दोलेश्वर महादेव मंदिर

पैठण शहर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर


शांतिब्रह्म एकनाथ महाराज समाधी मंदिरापासून काही अंतरावर पैठणमधील एक प्राचीन शिवमंदिर आहे. दोलेश्वर महादेव मंदिर किंवा दोलक मंदिर या नावाने ते ओळखले जाते. संत एकनाथ महाराज बारा वर्षांचे असताना आपण आता आध्यात्मिक गुरू करावा, अशी ओढ त्यांच्या मनास लागली होती. त्यामुळे ते देवगिरीला आले आणि त्यांनी जनार्दनस्वामी यांचे शिष्यत्व पत्करले. असे सांगितले जाते की या जनार्दनस्वामींना गुरू करावे, असा दृष्टान्त त्यांना पैठणमधील याच दोलेश्वर महादेव मंदिरात झाला होता.

प्रतिष्ठान महात्म्यग्रंथामध्ये या मंदिराविषयी एक कथा आहे. त्यानुसार धर्मवर्मा आणि त्याची पत्नी निंद्यरूपा हे ब्राह्मण दाम्पत्य येथे राहात होते.हे दोघेही दिसायला अत्यंत कुरूप होते. त्याचे मोठे शल्य त्यांच्या मनात होते. आपले हे कुरूप पालटावे यासाठी धर्मवर्मा आणि निंद्यरूपा या दोघांनीही एकदा गोदावरीत स्नान करून महादेवाची पूजा केली. त्यावर महादेव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना वर दिला. त्यामुळे ते ब्राह्मण दाम्पत्य रूपवान झाले. त्यांनी याच दोलेश्वर महादेवाची पूजा केली होती. अन्य एका आख्यायिकेनुसार, श्रीराम हे महादेवाचे भक्त असून त्यांनी स्वतः या मंदिराची स्थापना केली होती.

या मंदिराविषयी काही ऐतिहासिक कथा सांगण्यात येतात. त्यानुसार यादव काळात अल्लाऊद्दीन खिलजी याने देवगिरीवर आक्रमण केले. त्यावेळी त्याने या मंदिरास हानी पोचवली. त्याच्या सैनिकांनी साखळदंड लावून ही पिंड उखडण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांना त्यात यश आले नाही. या मंदिरातील शिवलिंगावर वरच्या बाजूला गोलाकार खाच दिसते. ती त्या साखळदंडामुळे पडली, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अशीही एक कथा सांगण्यात येते की छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे बंधू विठोजीराजे यांना पैठणजवळच असलेल्या मुंगी या गावाची जहागिरी मिळाली होती. आपल्या पूर्वजांच्या या गावास एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली होती. त्यावेळी ते पैठण येथे आले असता त्यांनी दोलेश्वर महादेव मंदिरात येऊन दर्शन घेतले होते.

या मंदिरास बाहेरच्या बाजूने जुनी विटांची आवारभिंत आहे. भगव्या रंगात रंगविलेल्या विटांनीच बांधलेल्या उंच प्रवेशद्वारातून आत जाताच डाव्या बाजूस शिवमंदिराचे दगडी महिरपी कमान असलेले प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वारासमोर तुळशी वृंदावन आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना असून सभामंडपामध्ये नंदीची दगडी मूर्ती आहे. गर्भगृहात जमिनीत रोवलेले काळ्या पाषाणातील अखंड शिवलिंग आहे. असे सांगण्यात येते की पैठणमधील ही सर्वांत मोठी शिवपिंडी आहे. श्रावण महिन्यात दोलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येथे भाविकांची गर्दी असते. मंदिराच्या प्रांगणात गणपती, हनुमंत महादेव यांची लहान मंदिरे आहेत. प्राचीन काळापासून पैठण परिसरातील १२ शंकर मंदिरे ही पैठणमधील १२ ज्योतिर्लिंग म्हणून ओळखली जातात. त्यामध्ये यात्रा मैदानाजवळील दोलेश्वर महादेव मंदिरासह माले मशिदीजवळील पिंपलेश्वर महादेव मंदिर, दत्त मंदिराजवळील गाढेश्वर, जैन मंदिराजवळील सोमेश्वर, गंगा मंदिराजवळील रामेश्वर मंदिर, गणेश घाटाजवळील तारकेश्वर मंदिर, रंगरहाटी येथील कालिकेश्वर मंदिर, नाग घाटावरील इंद्रेश्वर नागेश्वर मंदिर, शनिमंदिराजवळ असलेले बाळलिंगेश्वर मंदिर, कुचर ओट्याजवळील सर्वेश्वर मौलानाजवळ असलेले सिद्धेश्वर मंदिर यांचा समावेश आहे. महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. त्यावेळी हजारो भाविक त्यात सामील होतात. या मंदिरात सकाळी ते रात्री १० पर्यंत (दुपारी ते ही वेळ वगळता) भाविकांना दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • नाथसमाधी मंदिरापासून ५०० मीटर अंतरावर
  • पैठण बस स्थानकापासून पायी १० मिनिटांवर
  • छत्रपती संभाजीनगरपासून ५२ किमी अंतरावर
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • संपर्क : मंदिर कार्यालय : ८४८२८४८११६, ९८२२५००४४७
Back To Home