महारुद्र हनुमान संस्थान

हुतात्मा सर्कल, म्हापसा, जि. उत्तर गोवा

म्हापसा हे गोव्याच्या सीमेवरील एक व्यस्त शहर व व्यवसाय केंद्र आहे. येथील १६७४ साली बांधण्यात आलेले हिंदू आणि ख्रिश्चन बांधवांचे श्रद्धास्थान असलेले मिलाग्रेस चर्च प्रसिद्ध आहे. याशिवाय बोडगेश्वर मंदिर, टेकडीवरील दत्त मंदिर इत्यादी मंदिरे व शहरातील बस स्थानकाजवळ शुक्रवारी पहाटे भरणारा बाजार प्रसिद्ध आहे. आश्वेम आणि आरंबोलसारखे प्रसिद्ध समुद्र किनारे येथून जवळच असून शहरातील पारंपरीक खाद्य पदार्थ पुरवणारी काही प्राचीन दुकाने व हॉटेल्स प्रसिद्ध आहेत. याच म्हापसा शहरात प्रसिद्ध महारुद्र हनुमान मंदिर आहे. येथील जागृत हनुमान नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

समर्थ रामदास स्वामींनी बलोपासनेची परंपरा निर्माण केली. त्यासाठी त्यांनी देशभरात विविध ठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना केली. मठ निर्माण केले. समर्थांनी महाराष्ट्रात स्थापन केलेले अकरा मारुती प्रसिद्ध आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी त्यांनी हस्ते परहस्ते मारुतीच्या मूर्ती आणि मंदिरांची स्थापना केली. धर्माला चैतन्य अवस्था प्राप्त करून देण्यासाठी बलाची आवश्यकता आहे हे त्यांनी देशातील तरुणांना समजावले. त्यासाठी भारतभर भ्रमंती केली. असे सांगितले जाते की म्हापसा येथील महारुद्र हनुमानाची स्थापनाही समर्थ रामदास स्वामींनी केली होती. हे मंदिर सुमारे चारशे वर्षे प्राचीन असून सुमारे १८० वर्षापूर्वी मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता.

शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात, मुख्य रस्त्यालगत हे मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीवर सुबक नक्षीकाम केलेले आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन स्तंभशाखा व त्यांवर तोरण आहे. तोरणात मध्यभागी कीर्तीमुख आणि दोन्हीकडे पानाफुलांच्या नक्षी आहेत. येथील बंदिस्त स्वरूपाचा सभामंडप प्रशस्त असून त्यात प्रकाश व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्यबाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. सर्व स्तंभ स्तंभपादावर उभे असून स्तंभांच्या शीर्षभागी कणी आहेत. प्रत्येक रांगेतील स्तंभांवर अर्धचंद्राकार तोरणे आहेत. तोरणांवर विविध प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपात लहान मखरात राम व सीता यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात लोखंडी सुरक्षा कठडा लावून दर्शनरांगेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. येथील भिंतींवर विविध चित्रे व नक्षी आहेत. सभामंडपाच्या वितानावर चक्राकार नक्षी आहेत. पुढे स्टेनलेस स्टीलचे कठडे लावून अंतराळाची रचना केलेली आहे. अंतराळात मेजावर हनुमानाची काळ्या पाषाणातील उत्सव मूर्ती आहे. देवाच्या एका हातात गदा व दुसऱ्या हातात पर्वत आहे. दर्शनाला येणारे भाविक या मूर्तीवर तेल वाहतात.

पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत दीपकोष्टके आहेत. प्रवेशद्वाराला स्तंभशाखा असून स्तंभांवर नक्षीदार तोरण आहे. तोरणात मध्यभागी कीर्तीमुख आणि दोन्ही बाजूला पानफुलांच्या नक्षी आहेत. गर्भगृहात चांदीच्या वज्रपिठावर मारुतीची उभी मूर्ती आहे. देवास चांदीचा मुखवटा व मुकुट आहे. मूर्तीच्या मागे चांदीची नक्षीदार प्रभावळ आहे. वज्रपिठाच्या दोन्ही बाजूला पितळी दिवे लावले आहेत. गर्भगृहाच्या भिंतींवर चक्राकार नक्षी आहेत.

मंदिराच्या छतावर चोहोबाजूंनी बाशिंगी कठडा आणि तेथील बाशिंगांवर पुष्पनक्षी आहेत. छतावर चारही कोनांवर लघुशिखरे आहेत. या शिखरांच्या शीर्षभागी आमलक व आमलकावर कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. शिखराच्या सभोवतीने असलेल्या स्तंभांवर मंगल कलश आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक, कळस व ध्वजपताका आहे.

मंदिरात चैत्र पौर्णिमा हा हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. देवाला तेल व रुईच्या पानांच्या माळा वहिल्या जातात. मंदिरात लाकडी पाळणा सजवला जातो. पाळण्यात मारुतीची पितळी मूर्ती झोपल्या अवस्थेत ठेवून त्यास झोके देत पाळणे गायले जातात. यावेळी येथील नाट्यगृहात पाच नाटके व गवळणकाला सादर केली जातात. याशिवाय चैत्र शुद्ध अष्टमीला नुतन मूर्ती वर्धापनदिन, चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी उत्सव, दसऱ्याला पालखी सोहळा, कोजागिरी पौर्णिमा दीपावली आदी वर्षभरातील इतर सण व उत्सव साजरे केले जातात. या उत्सवकाळात मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, रामकथा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय शनिवार, मंगळवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात महारुद्र हनुमानाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • म्हापसा बस स्थानकापासून ५०० मीटर अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून म्हापसासाठी राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home