वाकोबा / वाकेश्वर मंदिर

वाकुर्डे बुद्रुक, ता. शिराळा, जि. सांगली

वाकेश्वर आणि जोतिबा या दोन देवतांचा एकमेकांशी जुना संबध आहे. गिरजवडेला आलेल्या जोतिबासोबत वाकेश्वरही येथे आला. कोल्हापूरमधल्या वाकीहून आल्याने त्याला वाकोबाही म्हणतात. मंदिरात वाकेश्वर लिंग आणि मूर्तीस्वरूपात स्थापित आहे. लिंगस्वरूपातील स्थान स्वयंभू आहे. ग्रामस्थांची ग्रामदैवत म्हणून वाकोबर अलोट श्रद्धा आहे. कोणत्याही कठीण काळात त्यालाच कौल लावला जातो. हा देव चल म्हणजे फिरता आहे. पौष पौर्णिमेला खास शिकारीसाठी निघणारा, पूर्वी आंघोळीसाठी कृष्णाकाठावर जाणारा हा देव वर्षभरात परिसरातील इतर देवतांच्या भेटीलाही जात असतो

गिरजवडे येथील जोतिबा मंदिरापासून वाकेश्वराचे मंदिर फार दूर नाही. या स्थानाचा इतिहास मराठा काळापर्यंत पोहोचतो. मंदिरासंदर्भात अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. गावाला अखंड पाणीपुरवठा करणारा, गावावरील संकट टाळणारा असे वाकोबाचे स्वरूप या आख्यायिकांमधून समोर येते. हा देव कधी दुसऱ्या स्थानी स्थापन होण्याचा हट्टही धरताना या कथांतून दिसतो. असे सांगितले जाते की पूर्वी देवाला कृष्णा नदीवर आंघोळीला नेण्याची प्रथा होती. असेच एकदा परतताना काले गावात पूजेसाठी पालखी थांबली. पण त्यानंतर ती तेथून हलेना. अनेकांनी केलेले प्रयत्न विफल झाल्यावर देवाला कौल लावला. त्याला तेथेच रहायचे होते. त्यामुळे तेथेच वाकोबाचे मंदिर बांधण्यात आले. शांतीसोहळ्यानंतर मात्र तो परत वाकुर्डेला आला. तेव्हापासून देवाला तेथे नेण्याची प्रथा थांबवण्यात आली

असे सांगितले जाते की वाकेश्वराचे अनन्य भक्त मानले जाणारे धोंडीबुवा यांना देवाने दृष्टांत दिला होता. त्यांना आशीर्वाद देऊन हवा तो वर माग असे देवाने सांगितल्यानंतर, त्यांनी गावासाठी भरपूर पाणी दे, अशी मागणी केली. यानंतर त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी खोदल्यावर तेथे पाणी लागले. या विहिरीतील पाणी कधीच आटत नाही. १९७२ मधील दुष्काळात अनेक ठिकाणच्या विहिरी आटल्या होत्या, पण त्या काळातही या विहिरीत भरपूर पाणी होते. संपूर्ण शिराळा तालुक्याला पाणीपुरवठा करूनही या विहिरीत पाणी शिल्लक राहत असल्याच्या कथा गावातील जुनी माणसे सांगतात

वाकेश्वराचे मंदिर प्रशस्त दगडी फरसबंदी असलेल्या प्रांगणात आहे. मंदिरासमोर सुरेख दगडी तुळशीवृदांवन आहे. नव्याने जीर्णोद्धार झालेल्या या मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप, गर्भगृह अशी आहे. मुखमंडपात जाण्यासाठी दोन बाजूंनी पायऱ्यांची रचना आहे. पाच पायऱ्या चढून घुमट आणि शिखर असलेल्या या मुखमंडपात आल्यानंतर समोर सभामंडपाच्या द्वारशाखांवर असलेले वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम दिसते. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची सुंदर मूर्ती आहे. मुखमंडपासूनच दिसणाऱ्या नक्षीदार खांबांनी मंदिराची वास्तु तोललेली दिसते. या खाबांना जोडणाऱ्या कमानदार रचनेने सजलेला सभामंडपात प्रशस्त आहे. सभामंडपातून चार पायऱ्या उतरून गर्भगृहात येता येते. येथे वज्रपिठावर वाकेश्वराची सुंदर मूर्ती स्थापित आहे. जोतिबासारख्याच मिशा असलेल्या या मूर्तीच्या हातात त्रिशूल आहे. या मूर्तीसमोर असलेल्या चौकोनी आयताकृती खोलगट भागात लिंग स्वरूपातील वाकेश्वराचे स्थान आहे. या स्थानी वाकेश्वर प्रकट झाला असे सांगण्यात येते. जीर्णोद्धारातही हे स्थान हलवलेले नाही. पाषाणस्वरुपातील वाकेश्वराला चांदीचे डोळे लावण्यात आलेले आहेत. त्यावर चांदीचेच छत्र आहे. वाकोबाची मूर्ती असलेल्या वज्रपिठापाशी एक छोटा चौथरा करून वाकेश्वराचे मुखवटे ठेवलेले आहेत. चार वेगवेगळ्या आकारातील हे मुखवटे उत्सवकाळात पालखीसाठी उपयोगात येतात

वाकेश्वराची जत्रा हा या गावातील एक मोठा सांस्कृतिक सोहळा असतो. स्थानिक पंचाग, पुजारी आणि गावकऱ्यांच्या सल्ल्याने या जत्रेची निश्चित तारीख ठरवली जाते. जत्रेदरम्याने वाकोबाची विशेष पूजा केली जाते. नोकरीधंद्यानिमित्त गावापासून दूर असणारे या जत्रेसाठी येतातच, पण अनेक सासुरवाशिणीही आपापल्या कुटुंबासह येथे आवर्जून येतात. त्या काळात गावकरी हलगीच्या तालावर लेझिम खेळतात. जत्रेदरम्यान तमाशा, भारूड यासारख्या अनेक पारंपरिक लोककलाही सादर केल्या जातात. या जत्रेच्या वेळी येथे जोतिबाची पालखी येते, तर गिरजवडे येथील हनुमान जयंतीच्या दिवशी वाकेश्वराची पालखी तेथे जाते. परिसरातील इतर देवतांच्या भेटीगाठीही वाकेश्वराकडून घेतल्या जातात

पाडव्याच्या दिवशी वाकुर्डे खुर्द येथे वाकोबाची जत्रा भरवण्यात येते. त्या यात्रेसाठीही वाकेश्वर तेथे जातो. दसऱ्याच्या शिलंगणासाठी (सीमोलंघन) वाकोबाची पालखी जाधववाडीच्या विठ्ठलाला भेटायला जाते. येताना मादळवाडीतील जोतिबाची भेट घेऊन पालखी परत फिरते. हा देव शिकारीलाही जातो. त्यासाठी पौष पोर्णिमेचा दिवस निश्चित केलेला आहे. त्या दिवशी शिकारीसाठी निघालेला वाकेश्वर माघ पोर्णिमेला परत येतो.

वाकेश्वराच्या मंदिरापासून दोन कि.मी. अंतरावर करमजाईचे मंदिर आहे. ही देवाची बहिण मानली जाते. श्रावण महिन्यात शेवटच्या मंगळवारी वाकोबाची पालखी तिला भेटायला जाते. येताना पडवळवाडीत असलेल्या महादेव मंदिरातही पालखी नेण्याची प्रथा आहे. करमजाईबद्दलही एक आख्यायिका सांगतात. एक भक्त खरूज आणि इतर व्याधींनी त्रासून गेला होता. आधी व्याधींनी गांजून गेलेला तो भक्त करमजाईच्या मूळ स्थानापाशी आला. तेथे असलेल्या ओढ्यात त्याने हातपाय धुतले. त्याला असे आढळले की त्याच्या व्याधी बऱ्या होत आहेत. त्यामुळे आनंदित झालेल्या त्या भक्ताने तेथेच करमजाईची स्थापना केली. या ओढ्याच्या ठिकाणी सात कुंडे उभारण्यात आली होती. पण ती कुंडे आता धरणाच्या पाण्याखाली गेली आहेत. मात्र तरीही भक्तगण तेथील पाण्यात आंघोळ करण्याची प्रथा पाळतात.

उपयुक्त माहिती

  • शिराळा शहरापासून ११ किमी, तर सांगलीपासून ६५ किमी अंतरावर
  • शिराळा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home