कोकणातील समुद्र किनार्यालगत असलेले पालघर जिल्ह्यातील डहाणू हे ऐतिहासिक शहर निसर्गसमृद्ध परिसरात स्थित आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील प्राचीन महालक्ष्मी मंदिरामुळे हे शहर विशेष प्रसिद्ध आहे. पालघरसह मुंबई व ठाणे जिल्ह्यातून तसेच गुजरातमधूनही या देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दररोज येथे येतात. चैत्र पौर्णिमा ते चैत्र अमावस्या या कालावधीत येथे १५ दिवसांची मोठी जत्रा असते. ठाणे व पालघर जिल्ह्यांतील सर्वात मोठ्या यात्रांपैकी ती एक समजली जाते. या काळात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवसपूर्तीसाठी येथे येतात.
डहाणूचे प्राचीन नाव दाहनूक असे होते. याच नावाची नदी तेथे होती. क्षत्रप वंशाचा राजा नहपान याचा जावई ऋषभदत्त (उषवदत्त) याच्या नाशिक लेण्यांतील इ.स. १२०-१२१ च्या शिलालेखात या नावाचा उल्लेख आहे. या शिलालेखात म्हटले आहे, की ‘इबा, पारदा, दमण, तापी, करबेणा आणि दाहनुका या नद्या पार करण्याकरिता धर्मार्थ तरींची सोय केली. या नद्यांच्या दोन्ही काठांवर धर्मशाळा बांधल्या व पाणपोया घातल्या आणि पिंडीतकावड, गोवर्धन, सुवर्णमुख, शोर्पारग आणि रामतीर्थ येथे संन्याशांना (भिक्षुसंघांना) नानंगोल गावातील बत्तीस हजार नारळीची झाडे दान दिली.’ इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनचा इतिहास असलेल्या या शहरामध्ये महालक्ष्मी मातेचे हे प्राचीन स्थान आहे.
येथील देवीच्या वास्तव्याबाबत आख्यायिका अशी की वनवास काळात असताना एके दिवशी पांडवांचा मुक्काम डहाणू येथील एका डोंगरावर होता. त्यावेळी कोल्हापूरची महालक्ष्मी भ्रमण करीत डहाणूजवळ पोहचली. तेव्हा देवीची भेट भीमाशी झाली. साजशृंगार केलेल्या देवीच्या सौंदर्यावर भीम मोहित झाला व त्याने देवीला लग्नासाठी मागणी घातली. त्यावेळी देवीने त्याच्यासमोर एक अट ठेवली की जर एका रात्रीत सूर्या नदीवर बांध बांधला तरच मी लग्न करणार. त्याप्रमाणे भीमाने बांध बांधायला सुरुवात केली. बांधाचे काम पूर्णत्वास येऊ लागले तेव्हा अघटीत घडू नये या भावनेने देवीने सूर्योदय होण्यापूर्वीच कोंबड्याचे रूप धारण करत बांग दिली. त्या आवाजाने भीमाला सूर्योदय झाला असे वाटले आणि त्याने आपण हरलो असे समजून माघार घेतली. या परिसरात असलेला बांध हा भीमबांध म्हणून ओळखला जातो व आजही तो अर्धवट स्थितीत आहे. यानंतर रानशेत गावाजवळील भुसल पर्वतावरील गुहेत जाऊन माता विश्राम करण्यास बसली.
ठाणे गॅझेटियरमधील नोंदीनुसार, भुसल डोंगरावरील शिखरास पूर्वी सेंट व्हॅलेंटाईन पिक (संत व्हॅलेंटाईनचे शिखर) असे म्हणत. त्याची उंची समुद्रसपाटीपासून १५४० फूट एवढी आहे. तेथील गुहेत देवीचे स्थान होते. तो डोंगर चढण्यास अत्यंत अवघड होता. तेथे केवळ देवीचा वारली पुजारीच जाऊ शकत असे. पौर्णिमेच्या रात्री तो शिखरावर चढून तेथे ध्वज लावून परतत असे. त्यावेळी खाली असंख्य लोक उभे राहात असत व डोंगरावर ध्वज फडकवण्यात आला की मोठा जयघोष करीत असत. या पुजाऱ्याच्या कुटुंबीयांखेरीज कोणीही तेथे ध्वज लावण्यास गेले की त्याच्या जीवावर बेतत असे. माऱ्या पाटील हा तेथे नेहमी ध्वज लावत असे. मात्र इ.स. १८७२ मध्ये तो ध्वज लावण्यासाठी चढत असताना अचानक गायब झाला. त्यानंतर तीन वर्षे तेथे ध्वज लावण्यात आला नाही. त्यानंतर माऱ्या पाटील याचा पुतण्या कृष्णा याला देवीचा स्वप्नदृष्टान्त झाला. देवीने त्याला ध्वज फडकावण्यास सांगितले. तेव्हापासून तो ध्वज लावण्यास चढत असे. ही १८८२ मधील नोंद आहे.
देवीच्या या डोंगरावरील स्थानाप्रमाणेच गावात डोंगराखालीही देवीचे मंदिर आहे. जव्हार संस्थानचे पहिले राजे जयबा मुकणे यांनी या मंदिराची स्थापना केल्याचे सांगण्यात येते. मुकणे यांनी जव्हार राज्याची स्थापना इ.स. १३१६ मध्ये केली. त्यानंतरच्या काळात हे मंदिर उभारण्यात आले असावे. देवीचे मंदिर डोंगराखाली उभारण्याबाबतची अशी आख्यायिका सांगण्यात येते की एकदा एक आदिवासी गर्भवती महिला पर्वत चढून देवीच्या दर्शनाला जात होती. त्यावेळी चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली. तेव्हा त्या महिलेला देवीने स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की यापुढे तुम्हाला माझ्या दर्शनासाठी गडावर येण्याची गरज नाही, मीच खाली येते. तेव्हापासून देवीचे स्थान या गडाखाली बिवलवेढे गावात आहे.
गावातील महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात प्रवेशद्वारानजीक दोन उंच व वैशिष्ट्यपूर्ण दीपस्तंभ आहेत. त्यांत असलेल्या खोबणींमध्ये शेकडो दिवे लावण्याची व्यवस्था आहे. या दीपमाळांच्या मध्यभागी असलेल्या चौथऱ्यावर काही स्थानिक देवतांचे पाषाण आहेत. मंदिरासमोरील रस्त्यापासून ८ ते ९ फूट खोलात हे मंदिर आहे. भाविकांच्या सुविधेसाठी या प्रांगणात दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय प्रांगणात प्राचीन वटवृक्ष आहे व त्याभोवती चौकोनी पार घातलेला आहे. पाराजवळ येथे काही वीरगळही आहेत. तीन मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची रचना आहे. मुखमंडपाच्या समोरील बाजूस देवीचे वाहन असलेल्या सिंहाची दोन शिल्पे आहेत. अर्धखुल्या स्वरूपाच्या या मुखमंडपातून मंदिरासाठीचा प्रदक्षिणा मार्ग आहे. मुख्य मुखमंडपाशिवाय सभामंडपाच्या उजवीकडे व डावीकडे आणखी दोन मुखमंडप आहेत. या तीनही मुखमंडपांवर घुमटाकार शिखरे व त्यांवर कळस आहेत. येथील सभामंडप खुल्या स्वरूपाचा व आटोपशीर आहे. यामध्ये भाविकांना दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सभामंडपासह मंदिरातील सर्व स्तंभांवर संगमरवरी कलाकुसर करण्यात आलेली आहे. सभामंडाच्या छतावर सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण असे मोठे झुंबर लावलेले आहे. या सभामंडपाच्या पुढील बाजूस गर्भगृह आहे. या गर्भगृहात वज्रपीठावर महालक्ष्मी देवी स्थानापन्न आहे. येथे देवीची शेंदुरचर्चित पाषाणमूर्ती आहे. या मूर्तीवर सोनेरी मुकुट व नाकात नथ आहे. विविध अलंकारांनी मढविलेली देवीची ही मूर्ती सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण भासते. देवीच्या उजवीकडे श्रीगणेशाची व डावीकडे सरस्वती मातेची मूर्ती आहे. या मंदिराच्या सभामंडपावर व गर्भगृहावर शिखर व कळस आहेत.
या मंदिरात वर्षभर विविध उत्सव व सण साजरे केले जातात. त्यामध्ये कोळीचा शेंदूर, नव्याचा शेंदूर, पित्तर बारस, नवरात्र, वाघ बारस, माही बारस, होळीचा शेंदूर आणि यात्रा उत्सव यांचा समावेश आहे. कोळीचा शेंदूर या उत्सवात पावसाळा सुरू झाल्यानंतर साधारणतः पहिल्या १२ ते १५ दिवसांत उगवणाऱ्या भाजीचा देवीला नैवेद्य दिला जातो. त्यानंतर त्या भाजीचा आहारात वापर केला जातो. नव्याचा शेंदूर या उत्सवात नवीन तयार झालेला भात देवीला अर्पण केला जातो. त्याच प्रमाणे पित्तर बारसमध्ये आदिवासी बांधवांकडून शेतात आलेले धान्य व भाज्या यांचा देवीला नैवेद्य दाखविला जातो. माघ शुद्ध द्वादशीला पुजारी कुटुंबाच्या घरी पाच दिवस माही बारस हा उत्सव असतो. यावेळी संपूर्ण पचक्रोशीतील लोक एकत्र येऊन या उत्सवात सहभागी होतात.
या मंदिराजवळूनच गडावर असलेल्या देवीच्या मूळ स्थानी जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला आहे. गडावरील मंदिरात जाण्याचा हा रस्ता काहीसा कच्चा व चढणीचा आहे. २० ते २५ मिनिटांची पायवाट व त्यानंतर ८८७ पायऱ्या चढून मंदिरापर्यंत यावे लागते. या वाटेवर काही लहान मंदिरेही आहेत. या डोंगरावरून खाली असणाऱ्या अनेक गावांचे विहंगम दृश्य दिसते. या गडावरील मंदिरात मांसाहार करून यायचे नसते, अशी प्रथा आहे; परंतु तरीही अनेक भाविकांकडून येथे कोंबड्या व बकऱ्यांचा नवस बोलला जातो. जिवंत कोंबडा वा बकरा वर आणला जातो. तो देवीला अर्पण करून त्याचा बळी न घेता तो गावात जिवंत सोडला जातात. हे येथील वेगळेपण आहे.
चैत्र पौर्णिमेला रात्री १२ वाजता डोंगरावरील मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या टोकदार शिखरावर देवीचा ध्वज चढविला जातो. जव्हारच्या राजघराण्यामार्फत देवीला ध्वज चढवण्याची परंपरा येथे आजही पाळली जाते. या मंदिरातील पुजारी या ध्वजासोबतच देवीच्या ओटीचे सामान व दिवा घेऊन या गडावर जातो. तीव्र चढावामुळे तेथे सर्वसामान्यपणे कोणालाही जाणे शक्य होत नाही. त्यामुळे ध्वज लावण्याचे हे दृश्य पाहण्यासाठी यावेळी गडाखाली हजारो भाविक उपस्थित असतात. बिवलवेढे येथे दुरून आलेल्या भाविकांच्या वास्तव्यासाठी भक्त निवासाचीही सुविधा आहे (संपर्क : नटू भाई, व्यवस्थापक, मो. ९३१६०६३६४४, ९२६५४०२३४३)