जोगेश्वरी माता

नागोठणे, ता. रोहा, जि. रायगड

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत अंबा नदीकाठी नागोठणे गाव आहे. येथील तीनतळे परिसरात असलेले ग्रामदेवता जोगेश्वरी देवीचे मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जोगेश्वरी ही भवानी मातेचे रूप असल्याची मान्यता आहे. या मंदिरात भैरवनाथाचे स्थान असल्याने देवीलाभैरी भवानीम्हणूनही ओळखले जाते. या परिसरातील अनेक कुटुंबांची ती कुलदेवता आहे. चैत्र कृष्ण प्रतिपदेला या देवीची पालखी संपूर्ण नागोठणे शहरातून फिरविली जाते. त्यावेळी हजारो भाविक त्यात सहभागी होतात. येथील ग्रामप्रदक्षिणेसाठी या पालखीला तब्बल तीन दिवस लागतात

या मंदिराची आख्यायिका अशी की फार वर्षांपूर्वी नागोठणेजवळील मुरावाडी येथील हिरू ताडकर नेहमीप्रमाणे आपली गुरे चरायला नागोठणे गावाच्या पूर्वेकडील डोंगरपठारावर गेला होता. त्याचवेळी त्याला कोणीतरी हाक मारीत असल्याचे जाणवले; परंतु हा भास असावा असे समजून त्याने दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशीही पुन्हा तोच प्रकार. त्याने परिसरात सर्वत्र पाहिले; परंतु कोणीच दिसले नाही. कोण आवाज देत असेल याचा विचार करीत तो सायंकाळी घरी आला. रात्री झोपेत असताना देवीने त्याला स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले कीतू ज्या ठिकाणी गुरे चरायला जातोस त्या ठिकाणी मी आहे. मला तुझ्या गावी घेऊन चल. मी ज्या ठिकाणी जड लागेन त्या ठिकाणी मला उभ्याने टाकून दे.’ दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ताडकर गुरे चरायला डोंगरपठारावर गेला असताना तेथे देवीची पाषाणरूपी मूर्ती त्याला दिसली. स्वप्नात दिसल्याप्रमाणे असलेली ती मूर्ती पाहून तो त्या मूर्तीसमोर नतमस्तक झाला

स्वप्नदृष्टांतात देवीने सांगितल्याप्रमाणे त्याने ती मूर्ती डोक्यावर घेतली गावाकडे येण्यासाठी निघाला. वाटेत नागोठणे येथील तीन तलावांच्या परिसरात आल्यावर त्याला मूर्ती जड वाटू लागली. त्याने विचार केला की जर मूर्ती उभ्याने टाकली तर ती भंग होण्याची शक्यता आहे म्हणून त्याने मूर्ती हळूच खाली ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु मूर्तीचा भार सहन झाल्याने मूर्ती खाली ठेवताच त्याचा मृत्यू झाला. याच ठिकाणी नंतर ग्रामस्थांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. काही दिवसांनी येथील पोवळे कुटुंबीयांच्या एका सदस्याच्या अंगात भैरीचे वारे आले आणि त्यांनी जोगेश्वरी ही माझी बहीण आहे, तिच्या शेजारी माझी प्रतिष्ठापना करा, असे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी माणगावजवळ असलेल्या गोरेगाव येथील भैरीच्या मंदिरातून भैरवनाथ महाराजांचे तत्व आणले ते देवीच्या शेजारी मांडले. त्यानंतर येथे भैरवनाथांची वाघेश्वर महाराज यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून नागोठणे येथील तीन तलावांच्या परिसरात स्थित जोगेश्वरी माता भैरवनाथ महाराज यांचे हे मंदिर प्रसिद्ध आहे

नागोठणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिराभोवती तीन तलाव आहेत. मंदिराच्या कमानीतून आत आल्यावर प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणाच्या मध्यभागी जोगेश्वरी भैरवनाथ मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मुखमंडपासमोर कासवाच्या पाठीवर असलेला प्राचीन दगडी दीपस्तंभ आहे. जमिनीपासून उंच जोत्यावर असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात जाण्यासाठी मुखमंडपातून आठ पायऱ्या आहेत. येथील सभामंडप हा अर्धखुल्या स्वरूपाचा आहे त्यात बाजूने कक्षासने आहेत. संपूर्ण सभामंडपात संगमरवरी फरशी लावलेली आहे. सभामंडपाच्या पुढील भागात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. या गर्भगृहात एका वज्रपीठावर मध्यभागी देवी जोगेश्वरीची मूर्ती आहे दोन्ही बाजूला भैरवनाथ महाराज वाघेश्वर महाराज यांच्या मूर्ती आहेत. येथील मुखमंडप, सभामंडप गर्भगृहाच्यावर अशी तीन शिखरे आहेत.

साधारणतः १८व्या शतकात या मंदिराची स्थापना झाली असल्याचे सांगितले जाते. देवीचे मंदिर पूर्वी कौलारू होते. १९९५ मध्ये जीर्णोद्धार झाल्यानंतर या मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जीर्णोद्धारानंतर या मंदिरात देवीच्या नव्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. जुन्या मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा असल्याने ती मूर्ती हरिहरेश्वर येथील समुद्रात विसर्जित करण्यात आली होती. काही काळाने विसर्जित केलेली मूर्ती पुन्हा किनाऱ्याला आल्याने तिची छोट्या मंदिरात स्थापना करण्यात आली

असे सांगितले जाते की १८९६ मध्ये प्लेगची साथ होती. त्यावेळी येथील ग्रामस्थ आपली घरेदारे सोडून जंगलात गेले होते. गावात कोणीच नव्हते. त्या वेळी चोरांनी गावात चोरीचा प्रयत्न केला असता पांढऱ्या घोड्यावर बसून देवीने गावाचे रक्षण केले. देवीला पाहून चोरांनी पळ काढला. आजही मंदिर परिसरात गावात मध्यरात्री घोड्यांच्या टापांचा घुंगरांचा आवाज ऐकू येतो, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे

नवरात्रोत्सवात देवीचा मोठा उत्सव असतो. नवरात्रोत्सवात पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम होतात. देवीचा गोंधळ, भोंडला नृत्य, फुगडी स्पर्धा, हळदीकुंकू, कीर्तन, भजन, हरिपाठ असे विविध कार्यक्रम येथे साजरे होतात. चैत्र कृष्ण प्रतिपदेला या देवीचा पालखी उत्सव असतो. त्यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात तीन तलावांभोवती विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात येते. नागोठणे येथील रहिवासी रोजगार उद्योगधंद्यासाठी राज्यात राज्याबाहेर कुठेही असतील, तरी ते यावेळी येथे उपस्थित असतात. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली ही देवीची पालखी संपूर्ण गावात ढोलताशांच्या निनादात फटाक्यांच्या आतषबाजीत फिरवली जाते. पूर्वी हा पालखी सोहळा त्याच दिवशी रात्री संपत असे; परंतु लोकवस्ती वाढल्याने तो आता तीन दिवस चालतो. या सोहळ्यात ताडकर पोवळे कुटुंबीयांना मानाचे स्थान असते.

मंदिराचा परिसर तीन तलावांनी वेढलेला आहे. यातील पहिला मोट्याचे तलाव म्हणून ओळखले जाते. तलावातून पाणी काढण्यासाठी मोटेचा वापर होत असे म्हणून हे नाव पडले. या तलावाची बांधणी शिवकालीन आहे. आतील बाजूंनी दगडी चिरेबंदी करून पाणी सुरक्षित करण्यात आले आहे. इतर दोन नासके तलाव म्हणून ओळखले जातात. यातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्यांना तसे नाव पडले.

उपयुक्त माहिती

  • अलिबागपासून ४२ किमी, तर पेणपासून २९ किमी अंतरावर
  • नागोठणे बस स्थानकापासून पायी दहा मिनिटे अंतरावर
  • मुंबई, ठाणे, अलिबाग, पेण येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home