गोवा तसेच कोकण प्रांतात पूजल्या जाणाऱ्या सातेरी देवीचे शांतादुर्गा हे एक रूप आहे. देवीच्या नावात दुर्गा देवीचे नाव असले, तरी येथे देवी सौम्य स्वरुपात विराजमान आहे. शैव आणि वैष्णव संप्रदायात समेट घडवून आणणारी, शिव आणि विष्णू यांच्यातील युद्ध थांबवणारी ही देवी गोव्यातील अनेकांची कुलदेवता आहे. डिचोलीतील या प्राचीन देवस्थानात शांतादुर्गेबरोबरच रवळनाथ ही गोमंतकातील शैव संप्रदायातील ग्रामदेवताही विराजमान आहे. या मंदिरात दर वर्षी ‘नवो सोमोर’ हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
धर्म-इतिहासानुसार, त्रिहोत्रपूर येथून शांतादुर्गा ही देवी गोव्यात आणण्यात आली. त्रिहोत्र हे नाव तैरभुक्ती या नावाचा अपभ्रंश आहे. मिथिला देशास प्राचीन काळी तेरभुक्ती असे म्हटले जात असे. सध्याच्या बिहार राज्यातील गंगेच्या उत्तरेकडील भागास तिरहूत क्षेत्र असे म्हणतात. येथून काही ब्राह्मणांनी ही देवी गोमंतकात आणली. ‘देवीकोश, खंड २’नुसार, कान्यकुब्ज प्रदेशातून (हल्लीचे उत्तर प्रदेशातील कनौज) काही सारस्वत रामेश्वरच्या यात्रेला गेले होते. तेथून परतताना वाटेमध्ये गोव्यात त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला आणि ते येथेच राहिले. देवशर्मा, लोकशर्मा आणि शिवशर्मा हे त्यांतील प्रमुख होते. त्यांनी गोव्यात देवीची स्थापना केली. यानंतर येथे देवीपूजनाची मोठी परंपरा निर्माण झाली.
गोव्याच्या लोकपरंपरेत डिचोली येथील शांतादुर्गा देवीस एक आगळे स्थान आहे. या देवीचा गोव्यात पुजल्या जाणाऱ्या सात भगिनींच्या कहाणीशी जवळचा संबंध आहे. याबाबतची लोककथा अशी की केळबाई, महामाया, शीतला देवी, मीराबाई ऊर्फ मिलाग्रेस, अजदीपा, मोरजाई आणि लइराई अशी या सात बहिणींची नावे आहेत.
तर खेतोबा उर्फ खेतलो हा त्यांचा भाऊ आहे. ही आठही भावंडे ऋषी अपत्ये होती. ती मूळची काशी क्षेत्रातील. तेथे त्यांच्यावर काही आपत्ती आल्याने ती तेथून निघाली व फिरत फिरत दक्षिणेत आली. घाटमाथ्यावरून चोर्ला हा घाट उतरून ती मोर्ले, गिरोडे, मावळींगे, लाटमबार्शे या मार्गे डिचोली येथे हत्तीवर बसून आली. येथील गावकरवाडा येथे त्यांनी शांतादुर्गा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर ही आठ भावंडे गावकरवाडा येथील देवस्थानात एक रात्र, एक दिवस थांबली. या भावंडांमध्ये दैवी शक्ती असल्याचे शांतादुर्गा देवीने ओळखले. देवीने त्यांचा रितसर पाहुणचार केला व नंतर त्यांना मये या गावी स्थायिक होण्यास सांगितले, अशी कहाणी सांगण्यात येते.
डिचोलीतील निसर्गरम्य परिसरात भव्य आवारामध्ये हे देवस्थान वसले आहे. आवारास मोठे सुशोभित महाद्वार आहे. त्यावरील देवळ्यांमध्ये मध्यभागी गणेशाची, तर त्याच्या दोन्ही बाजूंस लक्ष्मी आणि सरस्वतीच्या मूर्ती आहेत. त्यांच्या बाजूस दोन्ही बाजूंना खास गोमंतकीय पद्धतीचे वस्त्रप्रावरण ल्यालेल्या स्वागतिकांच्या दोन मूर्ती आहेत. येथून काही अंतरावर आणखी एक प्रवेशकमान आहे. या कमानीच्या दोन्ही स्तंभांनजीकही स्वागतिकांच्या मूर्ती आहेत. आत गेरूच्या रंगात रंगवलेले, गोमंतकीय स्थापत्यशैलीतील भव्य मंदिर उभे आहे.
मुख्य सभामंडप, दोन अर्धमंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या गर्भगृहावर बसक्या अष्टकोनी मनोऱ्याच्या आकाराचे व वर घुमट असलेले शिखर आहे. सभामंडपात समोरच्या भागात रंगमंच बांधलेला आहे. मध्यभागी एका काचेच्या कपाटात मोठी पितळी समई ठेवलेली आहे. सभामंडपातील स्तंभ गोलाकार आहेत, तर अर्धमंडपातील स्तंभ प्राचीन मंदिरांतील स्तंभांप्रमाणे कोरीव चौकोनाकार आहेत. या स्तंभांवर वैशिष्ट्यपूर्ण तरंगहस्त आहेत. मंदिरातील अंतराळ तुलनेने मोठ्या स्वरूपाचे आहे. यात रुंद चौकोनी स्तंभ असून ते कमानींनी एकमेकांना जोडलेले आहेत. छतावर मोठ्या पितळी घंटा, तसेच दिव्यांच्या काचेच्या हंड्या टांगलेल्या आहेत. गर्भगृहात संगमरवरी चौथऱ्यावर रोयण म्हणजे वारूळ स्वरुपातील देवीची प्रतिमा विराजमान आहे. वस्त्रप्रावरणे व पुष्पमालांनी सुशोभित केलेल्या या वारूळाच्या वरच्या भागावर देवीचा मोठा पितळी मुखवटा आहे. नाकात नथ, गळ्यात मोठे हार, कानात कुंडले, मस्तकी उंच मुकूट अशा प्रकारे येथे देवीस शृंगारण्यात आले आहे. वज्रपीठाच्या चार कोपऱ्यांत चार उंच पितळी समया आहेत. गर्भगृहाच्या मागील भिंतीतील देवकोष्ठकात देवीची पितळी अभिषेक मूर्ती विराजमान आहे.
देवस्थानाच्या प्रांगणात एका बाजूस रवळनाथाचे मोठे मंदिर आहे. उतरत्या छपराच्या या दुमजली मंदिरासमोर एक प्राचीन दीपस्तंभ आहे. याच प्रमाणे प्रांगणात सप्तमायेचे मंदिर आहे. एका चौथऱ्यावर नागदेवतेची देवळी आहे. या देवळीत श्रीराम-लक्ष्मण-सीता, गणेश यांच्या मूर्ती तसेच काही शिवपिंडी आहेत.
या देवस्थानात विविध सण व उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात साजरे केले जातात. त्यांतील नवरात्रोत्सव व ‘नवो सोमोर’ (नवा सोमवार) हे उत्सव विशेष महत्त्वाचे मानले जातात. नवरात्रोत्सवात देवीच्या या मंदिरास जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. विविध धार्मिक कार्यक्रम, होमहवन, भजन-कीर्तन यांबरोबरच येथे फुगडी स्पर्धा, गीतगायन यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. नवो सोमोर हा या देवस्थानातील वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक उत्सव आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या सोमवारी तो साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान शहरातून देवीची मोठी पालखी यात्रा काढली जाते. या मिरवणुकीस रात्री साडेदहाच्या सुमारास प्रारंभ होतो. ती दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात परत येते. अभिषेक, पूजा अनुष्ठान आदी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच या उत्सवात सुप्रसिद्ध गायकांच्या गायनाचा कार्यक्रमही आयोजित केला जातो. दिवंगत जितेंद्र अभिषेकी, रामदास कामत, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर, शौनक अभिषेकी, देवकी पंडित, अजित कड़कड़े यांसारख्या ख्यातकीर्त गायकांनी या उत्सवात हजेरी लावलेली आहे.