मंदिरांचे शहर असा लौकिक असलेल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरमधील सिडको एन–९ परिसरातील रेणुका मातेचे मंदिर हजारो देवीभक्तांचे श्रद्धास्थान आहे. ‘प्रतिमाहूर’ अशी या मंदिराची ख्याती आहे. आकर्षक कलाकुसर असलेल्या या मंदिरात विराजमान झालेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक येतात. २०११ मध्ये या मंदिराचे गर्भगृह २०० किलो चांदीने मढवण्यात आले होते. कालांतराने त्यावर सोन्याचा मुलामा चढवण्यात आला. नवरात्रोत्सवादरम्यान देवीची ओटी भरण्यासाठी येथे दररोज हजारो महिला येतात.
छत्रपती संभाजीनगर–जळगाव रस्त्यावर सिडको बस स्थानकापासून तीन किमी अंतरावर रस्त्यालगत या मंदिराची दुमजली वास्तू आहे.१९८९ मध्ये सोनई येथील प. पू. योगीराज हंसतीर्थ स्वामी ऊर्फ अण्णा महाराज यांनी या मंदिराची स्थापना केली होती. दाक्षिणात्य स्थापत्यशैलीच्या या मंदिराची उंची ४० ते ४५ फूट आहे. मंदिराच्या आवारात येताच मंदिराचे शिखर, बाह्य भिंतीवरील देखणी शिल्पे व नक्षीकाम नजरेत भरते. या भिंतींवर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. रेणुका मातेचे मंदिर आणि त्यालगतच्या कालभैरवाच्या मंदिराला जोडणाऱ्या कमानीवरही कलाकुसर असून मध्यभागी देवळीत दुर्गामातेची मूर्ती आहे.
भव्य सभामंडप आणि त्यातच डावीकडे गर्भगृह, असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूंना चवऱ्या ढाळणाऱ्या स्त्रीप्रतिमा आहेत. प्रवेशद्वाराजवळ सभामंडपात कासवमूर्ती आहे. या सभामंडपाच्या एका भिंतीवर देवीच्या नऊ रूपांची माहिती आहे. हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या शैलपुत्री, तपस्विनी स्वरूपातील पार्वती माता म्हणजेच ब्रह्मचारिणी, कपाळी अपूर्णावस्थेतील चंद्र असलेली माता चंद्रघंटा, विश्वजननी कृष्मांडा, कार्तिकेयाच्या मातेच्या स्वरूपातील स्कंदमाता, ऋषी कात्यायनांची कन्या कात्यायनी, वाईट शक्तींचा नाश करणारी कालरात्री, गौरवर्णीय महागौरी आणि सर्व सिद्धींची स्वामिनी सिद्धीदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.
देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला व पुरुषांना येथे वेगळ्या दर्शनरांगा आहेत. गर्भगृहासमोरील चौथऱ्याजवळ उभे राहून देवीचे दर्शन घेता येते. या चौथऱ्याच्या दोन्ही बाजूंना देवीचे वाहन असलेल्या सिंहांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहावर सुवर्णलेपित रुपेरीपत्रा जडवलेला असून त्यावर आकर्षक कलाकुसर आहे. मूर्तीच्या प्रभावळीवरही आकर्षक नक्षीकाम आहे. खालील बाजूस जय–विजय; तर वरच्या बाजूला सूर्य–चंद्र कोरण्यात आले आहेत. गर्भगृहात एका चौथऱ्यावर रेणुका मातेचा तांदळा विराजमान आहे. सव्वाचार फूट उंच देवीच्या शेंदूरचर्चित मूर्तीवर मुकुट, कपाळावर मोठे कुंकू, कानात आभूषणे, नाकात नथ व डोक्यावर छत्र आहे. या मूर्तीच्या भोवताली काचेची भिंत आहे.
रेणुका मातेच्या पौराणिक कथांनुसार, परशुरामाने आपला पिता जमदग्नी याच्या आज्ञेने रेणुका मातेचा शिरच्छेद केला. परशुरामाची आज्ञाधारकता पाहून जमदग्नी प्रसन्न झाले व त्याने परशुरामास वर माग असे म्हटले. त्यावर परशुरामाने आपल्या मातेस जिवंत करा, असा वर मागितला. जमदग्नीने ते मान्य केले. रेणुकेचे शव होमाग्नीत टाक म्हणजे ती दिव्य देह धारण करून तुला भेट देईल, असे जमदग्नीने सांगितले. मात्र परशुरामाने मागे वळून पाहायाचे नाही अशी अट होती. होमाग्नीत रेणुकेचे शव टाकल्यानंतर ती क्रमशः तेथून प्रकट होऊ लागली; परंतु परशुरामाने शंकाकुलतेने मागे वळून पाहिले. त्याबरोबर ती पूर्णतः प्रकट व्हायची थांबली. त्यामुळे ती तांदळ्याच्या स्वरूपातच पूजली जात असून माहूर हे तिचे निवासस्थान आहे. माहूरच्या मंदिरातही देवीचा तांदळा विराजमान आहे. येथील देवीचा तांदळा हाही बऱ्याच अंशी माहूर येथील देवीच्या तांदळ्यासारखाच आहे. या देवीसही सुवर्ण मुकुट, मकर कुंडले, नाकात नथ असा साज आहे. त्यामुळे हे मंदिर प्रतिमाहूर म्हणूनच ओळखले जाते.
मंदिराच्या गर्भगृहाच्या एका भिंतीवर मंदिराचे संस्थापक प. पू. योगीराज हंसतीर्थ स्वामी यांची प्रतिमा आहे. पूर्वाश्रमीचे प. पू. हरिहरानंदनाथ महाराज ऊर्फ अण्णा महाराज हे शिवशक्तीच्या उपासना परंपरेतील होते. त्यांनी संन्यास प्रकारातील हंस दीक्षा घेतली होती. संन्याशांच्या चार प्रकारांतील हंस म्हणजे गावात एक रात्र आणि शहरांत पाच रात्री राहणारा आणि वर्षातील ११ महिने भिक्षेवर राहणारा संन्यासी. यातील अन्य तीन प्रकार पुढीलप्रमाणे – कुटीचक म्हणजे झोपडीत राहणारा, भगवी वस्त्रे परिधान करणारा मात्र आप्तांच्या घरी भोजन करणारा बहूदक म्हणजे बांधव वर्ज्य करून इतर सात घरी भिक्षा मागून निर्वाह करणारा व परमहंस म्हणजे शिखायज्ञोपवीत आणि नित्यकर्म यांचा त्याग करणारा. योगीराज हंसतीर्थ महाराज हे जगदंबा व रेणुका मातेचे उपासक होते. इ.स. १९९९ मध्ये पौष वद्य एकादशीस ते समाधिस्थ झाले. अहमदनगरमधील सोनई येथील रेणुका दरबार हे त्यांचे समाधीस्थळ आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील या रेणुका मातेच्या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. त्याबरोबरच येथे आरोग्य शिबिर, नेत्रदान–रक्तदान शिबिर, सामुदायिक विवाह सोहळा आदी सामाजिक कार्यक्रमही होतात. या मंदिरात भाविकांना ऐच्छिक अभिषेक, पौर्णिमेचा अभिषेक, कुंकुमार्चन, सप्तशती पाठ, श्रीसुक्त अभिषेक, भोगीपूजा, शेंदूरलेपन या पूजा व विधी करता येतात. (संपर्क : धनंजय पुराणिक, गुरुजी, मो. ८४४६१२४०६७)