चंडिका देवी मंदिर

जूचंद्र, ता. वसई, जि. पालघर

वसई तालुक्यातील नायगाव पूर्वेकडील जूचंद्र येथील डोंगरावर चंडिका देवीचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. समुद्रसपाटीपासून ४०० फूट उंचीवर, मत्स्याकृती गिरीशिखरावर वसलेली देवी जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. येथे चंडिका देवी, कालिका देवी, महिषासुरमर्दिनी या तीन आदिशक्तींचे एकत्रित दर्शन घडते. तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा मिळालेल्या या शक्तिपीठाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यांतूनही लाखो भाविक येत असतात. चैत्र महिन्यात होणारा देवीचा यात्रोत्सव व शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजून जातो.

जूचंद्र या ग्रामनामाचा अर्थ चंद्राच्या आकाराचे बेट असा आहे. स्थानिक भाषेत बेटाला ‘जू’ असे म्हणतात. या मंदिराबाबतची एक आख्यायिका ‘रुमिनेशन्स – द ॲँड्रियन जर्नल ऑफ लिटरेचर २०१७’मधील ‘सँड इन अवर हँड्स’ या डॉ. दीपा मुर्डेश्वर-कात्रे यांच्या संशोधन निबंधात नमूद करण्यात आली आहे. ती आख्यायिका अशी की अज्ञातवासात असताना कौरवांना आपला ठावठिकाणा लागू नये यासाठी पांडवांचे घनदाट जंगलात वास्तव्य असे. या जंगलांमध्ये राहण्यासाठी ते गुहा खोदीत व तेथील पाषाणांमध्ये देवदेवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करीत व काही दिवसांनी ते पुढे मार्गक्रमण करीत असत. या अज्ञातवासादरम्यान त्यांचे जूचंद्र गावच्या पूर्वेकडील जंगलात काही दिवस वास्तव्य होते. या काळात त्यांनी डोंगरावर मंदिर उभारून येथे कालिका देवी, चंडिका देवी व महिषासुरमर्दिनीची स्थापना केली. या देवींच्या स्नानासाठी दगडांमध्ये छोटा तलावही खोदला. हा तलाव आजही पाहायला मिळतो.

असे सांगितले जाते की घनदाट जंगलात असलेल्या या मंदिराबाबत सुरुवातीला लोकांना माहिती नव्हती. अनेक वर्षांपूर्वी गावात राहणाऱ्या एका भक्ताच्या स्वप्नात देवी आली. गावाच्या पूर्वेकडील पर्वतावरील गुहेत तीन रूपांमध्ये माझ्या मूर्ती आहेत, असे देवीने त्याला सांगितले. त्या भक्ताने याबाबत गावकऱ्यांना सांगितल्यावर त्यांनी देवीचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना ते डोंगरावरील गुहेत पोचले. तेव्हा त्यांना या मूर्ती आढळल्या. त्यानंतर त्यांनी या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना केली.

चंडिका मंदिराबद्दलची ऐतिहासिक कथा अशी की २३ डिसेंबर १५३४ रोजी पोर्तुगीजांनी गुजरातचा राजा बहादूरशाहा याच्याकडून वसई किल्ला घेतला. हा किल्ला मातीचा होता. पोर्तुगीजांनी तेथे दगडाचा किल्ला बांधला. वसईचा किल्ला हा समुद्रकिनारी असल्याने तेथे त्यासाठीचे दगड उपलब्ध नव्हते. त्यावेळी त्यांनी चंडिका देवीच्या पर्वताचे मोठमोठे शिलाखंड जूचंद्र बंदरातून समुद्रमार्गे नेले. त्यावेळी त्या कामावरील मजुरांनी येथे तयार झालेल्या गुहांमध्ये चंडिका, कालिका आणि महिषासुरमर्दिनी या तीन देवतांची प्रतिष्ठापना केली. या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार इ.स. १९४८ मध्ये साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या ‘राष्ट्र सेवा दला’ने केला. यासाठीचा निधी राष्ट्र सेवा दलाने ‘गुरुदक्षिणा’ या नाटकाचा प्रयोग करून जमविला होता. इ.स. १९५६ मध्ये मंदिरासाठी विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्यात आली. इ.स. १९८४ मध्ये मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला.

जूचंद्र येथील डोंगरमाथ्यावर, निसर्गरम्य परिसरात असलेल्या या मंदिराची रचना एखाद्या दरडीवर दुसरी दरड रचावी अशी आहे. या चार मजली मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर मोठी दीपमाळ आहे. त्याजवळच मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे चालवले जाणारे प्रसादालय आहे. मंदिरात येण्यासाठी सुमारे २०० पायऱ्या चढाव्या लागतात. लिफ्टनेही मंदिराच्या थेट सभामंडपात येता येते. भाविकांच्या सोयीसाठी पायऱ्यांच्या मध्यभागी रेलिंग व वरच्या भागात पत्र्याचे छत आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून काही पायऱ्यांच्या अंतरावर डावीकडे जुनी दगडी दीपमाळ आहे. प्रवेशद्वाराच्या जवळ वरच्या बाजूस वाघाच्या प्रतिकृती आहेत. सभामंडपात प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. येथील मोठ्या सभामंडपात यज्ञकुंड आहे.

मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर नक्षीकाम आहे. गर्भगृहात, गुहेमध्ये असलेल्या चौथऱ्यावर चंडिका देवी, कालिका देवी व महिषासुरमर्दिनी या आदिशक्तींच्या तीन मूर्ती आहेत. त्यांच्या शेजारी गणेशाची पाषाणी मूर्ती आहे. देवींच्या मूर्तींवर चांदीचे मुकुट आहेत. या मूर्तींजवळ देवीचे वाहन असलेल्या वाघ-सिंहाच्या दोन शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. या मूर्तींच्या डावीकडील चौथऱ्यावर देवीचे वाहन असलेल्या सिंहाचे धातूचे शिल्प आहे. मूर्तींच्या मागील बाजूस, कातळात असलेल्या नैसर्गिक झऱ्यातून सतत पाणी झिरपत असते.

नवसाला पावणारी, संकटसमयी भक्तांच्या हाकेला धावून येणारी देवी, असा चंडिका देवीचा लौकिक आहे. त्यामुळे अनेक भाविक तिच्या दर्शनासाठी येथे येतात. येथे विविध शारीरिक व्याधी बऱ्या होण्यासाठी, तसेच अपत्यप्राप्ती आदी बाबींसाठी नवस केले जातात. नवसपूर्तीनंतर देवीला त्या-त्या नवसानुसार डोळे, हात, पाय, पाळणे आदींच्या सोने, चांदी वा पितळेच्या प्रतिकृती अर्पण करण्याची प्रथा आहे. या मंदिरात सकाळी ६.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येते. दररोज सकाळी ८.३० व सायंकाळी ७ वाजता येथे आरती होते. मंगळवार हा आदिशक्तीचा वार समजला जातो. या दिवशी संध्याकाळी ७ वाजता सामुदायिक आरती होते. दर पौर्णिमेला मंदिराच्या प्रसादालयात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत भंडारा होतो. दरवर्षी चैत्र महिन्यात तीन दिवस यात्रोत्सव होतो. त्यानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात येते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीचा विधिवत अभिषेक-पूजा करण्यात येते. दुसऱ्या दिवशी देवीचा पालखी सोहळा होतो. तिसऱ्या दिवशी कुस्त्यांचे जंगी सामने होतात. राज्याच्या विविध भागांतील मल्ल या स्पर्धेत सहभागी होतात. या उत्सवादरम्यान समाजप्रबोधन करणारे नाट्यप्रयोग सादर केले जातात. उत्सव काळात मंदिराच्या प्रसादालयाच्या सभागृहात रांगोळी प्रदर्शनही भरवण्यात येते. हजारो भाविक या उत्सवादरम्यान देवीच्या दर्शनासाठी येतात. या उत्सवकाळात ठाणे, वसई व पालघर येथून जूचंद्रसाठी खास परिवहन महामंडळाकडून एसटीची सेवा उपलब्ध करण्यात येते.

शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले असते. अश्विन शुद्ध प्रतिपदेला मंदिरात घटस्थापना करण्यात येते. नवमीला होमहवन होते तर दसऱ्याला घटविसर्जन करण्यात येते. या नऊ दिवसांत येथे धूपारती, महापूजा, भजन, कीर्तन, हरिपाठ, गरबा नृत्य, पालखी सोहळा आदी विविध कार्यक्रम होतात. नवरात्रोत्सवात येथे गरबा खेळण्यासाठी अगदी मुंबईच्या उपनगरांतूनही भाविक येतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ग्रामदेवी चंडिकादेवी न्यासतर्फे विनामूल्य चहापान व प्रसादाची व्यवस्था करण्यात येते. ग्रामदेवी चंडिकादेवी न्यासतर्फे परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. याशिवाय न्यासच्या वतीने दरवर्षी केवळ १०१ रुपयांत सामुदायिक विवाह सोहळ्याचेही आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती

  • वसईपासून १५ किमी तर विरारपासून २६ किमी अंतरावर
  • नायगाव स्थानकापासून रिक्षा व शहर परिवहन सेवेची बस सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : देवेंद्र किणी, अध्यक्ष, मो. ९२७०४३८१२५,
  • विद्याधर पाटील, उपाध्यक्ष, मो. ९८६०८०७२१३
Back To Home