लक्ष्मी नरसिंह मंदिर

वेलिंग, ता. फोंडा, जि. उत्तर गोवा

नृसिंह वा नरसिंह हा भगवान विष्णूचा चौथा अवतार होय. या अवतारातील विष्णूच्या लक्ष्मीसोबतच्या मूर्ती भारतात प्राचीन काळापासून पूजल्या जातात. वेलिंग येथील लक्ष्मीनृसिंह मंदिर हे त्याचे एक लक्षणीय उदाहरण होय. येथे लक्ष्मीसोबतच्या सौम्य अवतारातील नरसिंहाची पूजा केली जाते. ही देवता मूळची प्राचीन शंखावली (सध्याचे शंखवाळ) या गावची. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात तेथून ती वेलिंग येथे स्थलांतरित झाली. आज येथे ‘शंख पिंग कुत्स’ गोत्रीय गौड सारस्वत ब्राह्मणांनी संस्थापिलेले लक्ष्मीनृसिंहाचे भव्य मंदिर उभे आहे.

लक्ष्मीनृसिंह हे विजयनगरच्या राजवंशाचे कुलदैवत होते. विजयनगरचा सम्राट बुक्कराय याच्या कारकिर्दीत इ.स. १३७० मध्ये गोवा विजयनगर साम्राज्याचा भाग बनले. सुमारे एक शतकभर येथे विजयनगरची सत्ता होती. या कालखंडात येथे लक्ष्मीनृसिंहाची उपासना रुढ झाली. शंखावली या गावात हे दैवत नरसू या नावाने प्रतिष्ठापित होते, असे पोर्तुगीज दप्तरखान्यातील कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. या दैवताच्या येथील स्थानाविषयी ‘देवभूमी गोमंतक’ या पुस्तकात अशी आख्यायिका आहे की शंखावलीमध्ये सांतेरी, ईश्वर, धारोजिसीणी, नारायण, भगवती, अजोशिणी (विजयादुर्गा), नरसू आदी देवतांचे उपासक असलेले सात गोत्रांचे ब्राह्मण राहात होते. काही काळानंतर कर्नाटक प्रांतातून नायक उपनामाचा एक सारस्वत ब्राह्मण त्याचे आराध्य असलेल्या नरसिंह शालिग्रामास घेऊन येथे आला. गावातील लोकांस त्याच्याविषयी पूज्यबुद्धी होती. त्या काळी शंखावली आणि शेजारील कुशस्थली (हल्लीचे कुठ्ठाळ) येथील गावकऱ्यांत सीमावाद होता. कुठ्ठाळच्या लोकांनी आपल्या शक्तीच्या जोरावर शंखावलीच्या सीमेचा बराचसा भाग आपल्या गावात सामील करून घेतला होता. या सीमावादाचा कायमचा निर्णय व्हावा यासाठी शंखावलीच्या ग्रामस्थांनी कर्नाटकातून आलेल्या ब्राह्मणास मध्यस्थीची विनंती केली. कुशस्थलीच्या ग्रामस्थांनीही त्याची मध्यस्थी मान्य केली. त्यावर त्या ब्राह्मणाने सांगितले की ‘मी परकी गृहस्थ. तुमची कागदपत्रे मला कशी कळणार? तेव्हा मी निर्णयाची अशी योजना केली आहे की या माझ्या झारीत पाणी भरून तिची धार या स्थलापासून लावीत जाईन. ती जेथे संपेल, तेथे गावची सीमा पुरी झाली असे समजावे.’ सर्वांनी या अटीस होकार दिला. तेव्हा त्या ब्राह्मणाने झारीतील पाणी अभिमंत्रित करून त्याची धार सुरू केली. कुशस्थलीचा बराचसा भाग शंखावलीत समाविष्ट होईपर्यंत ती संपेनाशी झाली. त्याचा हा निर्णय कुशस्थलीकरांना मान्य करावा लागला. परंतु त्या गावातील काही लोक रूष्ट झाले. एके दिवशी तो ब्राह्मण झोपलेला असताना काही लोकांनी रागाने त्याच्या देवदेवता गुपचूप तलावात फेकून दिल्या. आपल्या नरसिंह शालिग्रामाची पूजा केल्यानंतरच तो ब्राह्मण अन्नग्रहण करीत असे. तो शालिग्राम नाहीसा झाल्याने त्या ब्राह्मणाने अन्नत्याग केला. त्याचे उपोषण सुरू असताना एके दिवशी त्यास स्वप्नदृष्टान्त झाला. देवाने त्यास सांगितले, की समोरच्या तलावात बुडी मारून तुझ्या हाताला जे लागेल तो मीच आहे, असे समजून त्याची पूजा कर. त्यानुसार त्याने बुडी मारली असता, त्याच्या हातास सुमारे सव्वाहात लांबीचे एक पाषाणमय लिंग लागले. त्याची त्या ब्राह्मणाने नृसिंह समजून पूजा केली. नंतर नरसिंह शालिग्रामही सापडला. पुढे त्या ब्राह्मणाने सदर लिंगास नरसिंहावताराच्या कल्पनेस जुळेल असे स्तंभ हे नाव कल्पून त्यावरच आपल्या नरसिंह दैवताची स्थापना केली. या ब्राह्मणाचे गोत्र कौत्स व प्रवर शंख, पिंगल व कुस्त होते. तो पुढे शंखावलीकर या उपनामाने प्रसिद्धीस पावला.

पुढे सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात, १ मे १५६०च्या काही दिवस आधी, धर्मांध पोर्तुगीजांच्या क्रूर अनाचारामुळे शंखावलीतील हे दैवत स्थलांतरित करण्यात आले. शके १६४३ (इ.स. १७२१)मध्ये रचण्यात आलेल्या ‘कोकणाख्यान’ या ग्रंथातील ‘दैवतांचे स्थलांतर’ या अध्यायात या विषयी असे म्हटले आहे की ‘कुशस्थळी श्रीमंगेश प्रियोळी। वेरणे म्हाळसा म्हाडदोळी। शंखावळी देव दोन्ही स्थळी। केरी
आणि वेलिंगासी।। वेलिंगासी नरसिंह सांतेरी। विजयदुर्गा ते केरी माझारी । आणि केळोशीची शांतादुर्गा बरी। राहिली कवळे ते ग्रामी।।’ यावरून नरसिंहाची मूर्ती वेलिंग येथे आणण्यात आल्याचे स्पष्ट होते. कालांतराने येथे देवाचे भव्य मंदिर उभारण्यात आले. वेळोवेळी केलेले नूतनीकरण आणि जीर्णोद्धार यानंतर देवालयास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मंदिर एका प्रशस्त प्राकारात वसले आहे. काही पायऱ्या चढून, गोपुरासारख्या महाद्वारातून मंदिराच्या प्राकारात प्रवेश होतो. समोरच मंदिराची गोमंतक स्थापत्यशैलीत बांधलेली भव्य वास्तू उभी आहे. सभामंडप, अर्धमंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडप अर्धखुल्या स्वरुपाचा आहे. सभामंडपात समोरच्या दोन्ही बाजूस मोठ्या चौथऱ्यांवर तुलसी वृंदावने आहेत. सभामंडपात बाजूने कक्षासने आहेत. तेथून काही अंतर सोडून गोलाकार स्तंभांची रांग आहे. त्याच्या वरच्या बाजूस गॅलरी आहे. पाच पायऱ्या चढून अर्धमंडपात प्रवेश होतो. अर्धमंडपाच्या दर्शनी भिंतीच्या वरच्या बाजूस गॅलरीतील देव्हाऱ्यात गणेशाची मूर्ती विराजमान आहे. अर्धमंडपास नक्षीदार प्रवेशद्वार असून द्वारचौकटीच्या दोन्ही बाजूंना लाकडात कोरलेली मोठी व्यालशिल्पे आहेत. अर्धमंडपातील समोरच्या भिंतीवर, महामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना जय व विजय या वैष्णव द्वारपालांची शिल्पे आहेत. महामंडपाचे प्रवेशद्वार रुंदसर आहे व द्वारचौकटीवर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली आहे.

मंदिरातील महामंडपाची शोभा कोरीवकाम केलेले गोलाकार स्तंभ व त्यावरील तरंगहस्त, सज्जामध्ये लाकडी कोरीव देवकोष्ठकांत असलेली विविध देवदेवतांची काष्ठशिल्पे, छतास टांगलेल्या काचेच्या हंड्या आणि झुंबर यामुळे द्विगुणीत झाली आहे. येथील स्तंभांवर दशावताराची, तसेच विविध पौराणिक प्रसंगांची चित्रे कोरलेली आहेत. स्तंभांच्या शीर्षस्थानी गोलाकार भागात अनेक नागफण्यांचे चित्रण केलेले आहे. येथील देवतांची आणि पौराणिक प्रसंगांची काष्ठशिल्पेही मनोवेधक आहेत. हे शिल्पकाम पाहण्यासाठी येथे मंदिर अभ्यासक आणि पर्यटक आवर्जून येत असतात. महामंडपात मध्यभागी पितळेच्या मोठ्या समया ठेवलेल्या आहेत. महामंडपातून गर्भगृहास प्रदक्षिणा मार्ग आहे. अंतराळाचे प्रवेशद्वार सुंदरशा मखरासारखे आहे. त्यावर बारीक नक्षीकाम केलेल्या चांदीच्या पत्र्याचे आवरण आहे.

त्याच्या वरील भागात छोटे घुमटाकार शिखर आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस वैष्णव द्वारपाल आहेत. या मंदिरात एकूण तीन छोटी अंतराळे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासही चांदीचे नक्षीदार आवरण आहे. त्याच्या द्वारचौकटीवर वरच्या भागात कीर्तिमुख आहे. आत चांदीच्या उंच देव्हाऱ्यामध्ये उच्चासनावर लक्ष्मीनरसिंहाची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. येथे नरसिंह अलिढासनात असून त्याच्या वामांकावर लक्ष्मीदेवी विराजमान आहे. नरसिंहाच्या तसेच देवीच्या मस्तकी मुकूट आहे. दोन्ही देवतांचा एक हात अभयमुद्रेत आहे. नरसिंहाच्या वरच्या दोन हातांमध्ये शंख व चक्र धारण केलेले आहे. खाली सोडलेल्या पायाजवळ मोठी गदा आहे. मूर्तीच्या गळ्यात हार व कमरेत कमरपट्टा आहे. दैनंदिन अभिषेकानंतर मूर्तीस पितळी मुखवटा व चांदीचा मुकूट आदी आवरण घालून भरजरी वस्त्रालंकार व पुष्पमालांनी शृंगारले जाते. मूर्तीच्या समोर गरुड व हनुमंताच्या पंचधातूच्या छोट्या मूर्ती आहेत. दोन्ही बाजूंस पितळेच्या दोन नागमूर्तीही आहेत. देव्हाऱ्यात मागील वरच्या बाजूस देवकोष्ठकात पंचधातूची नृसिंहमूर्ती विराजमान आहे.

गर्भगृहावर खाली चौकोनाकार, त्यावर अष्टकोनी रचना आणि त्याच्यावर त्रिकोणाकृती पिरॅमिडसारखी रचना असलेले शिखर आहे. या त्रिकोणाकृती शिखरावर ताम्रपटाचे आवरण व त्यावर कलश आहे. देवालयाच्या प्राकारातील देवळ्यांत क्षेत्रपाल, तसेच चतुर्मुख ब्रह्मदेवाच्या पाषाणात कोरलेल्या मूर्ती आहेत. याच प्रमाणे येथे भांडारकर आणि नायक कुटुंबांच्या मुळपुरूषांची पाषाणलिंगरूपातील स्थाने आहेत. मंदिराच्या प्राकाराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली गोड्या पाण्याची रमणीय पुष्करणी. घडीव पायऱ्यांनी चारही बाजूंनी बंदिस्त असलेल्या या तलावाच्या भोवतीच्या भिंतीमध्ये अनेक दालने बांधलेली आहेत. समोरच्या बाजूला दोन छोटेखानी मंदिरे, त्यामध्ये चारही बाजूंनी कमानी असलेली गोलाकार रचना व त्यावर ध्वजस्तंभ, त्याच्या मागच्या बाजूला दोन कमानी आणि त्याही मागे मध्यभागी दुमजली इमारत असे हे देखणे वास्तुशिल्प आहे. या तलावात असलेल्या गोमुखातून वर्षाचे बाराही महिने जलप्रवाह पडत असतो. तलावाच्या मागच्या भागात दाट वृक्षराजी आहे.

या मंदिरात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीस रात्री शिबिकोत्सव होतो. याशिवाय येथील महत्वाचा उत्सव म्हणजे नरसिंह जयंती होय. हा उत्सव चार दिवस चालतो. यास येथे वैशाख पौर्णिमा उत्सव असे म्हणतात. येथे कार्तिक पौर्णिमेस नरसिंहाची मोठी जत्रा भरते. ही जत्रा आदल्या दिवशी सुरू होते. पौर्णिमेच्या दिवशी रात्री येथील तळ्यामध्ये देवाचा सांगोडविहार म्हणजे नौकाविहाराचा उत्सव असतो. त्यावेळी शोभेचे दारूकाम केले जाते. याच्या दुसऱ्या दिवशी येथे प्रतिपदेचा रथोत्सव असतो. वेलिंग येथे प्रथम देवाचे आगमन ज्या स्थानी झाले, त्या झाडाजवळ देवाचा विशिष्ट प्रकारचा रथ नाचवत नेला जातो. तेथे आरती झाल्यानंतर हा रथ पुन्हा देवालयात येतो. या नंतर माघ पौर्णिमेत चार दिवस उत्सव साजरा केला जातो. येथे येणारे भक्त व महाजन यांच्यासाठी अग्रशाळा असून प्रसादालयही आहे.

उपयुक्त माहिती:

  • फोंडा येथून ८ किमी आणि पणजी येथून २४ किमी अंतरावर
  • फोंडा येथून राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७७६७८५५२२३, ९४०४४३५७५६
Back To Home