गोदावरी नदीच्या पात्राजवळ वसलेले गुंज (खुर्द) हे गाव दत्तात्रयांचा अवतार मानल्या जाणाऱ्या ‘वासुदेवानंद सरस्वती’ (टेंबे स्वामी) यांचे पट्टशिष्य योगानंद सरस्वती महाराज (गांडा महाराज) यांची कर्मभूमी आहे. दत्तोपासना करणाऱ्या भक्तांमध्ये अग्रगण्य असलेल्या योगानंद महाराजांनी येथेच टेंबे स्वामींच्या जीवनावर मराठी भाषेत ‘गुरुमूर्तीचरित्र’ लिहिले. त्यांच्या सांगण्यावरून प्रतिष्ठापना केलेल्या दत्तात्रयांच्या मूर्तीचे आणि गांडा महाराजांच्या समाधीचे येथे दर्शन होते. मराठवाड्यातील दत्तसंप्रदायाचे अनेक अनुयायी या ठिकाणाला भेट देतात. फाल्गुन वद्य द्वादशीच्या दिवशी गांडा महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुंज येथे मोठी जत्रा भरते.
योगानंद सरस्वती महाराजांचा जन्म शके १७९० (इ. स. १८६८) मध्ये गुजरात मधील सुरत जिल्ह्यातील तलंगपूर गावात दत्तजयंतीच्या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव डाह्याभाई आणि आईचे नाव काशीबाई असे होते. गांडा महाराजांचे मूळ नाव ‘कल्याण’ असे होते. नवसाने झालेल्या मुलाला दृष्ट लागू नये म्हणून आई-वडील त्यांना ‘गांडा’ (वेडा) म्हणू लागले आणि पुढे तेच नाव प्रचलित झाले. बालपणापासूनच शिवभक्त असलेल्या गांडा महाराजांचे लक्ष नोकरी किंवा व्यापारात लागले नाही. माता-पित्यांनी त्यांचा विवाह लावून दिला, परंतु ते संसारातही रमले नाहीत. मनात वैराग्याची भावना निर्माण झाल्याने गृहत्याग करून ते नाशिकजवळील पंचवटी येथे आले. तेथील वास्तव्यादरम्यान त्यांना संतसहवास लाभला.
पुढे ओंकारेश्वराच्या जंगलात काही काळ तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. काही दिवसांनी सिनोर येथे मार्कंडेश्वराच्या मंदिरातंची आणि टेंबे स्वामींची भेट झाली. त्यांची भक्ती पाहून टेंबे स्वामींनी त्यांना दीक्षा दिली आणि माता-पित्यांच्या सेवेसाठी गावी परत पाठवले. ते गुरूंची सेवा करण्यासाठी लवकरच टेंबे स्वामींकडे परतले.
गांडा महाराजांची निष्ठा, श्रद्धा आणि आचरण यांमुळे ते टेंबे स्वामींचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जाऊ लागले. गरुडेश्वर येथे समाधिस्त होण्यापूर्वी टेंबे स्वामींनी त्यांना संन्यास घेऊन मराठवाड्यात दक्षिण प्रांतात जाण्याची आज्ञा केली. माता-पित्यांचे निधन झाल्यावर विरक्ती प्राप्त झालेल्या गांडा महाराजांनी शके १८४१ मध्ये संन्यासदीक्षा घेतली आणि डाकोर येथे कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराजांकडून दंडदीक्षा ग्रहण करून ‘योगानंद सरस्वती स्वामी महाराज’ हे नामाभिधान धारण केले. त्यानंतर गांडा महाराजांनी ठिकठिकाणी प्रवचने करून लोकांपर्यंत अध्यात्म पोहोचवण्याचे कार्य केले.
पुढे ते फिरत फिरत मराठवाड्यात आले. त्यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद), सेलू, मानवत, मोरगाव, जिंतूर, बलीवसा, सेंधे गोगळगाव, कुरुंदा, पूर्णा, परभणी, पाथरी आणि औंढा आदी ठिकाणी भ्रमण केले. बऱ्याच ठिकाणी त्यांनी दत्त मंदिरे आणि मठ बांधले. पाथरी येथेंची भेट पंडितराव चौधरी यांच्याशी झाली. गुंज हे गाव त्यांच्याच देखरेखीखाली होते. चौधरी यांनी त्यांना गुंज येथे वास्तव्य करण्याची विनंती केली. गुंजच्या रम्य परिसरात योगानंद सरस्वतींच्या चिंतनशील व्यक्तिमत्त्वाला अधिष्ठान लाभले.
येथे त्यांनी मठाची स्थापना करून दत्तोपासनेस प्रारंभ केला. येथील सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिराजवळील एका लादणीत त्यांचे वास्तव्य असे. गुंज येथे त्यांनी असंख्य लोकांना अनुग्रह दिला. त्यांनी येथेच ‘गुरुमूर्तीचरित्र’ या ग्रंथाचे लेखन केले. या चरित्रात १३५ अध्याय आहेत आणि त्यातील ओव्यांची संख्या १४,८८३ आहे, तसेच त्यात ४७७ संस्कृत श्लोक आहेत. ‘गुरुमूर्तीचरित्र’ ग्रंथाव्यतिरिक्त त्यांनी ‘अज्ञान तिमिर दीपक’, ‘स्त्री धर्म निरुपण’ आणि ‘गुरुधर्म निरुपण’ आदी ग्रंथही लिहिले.
गुंज येथील वास्तव्यादरम्यान त्यांचा शिष्य परिवारही वाढत गेला. गांडा महाराजांना दैवी शक्ती प्राप्त झाली होती, असे भाविक मानतात. त्यांच्या चरित्रकथेमध्ये बऱ्याच चमत्कारांचा समावेश आहे. त्यांनी अनेकांचे असाध्य रोग बरे केले, असेही सांगण्यात येते. १९२४ च्या दुष्काळात त्यांनी पर्जन्यवृष्टी केली असा उल्लेख ‘दत्तपंचपदी’ या पुस्तकात आहे. वयाच्या साठाव्या वर्षी, शके १८५० (इ.स. १९२८) मध्ये फाल्गुन वद्य द्वादशीच्या दिवशी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांच्या पार्थिवाला गोदावरी नदीपात्रातील कमळजा या खोल डोहात जलसमाधी देण्यात आली. सिद्धेश्वर मंदिरालगत त्यावेळी दोन लादण्या होत्या.
त्यापैकी गांडा महाराजांचे वास्तव्य असलेल्या लादणीत वस्त्रसमाधी बांधण्यात आली. गांडा महाराजांच्या सांगण्यावरूनच येथे दत्तमंदिर उभारण्यात आले. शके १८५८ मध्ये या मंदिरात दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गांडा महाराजांच्या पश्चात त्यांचे शिष्य चिंतामणी महाराज यांच्या हाती या संस्थानाची सूत्रे आली. त्यांच्या काळात संस्थानाची भरभराट झाली. चिंतामणी महाराज आणि गांडा महाराजांचे पुतणे छन्नुभाई महाराज यांच्या प्रयत्नांनी सध्याचे भव्य मंदिर उभे राहिले आहे.
गुंज हे गाव पाथरीच्या नैऋत्येस, गोदावरी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर वसले आहे. मंदिराला विस्तीर्ण परिसर लाभलेला आहे. दत्तात्रयांच्या मुख्य मंदिराला मोठा सभामंडप आहे. १९९२ मध्ये या मंडपाचा जीर्णोद्धार करण्यात आला. सभामंडपात मध्यभागी असलेल्या गर्भगृहात दत्तात्रयांची मूर्ती विराजमान आहे. गोमातेला टेकून उभ्या असलेल्या या मूर्तीच्या खालच्या हातांमध्ये माळ आणि कमंडलू आहे. मधल्या दोन हातांमध्ये डमरू आणि त्रिशूळ आहेत. वरच्या दोन हातांमध्ये शंख आणि चक्र आहेत. मूर्तीच्या आजूबाजूस चारही वेदांचे प्रतिनिधित्व करणारे चार श्वान आहेत. मूर्तीच्या उजव्या बाजूला टेंबे स्वामींचा चांदीचा मुखवटा आणि डाव्या बाजूला गांडा महाराजांची प्रतिमा आहे.
सभामंडपात टेंबे स्वामी, गांडा महाराज, चिंतामणी महाराज आणि छन्नुभाई महाराज यांच्या प्रतिमा आहेत. भिंतींवरही जागोजागी सुंदर चित्रे आहेत.
सभामंडपाच्या दक्षिणेकडे असलेल्या लादणीमध्ये (दालन) गांडा महाराज विश्रांती करत असत. येथे त्यांची वस्त्रसमाधी (भौतिक शरीराऐवजी त्यांनी परिधान केलेली वस्त्रे, पांघरूण किंवा त्यांच्या वापरातील वस्तू ठेवून उभारलेले समाधी स्थळ) आहे आणि त्यावर चांदीचा मुखवटा ठेवण्यात आलेला आहे. वस्त्रसमाधीच्या मागील भागात त्यांची मूर्ती आहे. शके १९१८ मध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सभामंडपाच्या उत्तरेकडील भागात चिंतामणी महाराज आणि छन्नुभाई महाराजांच्या मूर्ती आहेत. उंचवट्यावर असलेल्या सिद्धेश्वर मंदिराकडे येथे येथे येण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. गुंजमध्ये येथे येणारे भाविक प्रथम दत्तात्रयांचे दर्शन घेतात. त्यानंतर लादणीमध्ये योगानंद महाराजांच्या वस्त्रसमाधीचे आणि मूर्तीचे दर्शन घेतल्यावर सिद्धेश्वर मंदिरात येतात. गुंज या गावात एकूण पाच शिवालये आहेत आणि हे सिद्धेश्वर मंदिर गावातील जुने जमीनदार असलेल्या चौधरी कुटुंबातील आबाई चौधरी या भाविक महिलेने बांधल्याचे सांगण्यात येते. संस्थानचे सर्व बांधकाम या मंदिराला आधार धरून केलेले आहे. याच मंदिरात गांडा महाराजांनी प्रथम वास्तव्य केले होते. त्यांनी ‘गुरुमूर्तीचरित्र’ या ग्रंथाच्या लेखनाची सुरुवातही येथेच केली होती. येथे सोमसूत्री [इंग्रजीतील U आकारासारखी, अर्धवर्तुळाकार] प्रदक्षिणा घालण्यात येते.
परिसरात असलेल्या एका संग्रहालयात चिंतामणी महाराजांनी वापरलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत. सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन खाली याताना संस्थेचे कार्यालय आहे. त्याला येथे ‘गादी’ असे म्हणतात. दरवर्षी दिवाळीमध्ये येथे लक्ष्मीपूजन केले जाते.
येथे दरदिवशी सकाळी आणि सायंकाळी दिवाबत्ती केली जाते. उत्सवांदरम्यान पालखी कार्यालयापुढे थांबवून तेथे विविक्षित पदे म्हणण्याचा प्रघात आहे. येथूनच पुढे उत्तर दिशेला असलेल्या लादणीत जाण्याचा मार्ग आहे. कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत एक पेव (धान्य साठवण्याची जागा) आहे. उत्तर दिशेला असलेल्या लादणीमध्ये चिंतामणी महाराज आणि छन्नुभाई महाराज यांच्या चांदीने मढवलेल्या पादुका आहेत. येथे चिंतामणी महाराज विश्राम करत असत. नंतरच्या काळात छन्नुभाई महाराज येथे वैयक्तिक उपासना करत असत. येथे असलेल्या योगानंद महाराजांच्या गादीचे दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीस्वरूपात पूजन केले जाते. परिसरात छन्नुभाई महाराजांचे विश्रामस्थानही आहे. दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी संस्थानाने भक्तनिवासही बांधलेले आहे. पुढे नदीकाठावर घाट बांधण्यात आलेला आहे.
मराठवाड्यातील दत्तोपासकांसाठी हे मंदिर श्रद्धेचे स्थान आहे. त्यामुळे येथे नेहमी भाविकांची वर्दळ असते. येथे दरदिवशी सकाळी प्रातःसमयी गंगास्नान करून भूपाळ्या, काकडा आरती आणि त्रिपदी भजन होते.
सूर्योदय झाल्यावर रुद्राभिषेक आणि दत्तात्रयांना उपहार व नैवेद्य दाखवून आरती केली जाते. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत मंदिरात सर्व ठिकाणी अभिषेक आणि पूजा केली जाते. दुपारी १२ वाजता महानैवेद्य दाखवण्यात आल्यावर मंगल वाद्यांच्या गजरात आरती केली जाते. त्यानंतर सायंकाळी ४ वाजेपर्यंत मंदिर बंद असते. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या नाममंत्राचा भाविक जप करतात. त्यानंतर प्रदोषपूजा, अभिषेक आणि शांतीपाठ केला जातो. शांतीपाठ झाल्यावर सभामंडपात रंगावधूत महाराजकृत ‘दत्तबावनी’चा पाठ होतो. त्यानंतर पंचपदी करून शेजारती केली जाते. दर गुरुवारी पालखीची मंदिर प्रदक्षिणा केली जाते.
येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री सिद्धेश्वर मंदिरातील शिवलिंग आणि दत्तात्रयांच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो. दुसऱ्या दिवशी पारणे (उपवास सोडतात किंवा उपवासाची सांगता केली जाते) केले जाते. फाल्गुन वद्य द्वादशी आणि त्रयोदशी हे योगानंद महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाचे मुख्य दिवस असतात.
त्याआधी सात दिवस येथे नामसप्ताहाचे आयोजन केले जाते. या सप्ताहादरम्यान दरदिवशी पालखीतून मंदिराभोवती मिरवणूक काढण्यात येते. फाल्गुन वद्य त्रयोदशीच्या दिवशी मंदिरापासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या गंगेच्या काठावर ‘गांडा पादुका’ आणि ‘निशाण’ येथे पालखी नेऊन पंचपदी केली जाते. मुख्य सोहळ्याच्या दिवशी नदीच्या वाळवंटात होणाऱ्या महापंक्तींमध्ये भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रक्षाळपूजा झाल्यावर मंदिराच्या आवारात पालखीची मिरवणूक काढली जाते. आषाढ शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी येथे टेंबे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक विधी केले जातात. दुसऱ्या दिवसापासून चातुर्मासानिमित्त दत्तात्रयांच्या मूर्तीवर सव्वादोन महिने अतिरुद्र अभिषेक केला जातो. श्रावण वद्य पंचमीच्या दिवशी टेंबे स्वामींचा तर गोकुळाष्टमीच्या दिवशी चिंतामणी महाराजांचा जन्मोत्सव होतो. कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी छन्नुभाई महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त तर माघ वद्य चतुर्थीला चिंतामणी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे कार्यक्रम होतात. दत्तजयंतीनिमित्त येथे सात दिवस नामसप्ताहाचे आयोजन केले जाते. दत्तजयंतीच्या दिवशीच योगानंद महाराजांची जयंती असते. त्या दिवशी दत्तात्रयांच्या तसेच योगानंद महाराजांच्या मूर्तीवर गुलाल उधळून जन्मोत्सव साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी पारणे करून पालखीची मंदिर परिसरात मिरवणूक काढली जाते.