सुंदर समुद्र किनारे, डोंगर, दऱ्या, नद्या आणि किल्ले असलेले गोवा हे सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. भारतातील हे लहानसे राज्य सांस्कृतिक व धार्मिक दृष्ट्याही तितकेच महत्त्वाचे आहे. गोव्यातील नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिर, पणजीचे मारुती मंदिर, पोंडा येथील शांतादुर्गा मंदिर, मार्डोल येथील मंगेशी मंदिर, वॉलपोई येथील ब्रह्म मंदिर, बांदिवडा येथील नागेश मंदिर आदी अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत. याच गोव्यातील म्हापसा शहरातील बोडगेश्वरचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. येथील जागृत देव नवसाला पावतो व हाकेला धावून येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे देवस्थान सुमारे सातशे ते आठशे वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. प्राचीन काळी येथील जमीन दलदलीची होती. या जमिनीवर केवड्याचे घनदाट जंगल होते. कोंकणी भाषेत केवड्याला बोडगे म्हणतात. त्यामुळे या जागेस बोडगिणी आणि येथील राखणदार देवाला बोडगेश्वर हे नाव पडले. या भागात आपली गुरे घेऊन येणारे गुराखी, जंगली श्वापदे व अघोरी शक्तींपासून आपले रक्षण व्हावे म्हणून या रक्षक देवास दिवा लावून प्रार्थना करीत. पुढे याच ठिकाणी सन १९३४ साली बोडगेश्वराचे मंदिर उभारण्यात आले. हा देव रोज रात्री हातात मशाल व काठी घेऊन परीसरात फिरत असतो आणि आपल्या भक्तांचे रक्षण करतो, अशी भाविक व ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
पणजी म्हापसा रस्त्यावर बोडगिणी या गावात हे मंदिर आहे.
रस्त्यावर मंदिराची स्वागतकमान आहे. कमानीच्या सज्जावर मध्यभागी सहा स्तंभिकांवर गजपृष्ठ आकाराचे छत असलेली मेघडंबरी व मेघडंबरीच्या छतावर मध्यभागी मशालीची प्रतिकृती असलेले शिखर आहे. शिखराच्या दोन्ही बाजूला कळस आहेत. सज्जावर मेघडंबरीच्या दोन्ही बाजूला नंदी शिल्पे व त्यांच्या बाजूला असलेल्या मेघडंबरीत शिवपिंडी आहेत. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात मोठ्या चौथऱ्यावर पद्मफुलाच्या प्रतिकृतीत उभी आठ थरांची षटकोनी दीपमाळ आहे. दीपमाळेच्या प्रत्येक थरात सहा दीपकोष्टके आहेत. दीपमाळेच्या शीर्षभागी शिखर व त्यावर कळस आहे. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात तुलसी वृंदावन आहे. प्रांगणात काचबंद वज्रपिठावर बोडगेश्वराच्या पादुका आहेत. मंदिराच्या दोन बाजूला वड व औदुंबराचे वृक्ष आहेत. मंदिर प्रांगणापेक्षा उंच असून मंदिराच्या तिन्ही बाजूने नऊ टप्प्यांच्या रचनेचा चौथरा आहे. तीन दिशांना तीन मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. तिन्ही मुखमंडपांसमोर प्रत्येकी बारा पायऱ्या आहेत. मुखमंडपात समोरील बाजूला सिंह शिल्पे व दोन नक्षीदार स्तंभ आहेत. या स्तंभांवर तुळई व तुळईवर छत आहे. छताची मागील बाजू सभामंडपातील स्तंभांवर तोललेली आहे. सभामंडप पूर्णखुल्या स्वरूपाचा आहे.
सभामंडपात प्रत्येकी सहा स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडपटलावर विविध देवतांच्या मूर्ती व इतर नक्षी साकारल्या आहेत. प्रवेशद्वाराजवळील दोन स्तंभांवर अष्टविनायक शिल्पे आहेत.
सभामंडपाच्या छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. सभामंडपात मध्यभागी गर्भगृह आहे. गर्भगृहात वज्रपिठावर बोडगेश्वराची पूर्णाकृती उभी मूर्ती आहे. देवाच्या उजव्या हातात घुंगुरकाठी, डाव्या हातात मशाल, डोक्यावर फेटा, पायात वहाणा, खांद्यावर घोंगडी आणि कासेला धोतर आहे. मूर्ती चांदीच्या मखरात आहे. या मखरात दोन्ही बाजूला स्तंभांवर पद्मसुंदरी शिल्पे आहेत. मखरातील स्तंभांवर मयूर तोरण आहे. तोरणात मध्यभागी कीर्तीमुख व दोन्ही बाजूला पानाफुलांच्या नक्षी आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. बोडगेश्वराच्या मूर्तीच्या मागील बाजूला प्राचीन वृक्ष आहे. वृक्षाच्या भोवतीने सुरक्षा भिंती आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या मागील बाजूला पाच मखरांत सत्यनारायणाच्या पाच मूर्ती आहेत. येथे भाविकांना सत्यनारायण महापूजा करता येते. मंदिराच्या कौलारू छतावर चारही कोनांवर गरुड शिल्पे आहेत. मुखमंडपाच्या शिखरांवर कीर्तीमुख आहेत. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी रचनेचे शिखर व त्यातील चारही कोनांवर लघू शिखरे आहेत. शिखरात मध्यभागी मशालीची प्रतिकृती आहे.
जानेवारी महिन्यात बोडगेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. देवास आपापल्या कुलाचारानुसार मानपान व नैवेद्य केला जातो. जत्रोत्सवानिमित्ताने मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, प्रवचन, नृत्य, गायन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय मंदिरात वर्षभरातील इतर बरेच सण व उत्सव साजरे केले जातात. दर बुधवारी आणि रविवारी बोडगेश्वराच्या दर्शनासाठी गोव्यातील विविध शहरांतून हजारो भाविक येथे येतात. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवारी सकाळी ८ ते रात्री ९.३० पर्यंत भाविकांना बोडगेश्वराचे दर्शन घेता येते. बुधवार आणि रविवारी हिच वेळ सकाळी ८ ते रात्री १०.३० अशी असते.