वसईजवळील हेदवडे येथील महालक्ष्मी मंदिर हे पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध व जागृत मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरातील महालक्ष्मी देवीला नवस करून सलग पाच शुक्रवारी येथे येऊन दर्शन घेतल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथे नवग्रह मंदिरही आहे व ते देशातील एकमेव स्वयंभू नवग्रह मंदिर असल्याचा दावा केला जातो. येथील नवग्रहांची पूजा केल्यास सर्व अडचणी दूर होतात तसेच ग्रहपीडा नष्ट होतात, अशीही भाविकांची भावना आहे. हे मंदिर केवळ शुक्रवारीच दर्शनासाठी खुले असते. त्यामुळे या दिवशी येथे हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.
या मंदिराबाबतची आख्यायिका अशी की वसईत राहणाऱ्या दादासाहेब हाटे यांना काही वर्षांपूर्वी देवीची मूर्ती सापडली. हाटे यांचे पूर्वज पोर्तुगीजांविरोधात लढण्यासाठी चिमाजी अप्पा यांच्यासोबत वसईला गेले होते. वसईत जन्मलेल्या हाटे यांनी कर्नाटकमधील गंगापूर येथे ज्योतिष आणि हस्तेरखा शास्त्राचे शिक्षण घेतले होते. ते एकदा बैलगाडीने त्यांच्या शेतात जात असताना नेहमीप्रमाणे काही क्षण विसावा घेण्यासाठी एका चिंचेच्या झाडाखाली थांबले होते. त्यावेळी दिव्य प्रभावळ असलेली देवी सुंदर स्त्रीच्या रूपात त्यांच्यासमोर प्रकट झाली. तिने एका जागेकडे निर्देश करत हाटे यांना जमिनीतून आपली मूर्ती बाहेर काढण्यास तसेच आपले मंदिर बांधण्याचे आदेश दिले. त्या दिवशी चैत्र कृष्ण पक्षातील द्वादशी आणि वार शुक्रवार होता. देवीने दाखवलेल्या जागी खोदले असता त्यांना शेंदूरचर्चित देवीची मूर्ती आढळली.
मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी त्यांनी कौलारू छत असलेले कारवीचे १० बाय १० फुटांचे छोटे मंदिर उभारले. मूळ योजनेनुसार मूर्ती भिंतीसमोर ठेवण्यात आली होती. मात्र अशी कहाणी सांगितली जाते की काही दिवसांनी देवीने पुन्हा हाटे यांना दर्शन दिले. ‘मला गरबा खेळायचा आहे. भिंतीसमोर असलेल्या मूर्तीची दिशा त्या आड येते,’ असे सांगत देवीने मूर्ती मंदिराच्या मध्यभागी ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येऊन मूर्तीचे स्थान बदलण्यात आले. देवी नवसाला पावते, ही ख्याती अल्पावधीतच पसरल्याने अनेक भक्त तिच्या दर्शनासाठी येऊ लागले. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या हेदवडे येथे तानसा नदीच्या उत्तरेकडील तीरावर हे मंदिर आहे. निसर्गरम्य परिसर लाभलेल्या या मंदिरापासून काही अंतरावरच तानसा आणि वैतरणा नद्यांचा संगम आहे. दूरूनच मंदिराची वास्तू नजरेस पडते. मंदिरात येण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिरात प्रवेश करण्याआधी प्रथम मंदिराबाहेर एका चौथऱ्यावर शेषनाग / नागमंडळाचे दर्शन घडते. या स्थानामागेही एक आख्यायिका आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम निधीअभावी अडकले होते. कंत्राटदारांची देयके देणेही हाटे यांना कठीण झाले होते. तेव्हा त्यांनी देवीची प्रार्थना केल्यावर तिने सापांच्या जोडीसह श्री शेषनागाचे मंदिर बांधण्याचा सल्ला दिला. त्यानुसार हाटे यांनी शेषनाग आणि नर व मादी नाग देवतांच्या मूर्ती मागविल्या. या मूर्ती मंदिरात आणल्या जात असतानाच मंदिरासाठी मोठी देणगी मिळाली आणि कामाला पुन्हा सुरुवात झाली. येथील नागमंडळाची नियमित पूजा केल्यास कालसर्प दोष नष्ट होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नागपंचमीच्या दिवशी येथे विशेष विधी केले जातात.
नागमंडळाचे दर्शन घेतल्यावर येथील मोठ्या सभामंडपात प्रवेश होतो. काही पावलांवरच पंचमुखी हनुमानाचे दर्शन होते. काळ्या ग्रॅनाईटपासून घडवलेल्या या सहा फूट उंचीच्या मूर्तीचे वजन ५०० किलोहूनही अधिक आहे. मूर्तीच्या पायाजवळ सुदर्शन चक्र, मध्यभागी गरूड आणि डावीकडे शंख आहे. मंदिराच्या उजवीकडे नवग्रहांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती ज्वालामुखीच्या लाव्हेपासून बनलेल्या ग्रॅनाईटच्या अखंड दगडातील आहेत. या मूर्ती एकाच ठिकाणी आहेत व त्यांची मुखे विविध दिशांना आहेत. सर्व मूर्ती २७ इंची (अंदाजे २.५ फूट) आहेत. वरून पाहिल्यास नवग्रहांवर ९ अंक बनल्याचे निदर्शनास येते. सर्व मूर्तींच्या वरच्या भागात विशिष्ट मंत्र कोरण्यात आले आहेत. येथील सर्व ग्रहांच्या मूर्ती समाधीवस्थेत (डोळे बंद असलेले) आहेत. नवग्रहांच्या स्थानी धनदेवता कुबेराचीही सुंदर मूर्ती आहे. नजीकच पंचमुखी शिवलिंगही आहे. या मूर्तींनजीकच्या भिंतीवर नवग्रह स्तोत्र कोरण्यात आले आहे. मंदिराच्या परिसरात कालभैरव, दत्तगुरू, श्री सरस्वती आणि पंचमुखी गणेशाचे स्थान आहे. येथील पंचमुखी गणेशाला कार्यसिद्धी गणेश असेही म्हणतात.
देवीच्या गर्भगृहासमोर कासव आहे व प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना देवीचे वाहन असलेल्या वाघाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीवर आकर्षक नक्षीकाम आहे व येथे काही ऋषींच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दर्शनी भिंतींवर दोन्ही बाजूंना ‘८७९’ ही संख्या आहे. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार विशिष्ट संयोजनात असलेल्या या संख्येला विशेष महत्त्व आहे. यातील ८ म्हणजे अष्टविनायक, ७ म्हणजे सप्तऋषी/सप्तदेवता आणि ९ म्हणजे नवग्रहांचे रूप आहे. दैनंदिन जीवनात या संख्येचा अवलंब केल्यास दैवी संरक्षण मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गर्भगृहात मध्यभागी सोन्याचा मुलामा दिलेल्या मखरात देवीची मूर्ती आहे. मूर्तीसमोर श्री यंत्र व देवीच्या मखरावर आकर्षक नक्षीकाम आहे. खालील बाजूस दोन्हीकडे गजराज आहेत. देवीच्या गळ्यात सोन्याचा हार आहे.
हे मंदिर आठवड्यातून केवळ एकदाच शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते. सकाळी १० वाजता मूर्तीवर अभिषेक करण्यात येतो. महाआरती व नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर भाविकांसाठी महाभंडारा होतो. दुपारी ११ ते ३.३० वाजेपर्यंत महाभंडारा असतो. सायंकाळी ६ वाजता भाविकांसाठी मंदिराची दारे बंद होतात. नवसपूर्ती झालेले अनेक भाविक सभामंडपात ‘तुलाभारम’ विधी करून आपल्या वजनाएवढे धान्य अर्पण करतात. दुपारच्या आरतीपूर्वी भाविकांची ‘तुला’ केली जाते. अनेक भाविक आपल्या मुलांची समृद्धी व विकास यासाठीही ‘तुलाभारम’ विधी करतात.