येडेश्वरी मंदीर

येरमळा, ता. कळंब, जि. धाराशिव

मराठवाडा प्रांतातील आत्ताचा धाराशिव जिल्हा प्राचीन काळापासून समृध्द समजला जातो. याच जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन, दुसऱ्या ते तिसऱ्या शतकातील मंदिरे तेर येथे आहेत. जिल्ह्यात शैव, वैष्णव, शाक्तपंथीय, नाथ, गिरी व पुरी संप्रदाय यांची मंदिरे व मठांची संख्या मोठी आहे. याच जिल्ह्यात कळंब तालुक्यातील येरमळा गावात येडेश्वरी देवीचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या देवीच्या यात्रोत्सवात होणारी हळदीची उधळण विशेष प्रसिद्ध आहे.
येडेश्वरी हे पार्वती, तुळजाभवानी व अंबाबाईचे रूप असल्याची धारणा आहे. काही आख्यायिकांनुसार ती सप्तमातृका, चौसष्ट योगिनी व नवदुर्गा या मालिकेतील असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यांत येडेश्वरी देवीचे भक्त मोठ्या संख्येने आहेत. हे मंदिर आठशे ते हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. या देवीबाबत अख्यायिका अशी की श्रीराम सीतेच्या शोधात फिरत असताना पार्वती मातेने त्यांची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप धारण करून ती या ठिकाणी श्रीरामासमोर येऊन थांबली. श्रीरामांनी मातेला क्षणार्धात ओळखले व ‘आई तू येडी आहेस का?’ असा प्रश्न त्यांच्या मुखातून बाहेर पडला. त्याच क्षणी पार्वती माता मूर्ती रूपात येथे स्थिरावली व ती येडेश्वरी या नावाने प्रसिद्ध पावली. काही जाणकारांच्या मते बंजारा समाजाच्या प्रभाव क्षेत्रातील या देवस्थानावर गोरमाटी भाषेचा प्रभाव आहे. गोरमाटी भाषेतील ‘याडी’ म्हणजे ‘आई’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन येडेश्वरी हे नाव प्रचलीत झाले.
येरमळा बस डेपोपासून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची पहिली स्वागत कमान आहे. गावापासून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर कल्लोळ कुंड आहे. घडीव पाषाणात बांधलेल्या या आयताकार कुंडात उतरण्यासाठी एका बाजूला पायऱ्या व बाकी तीन बाजूच्या भिंतींत देवकोष्टके आहेत. त्यांत मारूती, गणपती व महादेव यांच्या मूर्ती आहेत. हे कुंड भगवान दत्तात्रेयांनी पार्वती मातेच्या स्नानासाठी निर्माण केले, अशी अख्यायिका लिहिलेला फलक कुंडाशेजारी लावलेला आहे. या कुंडातून दररोज देवीच्या स्नानासाठी पाणी नेले जाते. कुंडाच्या काठावर एकमुखी दत्तात्रयांचे मंदिर आहे. कुंडापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर येडेश्वरी देवीचे मंदिर आहे.
हे मंदिर बालाघाट डोंगर रांगांमधील सुमारे ४०० फूट उंच टेकडीवर आहे. टेकडीला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. टेकडीच्या पायथ्याशी एका वृक्षाला धागा बांधून तो धागा पूर्ण टेकडीच्या भोवताली फिरवला जातो. हा प्रदक्षिणा मार्ग सुमारे दोन किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावर पेव्हरब्लॉकची फरसबंदी आहे.
टेकडीच्या पायथ्याशी वाहनतळ व आसपास खाद्य पदार्थ, पूजा साहित्य व इतर वस्तूंची अनेक दुकाने आहेत. येथून मंदिरापर्यंत २०४ पायऱ्या आहेत. संपूर्ण पायरीमार्गावर पत्र्याचे गजपृष्ठ आकारातील छत आहे. पायरी मार्गाच्या प्रारंभ बिंदुपासून मंदिरापर्यंत दोन्ही बाजूला विविध वस्तूंची व पुजा साहित्याची दुकाने आहेत. पायरीमार्गावर ठराविक अंतरावर भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. पायरी मार्गाच्या प्रारंभ बिंदूवर मंदिराची दुसरी स्वागत कमान आहे. कमानीत दोन्ही बाजूला नक्षीदार चौकोनी स्तंभांवर विविध शिल्पे व जय विजय द्वारपाल शिल्पे आहेत. स्तंभांवरील सज्जावर तीन देवकोष्टके आहेत. मधल्या देवकोष्टकात गणपती, डावीकडे येडेश्वरी देवी व उजवीकडील देवकोष्टकात मुखशिल्प आहे.
या पायरी मार्गावर ५० पायऱ्यांनंतर एक प्राचीन दीपमाळ आहे. सुमारे १८० पायऱ्या चढून आल्यावर मंदिराचे मुख्य दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला द्वारपाल चित्रे रंगवलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर पूर्वी नगारखाना होता, असे सांगितले जाते. मंदिराच्या प्रांगणात भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगेचे व्यवस्थापन केलेले आहे. दर्शनरांगेच्या पुलाच्या बाजूला दगडी गोलाकार दीपमाळ आहे. पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. सभामंडपात जमिनीवर पितळी सिंहशिल्प आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. येथील सर्व स्तंभ रजतपटल आच्छादित आहेत. प्रत्येक चार स्तंभाच्या मधील वितान अष्टकोनी व नक्षीदार आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपातील बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. मंदिरास एकूण १०१ पाषाणी स्तंभ असल्याने सांगितले जाते.
पुढे अंतराळ व गर्भगृह आहे. गर्भगृहात चांदीच्या नक्षीदार मखरात येडेश्वरी देवीचा स्वयंभू तांदळा आहे. मूर्तीवर मुकुट, मुख, डोळे व बिंदी हे सर्व चांदीचे आहेत. मंदिराच्या बाह्य बाजूला गर्भगृहाच्या मागील भिंतीस लागून मेघडंबरीत काळभैरव देवाचे पाषाण आहे. गर्भगृहाच्या छतावर गोलाकार व वर निमुळते होत गेलेले तीन थरांचे शिखर आहे. शिखराचे थर कमळ फुलांच्या प्रतिकृतीने विभागले गेले आहेत. शिखरातील पहिल्या दोन थरांत प्रत्येकी बारा देवकोष्टके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. तिसऱ्या निमुळत्या थरात उभ्या धारेची नक्षी व शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आणि त्यावर कळस आहे.
मंदिराच्या प्रांगणात सभामंडपाला लागून नरसिंह मंदिर आहे. येथे नृसिंह देवाचा शेंदुरचर्चित तांदळा व इतर देवतांचे पाषाण आहेत. या मंदिराच्या बाजूला जानाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरात शेंदुरचर्चित दोन पाषाण आहेत. मंदिराच्या प्रांगणात उजव्या बाजूला मातंगी देवीचे शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती असलेले मंदिर आहे. येथून पुढे चिंचेचा प्राचीन वृक्ष आहे. या वृक्षाखाली चौथऱ्यावर श्रीरामाच्या संगमरवरी पादुका आहेत. या पादुका अयोध्येतील श्रीराम मंदिराकडून मिळाल्याचे सांगितले जाते. याशिवाय प्रांगणात गणपती, श्रीदत्त, खंडोबा, तुळजाभवानी, महादेव व म्हसोबा ही मंदिरे आहेत.
चैत्र पौर्णिमा हा देवीचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी देवी पालखीत बसून मिरवणुकीने गावातील आमराईतील मंदिरात पाच दिवस मुक्कामी जाते. यावेळी आमराईत जमिनीत चुन्याचे खडे प्रकट होतात, असे सांगितले जाते. पाच दिवसानंतर देवी आपल्या मुख्य मंदिराकडे पालखी मिरवणुकीने परत येते. वर्षातून एकदा या चुन्याने देवीचे मंदिर लिंपण्याची प्रथा आहे. श्रावण पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, माघ पौर्णिमा व नवरात्रौत्सव या वेळी देवीची यात्रा भरते. सर्व उत्सवांच्या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.

उपयुक्त माहिती

  • कळंब येथून ३० किमी, तर धाराशिव येथून ४४ किमी अंतरावर
  • कळंब व धाराशिव येथून पायथ्यापर्यंत एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home