भोगावती नदीच्या किनारी वसलेल्या वाटेगावमधील वाटेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर येथील किरणोत्सवाच्या पंरपरेमुळे ख्यातकीर्त आहे. वाटेश्वर हे वाटेगावचे ग्रामदैवत आहे. स्थान माहात्म्य कथेनुसार या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना महायोगी चांगा वटेश्वर यांनी केली आहे. येथील शिवलिंग हे वाटीच्या आकाराचे असल्याने त्यास वाटेश्वर असे, तर त्यामुळे या गावास वाटेगाव असे नाव पडले. हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधण्यात आलेल्या या मंदिरास अलीकडेच नवी झळाळी देण्यात आली आहे. येथील वाटेश्वराचे स्थान हे जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिराच्या आख्यायिकेनुसार, हे मंदिर जेथे स्थित आहे त्या भोगावती नदीच्या किनारी वाळवंट होते. तेथे एक साधुपुरूष नित्यनेमाने वाळूचे शिवलिंग तयार करी व पूजा झाल्यानंतर नदीत त्याचे विसर्जन करी. एकदा त्याने या गावातून प्रस्थान करण्याचे ठरविले. त्या दिवशी त्याने नेहमीप्रमाणे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली. मात्र विसर्जन करण्याच्या वेळी ते शिवलिंग जागचे हलेना. अखेर त्याचे विसर्जन न करताच तो साधू निघून गेला. तेथे कायम राहिलेले ते शिवलिंग वाटीच्या आकाराचे होते. याबाबत येथे अशी आख्यायिका सांगण्यात येते की तो साधुपुरूष म्हणजे वटेश्वर चांगा हे महायोगी होते. त्यांनी स्थापन केल्यामुळे येथील शिवलिंगास वटेश्वर असे नाव पडले व त्याचाच अपभ्रंश वाटेश्वर असा झाला, असेही म्हटले जाते.
पारंपरिक चरित्रकथेनुसार महायोगी चांगदेव म्हणजेच चांगा वटेश्वर यांना त्यांच्या सिद्धीचा गर्व झाला होता. तो संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवून हरण केला. पुढे त्यांनी संत मुक्ताबाईंचे शिष्यत्व पत्करले. विशेष म्हणजे थोर संत विसोबा खेचर यांनी त्यांच्या ‘षट्स्थला’मध्ये चांगा वटेश्वरांचा आपले परमगुरू म्हणून उल्लेख केला आहे. चांगा वटेश्वर यांनी अभंगरचना केली आहे व त्यांचा ‘तत्त्वसार’ हा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. या ग्रंथातील उल्लेखानुसार, त्याची रचना हरिश्चंद्रगड येथे मार्गशीर्ष शु. १३, रविवार, शके १२३४ (इ.स. १३१२) रोजी झाली. महायोगी चांगदेव हे मूळचे कुठले हे अज्ञात आहे. मात्र ते प्रथम तापी–पयोष्णीच्या संगमाजवळ ‘चांगदेव’ नावाच्या गावी प्रथम दिसले. हे गाव जळगाव जिल्ह्यातील एदलाबादजवळ आहे. ‘भक्त विजय’, ‘भक्तलीलामृत’ आदी ग्रंथांनुसार, चांगदेव हे गावाजवळील बनात चर्मचक्षू झाकून तप करीत असत व नित्य पार्थिव लिंग करून त्याची उपासना करीत असत. या गावाशेजारील वरणगाव येथील दोन व्यापारी त्यांचे शिष्य होते. चांगदेवकृपेने त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला होता. त्यामुळे त्यांना द्रव्यमद चढला. एकदा चांगदेवांनी त्यांना पार्थिव लिंग तयार करण्यासाठी सांगितले असता, त्यांनी नदीतील वाळू गोळा करून त्यावर चांगदेवांची तुपाची वाटी पालथी घातली. चांगदेवांनी त्याच लिंगाची पूजा केली. पूजेनंतर ते जेवायला बसले असता त्यांनी वाटी मागितली. तेव्हा गडबडीने ते शिष्य नदीवर ती वाटी आणण्यास गेले, परंतु ती तेथून हलेना. तेव्हा घाबरून त्यांनी गुरूंची क्षमा मागितली. पुढे हे लिंग वटेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. ही घटना ‘चांगदेव’ या गावी घडली असली, तरी वाटेगावच्या स्थान कथासांभारात पुढे तिचा समावेश झाला आहे. येथील मंदिराच्या प्रांगणात असलेल्या एका घुमटीत, तसेच मंदिराच्या सभामंडपात चांगदेवांच्या मूर्ती स्थापून येथे त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यात आल्या आहेत.
येथील मंदिराच्या परिसरात समोरासमोर दोन सुंदर घाट आहेत. या घाटांदरम्यान नदी ओलांडण्यासाठी छोटा पूल आहे. नदीच्या पश्चिम घाटाच्या किनाऱ्यावर हे पूर्वाभिमुख मंदिर वसलेले आहे. मंदिराला कोट सदृश्य आवारभिंत आहे. या भिंतीमध्ये ध्वज लावण्यासाठी बुरुजसदृश्य रचना आहे. त्या बुरुजापासून आत काही पायऱ्या उतरून गेल्यावर साधारणतः दोन फूट लांबी व रुंदीचा छोटा दरवाजा असलेली जागा दिसते. ते ध्यानमंदिर होय. जमिनीत असलेले हे ध्यानमंदिर या मंदिराचे एक वैशिष्ठ्य ठरते.
मुख्य मंदिरासमोर तुळसीवृंदावन व प्राचीन दीपमाळ आहे. या दीपमाळेच्या खालच्या चौथऱ्यावर चार हत्तीशिल्पे आहेत. त्यामुळे ती दीपमाळ हत्तींनी पेलून धरल्याचा भास होतो. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपात मध्यभागी असलेल्या एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. सभामंडपाच्या द्वारशाखांवर नक्षीकाम व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. येथील सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. त्यामध्ये हवा आणि प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. अंतराळात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर डावीकडील देवकोष्टकात चांगदेव आणि उजवीकडे हनुमान मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखा नक्षीदार पितळी पत्र्यांनी मढविलेल्या आहेत. येथील ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात एक शिवपिंडी आणि त्यामागे वज्रपिठावर वटेश्वराची मूर्ती आहे. या मूर्तीमागे असलेल्या प्रभामंडळावर कीर्तीमुख कोरलेले आहे.
येथील सभामंडपाचे प्रवेशद्वार ते गर्भगृहातील शिवपिंडी हे चाळीस फुटांचे अंतर पार करून किरणोत्सवाच्या वेळी सूर्यकिरणे पिंडीवर पडतात. महाराष्ट्रातील काही मोजक्या मंदिरांतच किरणोत्सवाचा सोहळा होतो. त्यात या मंदिराचा समावेश आहे. साधारणतः मार्च महिन्यात पाच दिवस हा किरणोत्सव सोहळा असतो. या सोहळ्याच्या वेळी हजारो भाविकांची येथे गर्दी असते.
मंदिराच्या प्रांगणात गणपती आणि महादेव यांची मंदिरे आहेत. येथील महादेवाच्या मंदिरासमोर तीन प्राचीन नंदी आहेत. मंदिरातील अभिषेकतीर्थ बाहेर येण्यासाठी असलेल्या गोमुखाशेजारी काही पुरातन मूर्ती आहेत. त्यातील कडेवर छोट्या बाळाला घेतलेली स्त्री आणि विष्णूसदृश्य मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यापैकी एक मूर्ती देवी पार्वती आणि भगवान कार्तिकेय यांची असावी, असे सांगितले जाते. अशा स्वरूपाच्या मूर्तींत देवी पार्वती (उमा) आपल्या मांडीवर भगवान कार्तिकेय (स्कंद) किंवा गणेश यांना घेऊन बसलेली दिसते. दुसरी उभ्या स्वरूपातील विष्णूची मूर्ती आहे. या मूर्तीच्या हातांत शंख, चक्र, गदा व पद्म आहेत. याशिवाय आणखी दोन स्त्री मूर्ती आहेत.
या मंदिरात मृग नक्षत्राच्या वेळी शिवपार्वतीचे लग्न लावले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला वाटेश्वराची मोठी जत्रा भरते. कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतही उत्सव चालतो.