कोकण भूमीत राखणदारास विशेष महत्त्व आहे. ही भैरव कुळातील स्थान देवता असून क्षेत्राचे रक्षण करणे हे या देवतेचे मुख्य कार्य होय. गावचा राखणदार, पंचक्रोशीचा राखणदार, चाळीस गावांचा राखणदार, शंभर गावांचा राखणदार अशी राखणदाराचे महत्व विषद करणारी क्रमवारी कोकणात परिचीत आहे. हा राखणदार गावाचे, घरांचे, शेताचे, रानाचे, पशू-पक्षांचे, गवत-काडीचे व पीक-पाण्याचे संरक्षण करतो. वाट चुकलेल्या वाटसरूला वाट दाखवतो. कठीण परिस्थितीत अडकलेल्या भक्तांचे रक्षण करतो. तो गावोगावी विविध रूपात पुजला जातो. गोव्यातील केरी गावात तो आजोबा नावाने प्रसिद्ध आहे. जागृत आजोबा देव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर अलीकडील काळात बांधले गेले असले तरी देवस्थान हजारो वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. समुद्र किनाऱ्यावरील खडकाच्या रुपात असलेल्या या देवाची पूजा करून कोळी बांधव मासेमारी करण्यासाठी समुद्रात उतरत असत. या देवस्थानाच्या अनेक अख्यायिका प्रचलीत आहेत. रात्री अपरात्री समुद्रावरून परतणारे मच्छीमार बांधव अनेकदा वाट चुकतात.
त्यावेळी आजोबांचा धावा केल्यावर देव हातात मशाल व घुंगराची काठी घेऊन चुकलेल्यांना रस्ता दाखवतात. त्यांना घरापर्यंत सुखरूप सोडून येतो, अशी श्रद्धा आहे. पूर्वी लाकडी मंडप स्वरूपात असलेले हे मंदिर अलीकडील काळात पक्के बांधण्यात आले आहे.
गावाच्या वेशीवर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. केरी गावापासून जवळच समुद्र किनाऱ्यावर असलेले हे मंदिर अष्टकोनी आहे. मंदिराच्या वाहनतळापर्यंत येण्यासाठी गावातून पक्का रस्ता आहे. वाहनतळावर पूजा साहित्याची दुकाने आहेत. मंदिरासमोर बांबूच्या तोरणाला नवसाच्या पितळी घंटा टांगलेल्या आहेत. मंदिर जमिनीपासून सुमारे चार फूट उंच चौथऱ्यावर आहे व सभोवतीने पाच पायऱ्या आहेत. अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप व त्याच पद्धतीचे गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात प्रत्येकी आठ नक्षीदार स्तंभांची दोन रिंगणे आहेत. सर्व स्तंभ स्तंभपादावर उभे आहेत. बाह्य बाजूच्या स्तंभांमध्ये खाली व शीर्षभागी पद्मफुलांच्या प्रतिकृती आहेत. बाह्यबाजूच्या स्तंभांच्या शीर्षभागी कणी व कणीवर हस्त आहेत. हस्तांवर तुळई आणि त्यावर प्रत्येकी तीन पाषाणी झुंबर आहेत. आतील रिंगणातील स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले आहेत.
सभामंडपात दोन्ही रिंगणातील स्तंभ स्टेनलेस स्टीलच्या कठड्याने जोडलेले आहेत. बाह्यबाजूच्या प्रत्येक स्तंभाच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत. चौथऱ्यांवर गजराज, व्याघ्र, सिंह, मृग, मयूर, मकर, अश्व अशी विविध पशुपक्ष्यांची शिल्पे आहेत. आतील स्तंभांच्या रिंगणाच्या महिरपी तोरणांच्या वर असलेल्या दर्शनी भिंतीवर गणपती, महादेव, श्रीकृष्ण, परशुराम, हनुमान, विष्णू अशा विविध देवतांच्या मूर्ती आहेत.
सभामंडपाच्या मधोमध आतील स्तंभांच्या रिंगणाच्या आत अष्टकोनी गर्भगृह आहे. हे गर्भगृह चार फूट खोल आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या या गर्भगृहात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारात मेजावर पद्मपादुका आहेत. भाविकांना येथूनच देवाचे दर्शन घ्यावे लागते. गर्भगृहात जमिनीवर स्वयंभू पाषाण रुपात आजोबा देवाचे स्थान आहे. आठ स्तंभांवर तोललेले गर्भगृहाचे छत घुमटाकार आहे. छत मध्यभागी काहीसे खुले असल्याने त्यातून वर्षातील काही दिवस मध्यान्हीची सूर्यकिरणे व रात्री चंद्राची किरणे देवास अभिषेक घालतात. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने सभामंडपात प्रदक्षिणा मार्ग आहे.
मंदिराचे आठ पाखी छत कौलारू आहे. छतावर अष्टदिशांना असलेल्या मेघडंबरीत विविध ऋषीमुनींच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे घुमटाकार शिखर आहे. शिखराचा खालील पहिला थर अष्टकोनी आहे. वरील चार गोलाकार थरात पद्मदलमंडल आहेत. शिखराच्या शीर्षभागी कळस नसून तो भाग उघडा आहे. शिखराची ही रचना वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
मंदिरापासून जवळच समुद्र किनाऱ्यावर उभा खडक आहे. हा खडक म्हणजे आजोबा देवाचे मूळ स्थान असल्याचे सांगितले जाते. या खडकाजवळ ध्वज पताका आहे व रोज सायंकाळी येथे दिवाबत्ती करण्यात येते. या मंदिरापासून जवळ समुद्राकडील डोंगर कड्यात पांडवकालीन लेणी गुंफा आहेत. भरतीच्या वेळी गुफांकडे जाणारा रस्ता बंद होऊन त्यांत पाणी भरते. फक्त ओहोटीच्या वेळी गुफांमध्ये प्रवेश करणे शक्य होते.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आजोबा देवाचा पाच दिवसांचा जत्रोत्सव साजरा केला जातो. जत्रोत्सवाच्या तारखा देवस्थान कमिटी मार्फत ठरवून दोन महिने आधी जाहीर करण्यात येतात. या पाच दिवसात मंदिरात भजन, कीर्तन, महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंदिरात वर्षभरातील इतर सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. रविवार, गुरुवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. केरीच्या समुद्रकिनारी येणारे पर्यटक देवाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात.