
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमुळे आज प्रसिद्ध असलेले उरण हे करंजा बेटावरील एक गाव होय. पूर्वी या बेटाच्या चारही बाजूंनी पाणी होते. बेटावर इतरही अनेक गावे होती व उरण हे त्यांचे केंद्रस्थान होते. याचे मूळ नाव ‘उरुण’ किंवा ‘उरणे’ असे असावे, असे इतिहासकार सांगतात. चाणजे गावातील उरणावती देवीवरून त्यास उरण हे नाव प्राप्त झाले. येथील द्रोणागिरी पर्वतावरील किल्ल्यावर द्रोणागिरी आईचे मंदिर प्रसिद्ध आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या या देवीवर ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे. सात पाड्यांची देवी म्हणूनही या देवीला संबोधले जाते.
द्रोणागिरीस करंजा टेकडी असेही म्हणत. तो पूर्वी किल्ला होता. उत्तर कोकणचा शिलाहार राजा सोमेश्वरदेव याच्या ताब्यात हे बेट होते. परिसरातील पाणजे व रानवड येथे सापडलेल्या शिलालेखांत तसा उल्लेख आहे. या शिलाहारांचा देवगिरीच्या यादवांनी पराभव केल्यानंतर हा किल्ला त्यांच्या ताब्यात गेला. चौदाव्या शतकापर्यंत त्यावर यादवांची सत्ता होती. त्यानंतर
इ.स. १४२२ मध्ये पोर्तुगीज योद्धे लोरेस व लुईस यांनी या प्रदेशावर ताबा मिळविला. पोर्तुगीजांनी १५३० मध्ये या किल्ल्याची डागडुजी करून येथे एक चर्च बांधले. अजूनही या चर्चचे अवशेष येथील पोर्तुगीज राजवटीची साक्ष देतात. मराठा काळात हा किल्ला सेखोजी संकपाळ व त्यांच्या वारसाच्या ताब्यात होता. या परिसरात द्रोणागिरीच्या प्राचीन गुहांशिवाय रानवड, चाणजे व मोरा येथे प्राचीन शिलालेख सापडले आहेत. अभ्यासकांच्या मते, द्रोणागिरीतील गुंफा म्हणजे जकात वसुलीची शुल्कशाळा असावी. याशिवाय समुद्राची अधिष्ठात्री देवता मणिभद्र व मणिमेखल यांचीही येथे स्थाने आहेत.
या किल्ल्यावरील द्रोणागिरी देवीबाबतची आख्यायिका अशी की श्रीराम–रावण युद्धात बाण लागून मुर्च्छित पडलेल्या लक्ष्मणासाठी औषधी आणण्यास गेलेल्या मारुतीने संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. या पर्वतासह उड्डाण करून हनुमान करंजा बेटावरून जात असताना त्याचा काही भाग या बेटावर पडला. तोच भाग द्रोणागिरी पर्वत म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यावरून करंजा येथील देवीलाही ‘द्रोणागिरी आई’ या नावाने संबोधले जाऊ
लागले.
उरण शहराकडून करंजा गावाकडे जाताना मार्गावर डाव्या बाजूला दाट झाडी; तर उजव्या बाजूला डोंगररांगा आहेत. गावात प्रवेश केल्यावर मंदिराकडे जाणारी पायवाट नजरेस पडते. मंदिरापर्यंत आता चढणीचा गाडी रस्ताही करण्यात आला आहे. करंजा गाव हे समुद्रकिनाऱ्यावरच वसलेले असल्याने मंदिर परिसरातून अथांग समुद्राचे व बंदरावर उभ्या असणाऱ्या शेकडो मासेमारी बोटींचे विहंगम दृश्य दिसते. २००९ मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे. या मंदिरासमोर मोठे प्रांगण आहे व त्याला पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असल्यामुळे हा परिसर सुंदर भासतो. तीन मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. जमिनीपासून उंच जगतीवर असलेल्या मंदिराच्या मुखमंडपातील पायऱ्यांवरून सभामंडपात प्रवेश होतो. येथील प्रशस्त सभामंडपात शुभ्र संगमरवरी फरसबंदी आहे. सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दर्शनी भिंतीवर कमळावर
उभ्या असलेल्या दोन द्वारपालांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहातील वज्रपीठावर द्रोणागिरी देवी आणि शीतलादेवीच्या मूर्ती आहेत. मूर्तीच्या मागे भिंतीवर फणा काढलेली नागदेवता रंगवण्यात आली आहे. हे गर्भगृहही संगमरवरी फरशांनी सजविण्यात आलेले आहे. मंदिरावर असलेल्या मुख्य घुमटासह मुखमंडपांवर तीन लहान घुमट आहेत. या घुमटांसह सर्व खांबांवर सुंदर नक्षीकाम करण्यात आलेले आहे.
या मंदिरात नवरात्रीत मोठा उत्सव साजरा होतो. आठव्या दिवशी भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी हजारो भक्त येथे येतात. चैत्र सप्तमीला कार्ला येथील एकवीरा देवीच्या पालखीनंतर दुसऱ्या दिवशी चैत्र कालाष्टमीला द्रोणागिरी आईची पालखी निघते. या दिवशी येथे मोठी यात्रा असते. येथून निघणारी पालखी ही आधी गावातून मंदिरापर्यंत आणली जाते. त्यामध्ये देवीचे मुखवटे ठेवून मग वाजत–गाजत ती पालखी गावात नेली जाते आणि तेथून पुन्हा मंदिरापर्यंत आणली जाते. हा पालखी सोहळा २० ते २५ तास चालतो. या
पालखीबरोबर सुंदर देखावे केले जातात.
येथील आगरी व कोळी बांधवांची या देवीवर अपार श्रद्धा आहे. मासेमारीसाठी समुद्रात जाताना द्रोणागिरी आईची पूजा करून मगच होडी पाण्यात नेली जाते. दररोज सकाळी ६ वाजता देवीवर अभिषेक करण्यात येतो. सकाळी ६.३० व सायंकाळी ७.३० वाजता देवीची आरती होते. दररोज सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना द्रोणागिरी आईचे दर्शन घेता येते. दर मंगळवार सायंकाळी भजन होत असल्याने केवळ त्या दिवशी रात्री ९ वाजेपर्यंत मंदिराची दारे खुली असतात. या मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या देऊळवाडी परिसरात उरणावती देवीचे स्थान आहे. असे सांगितले जाते की या देवीच्या नावावरून शहराला ‘उरण’ हे नाव पडले आहे. या मंदिरासमोर उंच दीपमाळ आहे. प्रशस्त सभामंडप व गर्भगृह असलेल्या या मंदिरात उरणावती व शीतला देवीच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या आजूबाजूला एका रांगेत महादेव, विठोबा, बालाजी व दत्तगुरू या देवतांची मंदिरे आहेत. त्यामुळेच या परिसराला ‘देऊळवाडी’ असे नाव पडले आहे. या देवीमुळे उरण परिसरात रोगराई येत नाही, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे.
हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान पालखीबरोबरच उरणावती देवीची पालखीही फिरवण्यात येते. नवरात्रीनिमित्त अष्टमीच्या दिवशी (नवरात्रीचा आठवा दिवस) होम व यज्ञ होतो. मूर्तीच्या दोन बाजूला सुपाऱ्या लावून कौल घेण्याची पद्धत प्रचलित आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांची तिच्यावर श्रद्धा आहे. मंदिरात रोज सकाळी व संध्याकाळी पूजा–अर्चा व आरती होते.