येमाई देवी मंदिर

हिंगणगाव (बु.), ता. परांडा, जि. धाराशिव

महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशात येमाई देवीची अनेक मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील येमाई देवीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी औंधचे मंदिर हे देवीचे मूळपीठ असल्याचे मानले जाते. या शिवाय कान्हेसर (राजगुरूनगर), नाशिक जिल्ह्यातील मालेगाव खुर्द, साताऱ्यातील ज्योतिबाच्या डोंगरातील येमाई देवी ही प्राचीन व प्रसिद्ध मंदिरे आहेत. याच पंक्तितील एक प्रसिद्ध मंदिर परांडा तालुक्यातील हिंगणगाव (बु.) येथे आहे. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराची हेमाडपंती रचना, त्यावरील दगडी काम आणि स्तंभांवरील शिल्पकला यावरून हे मंदिर सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. येमाई देवीबाबत अनेक अख्यायिका प्रचलीत आहेत. त्यापैकी काही अख्यायिका ही देवी तुळजाभवानीचे रूप असल्याचे सांगतात. तर काही अख्यायिकांनुसार येमाई देवी ही रेणुका देवीचे रूप असल्याची मान्यता आहे. काही अभ्यासकांच्या मते येमाई ही मरीआईचे प्रतिरूप व मृत्यूची देवता आहे. एका अख्यायिकेनुसार या भागात दैत्यांचा उपद्रव फार वाढला तेव्हा भक्तांनी माहूरगडावरील रेणुका मातेचा धावा केला. आपल्या भक्तांच्या हाकेला धावून रेणुका मातेने दैत्यांचा संहार केला व भक्तांचा उद्धार करण्यासाठी देवी येथे येमाई रूपात स्थित झाली.
हे मंदिर गावापासून काही अंतरावर आहे. वाहनतळापासून मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत असलेल्या पायवाटेच्या दोन्ही बाजूला कठडे आहेत. त्यांत भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. दोन्ही बाजूच्या कठड्यांत एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले प्रत्येकी सात चौकोनी स्तंभ आहेत. मंदिराभोवती असलेल्या भक्कम तटबंदीत मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर महिरपी कमान व दोन्ही बाजूला नक्षीदार लाकडी झडपा आहेत. या झडपांवर पितळी सिंहशिल्पे आहेत. येथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात सभोवतीने तटबंदीला लागून उंच चौथरे असलेल्या ओवऱ्या आहेत. ओवऱ्यांमधे समोरील बाजूला महिरपी कमानीने जोडलेले चौकोनी स्तंभ आहेत. या ओवऱ्यांचा वापर भाविकांसाठी विश्रामस्थान व भक्तनिवास म्हणून केला जातो.
प्रांगणात ओवऱ्यांना लागून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन चौथरे व त्यावर बारा फूट उंचीच्या दीपमाळा आहेत. दीपमाळांच्या शीर्षभागी दीप प्रज्वलन करण्यासाठी वर्तुळाकार पाटे आहेत. प्रांगणात मंदिरासमोर चौथरा व त्यावर यज्ञकुंड आहे. या चौथऱ्याच्या डाव्या बाजूला असलेल्या दुसऱ्या चौथऱ्याच्या भिंतीत डावीकडे शेंदूरचर्चित पाचफणी नाग शिल्प व उजवीकडे मारूतीची मूर्ती आणि मध्यभागी प्राचीन विरगळ आहेत.
येमाई देवीचे हे मंदिर चार फूट उंच अधिष्ठानावर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात समोरील बाजूला कठडा आहे. प्रवेशद्वारासमोर कोरीव पाषाणात बांधलेल्या पाच पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल चित्रे रंगवलेली आहेत व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. प्रवेशद्वाराकडील स्तंभ कठड्यात व दोन्ही बाजूचे स्तंभ भिंतींत आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व त्यावर हस्त आहेत. हस्तांवर फणाधारी नागशिल्पे आहेत.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर स्तंभनक्षी व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. मंडारकावर कीर्तीमुख व दोन्ही बाजूला चक्र नक्षी आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर यमाई देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे. देवीचे डोळे, नाक व डोक्यावरील मुकुट चांदीचे आहेत. देवीच्या डावीकडे शक्ती मूर्ती आहे. मंदिराच्या बाह्य बाजूला जगतीवर कमळ फुलांची नक्षी कोरलेली आहे. मंदिराच्या छतावर चहूबाजूने सुरक्षा कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर भूमिज शैलीतील वर निमुळते होत गेलेले पाच थरांचे शिखर आहे. शिखराच्या खालील चार थरांत चारही बाजूंनी देवकोष्टके आहेत व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या पाचव्या थरात बाह्य बाजूला आठ लघूशिखरे व त्यावरील आमलकावर कळस आहेत. मुख्य शिखराच्या शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे.

अश्विन मासातील पौर्णिमा हा देवीचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. देवीस पुरणपोळीचा नैवेद्य तसेच पशूबळी दिला जातो. यात्रेदरम्यान देवीची पालखी मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा करण्यात येते. यावेळी विविध वस्तूंची दुकाने सजून परिसरास तात्पुरत्या बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. चैत्र पाडवा, शारदीय नवरात्र, दसरा, दिवाळी आदी सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या, वद्य आष्टमी या दिवशी दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते.

उपयुक्त माहिती

  • परांडा येथून २० किमी, तर धाराशिव येथून ५० किमी अंतरावर
  • परांडा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home