चौल हे प्राचीन काळातील वैभवशाली नगर होते. येथून समुद्रमार्गे देशांतर्गत व विदेशात व्यापार होत असे. खौल, चंपावतीनगर, चावोल, चिमोलो, चिवल, चिवील, चेऊल, चेमुल, चेमुली, चौले, जयमूर, तिमुल, शिऊल, सिबोर, सिमुल, सेमुल्ल, सैमुर या नावांनीही चौल ओळखले जाई. कारण एकेकाळी या गावाचा संपूर्ण जगाशी व्यापार चालत असे. या प्राचीन चौल-चंपावती नगरीत ३६० मंदिरे, तसेच ३६० तलाव होते, अशी नोंद सापडते. याच ऐतिहासिक प्रांतात श्री मल्लेश्वर देवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या प्राचीन मंदिरातील जागृत महादेव नवसाला पावतो व भाविकांच्या हाकेला धावून येतो, अशी मान्यता आहे.
सन २००१ ते २००७ या काळात चौल भागात पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या वतीने उत्खनन करण्यात आले. तेव्हा प्राचीन बंदराचे अवशेष, जेटीची भिंत, सातवाहनकालीन विटांचे बांधकाम, नळीची विहीर, सातवाहनकालीन नाणी, मातीची भांडी, खापरे, तत्कालीन रोमन संस्कृतीत वापरले जाणारे मद्यकुंभ ‘अॅम्फेरा’ अशा वस्तू सापडल्या. त्यामूळे या शहराचा इतिहास आणि येथील मंदिरांचे प्राचीनत्व अधोरेखित होते. येथील मल्लेश्वर मंदिर हे हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. १७५८ साली त्रिंबक डबीर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याची नोंद आहे.
हे मंदिर मुख्य रस्त्यालगत आहे. मंदिरासमोरील प्रशस्त प्रांगणाभोवती नारळी, पोफळीच्या बागा व आंबा आणि काजूची अनेक झाडे आहेत. कोकणी पद्धतीच्या कौलारू, चारपाखी छताच्या मंदिरासमोर दोन्ही बाजूस दोन चौथरे व त्यावर पिरॅमिड सारखी लहान लहान होत जाणारी रचना असलेले पाच थरांचे दीपस्तंभ आहेत. अलीकडील काळात या दीपस्तंभांना सिमेंट गिलावा करून रंगवलेले आहे. प्रांगणात कोरीव पाषाणात बांधलेली पुष्करणी आहे.
पुढे सभामंडपाचे प्रवेशव्दार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस, सभामंडपाच्या दर्शनी भिंतीस लागून भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. आसने फरशी आच्छादित आहेत. सभामंडपाच्या बाह्य बाजूस असलेली ही आसनांची रचना अनोखी आहे.
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस असलेल्या आसनांत प्रत्येकी दोन गोलाकार लाकडी स्तंभ आणि त्यावरील तुळईवर मंदिराच्या कौलारू छताची पुढील बाजू तोललेली आहे. तुळईना नक्षीदार लाकडी पट्टी लावून छताचे सौदर्य वाढविलेले आहे. प्रवेशद्वाराच्या लाकडी द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात हवा व सूर्यप्रकाश येण्यासाठी खिडक्यांची व्यवस्था आहे. सभामंडपात चार नक्षीदार चौकोनी लाकडी स्तंभ आहेत. या स्तंभांच्या शीर्षभागी कणी व त्यावर हस्त आहेत. सभामंडपात उजव्या भिंतीलगत गणपती व स्थानिक देवतेच्या शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर वज्रपिठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. सभामंडपाच्या भिंतीत असलेल्या देवकोष्टकांत विविध देवतांच्या प्रतिमा व काही मूर्ती आहेत.
गर्भगृहातील जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. शिवपिंडीच्या सभोवती काही इंच उंच संगमरवरी चौथरा आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे व जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहाच्या मागील भिंतीतील देवकोष्ठात पार्वती मातेची प्राचीन मूर्ती आहे. गर्भगृहातील तिन्ही बाजूच्या भिंतींमध्ये कक्षासनांची रचना आहे. गर्भगृहाच्या छतावर शिखर व कळस आहे. गर्भगृह सभामंडपाच्या छताखाली आहे. गर्भगृहाच्या सभोवतीने प्रदक्षिणा मार्ग आहे.
महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. यावेळी मंदिरात भजन, किर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या मंदिराच्या पूजा अर्चेचे नियोजन येथील पाखाडीतील ग्रामस्थ मंडळी करतात. श्री मल्लेश्वर मंदिरात पौर्णिमा, अमावस्या, तसेच दर सोमवारी भाविकांची गर्दी असते. श्रावणातील सर्व सोमवारी येथील मंदिर परिसर भाविकांनी फुलून जातो.