स्वामीनारायण या भारतातील प्रसिद्ध धार्मिक संप्रदायातील ‘बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने’ देश-विदेशात उभारलेली स्वामीनारायण मंदिरे ही स्थापत्यकला, सौंदर्य आणि आध्यात्मिकतेचा सुंदर मिलाफ मानली जातात. बृहन्मुंबईत ‘बीएपीएस’ स्वामीनारायण संस्थेची पाच शिखरबंद मंदिरे आहेत. दादर रेल्वे स्थानकाच्या समोर उभे असलेले भव्य आणि सुंदर स्वामीनारायण मंदिर हे त्यांपैकीच एक आहे. ‘प्रमुख स्वामी महाराज’ यांनी प्रतिष्ठापित केलेले हे मंदिर महामुंबईतील असंख्य स्वामीनारायण भक्तांचे श्रद्धाकेंद्र आहे.
‘स्वामी सहजानंद’ यांनी स्वामीनारायण संप्रदायाची स्थापना केली. त्यांचे मूळ नाव घनश्याम पांडे असे होते. उत्तर प्रदेशातील अयोध्येजवळील ‘छपैया’ या गावात ३ एप्रिल १७८१ रोजी रामनवमीच्या दिवशी सामवेदी ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. त्यानंतर त्यांनी सात वर्षे भारतभ्रमण केले, तसेच हिमालयात तपश्चर्या केली. या काळात ते ‘नीलकंठ वर्णी’ या नावाने ओळखले जात. इ.स. १८०० मध्ये सौराष्ट्रातील ‘मांगरोळ’ येथे ‘स्वामी मुक्तानंद’ आणि नंतर ‘पीपलाणा’ येथे गुरू ‘रामानंद’ यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी गुजरात हे आपले धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्यक्षेत्र म्हणून निवडले. ‘नीलकंठ वर्णी’ यांना ‘सहजानंद’ हे नाव ‘गुरू रामानंद’ यांनी दिले.
इ.स. १८०१ मध्ये ‘सहजानंद’ हे ‘रामानंदी संप्रदायाचे’ प्रमुख बनले. ‘रामानुजाचार्यांच्या’ ‘विशिष्टाद्वैत’ व ‘वल्लभाचार्यांच्या’ ‘शुद्धाद्वैत’ या तत्त्वज्ञानाचा आधार घेत ‘स्वामीनारायण’ यांनी समन्वयकारी धर्माचा प्रसार केला. तत्कालीन समाजातील सती प्रथा, भ्रूणहत्या यांसारख्या अनिष्ट गोष्टींचा, मद्यमांस भक्षण, हिंसा, पशुहत्या, चोरी, जुगार, व्यभिचार, अंधश्रद्धा, होळीसारख्या सणांतील बीभत्सता व अश्लीलता यांचा त्याग करण्याची शिकवण ते देत असत.
जैन धर्मीयांप्रमाणेच त्यांचाही अहिंसा आणि शाकाहारावर भर असे. स्वामीनारायण म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत. लोकांनी त्यांना शरण जावे, हा त्यांचा उपदेश होता. सहजानंद तथा ‘श्रीजी’ ऊर्फ ‘नीलकंठ वर्णी’ हेच स्वामीनारायण म्हणजे ईश्वराचा अवतार आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नोव्हेंबर १८२० मध्ये स्वतः सहजानंद यांनी गोपालानंद स्वामी यांना आपण अवतार घेण्यामागची सहा कारणे सांगितली होती.
१ जून १८३० रोजी सहजानंद ऊर्फ स्वामीनारायण यांचे निर्वाण झाले. तत्पूर्वी १८२५ मध्ये त्यांनी आपल्या संप्रदायात दोन गाद्यांची निर्मिती केली. त्यातील पहिली गादी अहमदाबाद येथे आहे आणि ती ‘नर-नारायण देव गादी’ म्हणून ओळखली जाते, तर वडताल येथील दुसरी गादी ‘लक्ष्मी-नारायण देव गादी’ म्हणून ओळखली जाते. या पंथाचे आचार्यपद वंशपरंपरागत चालावे, असा आदेश त्यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी अहमदाबाद येथील ‘नरनारायण देव गादीवर’ आपले ज्येष्ठ बंधू रामप्रताप पांडे यांचे पुत्र ‘अयोध्याप्रसाद’ आणि वडताल येथील ‘लक्ष्मीनारायण देव गादीवर’ धाकटे बंधू इच्छाराम यांचे पुत्र ‘रघुवीर’ यांची नियुक्ती केली.
पुढे आचार्यपदाच्या या मुद्द्यावरून या संप्रदायातून १९०५ मध्ये ‘शास्त्री यज्ञपुरुषदास’ म्हणजेच ‘शास्त्रीजी महाराज’ यांनी बोचासन येथे वेगळ्या संस्थेची स्थापना केली. ती ‘बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था’ म्हणजेच ‘बीएपीएस’ म्हणून ओळखली जाते. स्वामीनारायण हे संप्रदायाच्या गुरूंच्या माध्यमातून पृथ्वीवर जिवंत आहेत, अशी या संस्थेची श्रद्धा आहे. सन १९५० मध्ये ‘बीएपीएसच्या’ प्रशासकीय प्रमुखपदी, तर १९७१ मध्ये संस्थेच्या प्रमुखपदी ‘नारायणस्वरूपदास स्वामी’ ऊर्फ ‘प्रमुख स्वामी’ यांची नियुक्ती झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘बीएपीएसचा’ मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. आजघडीला जगभरात ‘बीएपीएसची’ १५० शिखरबद्ध मंदिरे आणि १७०० हून अधिक मंदिरे आहेत. नवी दिल्ली येथील ‘अक्षरधाम मंदिर’ हे जगातील सर्वांत मोठ्या मंदिरांपैकी एक मानले जाते. यमुनेच्या तीरावर १०० एकर परिसरात वसलेल्या या मंदिराची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्येही नोंद करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश मंदिरे प्रमुख स्वामींच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आली आहेत. दादरमधील स्वामीनारायण मंदिराची उभारणीही प्रमुख स्वामींच्या मार्गदर्शनाखाली झाली.
मुंबईमध्ये ‘बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे’ मंदिर असावे, अशी स्वामीनारायण यांचे तिसरे आध्यात्मिक वारसदार ‘शास्त्रीजी महाराज’ म्हणजेच ‘स्वामी यज्ञपुरुषदास’ यांची इच्छा होती. एकदा दादर भागात ते आले असता, त्यांनी मुंबईच्या या केंद्रस्थानी मंदिर असावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. १९५१ मध्ये त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात या गादीवर आलेले ‘योगीजी महाराज’ म्हणजेच ‘स्वामी ज्ञानजीवनदास’ यांनी आपल्या गुरूंच्या इच्छेनुसार दादरमधील एका इमारतीत १५ डिसेंबर १९६१ रोजी ‘अक्षर भवन – हरि मंदिराची’ स्थापना केली. स्वामीनारायण संप्रदायामध्ये दोन प्रकारची मंदिरे असतात. एक म्हणजे मोठे, उंच शिखरे असलेले शिखरबंद मंदिर. दुसरा प्रकार म्हणजे हरि मंदिर. ती लहान आकाराची मंदिरे असतात. तेथे सत्संगासारखे कार्यक्रम चालतात. या हरि मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी योगीजी महाराज यांनी “भविष्यात येथे एक मोठे शिखरबंद मंदिर उभे राहील,” असे भाकीत वर्तवले होते. योगीजी महाराज यांचे १९७१ मध्ये एका आजारपणात निधन झाल्यानंतर संस्थेच्या प्रमुखपदी प्रमुख स्वामी यांची नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळात २७ नोव्हेंबर १९७९ रोजी दादर येथे या भव्य मंदिराचा भूमिपूजन सोहळा झाला. डिसेंबर १९८३ मध्ये, प्रमुख स्वामी यांच्या ६२ व्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून एका भव्य सोहळ्यात या मंदिराचे कलशारोहण करण्यात आले.
महामुंबईचे हृदयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादरमध्ये, रेल्वे स्थानकानजीक असलेल्या मोठ्या भूखंडावर हे भव्य मंदिर व त्यास खेटून असलेली सात मजली इमारत वसलेली आहे.
‘बीएपीएसची’ स्वतःची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर स्थापत्यशैली आहे. पारंपरिक नागर शैलीची छाप असलेली ही शैली ‘अक्षर-पुरुषोत्तम महाराज शैली’ म्हणूनही ओळखली जाते. दर्शनमंडप, सभामंडप, या मंडपांतील कोरीव नक्षीकामाने नटलेले स्तंभ, त्या स्तंभांमधील मकरतोरणे, तसेच भव्य शिखरे व उपशिखरे ही स्वामीनारायण मंदिरांच्या या स्थापत्य रचनेची खास वैशिष्ट्ये होत. एकाच वेळी भव्यता आणि बारीक कोरीवकाम यांचा संगम त्यांत पाहावयास मिळतो. दादर येथील मंदिरही याच भव्यता आणि सौंदर्याचा प्रत्यय देते. मंदिरास उंच आवारभिंत आहे. मुख्य प्रवेशद्वारातून काही पायऱ्या चढून मंदिराच्या प्राकारात प्रवेश होतो. सर्वत्र संगमरवरी फरसबंदी असलेल्या या स्वच्छ व प्रकाशमान प्राकारात मुख्य मंदिर वसलेले आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. येथील स्तंभांवर देवी-देवता व सूरसुंदरी यांच्या शिल्पांचे आणि पुष्पवेलींचे बारीक नक्षीकाम केलेले आहे. दोन स्तंभांमध्ये मकरतोरणे आहेत. या मंदिरातील एका स्तंभाचे वैशिष्ट्य म्हणजे तो गोलाकार फिरू शकतो. श्रद्धाळू भाविक येथे मनात काही इच्छा धरून तो स्तंभ फिरवण्याचा प्रयत्न करतात. तो फिरल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
स्वामीनारायण मंदिराच्या पद्धतीनुसार सभामंडपातील मधल्या स्तंभांच्या शीर्षस्थानी संप्रदायातील संतांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाच्या वितानात चक्राकार आणि कमलदलाच्या आकाराचे स्तर असलेले झुंबर कोरलेले आहे. मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये संगमरवरी वेदीवरील सोनेरी मखरामध्ये भगवान स्वामीनारायण यांची मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीच्या डावीकडे गुणातीतानंद स्वामी आणि उजवीकडे गोपालानंद स्वामी यांच्या मूर्ती आहेत. येथील उजवीकडील उपगर्भगृहामध्ये सोनेरी मखरात घनश्याम महाराजांची तर डावीकडील उपगर्भगृहात हरिकृष्ण महाराज आणि राधा-कृष्णाची मनमोहक मूर्ती विराजमान आहे. वस्त्रालंकार आणि पुष्पमालांनी या सर्व मूर्तींचा शृंगार करण्यात आलेला आहे. गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर विष्णूचे दशावतार, तसेच वादकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या कोरीवकामासाठी त्या काळी सुमारे दीडशे कसबी शिल्पकार आणि कलाकारांचे हात राबत होते.
मंदिराच्या सभामंडपाच्या लगत ‘नीलकंठवर्णी अभिषेक मंडपम्’ आहे. या प्रशस्त आणि सुशोभित अशा मंडपामध्ये मध्यभागी कमलपुष्पाकार अधिष्ठानावर नीलकंठवर्णी यांची सोनेरी मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या मागच्या बाजूस उंच चौथऱ्यावरील चार मखरांमध्ये डावीकडून भगतजी महाराज, शास्त्रीजी महाराज,
योगीजी महाराज आणि प्रमुख स्वामी महाराज यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. याचप्रमाणे येथे शास्त्रीजी महाराज यांचे चांदीचे आसन, महंतस्वामी यांची भव्य प्रतिमा आणि प्रमुख स्वामी यांच्या प्रवचनाच्या ठिकाणी बसवलेली त्यांची मोठी मूर्ती आहे. मंदिराच्या परिसरात हनुमान आणि गणेश यांच्या मूर्तीही प्रतिष्ठापित केलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपावर एकूण सात घुमटाकार शिखरे आहेत. गर्भगृहावर सांप्रदायिक शैलीनुसार नक्षीकाम केलेली पाच शिखरे आहेत. यातील तीन शिखरे मुख्य आहेत. या शिखरांवर सोनेरी कलश आहेत.
या मंदिरात सकाळी ७.१५, दुपारी १२.०० आणि सायंकाळी ४.०० ते रात्री ८.४५ या कालावधीत भाविक देवदर्शन घेऊ शकतात. मंदिरात वेदोक्त पद्धतीनुसार व संप्रदायाच्या आचार्यांनी घालून दिलेल्या पद्धतींनुसारच पूजाविधी होतात. येथे सकाळी ६.०० वाजता मंगल आरती होते. यानंतर ७.३० वाजता शृंगार आरती, ११.१५ वाजता राजभोग आरती, सायंकाळी ६.३० वाजता संध्या आरती, तर रात्री ८.३० वाजता शयन आरती होते. स्वामीनारायण म्हणजेच घनश्याम पांडे तथा स्वामी सहजानंद यांचा जन्म रामनवमीचा आहे. हा सण येथे अत्यंत उत्साहाने आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. याशिवाय मंदिरात जन्माष्टमी, दीपावली, अन्नकूट उत्सव भव्य प्रमाणात साजरे केले जातात. अन्नकूट उत्सवाच्या दिवशी स्वामीनारायणांना शेकडो शाकाहारी पदार्थ, मिठाया आणि फळांचा नैवेद्य दाखवला जातो. अत्यंत कलात्मक पद्धतीने हे पदार्थ येथे मांडले जातात. ते पाहण्यासाठी हजारो भाविक येथे येतात. दिवाळीत येथे होणारे चोपडी पूजन हाही एक मोठा सोहळा असतो. मुंबईभरातील अनेक उद्योजक, व्यावसायिक व व्यापारी या सोहळ्यात सहभागी होतात. या मंदिरातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे येथे भोजनालयही चालवले जाते.