रोममधील व्हॅटिकन सिटीनंतरचे जगातील सर्वांत श्रीमंत देवस्थान म्हणजे तिरुमला तिरूपती देवस्थान होय. हे मंदिर देशातील लक्षावधी बालाजी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. तिरुपती बालाजीच्या गोमंतकातील भक्तांना येथेच देवदर्शन घेता यावे, या हेतूने काही वर्षांपूर्वी कुंकेळी येथे हे गोमंतक तिरूपती बालाजी मंदिर स्थापन करण्यात आले. बालाजीस समर्पित असलेल्या या देवस्थानात देवी पद्मावती आणि गणेशाचेही मंदिर आहे. गोमंतकीय आणि दक्षिण भारतीय मंदिर स्थापत्यशैलीच्या संगमातून बांधण्यात आलेल्या या मंदिरात तालुक्यातील असंख्य बालाजी भक्त दर्शनासाठी येत असतात.
बालाजी देवाबाबत आख्यायिका अशी की सत्य युगात ऋषी मुनींच्या तपाचे फळसंचित कोणत्या देवाला द्यावे, याबाबत परीक्षा घेण्याकरिता भृगू ऋषी विष्णूकडे गेले. देवाची परीक्षा घेण्यासाठी भृगू ऋषींनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली.
तेव्हा विष्णूच्या हृदयात वास करणारी लक्ष्मी रागावून देवलोक सोडून पृथ्वीवर आली. विष्णूने भृगू ऋषींच्या पायाला श्रम पडले म्हणून त्यांचे पाय कुरवाळले व त्यांच्या पायाला असलेल्या गर्वाच्या डोळ्याचा नाश केला. तेव्हा भृगू ऋषींनी सर्व संचितफळ विष्णूला अर्पण केले व कलियुगात पृथ्वीवर प्रत्येक याचकाच्या इच्छा तू पूर्ण करशील, असा आशीर्वाद दिला. त्यानंतर विष्णू पृथ्वीवर बालाजी रूपात स्थापित होऊन भक्तांच्या इच्छा पूर्ण करू लागला.
गोव्यामध्ये प्राचीन काळापासून वैष्णव भक्तीची परंपरा आहे. येथे लक्ष्मीनारायणाची अनेक मंदिरे आहेत. येथील माध्व वैष्णव संप्रदायातील सारस्वतांत त्याच प्रमाणे कऱ्हाडे ब्राह्मणांत अनंत चतुर्दशी हे विष्णूचे विशेष व्रत केले जाते. महाराष्ट्र-गोव्यात पूजला जाणारा पंढरपूरचा विठ्ठल आणि तिरुपतीचा वेंकटेश हे दोन्ही समधर्मी देव आहेत. दोघेही विष्णुरूप पावलेले आहेत. ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या अभ्यासपूर्ण ग्रंथात थोर संशोधक रा. चिं. ढेरे यांनी असे नमूद केले आहे की विठ्ठल हा बाळकृष्ण मानला जातो, तर वेंकटेश हा बालाजी या नावाने ओळखला जातो. विठ्ठलाची पत्नी राधेचे निमित्त सांगून दिंडीरवनात रुसून बसलेली, तर वेंकटेशाची पत्नी भृगूने केलेला अपमान पतीने सोसल्यामुळे चिडून प्रथम करवीरात आणि नंतर तिरूचानूरमध्ये वेगळी राहिलेली.
वेंकटेश हा विठ्ठलाप्रमाणेच शस्त्रहीन, मौनी आहे आणि डावा हात कटीवर ठेवून, उजव्या हाताने भक्तांना वरप्रदान करीत आहे. गोमंतकातील या मंदिरात तिरुपती बालाजी मंदिरातील मूर्तीप्रमाणेच बालाजीची वरप्रदान स्थितीतील मूर्ती विराजमान आहे.
कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या आशीर्वादाने २००१मध्ये येथे या मंदिराची स्थापना करण्यात आली. श्रीमती जयंती एसवंता सिनाई कुंडाईकर यांनी त्यांच्या दिवंगत माता-पित्याच्या स्मरणार्थ गोव्यातील ‘श्री कांची कामकोटी पीठम् चॅरिटेबल ट्रस्ट’ला दान दिलेल्या १४ हजार चौरस मीटर परिसरात हे मंदिर वसले आहे. मंदिराच्या हिरवळीने आच्छादिलेल्या प्रशस्त प्रांगणास मोठे प्रवेशद्वार आहे. त्याच्या छतावरील देवकोष्ठकात मध्यभागी तिरूपती बालाजी, डावीकडे देवी पद्मावती आणि उजवीकडे गणेशाची मूर्ती आहेत. मंदिरासमोर एका चौथऱ्यावर बलीपीठम् आहे. त्यापुढील चौथऱ्यावर सोनेरी मुलामा दिलेला धातूचा उंच ध्वजस्तंभ आहे. येथून काही अंतरावर गोमंतकीय स्थापत्य शैलीत बांधलेला मंदिराचा सभामंडप आहे. अनेक चौकोनाकार स्तंभ, त्यावर मध्यभागी समतल आणि दोन्ही बाजूंनी उतरते छप्पर असे या सभामंडपाचे स्वरूप आहे. यापुढे उपमंडप आणि गर्भगृह आहे. गर्भगृहावर दाक्षिणात्य स्थापत्यशैलीतील शिखर आहे. शिखरावर घुमटाकार आमलक व कलश आहे. शिखरावर चारही बाजूंनी विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या सभामंडपात मोठ्या देवळीमध्ये विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाची मूर्ती आहे. सभामंडपातून गर्भगृहास प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहास चांदीच्या नक्षीदार पत्र्याने मढवलेले प्रवेशद्वार आहे. त्यावर दशावतार कोरलेले आहेत. आत चांदीच्या कमलपुष्पावर तिरुपती बालाजीची कृष्ण पाषाणातील उंच उभी, वरदमुद्रेतील मूर्ती प्रतिष्ठापित आहे.
तिरूमला तिरुपती देवस्थानकडून दान स्वरूपात प्राप्त झालेल्या या मूर्तीच्या मस्तकी मुकुट, कानांत कर्णफुले, खांद्यावर नाग आहे. गळ्यात वैजयंतीमाला आहे. वरील दोन हातांमध्ये पांचजन्य शंख व सुदर्शन चक्र आहे. एक हात वरप्रदान करणारा, तर एक हात कटेवर आहे.
मूर्ती विविध वस्त्रालंकारांनी, तसेच पुष्पमालांनी शृंगारलेली आहे. मूर्तीच्या कपाळापासून डोळ्यांपर्यंत शुद्ध कापराच्या इंग्रजी व्ही आकाराच्या पट्ट्या लावलेल्या आहेत. यामुळे मूर्तीचे नेत्र नेहमी बंद असतात. याबाबत असे सांगितले जाते की बालाजीचे नेत्र नेहमी उघडे असतात. या तेजस्वी नेत्रांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्या ऊर्जेने संपूर्ण विश्व भाजून निघण्याची शक्यता असते. त्यामुळे एरव्ही ते विशिष्ट प्रकारचा कापूर लावून बंद केलेले असतात. या विषयी आणखी एक स्पष्टिकरण असे देण्यात येते की बालाजीचे पद्मनयन अत्यंत सुंदर असतात. ते उघडे ठेवल्यास ते नेत्र पाहून भाविक एवढे भारावून जातील की तेथून निघण्याचे नावच घेणार नाहीत. म्हणून ते झाकले जातात. केवळ नेत्रदर्शनाच्यावेळी तो कापूर बाजूला काढला जातो. त्यावेळी बालाजीचे नेत्र भाविकांना पाहता येतात. उंच चंदेरी मखरात ही मूर्ती विराजमान आहे. या मखराचे स्तंभ आणि तोरण यांवर बारीक नक्षीकाम केलेले आहे. त्याच्या ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख कोरलेले आहे. देवमूर्तीच्या समोर अनेक समया तेवत असतात. या मंदिराच्या गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवरील देवकोष्टकांत विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत.
मंदिराच्या प्रांगणातील अन्य दोन महत्त्वाची मंदिरे म्हणजे बालाजी-पत्नी पद्मावती आणि सर्व विघ्नांचा हर्ता असलेला गणेश यांची मंदिरे. पद्मावतीचे मंदिर उंच जगतीवर बांधलेले आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडप खुल्या प्रकारचा आहे. त्याच्या दर्शनी भागात छतावरील देवकोष्टकात देवी पद्मावतीची मूर्ती आहे. गर्भगृहात चांदीच्या प्रभावळीत चांदीच्या कमलासनावर बसलेल्या पद्मावती देवीची कृष्ण पाषाणातील मोठी मूर्ती विराजमान आहे. देवीस चांदीचे हात व मस्तकी चांदीचा मुकूट आहे. देवीची ही मूर्तीही तिरूमला तिरुपती देवस्थानकडून दान स्वरूपात प्राप्त झाली आहे. पद्मावती देवीच्या मंदिराप्रमाणेच येथील गणेश मंदिराची रचना आहे. मंदिराच्या सभामंडपाच्या छतावरील देवकोष्टकात गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात गणेशाची काळ्या पाषाणातील विशालकाय मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या मूर्तीस चांदीचे कान, दात व हात आहेत. मंदिर परिसरात शंकर मठाची मोठी इमारत आहे.
या मंदिरात दीपावली, तुलसी विवाह, वैकुंठ एकादशी, धनुर्मास पूजा, कोजागरी, तसेच नवरात्र आदी सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. अश्विन महिन्यात साजरा होणारा ‘नवरात्र ब्रह्मोत्सव’ हा येथील एक महत्त्वाचा उत्सव असतो. या काळात अभिषेक, विष्णू सहस्रनाम पारायण, ललिता पंचमी पूजा, कुमारिका पूजा आदी धार्मिक कार्यक्रम केले जातात. सप्तमीस सायंकाळी बालाजीचा गरुडवाहन रथोत्सव तर अष्टमीस सायंकाळी बालाजी रथोत्सव आयोजित केला जातो. या उत्सवास परिसरातील हजारो भाविक उपस्थित असतात.