आदिशक्ती महामायेचे रूप असलेली कालीदेवी म्हणजेच चंडिका देवी, अशी मान्यता आहे. या देवीचे प्रसिद्ध मंदिर तळा या तालुक्याच्या शहरात एका डोंगराच्या पायथ्याशी आहे. देवीचे हे स्थान जागृत असून तळा येथील बारा वाड्यांची ग्रामदेवता म्हणून या देवीस मान्यता आहे. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
‘दुर्गा सप्तशती’ या ग्रंथातील पौराणिक आख्यायिकेनुसार, शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी देवांचा राजा इंद्रदेवाकडून त्रैलोक्याचे राज्य जिंकले. तेव्हा पराभूत झालेल्या देवांनी आदिशक्ती भगवतीस साकडे घातले. ते भगवतीची प्रार्थना करीत असताना पार्वती देवी तेथे आली. तिच्या शरीरकोषातून अंबिका देवी निर्माण झाली. चंड आणि मुंड हे शुंभ-निशुंभाचे सेवक होते. त्यांनी अंबिकेस पाहिले व तिच्या रुपसौंदर्याचे वर्णन शुंभाकडे केले. शुंभाने अंबिकेस आपली पत्नी हो असा निरोप पाठवला. अंबिकेने त्यास धुडकावून लावले. तेव्हा तिला पकडून आणण्यासाठी शुंभ-निशुंभाने चंड-मुंड यांना पाठवले. त्यांना पाहताच क्रोधवश झालेल्या अंबिकेच्या शरीरातून काली प्रकटली. तिने चंड आणि मुंड यांचा तलवारीने शीरच्छेद केला. काली देवीने चंड आणि मुंड यांचा वध केल्यामुळे देवी भगवतीने तिला चंडिका असे नाव दिले.
तळा पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्याआधी एक मोठी कमान आहे. या कमानीतून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिराच्या समोर तुळसी वृंदावन व दीपस्तंभ आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रांगणातून सहा पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. प्रशस्त सभामंडपात पुढील बाजुला प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ उजवीकडे शिवपिंडी व गणेशमूर्ती, तर डाव्या बाजूला चंडिका देवीची मूर्ती आहे. या मूर्तीबाबत असे सांगितले जाते की सध्या गाभाऱ्यात असलेली मूर्ती ही मुघल काळात भग्न झाली होती. त्यामुळे नवी मूर्ती बनविण्यात आली. परंतु देवीने या नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी कौल न दिल्याने जुनीच मूर्ती वज्रलेप करून गर्भगृहात बसविली आहे.
त्यामुळे नवी मूर्ती गर्भगृहाबाहेर ठेवण्यात आलेली आहे.
या मंदिरासंदर्भात आख्यायिका अशी की येथील तळगड किल्ल्यावरून देवीने खाली सध्या जिथे मंदिर आहे त्या जागेवर उडी मारली होती. मंदिरासमोर असलेल्या ओहळामध्ये आजही दगडात उमटलेली देवीची पावले दिसतात.
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत मंदिरात नवरात्रोत्सव साजरा होतो. या उत्सवाला सुमारे २०० वर्षांची परंपरा आहे. यावेळी होणाऱ्या घटस्थापनेसाठी येथील बलुतेदारांना कामे वाटून दिलेली आहेत. घट व माती कुंभार आणतो, बुरूड परडी आणतो, घटाजवळ पेरा करण्यासाठी विविध प्रकारची धान्ये तसेच नऊ दिवस दिव्यासाठी लागणारे तेल वाणी आणतो. नाभिक आरसा, शिंपी खण आणि पोतदारांकडून फुलांची माळ बांधली जाते. प्रतिपदेच्या दिवशी दुपारी १२ वाजता चंडिकादेवीचे वतनदार व उपाध्ये यांच्याकडून घटस्थापना होते. शेतातील माती आणून वेदिका तयार केली जाते. त्यानंतर नऊ दिवस प्रत्येक जातीचे लोक त्यांना ठरवून दिल्याप्रमाणे सेवा करतात.
जानेवारी महिन्याच्या ५ व ६ तारखेला देवी पुनर्दर्शन सोहळा होतो. यावेळी देवीच्या मिरवणुकीसाठी पंचक्रोशीतील गावांमधून मानाच्या काठ्या आणल्या जातात. अनेक भाविकांकडून मंदिरात देवीला कौल लावला जातो. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून हजारो भाविक दरवर्षी देवीच्या या उत्सवानिमित्त येथे येतात. संकटकाळी आपल्यासोबत ठामपणे उभी राहा, असे गाऱ्हाणे घालतात. लग्नकार्य अथवा इतर शुभकार्याची पहिली पत्रिका देवीच्या चरणी ठेवण्याची प्रथा आजही तळावासीयांकडून जपली जाते. भाविकांसाठी हे मंदिर दिवसभर खुले असते.