ठाणे शहराचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या मोजक्या मंदिरांमध्ये विठ्ठल सायन्ना मंदिर या मंदिराची गणना होते. मंदिराच्या नावावरून हे मंदिर विठ्ठलाचे असल्याचा समज होऊ शकतो. पण हे मंदिर दत्ताचे आहे. विठ्ठल सायन्ना यांनी आपल्या गुरूंच्या सांगण्यावरून हे मंदिर उभारले होते. त्यामुळे त्यांच्याच नावाने हे मंदिर ओळखले जाते. कधीकाळी हे मंदिर मुख्य शहराबाहेर असलेल्या या ठिकाणी होते. त्याकाळी अनेक वृक्षांनी वेढलेले हे मंदिर आज इमारतींच्या गराड्यात आहे. पण मुख्य रस्त्यावर असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच या मंदिराचे वेगळेपण जाणवू लागते.
ठाण्यातील हरिनिवास सर्कल आणि तीन हात नाका या दरम्यान स्थित असलेल्या या मंदिरास शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. ठाण्यातील ‘हेरिटेज वास्तूं’मध्ये या मंदिराची गणना केली जाते. या मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी येथे मोठे जंगल होते. त्यात दत्तात्रेयाचा निवास असल्याचा साक्षात्कार नंद महाराज या अध्यात्मिक गुरुंना झाला. त्यामुळे येथे दत्तमंदिर उभारले जावे, अशी त्यांची इच्छा होती. इंग्रजांच्या काळात मुंबईतील अनेक टोलेजंग इमारती उभारणारे विठ्ठल सायन्ना हे कंत्राटदार त्यांचे शिष्य होते. आपल्या गुरुंचा मान राखून विठ्ठल सायन्ना यांनी या जंगलात हे प्रशस्त व देखणे असे दत्तमंदिर उभारले. या मंदिरात ८ सप्टेंबर १९१२ रोजी गोकुळाष्टमीच्या दिवशी दत्तगुरुंच्या मूर्तीची समारंभपूर्वक प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
हे मंदिर उभारणारे विठ्ठल सायन्ना हे मुळचे मुंबईकर. मात्र मंदिर उभारल्यानंतर ते ठाण्यास या मंदिराच्या शेजारी राहू लागले. ठाण्याच्या तत्कालिन सामाजिक व सांस्कृतिक जीवनात त्यांचे महत्त्वाचे स्थान होते. विठ्ठल सायन्ना हे मूळचे आंध्रप्रदेशच्या तेलगु यादव गोल्ला समाजाचे. त्यांचे वडिल कुलाबा परिसरात ब्रिटिश सैन्यास दूध पुरवण्याचा व्यवसाय करीत. विठ्ठल सायन्ना यांनीही प्रारंभी हा व्यवसाय केला. कालांतराने ते ब्रिटिशांची छोटी छोटी बांधकाम कंत्राटे घेऊ लागले. आपल्या मेहनतीने ते अल्पावधीतच मोठे कंत्राटदार बनले. मुंबईची शान वाढवणाऱ्या अनेक वास्तू त्यांनी उभारल्या आहेत. इंडो–सार्सेनिक वा इंडो–गॉथिक वास्तुशैलीच्या म्हणजेच ज्यात भारतीय, इस्लामी आणि पाश्चिमात्य स्थापत्यशैलीचे मिश्रण असते, अशा काही महत्त्वाच्या इमारती त्यांनी उभारल्या. त्यात प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम (आताचे राजा शिवछत्रपती संग्रहालय), मुंबई जनरल पोस्ट ऑफिस, सर कावसजी जहांगीर हॉल यांचा समावेश आहे. खोपोलीचे टाटा पॉवर हाऊस, तसेच ठाणे आणि कळव्याला जोडणार जुना ब्रिटिशकालीन पूलही त्यांनीच उभारला होता.
या मंदिरातील दत्तमूर्ती संगमरवरी दगडात घडवलेली आहे. ती सुमारे साडेतीनफूट उंचीची आहे. ही मूर्ती जयपूरमधील मुस्लिमधर्मिय कारागिरांनी घडवल्याचे सांगण्यात येते. दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या अवतारकाळापासूनच दत्तभक्तीच्या क्षेत्रात हिंदू–मुस्लिमांचा समन्वय होत होता. दत्तभक्त जनार्दन स्वामींचे गुरू चांद बोधले हे मुस्लिम होते. चांद बोधले यांनी संत एकनाथ महाराजांना ‘चतुःश्लोकी भागवता’च्या रचनेची स्फूर्ती दिली होती. संत एकनाथ महाराजांना दत्ताने मलंग वेशात भेट दिल्याचीही कथा आहे. दत्तोपासनेतील या समन्वयवादाची परंपरा या मंदिरातील मूर्तीच्या घडणावळीतून अजाणता पुढे आली आहे. येथील हमरस्त्यावर मंदिर परिसराचे मोठे महाद्वार आहे. वीस फूट रुंदीच्या या महाद्वारास अंदाजे आठ ते दहा फूट त्रिज्येचा घुमट आहे. त्याच्या चार कोपऱ्यांवर चार भारवाहक यक्षमूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या वर चार कोपऱ्यांना चार छोट्या घुमट्या आहेत. त्या शेजारी ऋषीमुनींच्या, तसेच हत्ती व श्वानांच्या मूर्ती आहेत. कमानीच्या मागच्या बाजूस लक्ष्मी आणि सरस्वतीच्या मूर्ती आहेत. महाद्वाराच्या आत दोन्ही बाजूंना देवडीसारखी बसण्याची सोय आहे. असे सांगितले जाते की मंदिरातील उत्सव प्रसंगी येथे समई चौघडावादक बसत असत आणि येणाऱ्या मान्यवर भाविकांचे स्वागत फुले उधळून करणारे सेवकही येथेच असत या प्रशस्त दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर डावीकडे हनुमानाची, तर
उजवीकडे गरुडाची मूर्ती आहे.
प्रांगणात मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी छोटा पण प्रशस्त मार्ग आहे. येथे विठ्ठल सायन्ना यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. मंदिराच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सिंहाच्या व श्वानाच्या मूर्ती आहेत. एका बाजुला नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपाची रचना पूर्वी वेगळी होती. मात्र १९८५ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारात ती बदलण्यात आली. सभागृहास मध्यभागी दोन खांब आहेत. त्याच्या पुढेच प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. येथे कासवमूर्ती आहे. दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या बाजुच्या देवळ्यांत हनुमान आणि गरुडाच्या देखण्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या द्वारचौकटीवरील ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती व बाजूस रिद्धी–सिद्धी यांच्या चामर ढाळणाऱ्या मूर्ती आहेत. गर्भगृहातील दत्तमूर्तीला सण–उत्सवात दागिने, सोन्याचा मुकुट आणि सोन्याच्या तारा असलेल्या पोशाखाने सजवले जाते. हा मुकुट आणि पोशाख स्थापनाकाळापासून जतन करण्यात आला आहे. येथे मुख्य मूर्तीसह पितळेच्या दोन लहान दत्तमूर्ती आहेत.
मंदिराच्या मागच्या बाजुला प्राचीन तुळशीवृंदावन आहे. येथे जवळच नंद महाराज यांच्या पादुका आहेत. त्यावर छोटी घुमटी उभारण्यात आली आहे. या मंदिराला गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, चिन्मयानंद स्वामी अशा अनेक संतांनी भेट दिली असल्याचे सांगण्यात येते. शिर्डीचे साईबाबा आणि कलावती माताही येथे येऊन गेल्याचे सांगण्यात येते. या मंदिरात बालगंधर्व, सवाई गंधर्व, मा. कृष्णराव, राम मराठे अशा मातब्बर कलावंतांच्या भक्तीसंगीताच्या मैफली झाल्या आहेत.
मंदिरात गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, आषाढी एकादशी, कृष्णजन्माष्टमी, दहीहंडी, गणपती आदी उत्सव साजरे केले जातात. दसरा, दिवाळी आणि कोजागिरीला मूर्तीला दुग्धाभिषेक केला जातो. मंदिराचे व्यवस्थापन विठ्ठल सायन्ना यांच्या वंशजांकडून केले जाते. मंदिरात सकाळी ५ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४ ते रात्री ९ दरम्यान भाविक दर्शन घेऊ शकतात.