शांतादुर्गा मंदिर

अमरावती, अमोना, ता. डिचोली, जि. उत्तर गोवा

उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यात येणारे अमोना हे गाव प्राचीन काळापासून कृषी व व्यापार केंद्र होते. मांडवी नदीच्या काठावर हे गाव वसले असून येथे जमिनीखाली गाडला गेलेला प्राचीन किल्ला असल्याचे पुरातत्त्व विभागाचे म्हणणे आहे. या भागात दळणवळणाची व जलवाहतुकीची साधने पूर्वापार उपलब्ध होती. त्यामुळेच आर्य काळापासून अनेक राज्यकर्त्यांनी या भागावर आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. येथील प्राचीन मंदिरांमध्ये आजही प्राचीन काळातील ढाली व तलवारी दिसून येतात. याच गावात शांतादुर्गा देवीचे एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. ही देवी जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

हे मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. याबाबत अख्यायिका अशी की देवीचे मूळ मंदिर केलोशी गावात होते. पोर्तुगीज राजवटीत अनेक हिंदू मंदिरांना धोका निर्माण झाल्यानंतर तेथील गावकऱ्यांनी आपल्या पूज्य देवतांच्या मूर्ती डोक्यावर घेऊन उत्तर गोव्यात सावंतवाडीच्या हिंदू राजांच्या राज्यात आश्रय घेतला. तेथेच आपल्या देवतांची त्यांनी स्थापना केली. पुढे आणखी स्थलांतर झाल्यानंतर प्रत्येक समूहाने आपापल्या वस्तीच्या ठिकाणी आपल्या कुलदेवतांची व इष्ट देवतांची मंदिरे स्थापन केली. अमोना मधील शांता दुर्गा मंदिर त्यापैकीच एक आहे.

गावापासून जवळच असलेले हे मंदिर रस्त्यालगत आहे. मंदिराच्या प्रांगणाभोवती असलेल्या तटबंदीत साधेसे प्रवेशद्वार आहे. अलीकडील काळात झालेल्या जिर्णोद्धारानंतर जुन्याच आकृतीबंधात असलेल्या मंदिरास नाविन्याची झळाळी प्राप्त झालेली आहे. मंदिरासमोर प्रांगणात चौथऱ्यावर दीपमाळ आहे. दीपमाळेचा खालील अर्धा भाग हा सात थरांच्या उतरत्या पायऱ्यांची रचना असलेला, अष्टकोनी आणि वरील अर्धा भाग अष्टकोनी स्तंभासारखा आहे. दीपमाळेच्या वरील अर्ध्या भागात वीस दीपकोष्टके आणि शीर्षभागी स्तूपिका आहे. प्रांगणात तटबंदीला लागून लहान लहान देवळ्या आहेत. त्यात स्थानिक देवतांच्या पाषाण मूर्ती आहेत. प्रांगणात डाव्या बाजूला इतर वास्तू आहेत. त्यात पुजारी व सेवेकऱ्यांची निवासस्थाने, देवस्थानचे कार्यालय व भांडारगृह आहे.

मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. मुखमंडपाच्या विशाल प्रवेशद्वारास नक्षीदार लोखंडी जाळीदार झडपा आहेत. पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात कठडे आहेत व त्याशेजारी भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबस्थानी स्वस्तिकाचे मंगल चिन्ह कोरलेले आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. या झडपांवर प्रतिहारी द्वारपाल व पुष्पनक्षी कोरलेल्या आहेत. अंतराळ बंदिस्त स्वरूपाचे असून पुरेसा प्रकाश व हवा येण्यासाठी तेथील भिंतींमध्ये वातायने आहेत. अंतराळात मध्यभागी अष्टकोनी रचनेचे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी स्तंभांवर लाकडी सज्जा व सज्जावर तोरण आहे. या तोरणावर लक्ष्मी, गणपती व सरस्वती यांची शिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत.

गर्भगृहात वज्रपिठावर शांतादुर्गा सातेरी देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या मागील दोन हातात त्रिशूल व डमरू आहे. देवीच्या पुढील एका हातात पानपात्र व दुसरा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. देवीच्या मागील पाठशिळेतील एका बाजूच्या स्तंभांवर सिंह व दुसऱ्या बाजूच्या स्तंभावर शक्ती शिल्प कोरलेले आहे. स्तंभांवरील तोरणात पानाफुलांच्या नक्षी व मध्यभागी कीर्तीमुख आहे. विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या देवीच्या डोक्यावर मुकुट आहे. ही देवीची मूर्ती चांदीच्या मखरात आहे. या मखरात गजतोरण व पानाफुलांच्या नक्षी आहेत. मूर्तीच्या मागील चांदीच्या प्रभावळीत पानाफुलांची नक्षी व वरील बाजुस मध्यभागी कीर्तीमुख आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे.

सभामंडपाचे छत वर खाली असे दोन भागात विभागलेले आहे. गर्भगृहाच्या छतावर दोन थरांचे अष्टकोनी शिखर आहे. शिखराच्या खालील थरात आठ दिशांना आठ वातायने आहेत. वरील थर, वर निमुळता होत गेलेला आहे. त्याच्या शीर्षभागी स्तूपिका व कळस आहे. या मंदिरापासून जवळच वेताळ देव व महादेव यांची मंदिरे आहेत.

कार्तिक पौर्णिमा दिवज्योत्सव (दीपोत्सव) हा येथील मुख्य उत्सवांपैकी एक महत्त्वाचा उत्सव आहे. यावेळी गावातील सर्व कुलपुरुष मंदिरातून दीप प्रज्वलीत करून देवीच्या मंदिरात आणले जातात. यावेळी अनेक नवदांपत्य देवीच्या दर्शनासाठी येतात तर इतर सुवासिनी मंदिरात दीप प्रज्वलन करण्यासाठी येतात. शारदीय नवरात्र, चैत्र पाडवा, दसरा दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, श्रावण मास आदी सर्व सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात.

उपयुक्त माहिती:

  • डिचोली येथून १७ किमी, तर पणजी येथून २४ किमी अंतरावर
  • डिचोली येथून राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : अच्युत गावकर, अध्यक्ष, मो. ९८२३५५२२३४,
  • शेखर गावकर, सचिव, मो. ८०८०४५४९६२
Back To Home