गोमंतकातील देवीउपासकांतील शांतादुर्गा ही लोकप्रिय देवता. भगवान विष्णू आणि महादेव यांच्यातील महायुद्ध थांबवून विश्वात शांतता प्रस्थापित करणारी देवी म्हणून शांतादुर्गा देवीची पूजा केली जाते. कोकणात वारूळ स्वरूपात पूजली जाणारी व सप्तमातृकांपैकी एक मानली गेलेली सातेरी वा सांतेरी ही देवी म्हणजेच गोमंतकातील शांतादुर्गा. या देवीचे मूळ स्थान पूर्वी गोव्यातील जुवारी नदीकाठी केळोशी गावात होते. पोर्तुगीजांच्या जाचाला कंटाळून तेथून देवीची मूर्ती फोंडा भागातील कवळे या गावी हलवण्यात आली. पुढे स्थलांतरीत कुटुंबे गोव्यातील विविध भागात स्थिरावली व आपापल्या गावात त्यांनी आपल्या कुलदेवतेची म्हणजेच शांतादुर्गा देवीची स्थापना केली. आज गोव्यात शांतादुर्गा देवीची पन्नासहून अधिक प्राचीन मंदिरे असून त्यापैकीच वारखंड येथील हे माऊली शांतादुर्गा देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे.
सातेरी देवीच्या शांतादुर्गा या रुपाची नामस्पष्टिकरणात्मक पौराणिक आख्यायिक अशी की प्राचीन काळी शिव आणि विष्णु यांचे घनघोर युद्ध झाले. ते दोन सहस्त्र वर्षे चालले होते. विष्णुचे सुदर्शन आणि शंकराचे पशुपतास्त्र यांच्या खणखणाटाने सर्व भूमंडळ हादरून जात होते. या युद्धात विश्वाचा अंत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. युद्धामुळे या दोन्ही देवतांची पालन-संहाराची कार्ये अडून राहू लागली होती. हे पाहून अखेर ब्रह्मदेवाने आपल्या दिव्य तेजाने आदिशक्ती जगदंबा निर्माण केली. तिला भूतलावर पाठवून या दोन्ही देवांमध्ये सलोखा घडवण्यास सांगितले. त्यानुसार ही देवी समरभूमीवर आली व दोन्ही योद्ध्यांच्या मध्ये उभे राहून तिने त्यांना उपदेश केला.
‘स्कंद पुराणा’तील ‘अंबिका खंडा’नुसार देवीने त्यांना ब्रह्म तोच हरि व महेश्वर आहे, असा उपदेश केला. अशा प्रकारे देवीने युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित केली, म्हणून तिचे नाव शांतादुर्गा असे पडले.
असे सांगितले जाते की हे मंदिर सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचे आहे. ही देवता मूळ मिथिला येथील असून काही ब्राह्मण कुटुंबे कनकुब्ज येथून रामेश्वराच्या यात्रेला गेले. यातील देशवर्मा, लोकशर्मा आणि शिवशर्मा आदी ब्राह्मण परतीच्या वाटेवर गोव्याच्या भूमीत स्थिरावले व त्यांनी आपली कुलदेवता शांतादुर्गा देवीची येथे स्थापना केली. या मंदिराभोवती आवारभिंत आहे. या आवारभिंतीत असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिरासमोर चौथऱ्यावर तुलसी वृंदावन व पाच थरांची दीपमाळ आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडप प्रांगणापेक्षा उंचावर असून मुखमंडपाच्या चौथऱ्यास तिन्ही बाजूने पायऱ्या आहेत. मुखमंडपात समोरील बाजूला दोन नक्षीदार चौकोनी स्तंभ व स्तंभावरील तुळईवर घुमटाकार छत आहे. येथील बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रकाश व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूच्या भिंतींमध्ये प्रत्येकी दोन दरवाजे आहेत.
सभामंडपात असलेल्या मेघडंबरींमध्ये स्थानिक देवतांची पाषाणे आहेत. याशिवाय सभामंडपात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी व्यासपीठाची रचना केलेली आहे. सभामंडपात भिंतीलगत भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत.
पुढे अंतराळाचे सात द्वारशाखा प्रवेशद्वार आहे. अंतराळ सभामंडपापेक्षा उंचावर असल्यामूळे प्रवेशद्वारास दोन पायऱ्या आहेत. अंतराळात मध्यभागी गर्भगृह आहे. गर्भगृहात वज्रपिठावर श्रीशांतादुर्गा देवीची काळ्या पाषाणातील अष्टभुजा मूर्ती आहे. देवीच्या हातात त्रिशूल, खड्ग, ढाल, पाश आदी शस्त्रे आहेत. मूर्तीस चांदीचा मुखवटा व मुकुट आहेत. मूर्तीच्या मागील चांदीच्या प्रभावळीत मध्यभागी कीर्तीमुख असून दोन्ही बाजूला पानाफुलांच्या नक्षी आहेत. देवीच्या डोक्यावर चांदीचे छत्र टांगलेले आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे.
मुखमंडपाच्या छतावर घुमटाकार शिखर व शिखराच्या समोरील बाजूला कीर्तीमुख आहे. शिखरावर आडव्या ओळीत तीन कळस आहेत. अंतराळाच्या कौलारू चौकोनी छतावर शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर चारही कोनांवर चार मेघडंबरी आहेत.
मेघडंबरीच्या छतावर घुमटाकार लघूशिखरे व त्यावर कळस आहेत. छतावर मध्यभागी उंच चौकोनी घुमटाकार शिखर, त्यावर शीर्षभागी स्तूपिका व कळस आहे. मंदिराच्या बाजूला दारवळ, रवळनाथ, भुतनाथ, म्हारिंगण मंदिर, गावरहाटी, बाराचा पूर्वस, भावकाई देवी, बाराचा ब्राह्मण आदी मंदिरे आहेत. मंदिराच्या प्रांगणात सभागृहाची प्रशस्त इमारत आहे.
शारदीय नवरात्रोत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा असा सलग पंधरा दिवस हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. देवीची खणानारळाचे ओटी भरून साडीचोळी व सौभाग्य अलंकार अर्पण केले जातात. मार्गशीर्ष महिन्यात देवीचा वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. जत्रोत्सव, होळी, चैत्र पाडवा व दसरा हे देवीच्या पालखी सोहळ्याचे दिवस. यावेळी देवी पालखीत बसून ग्रामप्रदक्षिणेला निघते. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत नाचत गात हजारो भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होतात. वर्षभरातील इतर सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी असते.