यल्ल अम्मा म्हणजे सगळ्यांची आई. शाक्तपंथीयांत येल्लम्मापंथीय ही स्वतंत्र शाखा मानली जाऊ लागली आहे. पूर्वी या देवीला अपत्य अर्पण करण्याचे नवस बोलले जात. देवीस अर्पण केलेल्या या मुलांना जोगते व जोगतीणी म्हटले जाते. ते या पंथाचे मुख्य प्रचारक असतात. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक व तेलंगणा या राज्यात यल्लम्मा देवीचे हजारो भक्त आहेत. त्यामूळे या भागात देवीची अनेक मंदिरे आहेत. यापैकीच देवीचे एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर जत शहरात आहे. येथील भरणारी खिल्लार जनावरांची यात्रा देशभरात प्रसिद्ध आहे. त्यात कोट्यवधींची उलाढाल होते.
आपल्याकडे ज्याप्रमाणे सप्तमातृका आहेत, त्याप्रमाणे कर्नाटकात त्यांना ‘योळूमाता’ म्हणतात. ‘यल्लम्मा’ हे त्याचेच अपभ्रंशित रूप असावे, असे सांगितले जाते. दक्षिणेकडे रेणुका आणि यल्लम्माची कथा सारखीच असल्याने यल्लम्मा हे रेणुकेचेच रूप असल्याचे मानले जाते. आंध्रप्रदेशातील ‘मादिगा’ नावाच्या चांभार समाजातील ‘बवनीड’ नावाचा वर्ग जोगुळांबेचा उपासक आहे. तो जमडिका नावाच्या ढोलाच्या साथीवर जी गाणी गातो, त्या गाण्यांना तेथे ‘यल्लम्माची कथा‘ किंवा ‘रेणुकेची कथा’ असे म्हटले जाते. कर्नाटक राज्यातील सौंदत्ती गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील यल्लम्मा डोंगरावर देवीचे मुख्य शक्तिपीठ आहे.
जत येथील यल्लम्मा देवीची अख्यायिका अशी की मूळचे राजस्थान येथील हाडा चौहाण घराण्यातील व्यक्तींनी दक्षिणेत येऊन डफळे गावची जहागीर मिळवली म्हणून ते डफळे नावाने प्रसिद्ध झाले. या डफळे घराण्यातील जत संस्थानचे राजे रामराजे डफळे सौंदत्तीच्या यल्लम्मा देवीचे निस्सिम भक्त होते. येथून सुमारे १८० किमी अंतरावर असलेल्या सौंदत्तीच्या डोंगरावरील देवीच्या दर्शनासाठी ते घोड्यावरून प्रवास करून जात असत. वयोमानानुसार त्यांना हा प्रवास झेपेनासा झाला. तेव्हा त्यांनी देवीला आपल्या गावी येण्याची विनंती केली. ‘आपण मेण्याने तूझ्या गावी येवू, परंतू पुढे चालताना तू ज्या ठिकाणी मागे वळून पाहशील, तेथेच मी स्थापित होणार’ असे सांगून देवीचा ताफा राजांच्या मागे चालू लागला. सध्या जेथे मंदिर आहे या ठिकाणी येऊन राजांनी मागे वळून पाहिले, तेव्हा देवी येथेच स्थापित झाली. राजांनी येथे देवीचे मंदिर बांधले.
सध्याचे मंदिर सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधीशी स्वागत कमान आहे. येथून काही अंतरावर मंदिराचे प्रांगण आहे. या प्रांगणात विशाल वटवृक्ष आहेत. प्रांगणातील उंच चौथऱ्यावर तीन मंदिरे आहेत. सभामंडप व गर्भगृह असे यल्लम्मा देवी मंदिरांचे स्वरूप आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर सुमारे वीस फूट लांबीच्या चार पायऱ्या आहेत. सभामंडप पूर्णखुल्या स्वरूपाचा आहे व बाह्य बाजूला दहा चौकोनी स्तंभ आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना अर्धंचंद्राकार कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपात दर्शनरांगेची व्यवस्था आहे. सभामंडपात गर्भगृहासमोर मेजावर पीठ व मीठाच्या परड्या ठेवलेल्या असतात. दर्शनाला येणारे भाविक या परड्यांत पीठ व मीठ अर्पण करतात. गर्भगृहाच्या लाकडी द्वारशाखांवर व मंडारकावर चलनी नाणी खिळे मारून ठोकलेली आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर यल्लम्मा देवीची मूर्ती आहे. ही मूर्ती अत्यंत सुबक आणि रेखीव आहे. देवीस उंची वस्त्रे व अलंकार परिधान केलेले आहेत. देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट व मूर्तीच्या मागे मोरपिसांचा कुंचला आहे.