कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत मंगळवार पेठेतील विठ्ठल मंदिर हे शहरातील प्राचीन व प्रसिद्ध मंदिरांमध्ये गणले जाते. या मंदिरातील विठ्ठलाची ‘पायात वहाणा घातलेला विठ्ठल’ अशी ख्याती आहे. स्थापत्यशैलीवरून हे मंदिर ११व्या वा १२व्या शतकातील असावे, असा अभ्यासकांचा कयास आहे. भाविकांमध्ये अशी श्रद्धा आहे की करवीरपासून काही अंतरावर असलेले नंदवाळ हे विठ्ठलाचे निजस्थान आहे, तर करवीरमधल्या मंदिरात विठ्ठल भोजनासाठी येत असतात. पंढरपूर, नंदवाळ व करवीर येथील तिन्ही मंदिरांची बांधणी आणि रचना यात साम्य आढळते.
मंगळवार पेठेतील ‘नूतन मराठी विद्यालय हायस्कूल’च्या आवारापासून जवळच विठ्ठल व अन्य मंदिरांचा समूह आहे. येथे विठ्ठल मंदिराबरोबर प्राचीन ओंकारेश्वर मंदिर, श्रीराम मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, शिव मंदिर, तसेच दत्त मंदिर ही मंदिरे आहेत. मूळ प्राचीन विठ्ठल मंदिर हे मुखमंडप, गूढमंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा स्वरूपाचे आहे. करवीर संस्थानच्या कालखंडात या मंदिराबाहेर भजन-कीर्तनादी धार्मिक कार्यक्रम व उत्सवांकरीता एक लाकडी सभामंडप बांधण्यात आला. हा सभामंडप साध्या स्वरूपाचा आहे. चौकोनी लाकडी खांब, तसेच लाकडाचेच छत असलेल्या या प्रशस्त सभामंडपातून काही पायऱ्या चढून मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. मुखमंडपातील एका देवळीत मुरलीधर कृष्णाचे उठावशिल्प आहे. यात मध्यभागी मुरली वाजवणारा देहुडाचरण (डाव्यापुढे उजवा पाय असलेला) श्रीकृष्ण आहे व त्याच्या माथ्यावर नागफणा आहे. कृष्णाच्या बाजूला गोपी, गाय-वासरू यांची शिल्पे आहेत. वरती हनुमान, गरुड आणि शुकाची शिल्पे कोरलेली आहेत. येथेच उजवीकडील देवळीत गणेशाची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे. येथे १५व्या शतकातील मराठी संत कवयित्री कान्होपात्रा हिचीही मूर्ती आहे. मूर्तीच्या एका हातात वीणा, तर दुसऱ्या हातात चिपळ्या आहेत.
मुख्य मंदिराच्या सभामंडपास पाच द्वारशाखा असलेले प्रवेशद्वार आहे. द्वारशाखा वा स्तंभांवर नक्षीकाम नसले तरी द्वारचौकटीच्या वरच्या भागात सुंदर कोरीवकाम केलेले आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. मूळ मंदिराचा हा दगडी सभामंडपही प्रशस्त आहे. दगडी काळ्या पाषाणात घडविलेले सोळा कोरीव स्तंभ हे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणता येईल. पंढरपूरमधील मंदिरातही अशाच प्रकारचे खांब आहेत. यानंतर समोरच छोटे अंतराळ आहे व पुढे चौखांबी गर्भगृह आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार पंचशाखीय आहे. द्वारस्तंभ कोरीव काम केलेले आहेत. द्वारचौकटीच्या वरच्या भागात मंदिर शिखरांच्या छोट्या प्रतिकृती कोरलेले तोरण आहे. गाभाऱ्यात उंच पाषाणपीठावर विठ्ठल, राही आणि रुक्मिणी यांच्या सुबक मूर्ती आहेत. विठ्ठलाची मूर्ती तीन ते सव्वातीन फूट उंचीची आहे. दोन्ही कर कटेवर असलेल्या या मूर्तीच्या उजव्या हाताच्या मुठीत सूर्यदेवतेचे चक्र, तर डाव्या हातात शंख आहे. मूर्तीच्या हातात पारंपरिक गहूतोडे आहेत. कानात मकरकुंडले आहेत. विठ्ठलमूर्तीच्या मस्तकावर मातुलिंग आहे. मूर्तीवर विविध अलंकार आहेत. पायांमध्ये तोडे आणि पादजालिका नावाचा अलंकार आहे. या पादजालिका अलंकारास भाविक वहाणा असे समजतात. या गैरसमजातून या विठ्ठलाची ‘पायात वहाणा घातलेला विठ्ठल’ अशी प्रसिद्धी झाली आहे. काही भाविक या विठ्ठलास ‘प्रवासी विठ्ठल’ असेही म्हणतात. मूर्तीच्या मागे सोनेरी पत्र्यावर कोरलेले अर्धकमानीकार मखर आहे व त्याच्या मध्यभागी फणा काढलेली नागदेवता आहे. शीर्षस्थानी कीर्तिमुख आहे. विठ्ठलमूर्तीच्या डाव्या बाजूस साधारणतः अडीच फूट उंचीची रुक्मिणीची व उजव्या बाजूस राहीची मूर्ती आहे. या दोन्ही मूर्ती कर कटेवर असलेल्या व सालंकृत आहेत. राही आणि रुक्मिणीच्या पायांतही पादजालिका हा अलंकार आहे.
मंदिराच्या लाकडी सभामंडपासमोर ८४ लक्ष योनीचा खांबही आहे. ८४ चौकोन असलेला सपाट व वरील बाजूकडे घुमटाकार होत गेलेल्या या खांबाला शेंदरी रंग देण्यात आला आहे. या खांबाविषयी अशी श्रद्धा आहे की त्यास पाठ टेकून विठ्ठलाचे नामस्मरण केले की जन्ममरणाच्या फेऱ्यांमधून मुक्ती मिळते, ८४ लक्ष योनीतून जन्म घ्यावा लागत नाही. असाच खांब पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही आहे. येथून पुढे काही अंतरावर उंच चौथऱ्यावर महादेवाचे छोटे मंदिर आहे. येथील देवळ्यांमध्ये हनुमानाची तसेच गरुडाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. येथे सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण आहे ते एका देवळीतील शिल्प. भक्त पुंडलिकाची मातृ-पितृ भक्ती चित्रांकित करणारे असे हे शिल्प आहे. त्यात भक्त पुंडलिक झोपलेल्या आई-वडिलांची सेवा करताना दाखविला आहे. त्याच्या उजव्या हातात वीट आहे, जी तो विठ्ठलाला उभे राहण्यासाठी देऊ करत आहे आणि डाव्या हाताने तो वडिलांचे पाय दाबत आहे. महादेव मंदिराच्या बाह्यभिंतींवर काही वीरगळही आहेत. यातील एक वीरगळ अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात एकाच शिळेमध्ये दोन त्रिस्तरीय वीरगळ आहेत व त्या शिळेच्या वरच्या भागात मोठे कीर्तिमुख कोरलेले आहे. अशा प्रकारचा वीरगळ दुर्मीळ आहे. येथे नागदेवतेचेही शिल्प दिसते. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी होते. हे जागृत देवस्थान असल्याने इथे आल्यावर मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच श्रीरामाचे दुमजली मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात प्रभू श्रीराम व सीतेची वालुकाश्मात कोरलेली मूर्ती आहे. बुधकौशिक ऋषींनी रचलेल्या रामरक्षा स्तोत्रामधील ध्यानश्लोकात श्रीरामाचे वर्णन ‘वामांकारूढ सीता’ अशा शब्दांत केलेले आहे. ही मूर्ती अशाच स्वरूपाची आहे. येथे श्रीरामाच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे.
राम मंदिराच्या बाजूला ओंकारेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा स्वरूपाचे हे मंदिर आहे. मंदिरातील स्तंभ, त्यावरील तोरणे, द्वारशाखा यांवर सुंदर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या मुखमंडपात नंदीची मोठी प्राचीन मूर्ती आहे. सभामंडपाच्या द्वारशाखांवर तळाकडील बाजूस असलेल्या द्वारपालांच्या मूर्ती लक्षवेधक आहेत. या मूर्तींच्या माथ्यावर नागाचा फणा कोरलेला आहे. गर्भगृहाच्या द्वारचौकटीवरील तोरण नागर आणि वेसर शैलीतील शिखरांच्या लहान प्रतिकृतींनी सजवलेले आहे. तसेच द्वारस्तंभांवर यक्ष, यक्षिणींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. गर्भगृहात ओंकारेश्वर महादेवाची पिंडी आहे. त्यावर पितळेचा मोठा नाग आहे. या मंदिराच्या बाह्यभिंतींवरही बारीक कोरीव काम केलेले आहे. त्यात अनेक देव-देवतांची शिल्पे व काही जैन धर्मीय शिल्पेही दिसतात. या मंदिरासमोरच एका मोठ्या वृक्षाखाली हनुमानाचे मंदिर आहे, तर विठ्ठल मंदिराकडे येणाऱ्या वाटेवर डावीकडे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे.