श्रीराम मंदिर

कात्रक रोड, वडाळा, मुंबई

जीएसबी समाजाच्या अस्मितेचे आणि एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठा’तर्फे स्थापन करण्यात आलेले प्रभू श्रीरामाचे सुप्रसिद्ध मंदिर वडाळा येथे आहे. अत्यंत धार्मिक वातावरणात आणि जल्लोषात साजऱ्या करण्यात येणाऱ्या रामनवमी उत्सवामुळे हे मंदिर ख्यातकीर्त आहे. या सोहळ्यामुळे या मंदिरास ‘महाराष्ट्राची अयोध्या’ असेही संबोधले जाते. प्रत्येक राममंदिरामध्ये हनुमानाची मूर्ती स्थापित असते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात हनुमानाची मूर्ती नाही, तर मंदिरासमोर अलबेला म्हणून संबोधल्या जाणाऱ्या हनुमानाचे स्वतंत्र मंदिरच आहे.

जगद्गुरु मध्वाचार्यांनी तेराव्या शतकात प्रस्थापित केलेल्या ‘द्वैत’ सिद्धांताचा वैचारिक वारसा जपणारा गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ हा वैष्णव संप्रदायाचा एक प्रमुख आधारस्तंभ मानला जातो. श्री नारायण तीर्थ हे या मठ परंपरेचे संस्थापक होत. त्यांचे मूळ नाव माधव असे होते. १४७५ मध्ये बदरिकाश्रमात उडुपीच्या श्री पालिमारू मठाचे दहावे मठाधिपती श्री रामचंद्र तीर्थ यांनी चैत्र शुक्ल द्वितीयेला माधव नावाच्या एका तरुण ब्रह्मचाऱ्याला संन्यास दीक्षा दिली आणि त्यांचे नारायण तीर्थ असे नामकरण केले. आपल्या गुरूंकडून प्रभू श्रीरामाची मूर्ती प्रसाद म्हणून घेऊन नारायण तीर्थांनी दक्षिणेच्या दिशेने आपल्या धर्मप्रसाराच्या प्रवासाला सुरुवात केली आणि या महान परंपरेची मुहूर्तमेढ रोवली.

तो काळ मोठा राजकीय धामधुमीचा होता. बहामनी सुलतान आणि त्यानंतर आलेल्या पोर्तुगीज आक्रमकांच्या धार्मिक अत्याचारामुळे गोव्यातील गौड सारस्वत ब्राह्मण समाजावर मोठे गंडांतर आले होते. त्यामुळे विखुरलेल्या या समाजास सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या एकत्र गुंफण्याचे कार्य या मठाने केले. नारायण तीर्थांनी काशी येथे गंगेच्या तीरावरील तत्कालीन राजाच्या साह्याने पहिल्या मठाची स्थापना केली. त्यानंतर कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ येथे दुसऱ्या मठाची उभारणी झाली. त्या काळी या प्रदेशावर केळदी नायकांचे राज्य होते. ‘गुरुपरंपरामृतम्’ या ग्रंथानुसार, केळदीच्या शासकांनी नारायण तीर्थ स्वामींना ‘वडेर’ ही पदवी बहाल केली. तेव्हापासून या मठाला ‘वडेर मठ’ म्हणूनही ओळखले जाऊ लागले. पुढे इ.स. १५४५ मध्ये या मठाचे मुख्यालय गोकर्ण येथे स्थलांतरित झाले. या परंपरेतील तिसरे स्वामी श्रीमद् जीवोत्तम तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांच्या काळात मठाला अभूतपूर्व प्रतिष्ठा प्राप्त झाली. जीवोत्तम तीर्थ स्वामी यांनी १५१८ ते १५८८ अशा प्रदीर्घ ७० वर्षांच्या कालखंडात समाजाचे नेतृत्व केले. आज हा मठ ‘श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ’ या नावाने जगप्रसिद्ध आहे. सध्या दक्षिण गोव्यातील कुशावती नदीच्या काठी असलेल्या पर्तगाळी या छोट्याशा शहरात या मठाचे मुख्य केंद्र आहे. आज बदरीनाथपासून रामेश्वरमपर्यंत या मठाच्या एकूण ३३ शाखा कार्यरत आहेत.

परमात्मा, जीवात्मा व इतर अचेतन विश्व हे परस्परांहून स्वभावतः अत्यंत भिन्न आहेत. जीव व ईश्वर, ईश्वर व जगत्, जगत्‌ व जीव, जीव व जीव आणि जगातील विविध पदार्थ यांच्यामध्ये भेद असतो, हा द्वैतवादाचा मूलभूत सिद्धांत होय. मध्वाचार्यांचा वैष्णव द्वैतवाद असे त्यास म्हटले जाते. वेदांचा मुख्य वाच्यार्थ भगवान विष्णू हाच आहे. ईश्वराची म्हणजे विष्णूची उपासना त्याच्या लक्ष्मी या चिन्मयशक्तीसह केली, तर मोक्षप्राप्ती त्वरेने होते. मोक्ष म्हणजे जन्ममरणपरंपरेतून सुटका. त्वरित मुक्तीकरिता लक्ष्मीसह विष्णू हाच आराधनेचा आणि ध्यानाचा विषय करावा, असे मध्वाचार्यांच्या वैष्णव द्वैतवादाचे प्रतिपादन आहे.

जीएसबी समाजाच्या सदस्यांना आधार देण्याच्या हेतूने वडाळा येथे या मठातर्फे एक भूखंड मिळवून त्यावर इ.स. १९५५ मध्ये एक इमारत बांधण्यात आली. काशी मठाचे श्रीमद् सुधींद्रतीर्थ स्वामी यांच्या हस्ते या इमारतीचे उद्‌घाटन करण्यात आले होते. यानंतर दशकभरात या ठिकाणी श्रीरामाचे मंदिर उभारण्यात आले. माघ शुद्ध षष्ठी, ७ फेब्रुवारी १९६५ रोजी या मंदिरात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींची तत्कालीन मठाधिपती परमपूज्य श्रीमद् द्वारकानाथ तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिरात हनुमानाची मूर्तीही प्रतिष्ठापित करण्यात येणार होती. परंतु असे सांगण्यात येते की मंदिराच्या उद्‌घाटनापूर्वी द्वारकानाथ तीर्थ यांच्या मनात असा विचार आला की मंदिरासमोर आधीपासूनच हनुमानाचे मंदिर आहे. आता आपल्यासमोर प्रभू श्रीराम येणार या विचाराने तेथील हनुमानास आनंद झाला असेल. या राममंदिरात हनुमानाची दुसरी प्रतिमा नको असे त्यास वाटले असेल. या विचाराने येथे हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नाही.

वडाळ्यातील कात्रक मार्ग या रस्त्यालगत मोठ्या भूखंडावर हे मंदिर वसलेले आहे. मंदिरासमोर मोठे प्रांगण आहे. त्यावर पत्र्याची उंच शेड उभारण्यात आली आहे. मुखमंडप, अर्धसभामंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराचा मुखमंडप खुल्या प्रकारचा आहे. त्यास पितळी पत्रा जडवलेले दोन भव्य स्तंभ आहेत. मंडपाच्या छतावर दाक्षिणात्य गोपुरांवर असते त्या प्रकारची देवळी आहे. त्यात मध्यभागी देवकोष्ठकात श्रीराम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती आहेत. देवकोष्ठकाच्या एका बाजूस लक्ष्मी, तर दुसऱ्या बाजूस गणपतीची मूर्ती विराजमान आहे. गणेशमूर्तीच्या समोर विष्णूस आवडता शंख, तर लक्ष्मीमूर्तीसमोर मोठे पुष्पशिल्प लावलेले आहे. मुखमंडपात मध्यभागी भगवान विष्णूस प्रिय असलेल्या तुलसीचे वृंदावन आहे. येथे एक दीप तेवत आहे. वर काचेचे झुंबर टांगलेले आहे. अर्धसभामंडपास संगमरवराचे चौरसाकार प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूंस वैष्णव द्वारपालांच्या मोठ्या मूर्ती विराजमान आहेत.

येथून ओवरीसारख्या अर्धमंडपात प्रवेश होतो. येथे दर्शनी भिंतीवर मठाधिपती, तसेच भगवान विष्णू आदी देवतांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. अर्धमंडपाच्या प्रवेशद्वारास पितळेचे दोन गोलाकार स्तंभ आहेत. त्यांच्या शेजारी दोन्ही बाजूंना द्वारपालांच्या दोन सुंदर कोरीव मूर्ती आहेत. मंदिराचा सभामंडप चौरसाकार व प्रशस्त आहे. त्यातून गर्भगृहास प्रदक्षिणा मार्ग आहे. सभामंडपाच्या छतावर झुंबरे टांगलेली आहेत. बाजूच्या भिंतींवर गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या विविध अधिपतींच्या तसबिरी लावलेल्या आहेत.

समोर मंदिराचे मुख्य गर्भगृह आहे. या चौकोनाकार गर्भगृहाच्या समोर चंदेरी मखर लावलेले आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंती चांदीच्या पत्र्याने मढवलेल्या आहेत. त्यांवर भगवान विष्णूच्या दशावतारांची उठावशिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृहाच्या द्वारचौकटीच्या उतरांग भागामध्ये शेषशायी नारायणाचे मोठे उठावशिल्प आहे. आत चांदीचा पत्रा जडवलेल्या उंच वेदीवर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील कोरीव मूर्ती प्रतिष्ठित आहेत. या मूर्तींची पदकमले, तसेच मस्तकावरील मुकुट सुवर्णाचे आहेत. श्रीरामाच्या हातातील धनुष्य व बाण हेही सुवर्णाचे आहेत. मूर्तींच्या मागे भिंतीवरही श्रीराम-लक्ष्मण-सीता यांच्या धातूच्या मूर्ती विराजमान आहेत. तर वेदीच्या पुढच्या भागात चांदीच्या देव्हाऱ्यामध्येही श्रीराम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती आहेत.

या मंदिराच्या उजवीकडे पत्र्याच्या मोठ्या मंडपामध्ये उभारलेल्या देवळ्यांमध्ये ‘कलियुग-धूम्रकेतू-ध्येयमूर्ती-गणपती’ हे चारही युगांतील गणेश, तसेच बालाजी, नागदेवता वासुकी आणि नवग्रह यांच्या मूर्ती विराजमान आहेत. येथील एका स्तूपासारख्या रचनेमध्ये २३ कोटी राममंत्र लिहिलेल्या वह्या जतन करून ठेवलेल्या आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने, १९९७च्या विजयादशमीच्या मुहूर्तावर मंदिरात श्रीमद् विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांनी महायज्ञ मालिकेचे आयोजन केले होते. त्यावेळी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा मंत्र एक कोटी वेळी लिहून संकलित करण्याचा संकल्प सोडण्यात आला होता. त्यासाठी लहान मुले, विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना प्रोत्साहित करण्यात आले होते. त्यास एवढा प्रतिसाद मिळाला की भाविकांनी तब्बल २३ कोटी मंत्रांचे लेखन केले. ते मंत्र या स्तूपामध्ये आहेत. मंदिर परिसरात तीन वातानुकूलित सामुदायिक सभागृहे आहेत. येथे विविध उत्सव, तसेच विवाह, ब्रह्मोपदेश (मुंज) आदी कार्यक्रम केले जातात.

मंदिरात रविवार ते शुक्रवार या दरम्यान रोज सकाळी ७ ते १.३० व सायंकाळी ५ ते ८.३० या काळात, तर दर शनिवारी सकाळी ७ ते ८.३० या काळात भाविक देवदर्शन घेऊ शकतात. येथे वसंत ऋतूमध्ये रोज पालखी उत्सव, वसंत पूजा, तसेच प्रभू श्रीरामाची अष्टवंदन सेवा हे सोहळे आयोजित केले जातात. श्रावणी (नारळी) पौर्णिमेला सूत्तपूणक हा यज्ञोपवित बदलण्याचा सोहळा होतो. या वेळी मंदिरात यज्ञाचे आयोजन केले जाते. त्यावेळी प्रभू श्रीरामास नवीन यज्ञोपवित घातले जाते. याच प्रमाणे येथे गणेशोत्सव, तसेच नागपंचमीही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मंदिरातील रामनवमी हा सर्वांत मोठा सोहळा होय. नऊ दिवस साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवास गुढीपाडव्यास प्रारंभ होतो. या नऊ दिवसांत मंदिरात सतत रामनामाचा जप केला जातो. रामनवमीच्या दिवशी येथे पाच ते सहा हजार भाविकांच्या उपस्थितीत रामजन्माचा सोहळा साजरा केला जातो. त्या दिवशी येथे भाविकांसाठी भोजनप्रसादाचे आयोजन केले जाते. सायंकाळी मंदिरातून दादर टीटीपर्यंत प्रभू श्रीरामाची पालखी काढली जाते. या सोहळ्यात हजारो रामभक्त सहभागी होतात.

उपयुक्त माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ९ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ८ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२२-२४१२१५३५
मंदिर लोकेशन:

श्री राम मंदिर

कतरक रोड, वडाला, मुंबई

Back To Home