‘देवदरी’ या नावाने ओळखले जाणारे सावळेश्वर महादेव मंदिर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर या तीन तालुक्यांच्या सीमेवर आहे. चौदाव्या शतकातील हे मंदिर निसर्गरम्य परिसर व डोंगराच्या दरीत वसलेले आहे. या मंदिराबाबत पौराणिक आख्यायिका अशी की श्रीरामांनी वनवासकाळात सीतेसाठी येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. तेथेच कालांतराने हे मंदिर उभारण्यात आले. असे हे श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थस्थान मराठवाड्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मंदिराबाबत अशी इतिहासकथा सांगितली जाते की सतराव्या शतकात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठवाडा परिसरात निजामशाही फौजांनी धुडगूस घातला होता. त्यांचा उपद्रव मोडून काढण्यासाठी शिवरायांनी आपले पराक्रमी सरदार प्रतापराव जाधव यांना येथे पाठवले. प्रतापरावांनी येथील दऱ्या-खोऱ्यांतून गनिमी काव्याने निजामशाही फौजांशी चार हात केले. या परिसरातील वास्तव्यादरम्यान मारसावळी येथील मोडकळीस आलेले हे सावळेश्वर महादेव मंदिर त्यांना दिसले. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मारसावळी जंगल परिसरातच प्रतापराव जाधव यांचे समाधी मंदिरही आहे.
याबाबतची एक आख्यायिका अशी की दंडकारण्याचा भाग असलेल्या या घनदाट परिसरामध्ये वनवास काळात श्रीराम, सीता व लक्ष्मण यांचे वास्तव्य होते. त्यावेळी सीतेस शंकराची पूजा करता यावी, याकरीता श्रीरामांनी येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यामुळे या मंदिरातील शिवपिंडीजवळ श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती आहेत. श्रीरामांनी स्थापन केलेल्या शिवलिंगामुळे त्या काळी या ठिकाणाचे नाव ‘रामेश्वरम’ असे होते. मात्र येथील देवाचे वास्तव्य दरीत असल्याने पुढे या ठिकाणाचे नाव देवदरी हे रूढ झाले. आज ते देवदरी तसेच सावळेश्वर महादेव मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे.
फुलंब्री तालुक्यातील मारसावळी आणि नांदखेडा या गावांच्या मध्यभागी डोंगररांगांमध्ये हे प्राचीन मंदिर आहे. डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरात येण्यासाठी बांधीव पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी आहे. प्रांगणाच्या प्रवेशद्वाराजवळ उजवीकडे भारतमातेचे छोटेसे मंदिर आहे. देशात वाराणसी, हरिद्वार, कन्याकुमारी, उज्जैन, तसेच देवगिरी येथे असलेल्या भारतमातेच्या मंदिरांहून हे मंदिर वेगळे आहे. देवगिरी येथील मंदिरामध्ये भारतमातेची मूर्ती अष्टभुजेच्या रूपात सर्प, पद्म, त्रिशूळ, सुदर्शन चक्र धारण केलेली अशी आहे. येथील मंदिर आकाराने लहान असून मूर्ती शेंदूरचर्चित आहे. मंदिराच्या पायऱ्यांजवळ डावीकडे गणेशाची तर उजवीकडे मारुतीची मोठी मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. या मंदिराचे प्रवेशद्वार कमानीच्या आकाराचे आहे. गर्भगृहात भारतमातेची उभी मूर्ती आहे. मंदिरास मोदकाच्या आकाराचे शिखर असून द्विस्तरीय आमलकावर कळस आहे. या शिखराच्या खालील भागातील देवळ्यांमध्ये देवतांच्या मूर्ती आहेत.
भारतमातेच्या या मंदिरासमोर सावळेश्वर महादेवाचे मंदिर आहे. दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराचे शिखर आकर्षक आहे. जमिनीपासून सुमारे तीन फूट उंचीच्या अधिष्ठानावर हे मंदिर आहे. अधिष्ठानावर नक्षीदार पट्टिका कोरण्यात आली आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. पाच पायऱ्या चढून मंदिराच्या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पगडीधारी व दंडधारी द्वारपालांची चित्रे आहेत. सभामंडपातील दगडी खांबांवर नक्षीकाम तसेच विविध शिल्पे आहेत. अंतराळात नंदीची अखंड पाषाणातील मूर्ती आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती कोरलेली आहे. संगमरवरी फरसबंदी केलेल्या गर्भगृहात मध्यभागी सावळेश्वराची मोठी पिंडी आहे. या पिंडीवरील लिंगाचा भाग सोडून असलेली शाळुंका संगमरवरी आहे. शिवलिंगाच्या मागील समोरील भिंतीला लागून श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या दगडात कोरलेल्या प्राचीन मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर दगडी गोमुख आहे. गोमुखाच्या वरच्या भागात छोटी शिवपिंडी आणि नंदी आहे. मंदिराच्या शिखरावर निमुळते होत जाणारे सहा स्तर आहेत. त्यावर आमलक व आमलकावर सोनेरी कळस आहे. या शिखरावर सुंदर नक्षीकाम व रंगकाम केलेले आहे.
महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. या काळात मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. श्रावण महिन्यातही मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप येते. या महिन्यात दररोज भजन, काकड आरती आदी धार्मिक कार्यक्रम होतात. अनेक भाविक यावेळी भंडाऱ्याचेही आयोजन करतात. हे मंदिर सध्या पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. या मंदिराला लागून बारमाही वाहणारा झरा आहे. असे सांगितले जाते की १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळादरम्यान मराठवाड्यातील अनेक जलस्रोत आटले होते. मात्र त्यावेळीही हा झरा वाहत होता. त्यावेळी या झऱ्याने परिसरातील गावांमधील नागरिकांची तहान भागवली होती. या झऱ्याजवळ दगडी बांधकाम करून त्याचे पाणी अडविण्यात आलेले आहे.