श्रीदेवी लइराई संस्थान

शिरगाव, ता. डिचोली, जि. उत्तर गोवा

भारतातील अनेक राज्यांतील लोकधर्मात सप्तमातृका, सात आसरा, सात भगिनी यांना महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे. गोव्याच्या लोकपरंपरेतही सात भगिनींच्या पूजनास अनन्यसाधारण स्थान आहे. लइराई ही या सप्तभगिनींमधील एक देवता होय. या देवतेचे गोव्यातील मूळ देवालय शिरगाव येथे स्थित आहे. येथे सलग पाच दिवस चालणारा जत्रोत्सव सुप्रसिद्ध आहे. धगधगत्या कुंडातून चालत जाण्याचे धोंडांचे म्हणजे व्रतस्थ भक्तांचे अग्निदिव्य हे या जत्रेचे एक वैशिष्ट्य आहे. हे अग्निदिव्य पाहण्यासाठी येथे दरवर्षी हजारोंची गर्दी जमते.

गोव्यातील लोककथांनुसार, केळबाई, महामाया, शीतला देवी, मीराबाई ऊर्फ मिलाग्रेस, अजदीपा, मोरजाई आणि लइराई अशी या सात बहिणींची नावे आहेत. तर खेतोबा उर्फ खेतलो हा त्यांचा भाऊ आहे. गोव्यातील कृषी संस्कृतीत एकरूप झालेल्या कष्टकरी बहुजन समाजाच्या या देवता आहेत. त्यांची आख्यायिका अशी की ही आठही भावंडे ऋषी अपत्ये होती. ती मूळची काशी क्षेत्रातील. तेथे त्यांच्यावर काही आपत्ती आल्याने ती तेथून निघाली व फिरत फिरत दक्षिणेत आली. घाटमाथ्यावरून चोर्ला हा घाट उतरून ती मोर्ले, गिरोडे, मावळींगे, लाटमबार्शे या मार्गे डिचोली येथे हत्तीवर बसून आली. त्याकाळी गोव्यात कदंब राजघराण्याची सत्ता होती. डिचोली येथे ती देवी शांतादुर्गेकडे पाहुणचारासाठी थांबली. या भावंडांमध्ये दैवी शक्ती असल्याचे शांतादुर्गा देवीने ओळखले.

शांतादुर्गा देवीने त्यांचा पाहुणचार केल्यानंतर त्यांना मये या गावी स्थायिक होण्यास सांगितले. त्या सूचनेवरून ही भावंडे मये गावच्या वडणे या ठिकाणी आली. येथे त्यांनी विश्रांती घेतली. त्या स्थानाला आज ‘सात मायेची बसका’ असे म्हणतात. या ठिकाणी त्यांच्या कहाणीला एक वेगळे वळण लागले. या भावंडांमध्ये केळबाई ही सर्वांत थोरली. एके दिवशी तिने स्वयंपाकाकरीता अग्नी आणण्याकरीता खेतोबास गावात पाठवले. खेतोबाचे वय लहान. गावातील मुले काही खेळ खेळत होती. तो त्यांच्यातच रमला. बराच वेळ झाला तरी तो परत येईना तेव्हा केळबाईने त्याला बोलावण्यासाठी लईराईला पाठवले. लइराई गावात पोचली तेव्हा खेतोबा तेथे मुलांमध्ये खेळत बसलेला होता. ते पाहून लईराईला राग आला. तिने खेतोबाच्या कंबरेत लाथ घातली. त्यामुळे खेतोबा चिडला व तेथून निघून तो वायंगिणी येथे गेला. काही वेळाने लईराईला आपल्या वर्तनाचा पश्चात्ताप झाला. त्याचे प्रायश्चित्त भोगण्यासाठी ती शिरगावात येऊन राहिली. या ठिकाणी तिने अग्नीवरून चालण्याचे दिव्य केले. कहाणीतील या प्रसंगाची स्मृती म्हणून आजही लइराई देवीचे धोंड निखाऱ्यावरून चालण्याचे अग्निदिव्य करतात.

या देवीचे मूळ स्थान शिरगावातील मुड्डी येथे होते. त्या ठिकाणी तिची वारूळ स्वरूपात पूजा केली जात असे. ‘देवीकोश’कार प्रल्हाद कृष्ण प्रभुदेसाई यांनी देवीकोशाच्या खंड-२ मध्ये दिलेल्या माहितीनुसार, याचे उल्लेख देवीविषयीच्या काही लोकगीतांत आढळतात. एका लोकगीतात ‘चिरे तव नेती मुड्डेवरी’ अशी ओळ आहे. याचा अर्थ ‘तुझी वस्त्रे डोंगरावरील मूळ स्थानाला नेतात’ असा होता. यावरून देवीचे मूळ स्थान डोंगरावर होते व नंतर ते पायथ्याला स्थापन करण्यात आले. शिरगावातील मुख्य ठिकाणी बांधलेल्या मंदिरात आज देवीचे कलश रुपात पूजन केले जाते. लइराई ही देवी उग्र प्रवृत्तीची मानली जाते. याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की एके काळी शिरगावमध्ये गुड्डू रवळू नावाचा श्रीमंत जमीनदार राहात असे. एकदा त्याच्या कुटुंबाने लइराई देवीची पूजा केली. परंतु ही पूजा त्याने कुटुंबातील व्यक्तींच्या हातून न करता, घरातील मोलकरणीच्या हातून केली. त्यामुळे देवीचा अवमान झाला. देवी संतापली व तिने गुड्डू रवळूला शाप दिला. त्या शापाने त्याची जमीनदारी गेली. त्याच्या कुटुंबाची वाताहत झाली. भाविकांची अशी श्रद्धा आहे की देवी पूजनाच्या सर्व परंपरा मनोभावे पाळून तिची पूजा केल्यास देवी आपल्या मनोकामना पूर्ण करते.

शिरगावात पूर्वी देवीचे छोटे मंदिर होते. ३० वर्षांपूर्वी येथे देवीचे भव्यतम असे नूतन मंदिर उभारण्यात आले. माघ कृष्ण दशमी, ता. २४ फेब्रुवारी १९९५ रोजी या मंदिरात देवीचा पुनःप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. गोमंतकीय वास्तुशैलीत हे मंदिर उभारण्यात आले आहे. सभामंडप, अर्ध सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. गावातील चढावावरील भागात उंच अधिष्ठानावर बांधलेल्या या मंदिरासमोर प्रशस्त ओटा आहे. तेथून सात अर्धगोलाकार पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या छतावर नागर स्थापत्य शैलीतील भव्य शिखर आहे. सभामंडप अत्यंत प्रशस्त व खुल्या प्रकारचा आहे. त्यात दोन्ही बाजूंनी कक्षासने आहेत. तेथून डाव्या व उजव्या बाजूंस काही फूट अंतरावर अष्टकोनी स्तंभांची रांग आहे. सभामंडपातून तब्बल १६ पायऱ्या चढून अर्ध सभामंडपात प्रवेश होतो. या अर्धमंडपातून मंदिराच्या मुख्य सभामंडपाच्या चौकातील सज्जामध्ये जाण्यासाठी जीने काढण्यात आले आहेत. या पुढेही आणखी एक बंदिस्त अर्धमंडप आहे. त्यातील मधल्या चौकाच्या वरच्या भागात असलेल्या सज्जावरील देवळ्यांत विविध देवी-देवतांच्या छोट्या मूर्ती आहेत. या पुढे आणखी एक अर्धमंडप आहे. त्याच्या प्रवेशद्वाराच्या उत्तरांग भागात लक्ष्मीमातेची मूर्ती आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना गजराज आहेत. याच प्रमाणे या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना जय आणि विजय हे वैष्णव द्वारपाल आहेत.

या पुढे मंदिराचे अंतराळ आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीभोवती नक्षीदार अर्धस्तंभ आणि कमानीची सजावट करण्यात आली आहे. या द्वारचौकटीच्या वरच्या भागात समुद्रस्थित विष्णूची मूर्ती आहे. या मूर्तीवर सप्तमुखी शेषाने फणा धरलेला आहे, तर बाजूला दोन ऋषींच्या नमस्कार मुद्रेतील मूर्ती आहेत. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस देवळ्या आहेत. त्यातील डावीकडील देवळीत विष्णूमूर्ती आहे, तर उजवीकडील देवळीत गणेशमूर्ती विराजमान आहे. मंदिराच्या गर्भगृहास नक्षीदार चांदीचा पत्रा जडवलेले प्रवेशद्वार आहे. आत उंच संगमरवरी वज्रपीठावरील सोनेरी मखरात कलशस्वरूपातील देवीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या देवीस मोगऱ्याची फुले अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे जत्रेच्या दिवशी देवीस अर्पण केलेल्या मोगऱ्यापैकी एक फूल या कलशामध्ये ठेवतात. ते पुढच्या जत्रेच्या वेळीच काढतात. विशेष म्हणजे या जत्रेच्या वेळी म्हापसा येथील अवर लेडी ऑफ मिलाग्रेस चर्चतर्फे लइराई देवीस प्रिय असलेली मोगऱ्याची फुले अर्पण केली जातात. असे सांगितले जाते की मिलाग्रेस सायबीण ही लइराई देवीची बहिण आहे. लइराई मंदिराच्या गर्भगृहावर बसक्या मनोऱ्याच्या आकाराचे भव्य शिखर आहे. याच्या वरच्या बाजूस मोठा घुमट असून त्यावर कळस आहे.

श्रीदेवी लईराईची येथील जत्रा ही उत्तर गोव्यातील एक मोठी जत्रा गणली जाते. वैशाख शुद्ध पंचमीला ही भरते. लईराईने केलेल्या अग्निदिव्याची स्मृती म्हणून मंदिरासमोरील ओट्यावर सुमारे १५ बाय १५ फुटांचे होमकुंड तयार केले जाते. त्यात देवीचे धोंड म्हणजे व्रतस्थ भक्त अग्निदिव्य करतात. याबाबत अशी माहिती देण्यात येते की सर्व धोंड अग्निदिव्याची तयारी सुमारे आठवडाभर आधी, वैशाख शुद्ध प्रतिपदेपासून सुरू करतात. या काळात ते कुटुंबीयांपासून दूर राहतात, उपवास करतात. यात्रेच्या आदल्या दिवशी कौलप्रसाद मिळाल्यावर ते होमकुंडात प्रवेश करू शकतात. मुड्डी येथील देवीच्या लहान मंदिरातील आदिस्थानावर नव्या धोंडांना मान्यता दिली जाते. आदिस्थानावरून देवीची पालखी रात्री आठ वाजता देवालयात परत येते. रात्री साडेबाराच्या नंतर होमकुंड प्रज्वलित केले जाते. पवित्र तळीमध्ये (तळ्यात) स्नान करून धोंड आल्यानंतर अग्निदिव्यास सुरूवात होते. पहाटेपर्यंत हा दिव्याचा निखाऱ्यांवरून चालण्याचा कार्यक्रम चालतो. या जत्रोत्सवास हजारो भाविक उपस्थित असतात. या शिवाय मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने व धुमधडाक्यात साजरा केला जातो. त्याच प्रमाणे अन्य हिंदू सण व उत्सवही येथे धार्मिक वातावरणात साजरे केले जातात.

उपयुक्त माहिती:

  • डिचोली येथून ९ किमी अंतरावर
  • डिचोली येथून राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home