मंडोदरी वा मन्दोदरी नावाच्या देवतेचे एकमेव मंदिर पूर्ण गोव्यात केवळ बेतकी या गावातच आहे. गोमंतक ही भगवान परशुरामाने निर्मिलेली भूमी. या भूमीमध्ये मन्दोदरी देवीचे मंदिर असावे, ही अनेकांसाठी आश्चर्याची बाब आहे. परंतु येथील मंदिर हे रावणपत्नी मन्दोदरीचे नसून ते मन्दोदरी या जलदेवतेचे आहे. रावणपत्नीपासून तिचे वेगळेपण स्पष्ट व्हावे याकरीता मन्दोदरी या नावाचा उच्चार येथे मंडोदरी असा केला जातो. या देवतेचा उत्सव नवोत्सव म्हणून साजरा केला जातो व त्या दिवशी गावात अन्न न शिजवण्याची रूढी आहे.
हे मंदिर किमान पाचशे वर्षांपूर्वी ग्रामवस्तीच्या वेळी उभारण्यात आले असावे, असे सांगितले जाते. मंदिर अभ्यासक विनायक नारायण शेणवी धुमे यांच्या ‘देवभूमी गोमंतक’ या पुस्तकात याबाबतची आख्यायिका अशी की हे गाव वसवण्याचे काम प्राचीनकाळी लोकांनी सुरू केले. परंतु त्यात एक अडचण होती. गावाच्या हद्दीत पाण्याचा अभाव होता. तेव्हा लोकांनी येथील डोंगरमाथ्यावर तळे खोदण्याचे ठरवले. कितीही खोदले तरी तेथे झरा सापडेना.
तेव्हा लोकांनी ही वस्ती सोडून अन्यत्र जाण्याचे ठरवले. त्याच वेळी गावात एक योगी अवतरला. लोकांनी त्याच्यापुढे आपली समस्या मांडली. तेव्हा त्याने सांगितले की तुम्हास या तलावातच भरपूर पाणीसाठी मिळेल, परंतु त्यासाठी एक दिव्य करावे लागेल.
हे दिव्य म्हणजे या ठिकाणी एक पुरूष व एक स्त्री असे दोन नरबळी द्यावे लागतील. हे ऐकून लोक चिंतेत पडले. कोणीही आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा नरबळी देण्यास तयार नव्हते. त्या गावात एक गरीब ब्राह्मण स्त्री तिच्या दोन कोवळ्या मुलांसह राहात असे. एके दिवशी ती काही कामानिमित्ताने दूर गेल्याची संधी साधून काही लोकांनी तिचा मुलगा व मुलगी यांना फूस लावून त्या खोदकामाच्या ठिकाणी नेले व तेथे त्यांचा बळी दिला. यानंतर तेथे विपुल पाण्याचा संचय झाला. या ठिकाणी गाव वसवण्यात आले. ती ब्राह्मण स्त्री परतल्यानंतर तिला तिच्या मुलांचा बळी देण्यात आल्याचे समजले. तिच्या शोकास पारावार राहिला नाही. त्या भरात संतापून तिने गावास शाप दिला की ‘या गावात २४ पिढ्या एवढ्या काळात कोणीही वसणार नाही. गावातील चुलीत अग्नी पेटणार नाही. अन्न शिजणार नाही.’ यानंतर तिने घरदाराचा त्याग करून गाव सोडले.
या शापामुळे लोक घाबरले. त्या स्त्रीने उःशाप दिला नाही, तर आपला वंशनाश अटळ असल्याची जाणीव त्यांना झाली. तेव्हा सर्व मिळून त्या स्त्रीला शरण गेले. तिने गावाच्या कल्याणासाठी आपले दुःख गिळून उःशाप दिला की २४ पिढ्यांच्या काळाऐवजी फक्त २४ तास गावात अग्नी पेटू नये आणि अन्न शिजू नये. तिच्या उःशापामुळे गावास जणू पुनर्जन्म लाभला. त्याची स्मृती म्हणून गावात दरवर्षी ‘नवोत्सव’ पाळला जातो. या दिवशी गावातील एकही चूल पेटवली जात नाही व अन्न शिजवले जात नाही. ही रुढी आजही पाळली जाते. एका आख्यायिकेनुसार, या तलावासाठी बळी दिलेल्या मुलीचे नाव मन्दोदरी (मंडोदरी) व मुलाचे नाव नारबांदो असे होते. गावकऱ्यांनी नंतर या दोन्ही भावंडांची मंदिरे येथे स्थापन केली. मंडोदरी ही त्या तलावाची जननी म्हणून तिची जलदेवता स्वरूपात येथे पूजा केली जाते. नवोत्सव हा मंदिर स्थापनेचा दिवस एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो.
नारळी-पोफळींच्या बागांनी समृद्ध अशा परिसरातील मोठ्या प्रांगणात मंडोदरी देवीचे मंदिर वसले आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडप अर्धखुल्या प्रकारचा आहे. त्यावर उतरते कौलारू छप्पर आहे. येथे कक्षासने असून चार मोठे वर्तुळाकार लाकडी स्तंभ आहेत. त्यांवर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. स्तंभांच्या शीर्षस्थानी तरंगहस्त आहेत. त्यावरील तुळयांवर सज्जासारखे लाकडी बांधकाम केलेले आहे. येथून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपास कोरीव नक्षीकाम असलेले कमानदार दगडी प्रवेशद्वार आहे. सभामंडपात डाव्या व उजव्या बाह्य भिंतीपासून काही फूट अंतर सोडून स्तंभरांग आहे. दोन्ही बाजूंना उतरत्या असलेल्या छतास पितळी घंटा टांगलेल्या आहेत. मंडपात डावीकडे दोन तरंगकाठ्या ठेवलेल्या आहेत. मध्यभागी काचेच्या पेटीमध्ये उंच समई आहे. या सभामंडपातून गर्भगृहास प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना देव्हाऱ्यासारखा आकार दिलेली दोन देवकोष्ठके आहेत. या देवकोष्ठकांत वैष्णव द्वारपालांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार लाकडी आहे व त्याच्या कमानीवर नक्षीकाम केलेले आहे. त्यावरील ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख कोरलेले आहे. आत उंच अशा देव्हाऱ्यामध्ये देवीची मुखवटा स्वरुपातील मूर्ती विराजमान आहे. देवीच्या मागे बारीक कोरीवकाम केलेली चंदेरी प्रभावळ आहे. देव्हाराही चंदेरी पत्र्याने मढवलेला आहे. मंदिरावर चारही बाजूंनी वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. त्यावर मोठा आमलक आणि कलश आहे.
या मंदिराच्या परिसरात लक्ष्मी रवळनाथ, तसेच मूळमाया सातेरी आणि ग्रामपुरुष यांची मंदिरे आहेत. येथील सातेरी मंदिरातील देवीच्या मूर्तीमागे भले मोठे वारूळ आहे. मंडोदरी मंदिराच्या डावीकडे मोठे सभागृह आहे. मंदिरासमोर काही अंतरावर रंगमंच बांधलेला आहे. येथून काही अंतरावर मंदिराच्या प्रांगणात एका मोठ्या चौथऱ्यावर पितळेचा समईसारखा भव्य असा दीपस्तंभ बसवलेला आहे. या दीपस्तंभाच्या तळाशी कूर्मप्रतिमा आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साजऱ्या होणाऱ्या नवोत्सवाच्या निमित्ताने गावकरी आपल्या शेतातील पहिल्या भाताच्या तांदळाचा महानैवेद्य देवीस अर्पण करतात. त्यानंतरच ते नवे तांदूळ लोक खाण्यासाठी वापरतात. ही रीतही येथे पूर्वीपासून चालत आलेली आहे. या शिवाय या मंदिरात संस्थानी पूर्वपरंपरेनुसार अश्विन शुक्ल प्रतिपदा ते दशमी या काळात शारदीय नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. येथे दर शुक्रवारी देवीची विशेष पूजा केली जाते.