आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमलयेस्थित तिरुपती वेंकटेश्वर मंदिर हे कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आहे. तिरुमला मंदिर, तिरुपती मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर अशा विविध नावांनी हे मंदिर ओळखले जाते. मंदिराच्या इतिहासानुसार, नवव्या शतकात मंदिराची स्थापना करण्यात आली होती. या मंदिरात रोज असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. नवसाला पावणारा देव, अशी तिरुपती बालाजीची ख्याती आहे. अनेक जण वर्षातून एकदा तरी या मंदिरास भेट देत असतात. देशात अनेक ठिकाणी आज तिरुपती बालाजीची मंदिरे उभी आहेत. त्यातील एक मंदिर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे.
या मंदिराची स्थापना ३० ऑगस्ट १९९४ रोजी करण्यात आली. असे सांगितले जाते की या ठिकाणी गणपतीचे मंदिर उभारण्याची योजना होती. त्यासाठी येथे पाया खणत असताना एका मजुराने टिकावाचा घाव घातला असता जमिनीतून खण्ण असा आवाज आला. तेव्हा शोध घेतला असता तेथे एक छोटी पितळी मूर्ती सापडली. ही मूर्ती बालाजीची होती. त्यामुळे येथे बालाजीचे मंदिर बांधण्याचे ठरले. श्री व्यंकटरमण गोविंद बालाजी संस्थानतर्फे मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिराच्या आजूबाजूला अनेक गृहनिर्माण संस्था असून लोकवस्तीमध्येच विस्तीर्ण जागेत दाक्षिणात्य शैलीत हे मंदिर बांधण्यात आले आहे.
मंदिरासमोर प्रांगणात सुंदर उद्यान विकसित करण्यात आलेले आहे. यामध्ये ठिकठिकाणी नागरिकांना व भाविकांना बसण्यासाठीची व्यवस्था आहे. या संपूर्ण प्रांगणात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर मंदिराहूनही उंच असा पितळी गरुडखांब उभारण्यात आला आहे. या खांबाच्या पायथ्याशी संगमरवरी मंदिरात काळ्या पाषाणातील गरुडाची नमस्कार मुद्रेतील उभी मूर्ती आहे. या मंदिराच्या वरील बाजूस खांबावर पितळी पत्र्यामध्ये आणखी एक गरुडाची बसलेली मूर्ती आहे. हे मंदिर जमिनीपासून उंच जोत्यावर असल्याने आठ पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. मंदिराचे प्रवेशद्वार मोठे आहे. दर्शनी भिंतीच्या वरच्या बाजूस दाक्षिणात्य शैलीतील मंदिराकार शिल्पे बसवण्यात आली आहेत. प्रवेशद्वारातूनच गर्भगृहातील बालाजी मूर्तीचे मुखदर्शन होते. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप बंदिस्त असून त्यास मोठ्या खिडक्या आहेत. आत कोरीव नक्षीकाम केलेले खांब आहेत.
गर्भगृहाच्या द्वारास सागवानी चौकटी आहेत. त्यावर सुंदर वेलबुट्टी कोरलेली आहे. गर्भगृहात संगमरवरी आसनावर कृष्णपाषाणातील बालाजीची उभी चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या मस्तकी सुवर्णमुकुट, चंद्रकोरीचे चिन्ह, तसेच हातात शंख–चक्र आहे. सुवर्णरंगलेपित मखरकमानीमध्ये ही मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीच्या पायाजवळ मंदिराच्या बांधकामाच्या वेळी सापडलेली बालाजीची लहानशी पितळी मूर्ती आहे. तिरुपतीच्या बालाजी मंदिराप्रमाणे येथेही उत्सव साजरे केले जातात. श्रावण महिन्यात प्रत्येक शुक्रवारी येथे सामूहिक विष्णुसहस्त्रनाम पठणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. याशिवाय मंदिर ट्रस्टतर्फे वर्षभर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सकाळी ५ वाजल्यापासून ९ पर्यंत सायंकाळी ४.३० वाजल्यापासून ८.३० पर्यंत या मंदिरात भाविकांना बालाजीचे दर्शन घेता येते.
पौराणिक कथांनुसार, तिरुपती बालाजी वा श्री वेंकटेश आणि पंढरपूरचा विठ्ठल यांच्यात साम्य आहे. विठ्ठल हा बाळकृष्ण मानला जातो, तर वेंकटेश हा बालाजी म्हणून ओळखला जातो. विठ्ठलाची पत्नी रुक्मिणी राधेचे निमित्त सांगून दिंडीरवनात रूसून बसली होती, तर वेंकटेशाची पत्नी भृगू ऋषींनी केलेला अपमान पतीने सोसल्यामुळे चिडून प्रथम करवीरात आणि नंतर तिरुमलैपासून तीन मैल दूर तिरुचानूरमध्ये वेगळी राहिली होती. वेंकटेशाच्या पत्नीचे नाव पद्मावती, तर विठ्ठलाच्या पत्नीचे एक नाव पद्मा असेही सांगण्यात येते. वेंकटेश हा विठ्ठलाप्रमाणेच शस्त्रहीन आहे. हे दोन्ही देव विष्णुरूप पावलेले आहेत.