दुर्गा, महिषासुरमर्दिनी, जगदंबा अशी विविध नावे धारण करणारी महालक्ष्मी म्हणजे मूळ प्रकृती, आदिमाया. शक्तिपीठ देवता असलेली महालक्ष्मी ही समृद्धीचीही देवता मानली जाते. गोमंतकात राज्य केलेल्या कदंब राजघराण्याप्रमाणेच शिलाहार राजवंशाचीही ती कुलदेवता होती. याच शिलाहारांच्या काळात बांदोडा (बांदिवडे) येथे महालक्ष्मीच्या या मंदिराची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते. प्राचीन काळी बंदवाड ग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांदोड्यातील एका तलावाच्या काठी देवीचे भव्य मंदिर वसले आहे. वार्षिक उत्सवाच्या वेळी या तलावातील नौकाविहार पाहण्यासाठी शेकडो भाविक जमतात.
‘दुर्गासप्तशती’मध्ये महालक्ष्मीचे वर्णन हातामध्ये अक्षमाला, परशू, गदा, बाण, वज्र, कमल, धनुष्य, कुंडिका, दंड, शक्ती, खड्ग, चर्म, शंख, घंटा, सुधापात्र, शूल, पाश व सुदर्शनचक्र धारण करणारी, असे करण्यात आली आहे. ही महालक्ष्मी प्रसन्नवदना, कमलासना व महिषासुरमर्दिनी अशी असल्याचे त्यात म्हटले आहे. तिच्या अन्य एका पौराणिक कथेनुसार, तिने कोलासुर नावाच्या दैत्याचा नाश करून लोकांना संकटमुक्त केले. पं. महादेवशास्त्री जोशी यांनी ‘भारतीय संस्कृती कोशा’मध्ये या संबंधी असे म्हटले आहे की कोलासुर म्हणजे रानडुक्कर होय. तो शेतीची नासधूस करतो. त्याचा नाश करून देवीने शेतीचे संरक्षण केले म्हणून महालक्ष्मी ही समृद्धीची देवता मानली जाते. कोल्हापूर येथे महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाईचे शक्तिपीठ आहे. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. बांदोडा येथील मंदिरातील महालक्ष्मीच्या स्वरूपाचे कोल्हापूर येथील मंदिरातील महालक्ष्मीच्या मूर्तीशी मोठे साम्य आहे.
गोव्याचा कदंब राजघराण्याची महालक्ष्मीवर श्रद्धा होती. कदंब राजा षष्ठदेव दुसरा याच्या शक ९३२च्या (इ.स. १०१०) ताम्रपटात ‘श्रीकोल्लापुरमेत्य येन च श्रीमहालक्ष्मी समाराधिता’ असे वर्णन आहे. कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या मंदिराचा विस्तार शिलाहार राजा मारसिंह (१०५५-१०७०) याने केला होता, तर त्याचा पुत्र गंडरादित्य याने मंदिरावर कळस चढवला होता. या गंडरादित्याचा नातू दुसरा भोज हा सत्तेवर आल्यानंतर त्याने कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरास दान दिले होते.
या शिलाहारांच्या काळात बांदोडे येथे महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे.
या मंदिराच्या पूर्वपिठीकेबाबत इतिहास संशोधकांत मतभेद आहेत. ‘गोवा गॅझेटियर’मधील नोंदीनुसार, येथील देवीचे मूळ मंदिर कोळवे येथे होते. परंतु पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचारांमुळे ते तेथून बांदोडा येथे स्थलांतरित करण्यात आले. ही घटना सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात घडल्याचे सांगण्यात येते. मात्र बांदिवडेतील नागेश देवस्थानातील शिलालेखातून हे मंदिर मूळचे बांदोडा येथीलच असल्याचे स्पष्ट झाले आहे. संस्कृत-मराठी भाषेत कोरलेला हा शिलालेख विजयनगर साम्राज्याच्या वीर प्रताप देवराय महाराय या राजाच्या कारकिर्दीतील आहे. त्यावर ‘श्रीशालिवाहन शके १३३५ पौष बहुल ३०’ (२४ डिसेंबर १४१३) अशी कालनोंद आहे. या साली ‘गोमंतकात नंजण गोसावी हा प्रतिहस्त असताना, माईन शेणवी वागळे यांनी वेद खंडिकेचे कुळागर, नागझरी मळो शेत व गोलती वाड्यावरील रुवो कुळागर या जमिनी बांदिवडे येथील श्रीनागेश व श्रीमहालक्ष्मी या देवतांस दिल्याचा’ उल्लेख या शिलालेखात आहे. नंजण गोसावी यास यात ‘धर्माधर्म विचारपटू’ असे म्हटलेले आहे.
तो देवरायाच्या काळात त्याचा मांडलिक होता व गोवे सिंहासनावर राज्य करीत होता. यावरून येथील महालक्ष्मीचे स्थान पोर्तुगीजांच्या गोमंतकातील आगमनाच्या कित्येक वर्षे आधी, पंधराव्या शतकात अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी कोळवे येथील महालक्ष्मीचे मंदिर पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त करण्यापूर्वी तेथील देवीची मूर्ती बांदोड्यातील मंदिरात आणण्यात आली होती. त्यावेळी ही मूर्ती मूळच्या महालक्ष्मीच्या मूर्तीबरोबर ठेवण्यात आली. आजही या देवस्थानात महालक्ष्मीच्या दोन मूर्ती आहेत. या देवीच्या सोबत नारायणदेव, रवळनाथ आणि बाळेश्वर ही दैवतेही येथे स्थलांतरित झाली. मंदिर प्रांगणात त्यांचीही छोटी मंदिरे आहेत. असे सांगण्यात येते की कोळवे येथील महालक्ष्मीची पितळी मूर्ती दुर्भाट गावातील सावंत व फडते या उपनावाच्या दोन देवीभक्तांनी जुवारी नदी पार करून मोठ्या शिताफीने प्रथम फोंड्यातील तळावली येथे नेली व तेथून ती येथे आणली. त्यांना सट्टो व फट्टो या नावाने संबोधले जाते. त्यांच्याविषयीची कृतज्ञता म्हणून मंदिरासमोर या सट्टो-फट्टोंची देवळी उभारण्यात आली आहे.
गोमंतकीय मंदिर वास्तुशैलीचा उत्तम नमुना म्हणून या महालक्ष्मी मंदिराकडे पाहिले जाते.
हे मंदिर मोठ्या प्रांगणात वसले आहे. मंदिराच्या प्रांगणास तीन प्रवेशद्वारे आहेत. मागच्या बाजूस असलेल्या भव्य अशा महाद्वाराच्या द्वारस्तंभांवर वरच्या भागात वैष्णव द्वारपालांच्या मूर्ती आहेत. छताकडील भागात मध्यभागी असलेल्या देवळीत महालक्ष्मीची मूर्ती विराजमान असून, तिच्या दोन्ही बाजूंस गजशिल्पे आहेत. छताच्या दोन्ही कोपऱ्यांत देवसेविकांची शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस एका चौथऱ्यावर आठ स्तरीय दीपस्तंभ आहे. त्यानजीक मोठे तुलसी वृंदावन आहे. प्रवेशद्वारासमोर दगडी बांधणीचा उंच गरूडस्तंभ आहे.
अर्धमंडपातून महामंडपात प्रवेश होतो.मंदिराची संरचना सभामंडप, अर्धमंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा प्रकारची आहे. सभागृहाच्या प्रवेशद्वाराच्या छतावरील भागात मोठी कमानीच्या आकाराची भिंत आहे. तिच्या वर सुंदर कलाकुसर करण्यात आली आहे. तिच्या शीर्षस्थानी दोन गजमूर्तींच्या मध्ये कलश आहे. सभामंडप खुल्या प्रकारचा आहे. त्यावर दोन्ही बाजूंस उतरते छत आहे. सभामंडपात भाविकांच्या विश्रामासाठी कक्षासने आहेत. येथून काही फूट उंचावर अर्धमंडप आहे.
त्याच्या दर्शनी भिंतीत कमानीच्या आकाराचे प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूंस दोन खिडक्या आहेत. त्यांच्यालगत असलेल्या स्तंभांवर मधल्या भागात दोन व्यालशिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात सज्जासारखी रचना आहे. त्यात मध्यभागी महालक्ष्मीची मूर्ती विराजमान आहे.
अर्धमंडपातून महामंडपात प्रवेश होतो. येथे कमानदार प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस द्वारपालांची शिल्पे आहेत. तर प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस महामंडपात गर्भागाराकडे तोंड असलेल्या गरुड आणि हनुमंताच्या प्रतिमा आहेत. महामंडपाच्या भिंतीवर देवीची विविध रुपे चितारलेली आहेत. महामंडपात आतील दोन्ही बाजूंस गोलाकार स्तंभ रांगा आहेत. हे स्तंभ मोठ्या कमानीने एकमेकांस जोडलेले आहेत. त्यावर सज्जा आहे. येथे छतास काचेच्या अनेक हंड्या, तसेच मोठे झुंबर टांगलेले आहे. महामंडपात मध्यभागी समया ठेवलेल्या आहेत. १९२० साली या महामंडपाची सजावट करण्यात आली. अंतराळाचा दर्शनी आकार कमानीकार आहे. या दर्शनीभिंतीवर चांदीच्या नक्षीदार पत्र्याचे आवरण आहे. येथे द्वारचौकटीच्या वरच्या भागात मध्यभागी देवीची चांदीची मोठी प्रतिमा कोरलेली आहे व तिच्या बाजूला आठ गोलाकारात देवीची आठ रुपे कोरलेली आहेत.
अशा प्रकारे येथे नवदुर्गा आहेत. मधल्या भागात कीर्तिमुख कोरलेले आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस द्वारपालांची शिल्पे आहेत. गर्भगृहात नक्षीकामाने सुशोभित केलेल्या चांदीच्या मोठ्या मखरामध्ये देवीची वस्त्रालंकार व पुष्पमालांनी सुशोभित केलेली मोठी मूर्ती विराजमान आहे. देवीच्या मागे असलेल्या चांदीच्या प्रभावळीवर कीर्तिमुख आहे. देवीच्या पायांनजीक दोन मोठे चांदीचे नाग आहेत. या मूर्तीसोबतच येथे कोलवे येथून आलेल्या महालक्ष्मीची पितळेची मूर्ती, तसेच गणेशाची पितळी मूर्तीही विराजमान आहे. मंदिराच्या गर्भगृहावर गोमंतकीय मंदिर स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य असलेला अष्टकोनी मनोरा आणि त्यावर घुमट अशा प्रकारची शिखर रचना आहे. या शिखरावर छोटी मेघडंबरी व त्यावर कलश आहे.
नवरात्रोत्सव आणि रामनवमी हे या मंदिरातील सर्वांत मोठे उत्सव होत. येथे रामनवमीनिमित्ताने सलग पाच दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन केले जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत संपूर्ण मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने गजबलेला असतो. नवरात्र उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे रोज रात्री दहा वाजता होणारी मखर आरती. या उत्सवानिमित्ताने अत्यंत सुशोभित असा मखर तयार केलेला असतो. त्यात देवीची उत्सवमूर्ती ठेवली जाते. आरतीच्या वेळी वाद्यांच्या तालावर देवीच्या मखरास झुलवले जाते. उत्सवात अष्टमीच्या दिवशी सुवर्ण शिबिकेतून देवीची मिरवणूक काढली जाते. या शिवाय येथे श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मीव्रत साजरे केले जाते. यात अनेक महिला सहभागी होतात. दीपावलीत धनत्रयोदशीच्या दिवशी येथे मोठा दीपोत्सव केला जातो. या कालावधीत १४ दिवस मंदिर दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघते. याच प्रमाणे येथे दर शुक्रवारी सायंकाळी साडे आठ वाजता देवीची पालखी काढली जाते. त्यानंतर रात्री ९ वाजता महाआरती होते. या मंदिराच्या प्रांगणात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृहे बांधण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे मंदिराचे महाजन, कुळावी यांच्याकरीता येथे अग्रशाळा उभारण्यात आलेली आहे.