लखुबाई मंदिर

दिंडीरवन, पंढरपूर, ता. पंढरपूर जि. सोलापूर

साधू, संत व लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर हे अध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीचे क्षेत्र आहे. येथील चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आषाढी व कार्तिकी वारीला लाखो भाविक जाती धर्माचा भेदाभेद विसरून एकोप्याने विठ्ठल नामात दंग होतात. अशी मान्यता आहे की पंढरपुरात कृष्णापेक्षा बारा वर्षे आधी रुख्मिणी येऊन राहिली. येथील दिंडीरवनात रुख्मिणीचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. लखुबाई या लाडिक नावाने पुजली जाणारी रुक्मिणी हाकेला धावून येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर द्वापार युगातील असल्याचे सांगितले जाते. सन १७८० साली धोंडभट कटके यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला असल्याची नोंद सापडते. मंदिराबाबत अख्यायिका अशी की एकदा रुख्मिणीने श्रीकृष्णाला गोपिकांच्या गराड्यात बसलेले पहिले. विशेष म्हणजे राधेला श्रीकृष्णाच्या मांडीवर बसलेली पाहून रुख्मिणीच्या ठाई दुःख आणि संताप निर्माण झाला. त्यामुळे रुख्मिणी द्वारका सोडून चंद्रभागेतीरी दिंडीरवनात आली. येथे बारा वर्षे तपस्या केल्यानंतर श्रीकृष्ण रुक्मिणीला भेटायला आले व येथेच राहिले.
रुक्मिणीला देवाचा बारा वर्षाचा विरह सहन करावा लागला याबाबतची अख्यायिका अशी की एकदा श्रीकृष्ण व रुख्मिणी यांना भेटायला दुर्वास ऋषी द्वारकेच्या सीमेवर आले. तेव्हा दोघांनी दुर्वासांना राजवाड्यात चलण्याची विनंती केली. तुम्ही दोघे रथ ओढणार असाल तर मी द्वारकेत येतो, असे दुर्वासांनी सांगितले. ऋषींची अट मान्य करून रुख्मिणी व श्रीकृष्णाने दुर्वासांना रथात बसवून रथ ओढायला सुरूवात केली. अर्ध्या वाटेवर आल्यानंतर अतीश्रमाने रुक्मिणीला तहान लागली. श्रीकृष्णाने आपल्या उजव्या पायाचा अंगठा जमिनीत दाबून गंगा निर्माण केली. गंगेच्या पाण्याचे कारंजे जमिनीतून वर उडाले. त्यातील घोटभर पाणी रुख्मिणी प्यायली. अतिथीच्या आधी रुख्मिणी पाणी प्यायल्याने दुर्वास क्रोधित झाले व त्यांनी रुक्मिणीला श्रीकृष्णाचा बारा वर्षांचा विरह सहन करावा लागेल, असा शाप दिला.
चंद्रभागा नदीच्या तीरावर उंच चौथऱ्यावर हे मंदिर आहे. चौथऱ्यावर चढण्यासाठी सुमारे सहा पायऱ्या आहेत. हेमाडपंती स्थापत्यशैलीचे दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराची सभामंडप व गर्भगृह अशी रचना आहे. मंदिरासमोर लोखंडी स्तंभांवर पत्र्याचे छत असलेला खुल्या स्वरूपाचा दर्शनमंडप आहे. दर्शनमंडपास बाह्य बाजूला लोखंडी जाळीदार सुरक्षा कठडे आहेत. दर्शनमंडपात दोन मेघडंबरी आहेत. त्यापैकी एकात शेंदूरचर्चित मारुतीची मूर्ती व दुसऱ्या मेघडंबरीत पंचफणी नागशिळा आहे.
सभामंडपास तीन प्रवेशद्वारे आहेत. तिन्ही प्रवेशद्वारांच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन चक्रनक्षी आहेत. मधल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. मंडारकास चंद्रशिळा आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दर्शनी भिंतीवर गरुड व हनुमान यांची चित्रे रंगविलेली आहेत. सभामंडपात प्रत्येकी तीन चौकोनी नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभावरील हस्तांनी अर्धचंद्राकृती कमानी साकारल्या आहेत. हस्तांवरील तुळईवर छत आहे. प्रत्येक चार स्तंभांमधील वितानावर चक्राकार नक्षी आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन देवकोष्टके आहेत. त्यातील एका देवकोष्टकात मारुतीची व दुसऱ्या देवकोष्टकात हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारात मेजावर पद्मपादुका आहेत. भाविकांना येथूनच रुख्मिणीचे दर्शन घ्यावे लागते. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपिठावर रुख्मिणीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. देवी पाषाणी नक्षीदार मखरात विराजमान आहे. या मूर्तीच्या अंगावर विविध वस्त्रे व अलंकार आहेत. गर्भगृहात जमिनीवर देवीची तांदळा स्वरूपातील शेंदूरचर्चित स्वयंभू पाषाणमूर्ती आहे.
या मंदिराचे व्यवस्थापन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समितीतर्फे करण्यात येते. नवरात्रोत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्रातील दहा दिवस देवीची विविध शक्ती स्वरूपातील पूजा बांधली जाते. सलग दहा दिवस मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, गायन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. आषाढी व कार्तिकी एकादशीस वारीला पंढरपुरात येणारे हजारो भाविक या देवीच्या दर्शनाला आवर्जून येतात. चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, शाकंभरी नवरात्री, सर्व एकादशी, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.

उपयुक्त माहिती

  • पंढरपूर बस स्थानकापासून १.६ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून पंढरपूरसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home