रूपनारायण मंदिर

दिवेआगर, ता. श्रीवर्धन, जि. रायगड

दिवेआगर हे जसे पर्यटन केंद्र आहे, तसेच ते तेथील प्राचीन मंदिरांमुळेही प्रसिद्ध आहे. शेकडो वर्षांपूर्वीची मंदिरे अजूनही येथे दिमाखात उभी आहेत. या सर्व मंदिरांमध्ये साधारणतः नवव्या शतकातील रूपनारायणाचे सुंदर नारायणाचे मंदिर त्यांच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे भाविकांसोबतच अभ्यासकांचाही कुतूहलाचा विषय आहे. येथील नोंदींनुसार .. १७७२ मध्ये माधवराव पेशवे त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी या मंदिराला भेट दिली होती. पेशवाईपासून या मंदिराला पूजाविधीसाठी वर्षासन मिळत होते. १९६० साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद आहे.

दिवेआगर या गावाला प्राचीन इतिहास आहे. ८२५ ते १२६५ या कालावधीत या प्रदेशावर शिलाहारांच्या उत्तर कोकण शाखेचे अधिपत्य होते. येथे पाचव्या शतकापासूनचे अनेक ताम्रपट सापडले आहेत. यातील .. १०२७२८ मधील नागरी लिपीतील एका ताम्रपटात दिवेआगरचा उल्लेखदीपकगरअसा करण्यात आला आहे. हा ताम्रपट शिलाहार नृपती छित्तराज याने दिलेला आहे. त्यात दंडनायक नागवर्मन् याने दीपकगरच्या गोविंद ब्राह्मणाला दिलेल्या बगीच्याची व्यवस्था ठेवण्याकरीता राजाने त्याला २०० द्रम्म (तेव्हाचे नाणे) देणगी दिल्याचे नमूद आहे. याच छित्तराजाने अंबरनाथचे प्रसिद्ध शिवालय बांधले होते त्याचा बंधू मुम्मुणिराज याने त्या मंदिराची दुरुस्ती केली होती. या शिलाहार नृपती नागार्जुन मुम्मुणिराज याच्या ताम्रपटातही दीपकगर असाच उल्लेख आहे

महाराष्ट्र राज्य साहित्यसंस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्यामहाराष्ट्र गोवे शिलालेखताम्रपटांची वर्णनात्मक सूचीया ग्रंथानुसार, हा ताम्रपट ..१०५३५४ चा नागरी लिपीतील आहे. तो म्हणजे दीपकगर अन्य खेड्यांतून मिळणाऱ्या कराबद्दलचे पद्मलदेवीने दिलेले शिलाहार नृपती मुम्मुणिराज याने नवीन करून दिलेले व्यवस्थापत्र आहे. यांतील दिवेआगरमध्ये सापडलेला अकराव्या शतकातील ताम्रपट अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याचे कारण तो मराठीतील पहिला सर्वांत प्राचीन असा ताम्रपट आहे. हा देवनागरी लिपीतील प्राचीन मराठी भाषेतील ताम्रपट आहे. त्यात शके ९८२ शार्वरी संवत्सर, मार्गशीर्ष पौर्णिमा (शुक्रवार १० नोव्हेंबर १०६०) अशी तिथी देण्यात आली आहे. ताम्रपटाचा सारांश असा आहे कीदिवे गावातील वासुदेव भट्ट या ब्राह्मणाने बहुशः त्याच्याजवळ असलेले स्थितिपुरी या गावासंबंधीचे दोन ताम्रपट रिसियप्प घैसास, सीवु षडंगविद् हे प्रमुख असलेल्या मुख्य सभेत मावलभट्ट या इसमाजवळ ठेवले. सोन्याची १२७ गद्याणक नाणी सभेचा योगक्षेम नीट चालावा म्हणून दामोदर नावाच्या इसमास दिली. हे सर्व दिवे गावच्या रिसियप, पौंवदेव षड्गविद्, तिकै षडंगविद्, जीवणे, नागरूद्र भट, मधुवै षडंगविद् मधुवय देवल यांना ठाऊक आहे. तसेच जी सुवर्णाची नाणी लिहिली ती सर्व एका कंठ्यात ओवलेली आहेत.’ या मराठी ताम्रपटात दिवे असा ग्रामनामाचा स्पष्ट उल्लेख आहे. या शिलाहार काळातच कोकणपट्टीत अरबांची व्यापाराच्या निमित्ताने वस्ती वाढत चालली होती. गोव्याचा कदंबराजा दुसरा जयकेशी (.. ११०४ ते ११४७) याचा प्रधान एक अरब होता. या अरबांच्या पोर्तुगीजांच्या वारंवार हल्ल्यांमुळे दिवेआगर हे गाव अनेकदा उद्ध्वस्त झाले

अशा या इतिहासप्रसिद्ध गावात समुद्रकिनाऱ्याला लागून नारळ आणि पोफळीच्या दाट झाडांमध्ये हे रूपनारायणाचे सुंदर छोटेखानी मंदिर वसले आहे. येथील प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार १९६० साली करण्यात आला होता. त्यानंतर अलीकडच्या काळात या मंदिराचे जांभ्या दगडात बांधकाम करून नूतनीकरण करण्यात आलेले आहे. या मंदिरासमोर एक दीपस्तंभ आहे. हे मंदिर उंच जोत्यावर आहे. मंदिरासमोर जांभ्या दगडाचे चार मोठे स्तंभ आहेत. मुखमंडप, सभामंडप प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपातून काही पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. येथील सभामंडप हा खुल्या स्वरूपाचा आहे बाजूने भाविकांना बसण्यासाठी त्यात कक्षासने आहेत.

गर्भगृहात असलेली रूपनारायणाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती ही सुमारे दीड मीटर उंचीची आहे. अभ्यासकांच्या मते, ही मूर्ती तमिळनाडूतील मधुमला जंगलातील हिरवट काळ्या संगमरवरी दगडातून कोरलेली आहे. मूर्ती शिल्पसौंदर्याचा ती उत्तम नमुना आहे. शिलाहारकालीन म्हणजेच नवव्या ते तेराव्या शतकापर्यंतच्या कालावधीतील ही मूर्ती असावी, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. या कालावधीत कोकण प्रदेश उत्तर शिलाहारांच्या अमलाखाली होता. या मूर्तीवरील नाजूक कलाकुसर वैशिष्ट्यपूर्ण आहे. कानात मकर कुंडले, कमलनयन नेत्र, गळ्यात मोत्याच्या माळा, यज्ञोपवित (जानवे), कमरेच्या वस्त्रावर कमरपट्टा, मनगटात कडा, गळ्यातील सैलसर दागिना खाली झुकलेला दिसतो. दंडामध्ये बाजुबंध, हातातील सर्व बोटांत अंगठ्या कमरेभोवती अनेक अलंकार कोरलेले आहेत. मस्तकावर कमलपुष्प करंडक मुकुट त्यावर असलेले कौस्तुभ चिन्ह व्याघ्रमुखामुळे ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची असल्याचे सांगितले जाते.

मुख्य मूर्तीच्या दोन्ही बाजूंना दशावतार कोरलेले आहेत. मत्स्य, कूर्म, वराह, वामन अवतारातील बटू, याशिवाय हिरण्यकश्यपूशी युद्ध करणारा नृसिंहावतार आवर्जून पाहावा असा आहे. डाव्या पायाने हिरण्यकश्यपूची पकड घेणाऱ्या नृसिंहाने डाव्या हाताने त्याचा केशसंभार पकडला आहे. मूर्तीच्या प्रभावळीमागे असणाऱ्या भागात भगवान बुद्ध आणि कालियामर्दन करणारा कृष्ण ही शिल्पेही नजरेत भरतात. या विष्णुमूर्तीच्या स्कंधावर उजव्या हातास चतुर्मुख ब्रह्मा आणि डाव्या बाजूस शिवप्रतिमा कोरलेली आढळते. मूर्तीच्या मस्तकामागील प्रभावळीत कमलधारी गंधर्व आणि वस्त्रधारी विद्याधर आहेत. मंदिराच्या समोरच दगडी पायऱ्यांची प्राचीन पुष्करणी आहे. याशिवाय येथे सुंदर नारायण हे विष्णूचे मंदिरही आहे

रूपनारायण मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की काही वर्षांपूर्वी परदेशी आक्रमकांनी ही मूर्ती पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. ही मूर्ती पळवून होडीकडे नेत असताना गावकऱ्यांनी त्यांचा प्रतिकार केला. त्यावेळी चोरट्यांनी ग्रामस्थांच्या दिशेने गोळीबारही केला होता. मूर्ती ठेवल्यानंतर या चोरट्यांचे गलबत बुडू लागले म्हणून त्यांनी ती मूर्ती तेथेच टाकून पळ काढला. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मूर्तीला वज्रलेप करताना मूर्तीच्या चक्रात अडकलेली बंदुकीची गोळी काढण्यात आली होती. मंदिर भाविकांसाठी दिवसभर खुले असते. येथे येणारे पर्यटकही आवर्जून या मंदिराला भेट देतात

उपयुक्त माहिती

  • दिवेआगर बस स्थानकापासून किमी अंतरावर
  • माणगाव, श्रीवर्धन येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home