पालघर तालुक्यातील एडवणच्या समुद्रकिनाऱ्यापासून ५०० मीटर आत एका उंच टेकडीवजा खडकावर आशापुरी देवीचे स्वयंभू स्थान आहे. शेकडो वर्षांपासून टेकडीवरील गुहेत वास्तव्यास असलेल्या या देवीला अश्रापेश्वरी देवी म्हणूनही ओळखले जाते. या टेकडीच्या मागच्या बाजूला पाण्याची कुंडे आहेत. ही कुंडे देवीनेच निर्माण केल्याची भाविकांची श्रद्धा आहे. भक्तांच्या आशा पूर्ण करणारी म्हणून आशापुरी देवी असे नाव पडलेल्या या जागृत देवतेच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, पालघरसह गुजरात व राजस्थानमधूनही शेकडो भाविक येथे येत असतात.
पालघर जिल्ह्यात देवींची अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत. येथील निसर्गरम्य परिसरात वसलेल्या एकवीरा, महालक्ष्मी, वज्रेश्वरी, शीतलादेवी, हरबादेवी आणि सत्वादेवी या देवींची आशापुरी देवी ही सातवी बहीण असल्याची मान्यता आहे. पं. महादेवशास्त्री जोशी संपादित ‘भारतीय संस्कृतीकोशा’च्या पहिल्या खंडानुसार, आशापुरी ही गुजरातमधील एक देवता आहे व तेथील अनेकांची कुलदेवता आहे. तेथील वेगवेगळ्या भागात हिची वेगवेगळ्या नावांनी पूजा करतात. आपल्या कुलदेवीचे स्थान फार लांब असू नये, या उद्देशाने आशापुरी देवीची स्थापना अनेक मध्यवर्ती ठिकाणी झाल्याचे दिसते. या देवीस अपत्यप्राप्तीसाठी नवसही केले जातात. पालघर जिल्हा हा गुजरातला लागून असल्याने या भागातही अनेक लोकांचे आशापुरी देवी हे पूज्य दैवत आहे.
एका आख्यायिकेनुसार, या परिसरात इ.स. १७३९ पर्यंत पोर्तुगीजांचे राज्य होते. पोर्तुगीजांनी १५६० साली गोवा बेटात इंक्विझिशन म्हणजेच धर्म समीक्षण संस्थेची स्थापना केली होती. आपल्या अखत्यारितील प्रदेशातील बिगर ख्रिश्चन रहिवाशांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागू न देणे व ते तसे वागत असल्यास त्यांना कडक शासन करणे हा त्याचा उद्देश होता. या इंक्विझिशनने गोव्यात आणि ठाणे-पालघर मधील पोर्तुगीज भागांत प्रचंड धुमाकूळ घातला होता. त्यांनी अनेक मंदिरे पाडली. अनेकांना धर्माच्या नावाखाली मारून टाकले. याच बरोबर यातून त्यांनी अलोट संपत्तीही गोळा केली. एकदा एडवणमधील या बेटावर इंक्विझिशनचे काम करणारे भिक्षू काही पोर्तुगीज सैनिकांसह आले होते. असे सांगण्यात येते की त्यावेळी देवी असलेल्या गुहेतून मोठ्या आकाराचे हजारो भुंगे बाहेर पडले व त्यांनी पोर्तुगीज सैन्याला सळो की पळो करून सोडले. त्यामुळे पोर्तुगीजांनी येथून पळ काढला. या घटनेनंतर वारंवार येथील ग्रामस्थांना देवीचा साक्षात्कार होऊ लागला. या बेटाच्या आसपास समुद्रात मच्छीमारांना अमाप मासे सापडू लागले. याच काळात पांढऱ्याशुभ्र रंगाच्या घोड्यावर स्वार होऊन गावात फेरफटका मारणाऱ्या या तेजस्वी देवीने अनेकांना दर्शन दिले.
या देवीची दुसरी आख्यायिका अशी की अनेक वर्षांपूर्वी एक गुराखी येथे ओहोटीच्या वेळी गायींना चरण्यासाठी घेऊन येत असे व भरती सुरू होण्याआधी देवीचे दर्शन घेऊन घरी जात असे. मात्र त्याच्या गायींपैकी एक गाय अनेकदा त्याच्यासोबत घरी जात नसे. टेकडीवरच ती राहत असे. बरेच दिवस हा प्रकार सुरू असल्याने तो एके दिवशी तिला शोधायला टेकडीवर आला. तेव्हा त्याने पाहिले की ती गाय टेकडीवर देवीसमोर बसली होती. देवीचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर तो तिच्या चरणी नतमस्तक झाला. त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन त्याला एक पोते दिले. मात्र घरी जाईपर्यंत हे पोते उघडून पाहू नकोस, असेही बजावले. तो पोते घेऊन घरी जाण्यास निघाला. मात्र देवीने पोत्यात काय दिले असावे, हे पाहण्याच्या उत्सुकतेतून त्याने वाटेत पोते उघडून पाहिले. त्यात कोळसे असल्याचे त्याला आढळले. त्यामुळे रागातून त्याने घाटरस्त्याच्या कडेला ते कोळसे फेकून दिले आणि रिकामे पोते घेऊन तो घरी गेला. त्यानंतर त्याने पत्नीला ही हकीगत सांगितली. त्याच्या पत्नीने ते झटकल्यावर त्यातून सुवर्णमुद्रा खाली पडल्या. त्यामुळे गुराख्याला पश्चाताप झाला. त्याने फेकलेले कोळसे परिसरातील जेटीच्या मार्गिकेच्या समुद्र तळाशी लहान लहान दगडगोट्यांच्या रूपात आजही पाहायला मिळतात, असे सांगितले जाते.
अठरापगड जातीचे वास्तव्य असलेल्या एडवण गावातील मराठी शाळेच्या मागे असलेल्या पडक्या किल्ल्याचे अवशेष येथील पोर्तुगीजकालीन राजवटीची साक्ष देतात. या गावात आशापुरी देवीच्या मंदिराशिवाय शंकराचे तसेच रामाचेही मंदिर आहे. देवीच्या मंदिरात येण्यासाठी आता किनाऱ्यापासून बेटापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केलेला आहे. त्यामुळे भाविकांना आपल्या वाहनांनी थेट बेटापर्यंत येता येते. पूर्वी भरती-ओहोटीची वेळ पाहून मंदिरात यावे लागत असे. मंदिराच्या प्रांगणातून पुढे आल्यावर मंदिराची प्रवेशकमान आहे. या परिसरात फुले व पूजा साहित्याची अनेक दुकाने व उपाहारगृहे आहेत. या कमानीजवळ देवीचे वाहन असलेल्या घोड्याचे छोटे मंदिर आहे. या मंदिरापासूनच गुहेत असलेल्या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या करण्यात आल्या आहेत. टेकडीच्या पायथ्याशी देवीचा भाऊ असलेल्या श्रीकृष्णाचे स्थान आहे. त्याला ‘गोवळा’ असे संबोधण्यात येते. बहिणीच्या रक्षणासाठी तो पायथ्याशी थांबलेला आहे, अशी आख्यायिका आहे.
सुमारे चार फूट उंचीच्या गुहेमध्ये असणाऱ्या कपारीसारख्या गर्भगृहात सुमारे १० पायऱ्या उतरून प्रवेश होतो. एका वेळी चार ते पाच भाविक दर्शन घेऊ शकतील एवढीच गर्भगृहात जागा आहे. गर्भगृहातील खडकावर आशापुरी देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे. तिच्या बाजूला देवीची संगमरवरी मूर्ती आहे. त्याशेजारी देवीचे शस्त्र असलेला त्रिशूळ आहे. या गुहेत जीवदानी देवी आणि एकवीरा देवीचीही स्थाने आहेत. जीवदानी देवीच्या मूर्तीच्या मागील बाजूस एक गुहा आहे. या गुहेत आशापुरी देवी वास्तव्य करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
आशापुरी मंदिराच्या मागील बाजूस काही पायऱ्या चढून गेल्यावर एका गुहेत बारोडकरणी देवीचे स्थान आहे. ही आशापुरी देवीची बहीण असल्याचे बोलले जाते. तिच्या मंदिराजवळ असलेल्या गुहेत पाच तोंड असलेल्या भुजंगाचे वास्तव्य असून तो केवळ भाग्यवान भाविकांनाच दर्शन देतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. टेकडीच्या वरच्या भागात दोन कुंडे आहेत. या कुंडामध्ये देवी स्नान करते, अशी आख्यायिका आहे. चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या देवीच्या यात्रेदरम्यान तसेच नवरात्रोत्सवात येथे हजारो भाविक उपस्थित असतात.