आध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून उभारण्यात आलेले छत्रपती संभाजीनगरमधील पारदेश्वर मंदिर अनेक शिवभक्त तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण आहे. या मंदिरातील शिवलिंग १११ किलो वजनाच्या पाऱ्यापासून बनवण्यात आले असून ते १५१ किलो वजनाच्या गंधकापासून निर्माण करण्यात आलेल्या वेदीवर ठेवण्यात आले आहे. प्रसिद्ध वेरूळ लेण्यांमधील कैलाश मंदिरातील शिवलिंगाची काहीशी छबी येथे पाहायला मिळते.
भारतात पारदेश्वराची मोजकीच मंदिरे आहे. त्यापैकी एक असलेले हे मंदिर छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळ आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी अनंत शास्त्री यांनी हे मंदिर उभारले. प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराचे विस्तीर्ण प्रांगण लागते. सर्वत्र पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेले प्रांगण स्वच्छ व नीटनेटके आहे. प्रांगणात ठिकठिकाणी लहान–मोठी झाडे आहेत. प्रांगणाच्या डावीकडे गोशाळा तसेच राम–कृष्ण सभागृह आहे. येथून पुढे वटसिद्ध यक्षिणी मंदिर, नवग्रह मंदिर, यज्ञशाळा, सरस्वती मंदिर, हनुमान मंदिर तसेच कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. कार्तिक स्वामींचे मंदिर वर्षातून एकदाच दर्शनासाठी खुले असते. या परिसरात श्री रेणुका, श्री तुळजाभवानी आणि श्री सप्तशृंगी देवीचे सप्तघृत मातृका शक्तिपीठही आहे.
पारदेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारानजीक शंखनिधीची (द्वारपाल) मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांजवळ दोन्ही बाजूला सिंहांची शिल्पे व वारली चित्रे आहेत. सभामंडप, त्यापुढे खुले अंतराळ आणि गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. येथील सभामंडपाच्या भिंतींवर वरच्या बाजूस जुन्या औरंगाबादमधील (सध्याचे छत्रपती संभाजीनगर) प्राचीन वास्तू, प्रसिद्ध ठिकाणे, मंदिरांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. त्यात अजिंठा–वेरूळमधील लेण्यांच्या जुन्या चित्रांचाही समावेश आहे. बंदिस्त सभामंडप व गर्भगृहाच्या मधल्या जागेत खुले अंतराळ आहे. अंतराळात गर्भगृहासमोर नंदीचे शिल्प व दोन्ही बाजूला सिंहांची शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या भिंतींवरील दोन्ही बाजूंच्या देवळ्यांमध्ये डावीकडे दत्ताची, तर उजवीकडे गणेशाची मूर्ती आहे. येथील गर्भगृहातील शिवलिंग हे पाऱ्याचे आहे. त्यासाठी १११ किलो पारा वितळवून त्याला घनस्वरूप देत, हे शिवलिंग तयार करण्यात आले आहे. गंधकापासून निर्माण करण्यात आलेल्या वेदीवर हे शिवलिंग आहे. गंधक म्हणजे पार्वतीचे रज आणि पारा म्हणजे शिवाचे वीर्य असल्याची पौराणिक मान्यता आहे.
असे सांगितले जाते की या मंदिरात आध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालण्यात आली आहे. पारा हा ऊर्जादायी, मोक्षदायी असतो. त्यामुळे पारदेश्वराच्या सान्निध्यात आल्यावर भाविकांना शक्ती व ऊर्जा मिळते. पाऱ्यामध्ये ऊर्जावहनाची क्षमता असल्याने विचार करणारे तंतू कार्यान्वित होतात, अशी या मागील श्रद्धा आहे. भावी पिढीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून आध्यात्माकडे पाहावे, हाही या मंदिराच्या उभारणीमागील हेतू आहे. पारद शिवलिंगाची पूजा–अर्चा केल्यास मानवाला चारही पुरुषार्थ प्राप्त होऊ शकतात. पारद शिवलिंगात साक्षात शिवाचा वास असतो. त्याच्या दर्शनाने मानवाला सुख–सौभाग्य, आयुष्य, आरोग्य तसेच ऐश्वर्याची प्राप्ती होते, अशी श्रद्धा असल्याने अनेक शिवभक्त येथे दर्शनासाठी येतात.
मंदिराच्या बाजूला श्री लक्ष्मी कुबेर सिद्धपीठही (मंदिर) आहे. या मंदिरासमोरील छोट्या हौदात मुंगसाची मूर्ती आहे. या हौदात जिवंत मासे आहेत. मुंगूस, मत्स्य आणि अश्व ही कुबेराची वाहने आहेत. नभ–भू–आणि जल या तिन्ही ठिकाणच्या धनावर लक्ष ठेवण्यासाठी देवांनी कुबेराला ही वाहने दिल्याची पौराणिक कथा आहे. त्यामुळे या वाहनांना येथे स्थान देण्यात आले आहे. मंदिरात लक्ष्मी, कुबेर आणि चित्रलेखा यांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती राजस्थानातून बनवून आणल्या आहेत. मध्यभागी धनकुंभ हातात घेऊन तो रिता करत असलेली लक्ष्मी आहे. तिच्या डाव्या बाजूला कुबेर आणि उजवीकडे त्याची धर्मपत्नी चित्रलेखा आहे. कुबेराच्या उजव्या हातात धनकुंभ आहे.
शिवाचा भक्त असलेला कुबेर रावणाचा चुलत भाऊ असल्याचेही दाखले पुराणात आहेत. देवांच्या कोषागाराचा प्रमुख असलेल्या कुबेराकडून बालाजीने विवाहासाठी कर्ज घेतले होते, अशी आख्यायिकाही आहे. लक्ष्मीने कुबेराला पुत्र मानले होते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याचेही दर्शन घेण्याची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर श्री लक्ष्मी कुबेर सिद्धपीठात दिवाळीदरम्यान वसूबारस, नरक चतुर्दशी व लक्ष्मी पूजन असे तीन दिवस उत्सव होतो. उत्सवादरम्यान श्री सुक्तांचे ११ हजार पाठ करून हवन केले जाते. पहिले दोन दिवस यज्ञ होतो. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ५६ भोगांचा प्रसाद असतो. या दिवशी शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. सकाळी ६.३० ते दुपारी १ तसेच दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मंदिरात भाविकांना दर्शन घेता येते.