कनकाळेश्वर मंदिर

मोमीनपुरा, बीड, ता. व जि. बीड

बीड शहराच्या प्राचीन आणि समृद्ध वारशाचे प्रतीक म्हणजे येथील बिंदूसरा नदीच्या पात्राजवळ विसावलेले कनकाळेश्वर मंदिर होय. हे भव्य जलमंदिर मध्ययुगीन भारतीय स्थापत्यकलेचा एक अद्भुत आविष्कार मानला जातो. हेमाडपंती आणि चालुक्य शैलीचा सुरेख संगम साधणाऱ्या या वास्तूची रचना तारकाकृती आहे. तलावाच्या मध्यभागी काळ्या पाषाणात उभे असलेले हे मंदिर अकराव्या ते तेराव्या शतकातील चालुक्य आणि यादव राजवटींच्या वैभवाची साक्ष देते. इतिहासाच्या अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार असलेल्या या मंदिराने परकीय आक्रमणात ‘खानकाह’ (सुफी प्रार्थना स्थळ) ते १९४८ च्या मुक्ती लढ्यानंतर ‘स्वतंत्र मंदिर’ असा संघर्षमय प्रवास पाहिला आहे.

ऐतिहासिक माहितीनुसार, देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य संपल्यानंतर १४व्या शतकात दख्खनवर परकीय आक्रमणे सुरू झाली. बीड शहर बहामनी, मुघल आणि नंतर निजामशाहीच्या ताब्यात गेले. या काळात अनेक हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली, परंतु कनकाळेश्वर मंदिराचे सौंदर्य आणि मजबूत बांधकाम पाहून आक्रमकांनी ते पूर्णपणे न पाडता त्याचा वापर स्वतःच्या धार्मिक कार्यासाठी करण्याचा निर्णय घेतला. मंदिराच्या मूळ गाभाऱ्याला धक्का न लावता, मंदिराच्या छतावर विटांची एक भिंत बांधण्यात आली. या छताचा वापर सुफी संतांचे निवासस्थान किंवा प्रार्थनास्थळ म्हणून केला जाऊ लागला, ज्याला फारसी भाषेत ‘खानकाह’ म्हणतात. यामुळे खालच्या भागात हिंदू वास्तुकला आणि वरच्या भागात इस्लामी वापर, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. याला ‘खानकाह देवल’ असेही म्हटले जाऊ लागले.

हैदराबादच्या निजाम राजवटीत या मंदिरावरील हिंदू हक्कांवर गदा आली. मंदिराचा ताबा पूर्णपणे मिळवण्यासाठी आणि हिंदू भाविकांना रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध लादण्यात आले. विशेषतः महाशिवरात्रीसारख्या मोठ्या उत्सवांवर आणि जत्रेवर बंदी घालण्यात आली. मंदिर असतानाही येथे पूजा करणे गुन्ह्यासारखे मानले जाऊ लागले. या अन्यायाविरुद्ध बीडमधील हिंदू समाजात असंतोष खदखदत होता. १९१५ साली पुरुषोत्तम गोडसे या तरुण क्रांतिकारकाने या अन्यायाला वाचा फोडली. महाशिवरात्रीच्या दिवशी निजामाचे पोलीस आणि कडक पहारा असतानाही, गोडसे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पोलिसांचे कडे तोडून मंदिरात प्रवेश केला आणि शिवपिंडीवर अभिषेक केला. हा केवळ धार्मिक विधी नव्हता, तर ती निजाम सत्तेविरुद्ध केलेली एक मोठी बंडखोरी होती. या सत्याग्रहाने मुक्तीच्या लढ्याची पहिली ठिणगी पडली. भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले, तरी हैदराबाद संस्थान स्वतंत्र राहिले होते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्ती लढा पेटला होता. अखेर भारतीय सैन्याने ‘पोलीस ॲक्शन’ केली आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. निजामाची राजवट संपताच कनकाळेश्वर मंदिरावरील ‘खानकाह’चा ताबा संपुष्टात आला. मंदिर पूर्णपणे मुक्त झाले आणि पुन्हा एकदा अधिकृतपणे हिंदू प्रार्थनास्थळ म्हणून घोषित करण्यात आले.

हे मंदिर अकराव्या शतकात चालुक्य राजा सहावा विक्रमादित्य याने बांधले असावे, असे बीड येथील स्थानिक इतिहास अभ्यासक डॉ. सतीश साळुंखे यांचे मत आहे. परंतु, तशा अर्थाचा कोणताही शिलालेख नसल्याने व मंदिराची रचना पाहता, हे मंदिर बाराव्या ते तेराव्या शतकातील असल्याचे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. एकंदरीत हे मंदिर आठशे ते हजार वर्षांपूर्वीचे असावे, यावर सर्व अभ्यासकांचे एकमत आहे. या मंदिराचे मूळ नाव ‘कनक काळ ईश्वर’ म्हणजे ‘सुवर्ण ईश्वर’ असे आहे. या मंदिराचा उल्लेख काही पुराणग्रंथांत आढळत असल्याचे येथील पुजारी सांगतात. मंदिरात पुराणकाळात ऋषीमुनींनी शिवाराधना केली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हे मंदिर २७८ फूट लांब व २५२ फूट रुंद पाण्याने भरलेल्या चौकोनी तलावाच्या मध्यभागी तारकाकृती आकारात आहे. चालुक्य आणि होयसळ मंदिरांचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा तारकाकृती तलविन्यास. कनकाळेश्वर मंदिर हे याच रचनेवर आधारित आहे. मंदिराचा बाह्य आकार साध्या चौकोनाऐवजी अनेक कोनांमध्ये बाहेर आणि आत वळणारा आहे. यामुळे मंदिराचा परीघ वाढतो आणि शिल्पकाम करण्यासाठी अधिक भिंत उपलब्ध होते. तारकाकृती रचनेमुळे दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी सूर्यप्रकाश भिंतींच्या विविध कोनांवर पडतो, ज्यामुळे येथील शिल्पकाम उठावदार दिसते. मंदिराभोवती असलेल्या तलावात उतरण्यासाठी चारही बाजूंनी कोरीव पाषाणात बांधलेल्या पायऱ्या आहेत. मंदिर बांधण्यासाठी दगड काढूनच या तलावाची निर्मिती करण्यात आली, असे सांगितले जाते. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तलावाच्या काठापासून सुमारे ६ फूट रुंद दगडी पूल आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी सुरक्षा कठडे आहेत. तलावाची भिंत व मंदिराच्या जोत्यापेक्षा पूल खाली असल्याने पुलाच्या दोन्ही टोकांना पायऱ्या आहेत. पावसाळ्यात तलावातील पाण्याची पातळी वाढते व पुलावर पाणी येते.

मंदिरासमोर वज्रपीठावर शिवपिंडी व नंदी आहेत. मुखमंडप, सभामंडप, मुख्य सभामंडप, तीन अंतराळ व तीन गर्भगृहे अशी रचना असलेले हे मंदिर सुमारे चार फूट उंच जगतीवर आहे. मुखमंडपात चढण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा कठडे आहेत. सुरक्षा कठड्यात देवकोष्ठके आहेत. मुखमंडपात चार नक्षीदार स्तंभ आहेत. चौकोनी स्तंभपादावर उभ्या असलेल्या स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. अष्टकोनी वितानावर मध्यभागी चक्राकार नक्षी आहे. स्तंभ, कणी, हस्त, तुळई व वितानावर विविध प्रकारची नक्षी व उठावशिल्पे कोरलेली आहेत. छतावर नव्याने उभारण्यात आलेला नगारखाना आहे. नगारखान्याच्या छतावर चारही बाजूंनी कठडा आहे. या कठड्याच्या चारही कोनांवर स्तंभ व स्तंभांवर कळस आहेत. कठड्यावर चारही बाजूंना बाशिंगे आहेत.

मुखमंडपाच्या पुढे अर्धखुल्या स्वरूपाचा आयताकार सभामंडप आहे. सभामंडपात बाह्य बाजूंनी कठडा आहे, तसेच भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपात सुमारे सोळा नक्षीदार स्तंभ आहेत. पुढे अष्टकोनी आकाराचा मुख्य सभामंडप आहे. मुख्य सभामंडपात आठ दिशांना एकूण सोळा नक्षीदार स्तंभ आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभावरील चौकोनी पटावर विविध प्रकारची संयुक्त नक्षी कोरलेली आहे, तर गोलाकार भागावर उभ्या धारेची नक्षी आहे. वरवर लहान होत जाणाऱ्या वर्तुळाकार रिंगणांनी येथील छत बनलेले आहे. त्यात विविध नक्षी कोरलेल्या आहेत. वितानावर मध्यभागी कमळपुष्पांची नक्षी आहे. मुख्य मंडपात वज्रपीठावर नंदीची मूर्ती आहे. ही मूर्ती नंतर बसवण्यात आली असावी व येथे मूळ रंगशिलेची रचना असावी, असे काही अभ्यासकांचे मत आहे. या मंडपाखाली एक गर्भगृह आहे. ते पाचशे वर्षांपासून बंद असल्याचे येथील पुजारी सांगतात.

मुख्य सभामंडपाच्या पुढे समोरील बाजूला एक, तसेच डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी एक, असे एकूण तीन अंतराळ व गर्भगृहे आहेत. मधल्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास पाच द्वारशाखा आहेत. द्वारशाखांवर खालील बाजूस द्वारपाल, द्वारपालिका, गंगा-यमुना, चौरी-चामरधारिका अशी शिल्पे आहेत. द्वारशाखांवर व्याल, पर्णलता, पुष्पलता, स्तंभनक्षी आहेत. ललाटबिंबावर गणेशशिल्प आहे. ललाटपट्टीत पानाफुलांची नक्षी तर उत्तरांगावर शिखरशिल्पांचे तोरण आहे. नक्षीदार मंडारकास चंद्रशिला आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पंचफणी नाग आहे. जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहात मागील भिंतीतील देवकोष्ठकासमोरील सज्जावर काचबंद मखरात गणेश, महादेव, लक्ष्मी, विष्णू, सरस्वती यांच्या आधुनिक पद्धतीच्या मूर्ती आहेत.

मुख्य सभामंडपाच्या डाव्या बाजूला दुसरे अंतराळ व त्यापुढे पंचशाखीय प्रवेशद्वार असलेले गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची रचना पहिल्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासारखी असली, तरी द्वारशाखांवर कमी शिल्पे व नक्षीकाम आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपीठावर मध्यभागी श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती आहेत. डाव्या बाजूला श्रीदत्तात्रेय, उजव्या बाजूला राधाकृष्ण आणि समोर विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. भिंतीतील उजव्या देवकोष्ठकात मारुती व डाव्या देवकोष्ठकात ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. सर्व मूर्ती आधुनिक काळातील आहेत.

मुख्य सभामंडपाच्या उजव्या बाजूला तिसरे अंतराळ व त्यापुढे गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची रचना डावीकडील गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या रचनेसारखीच आहे. गर्भगृहात वज्रपीठावर मारुतीची पर्वत उचलून धरलेली मूर्ती आहे. मंदिराच्या मंडोवरावर खालील बाजूस चौकट, पद्मपुष्प व कीर्तीमुख थर आहेत. मंडोवरावर श्रीविष्णूचे दशावतार, अष्टदिक्पाल, जैन तीर्थंकरांच्या दोन मूर्ती व लढवय्या स्त्रियांची शिल्पे आहेत. येथील लढवय्या स्त्रियांची शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण मानली जातात. या शिल्पांमध्ये स्त्रिया हातात ढाल-तलवार घेऊन शत्रूशी लढताना, घोडेस्वारी करताना आणि युद्धात सक्रिय सहभाग घेताना दाखवल्या आहेत. हे चित्रण चालुक्य काळातील स्त्रियांच्या सामाजिक दर्जाचे प्रतीक आहे. चालुक्य राजवटीतील राण्या (उदा. अक्कादेवी) स्वतः युद्धात भाग घेत असत, असे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत.

महाशिवरात्री, श्रावणी सोमवार व मकरसंक्रांत हे येथील मुख्य वार्षिक उत्सव आहेत. ते मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यावेळी देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी अनेक भाविक येथे येतात. या प्रसंगी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोमवार, गुरुवार, शनिवार, एकादशी, प्रदोष, पौर्णिमा, अमावास्या इत्यादी दिवशी भाविकांची विशेष गर्दी असते. मंदिराची रचना, शिल्पे व स्थापत्यशैली अभ्यासण्यासाठी अनेक अभ्यासक या मंदिराला भेटी देतात.

उपयुक्त माहिती:

  • बीड बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून बीडसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : प्रभाकर गुरव, पुजारी, मो. ९८६०६५२२५१, ९०९६६६८७९७

कंकालेश्वर मंदिर

मोमिनपुरा, बीड, ताल. और जिला. बीड

Back To Home