केळबाई मंदिर

गावकरवाडा, मुळगाव, ता. बार्देश, जि. उत्तर गोवा

गोव्यातील प्रत्येक देवतेचे आगळे वेगळे वैशिष्ट्य असते. येथील भाविक आपल्या पूज्य देवी देवतांना लडिवाळ नावाने पुकारतात. त्यामुळेच स्थळपरत्वे एकाच देवतेस येथे वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. डोंगरावरील डोंगराई तर ओढ्याच्या काठावर असलेली ओढ्याची आई होते. गोव्यात केळीच्या बनात प्रकट झालेल्या देवीला केळबाई नावाने संबोधले जाते. या केळबाई देवीची गोव्यात अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर मुळगाव येथील गावकर वाड्यात आहे. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

हे मंदिर सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिराची अख्यायिका अशी की प्राचीन काळी उत्तरेतील मोरजाई, लईराई, केळबाई, महामाया, मीराबाई, शितलाई व अंजीदीपा या सात बहिणी आणि त्यांचा भाऊ खेतोबा घाट उतरून गोव्यातील डिचोले येथील शांतादुर्गा देवीकडे पाहुणचारास आले. येथील निसर्गसौंदर्याची भुरळ पडल्याने या देवतांनी येथेच राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा शांतादुर्गेने त्यांना मयेगाव येथे राहण्याची परवानगी दिली. आजही या ठिकाणाला सात बहिणींची बैठक म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी सात बहिणींनी खेतोबाला अग्नी आणण्यासाठी गावात पाठवले. परंतु तो गावातील मुलांसोबत खेळण्यात रमला. त्याला परत येण्यास उशीर झाला म्हणून मोठी बहिण त्याला शोधण्यासाठी गावात गेली. आपला भाऊ खेळात रमला आहे हे पाहून बहिणीस राग आला व तिने खेतोबाच्या कमरेत लाथ मारली. त्यामुळे क्रोधाने तो आपल्या बहिणींना अद्वातद्वा बोलला. त्यामुळे सातही बहिणी वेगवेगळ्या गावी निघून गेल्या. त्यावेळी केळबाई मुळगाव येथे येऊन गावकर वाड्यात स्थित झाली.

गावापासून काही अंतरावर असलेल्या या मंदिरापर्यंत येण्यासाठी पक्का रस्ता आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीमधील प्रवेश कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात मंदिरासमोरील मोठ्या चौथऱ्यावर सात थरांची अष्टकोनी दीपमाळ आहे. दीपमाळेच्या प्रत्येक थरात प्रत्येकी आठ दीपकोष्टके आहेत. दीपमाळेत शीर्षभागी शिखर व कळस आहे. दीपमाळेच्या शेजारी चौथऱ्यावर अष्टकोनी तुलसी वृंदावन आहे. तुलसी वृंदावनात चार बाजूंना चार दीपकोष्टके आहेत. प्रांगणात गोड्या पाण्याचा हौद व त्याच्या काठावर असलेल्या मेघडंबरीत देवीच्या मूर्ती आहेत. उत्सवकाळात या हौदात प्रथम देवीच्या मुखवट्यांचा अभिषेक केला जातो. त्यानंतर पुरोहितांचे तीर्थस्नान व शेवटी जमलेल्या समग्र भाविकांचे तीर्थस्नान होऊन यात्रेला सुरुवात होते.

अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची संरचना आहे. अर्धमंडपाच्या प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला दोन स्तंभ व त्यावर अर्धचंद्राकार कमानी छत आहे. बंदिस्त स्वरुपाच्या अर्धंमंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. अर्धमंडपात प्रकाश व हवा येण्यासाठी वातायने आहेत. पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. सभामंडपात स्तंभांच्या चार रांगा आहेत. येथील स्तंभांवर डाव्या व उजव्या बाजूला वरील मजल्याचा सज्जा आहे. सज्जावर जाण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूने पायऱ्या आहेत. सभामंडपात बाह्य बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ या कक्षासनांत आहेत. प्रत्येक रांगेतील स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत.

पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. बंदिस्त स्वरूपाच्या अंतराळात प्रत्येकी चार नक्षीदार गोलाकार स्तंभांच्या दोन रांगा आहेत. सर्व स्तंभ अर्धचंद्राकार कमानीने जोडलेले आहेत. येथील छताला पितळी घंटा व काचेचे झुंबर टांगलेले आहेत. जत्रोत्सवाच्या वेळी पेटीत मुखवटे ठेवण्याचा विधी याच ठिकाणी करण्यात येतो. यापुढे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन नक्षीदार स्तंभ व या स्तंभांवर कमळ आणि त्यांवर गजमुख शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या वर भिंतीवर कीर्तीमुख आहे. गर्भगृहाच्या अर्धचंद्राकार प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चतुर्भुज द्वारपाल शिल्पे आहेत.

गर्भगृहात वज्रपिठावर केळबाई देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या दोन हातात आयुधे, एका हातात पानपात्र व एक हात अभय मुद्रेत आहे. देवीच्या पायाकडे दोन्ही बाजूला गजराज व शक्ती शिल्पे कोरलेली आहेत. मूर्तीच्या मागील चांदीच्या प्रभावळीत पानाफुलांची नक्षी आणि वर कीर्तीमुख आहे. मूर्ती चांदीच्या मखरात विराजमान आहे. मखरातील स्तंभांवर पानाफुलांची नक्षी व तोरणाच्या मध्यभागी कीर्तीमुख आहे. मखरच्या दोन्ही बाजूला पितळी लामणदिवे प्रज्वलीत आहेत.

मंदिरावर खाली आणि वर अशा दोन भागात विभागलेले कौलारू छत आहे. अर्धमंडपाच्या छतावर वर निमुळते होत गेलेले कौलारू चौकोनी शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे. अंतराळाच्या छतावर अश्याच प्रकारचे शिखर व कळस आहे. सभामंडपाच्या डाव्या व उजव्या बाजूच्या प्रवेशद्वारांवर गजपृष्ठ आकाराचे छत आहेत. गर्भगृहाच्या छतावर वर निमुळते होत गेलेले चौकोनी शिखर आहे. शिखरावरील चारही बाजुला असलेल्या देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखरावर शीर्षभागी कळस व ध्वजपताका आहे.

फाल्गुन अमावास्येला नव्या पुजाऱ्यांच्या दिक्षेच्या विधीने येथील जत्रोत्सवाची सुरूवात होते. चैत्र पाडवा ते पौर्णिमा असा सलग पंधरा दिवस हा जत्रोत्सव सुरू असतो. चैत्र शुद्ध पंचमी हा जत्रेचा मुख्य दिवस होय. यावेळी देवी व नंदीचे मुखवटे पवित्र पेटीत बंद करून पेटी वाजत गाजत, ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत पारंपारिक वाटेने मयेगावच्या देवीच्या भेटीला मिरवणुकीने जाते. तिथे देवींची भेट झाल्यानंतर देवी पुन्हा माघारी फिरते व आपल्या आसनी स्थापित होते. यावेळी निघणाऱ्या शोभा यात्रेत व हौदात स्नान करण्यासाठी हजारो भाविक येथे उपस्थित असतात. रंगीत निशाण नाचवीत देवीचा जयघोष केला जातो.

मंदिरात शारदीय नवरात्रौत्सव, श्रावणी सोमवार, दिवाळी, कार्तिक पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा आदी सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. येथे कौल लावण्याचे कार्यक्रमही केले जातात. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते.

उपयुक्त माहिती:

  • बार्देशपासून २२ किमी आणि पणजीपासून २८ किमी अंतरावर
  • बार्देश व पणजी येथून राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : कृष्णा परब, अध्यक्ष, मो. ८७८८११२८२९,
  • विद्याधर राऊत, सचिव, मो. ८००७०९३३११
Back To Home