अपरान्त भूमी म्हणजेच कोकण भूमी. या भूमीत विठ्ठलोपासना पूर्वापार चालत आलेली आहे. भागवत संप्रदायाचा ध्वज येथे प्राचीन काळापासून फडकत आहे. याच भूमीतील प्राचीन सुंदरवाडी म्हणजेच आजच्या सावंतवाडीत विठ्ठल–रुक्मिणीचे अठराव्या शतकातील मंदिर आहे. प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या या विठ्ठल–रुक्मिणी मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे पर्वतशिखरासारखे उंचच उंच असलेले अद्वितीय शिखर. त्याचप्रमाणे या मंदिराचा दर्शनी भागही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. संत तुकाराम महाराजांच्या चरित्रात ज्या गरुड विमानाचा उल्लेख आलेला आहे, त्या गरुड विमानाप्रमाणे या मंदिराची बाह्यरचना करण्यात आलेली आहे.
प्राचीन भारतात विमानविद्या होती असे उल्लेख आहेत. संस्कृतमधील विमान या शब्दाचे सात अर्थ आहेत. ते पुढीलप्रमाणे– १. अपमान, २. परिमाण, ३. विमान, आकाशयान, ४. रथ इत्यादी वाहन ५. घोडा, ६. सात मजली वाडा, ७. राजवाडा. वास्तुरचनाशास्त्रात मुख्य मंदिराच्या वरच्या संरचनेस विमान असे म्हणतात. वाल्मिकी रामायणात आकाशातून उडणाऱ्या पुष्पक नामक आकाशयानाचे तसेच महालासारख्या विमानांचे उल्लेख आढळतात. वाल्मिकी रामायणाच्या सुंदरकाण्डातील सातव्या सर्गातील पाचव्या श्लोकात या विमानाचे वर्णन करताना वाल्मिकींनी त्यास ‘गृहोत्तमं’ असे म्हटलेले आहे. इ.स. १९०० ते १९२२ या काळात भारद्वाज ऋषी यांच्या नावाने पं. सुब्बराय शास्त्री यांनी रचलेल्या ‘वैमानिक शास्त्र’ या ग्रंथामध्ये विमानाचे शकून, सुंदर, रूक्म आणि त्रिपूर असे प्रकार सांगितलेले आहेत. पौराणिक कथांमध्ये आकाशमार्गाने गमन करणाऱ्या अनेक विमानांचे उल्लेख आढळतात. त्यातील गरुड विमान हे एक आहे. हे विमान शकून प्रकारात बसते. त्यात खालच्या बाजूस पक्ष्याच्या पंखासारखे पंख असतात व त्यावर दालने असतात. तसेच त्यावर उंचच उंच असा स्तंभ असतो. या मंदिराची वास्तूरचनाही अशाच विमानाच्या प्रकारची करण्यात आलेली आहे.
सावंतवाडीच्या भर बाजारपेठेत असलेल्या या तीन मजली मंदिराचे प्रवेशद्वार चांगलेच रुंद व उंच आहे. वरच्या बाजूस ते अर्धगोलाकार आहे. त्याच्या वर छतास पंख पसरविलेला पक्षीराज गरुडाचा आकार देण्यात आलेला आहे. चोच उघडी असलेल्या गरुडाचे मुख आणि दोन्ही बाजूस पसरलेले विशाल पंख, असा हा आकार आहे. त्याने पायात मोठा नागराज पकडलेला आहे. त्याच्या पंखांच्या वर मोठे चौकोनाकार दालन व त्याच्या बाजूस पडवीसारखा उतरत्या छपराचा आकार आहे. दालनाच्या दर्शनी भिंतीत मधोमध गवाक्ष आहे, त्यात लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे. या दालनाच्या वरच्या भागावर बैठे शिखर आहे. त्यावर पुष्पपाकळ्यांची सजावट करण्यात आलेली आहे. समोरील बाजूस गदा शिल्प आहे. शिखरावर मोठे आमलक व कळस आहे.
मंदिराच्या चारी बाजूंनी उतरते छप्पर असलेल्या गर्भगृहावरील उंचच उंच शिखर हे या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. हे शिखर नऊ स्तरांचे आहे व त्याची उंची तब्बल १३० फूट आहे. शिखराच्या खालील सात स्तरांच्या भिंतीत देवकोष्ठके कोरलेली आहेत. यामध्ये एकूण १०८ देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. नवव्या स्तरात दंडगोलाकार रचनेवर आमलक आहे व त्यावर कळस आहे. हे उंच शिखर व मंदिराचा गरुड विमानाकार यामुळे यास खास ओळख प्राप्त झाली आहे.
या मंदिरासमोर एक उंच सर्पिलाकार स्तंभ आहे. त्याच्या शीर्षस्थानी कमळावर आसनस्थ ब्रह्मदेवाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आलेली आहे. त्या मूर्तीच्या वर छोटे छत्र आहे. या सर्पिल आकाराच्या ब्रह्मस्तंभावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. स्तंभाच्या शेजारी तुळशी वृंदावन आहे. दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. दगडाने भिंतीवर तयार करण्यात आलेल्या (म्यूरल) निसर्गचित्राने नटलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारातून दोन पायऱ्या चढून दर्शनमंडपात प्रवेश होतो. दर्शनमंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीतील देवडींमध्ये संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव यांच्या सुंदर मूर्ती आहेत. याशिवाय माता–पित्याचे मस्तक मांडीवर घेऊन त्यांची सेवा करणारा आणि विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाची मूर्ती हातात असलेला भक्त पुंडलिक हे येथील शिल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. दर्शमंडपातून सभामंडपात जाण्यासाठी नऊ पायऱ्या आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वारास दोन्ही बाजूंनी भिंतीत बसवलेले गोल स्तंभ आहेत. त्यांच्या शीर्षस्थानी हत्तींची शिल्पे व त्यावर महिरपी कमान आहे. या कमानीच्या भिंतीवर मयुरांची उठावशिल्पे आहेत व ललाटबिंबावर कृष्णाची मुखमूर्ती आहे.
मंदिराचा सभामंडप पेशवेकालीन वाड्यासारखा आहे. सभामंडप बंदिस्त प्रकारचा व दुमजली आहे. मधला भाग छतापर्यंत खुला व चारी बाजूंना वरच्या माडीचा बाल्कनीसारखा कठडे असलेला भाग, अशी त्याची रचना आहे. हा भाग सभामंडपाच्या सहा दगडी खांबांवर उभा आहे. सभामंडपात मध्यभागी मोठे झुंबर आहे. सभामंडपाचा मधला भाग खोलगट आहे. आत प्रवेश करताच समोर मध्यभागी होमकुंड आहे. सभागृहात सूर्यनारायण, लक्ष्मी यांच्यासह महान संत व ऋषी–मुनींच्या मूर्ती पाहायला मिळतात. समोर उजव्या बाजूला गणेश व डाव्या बाजूला महादेव यांच्या मूर्ती आहेत. या ठिकाणी समोरच विठ्ठल–रुक्मिणीच्या लहानशा सुंदर मूर्ती आहेत. सभामंडपातून तीन पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे देवदेवता आणि संताकडून आशीर्वाद घेतानाचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला स्वामी समर्थांचे सुंदर चित्र आहे. ही चित्रे सावंतवाडीचे चित्रकार दादा मालवणकर यांनी काढली आहेत. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरही विविध संत व देवदेवतांची शिल्पे आहेत.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालांची मोठ्या आकारातील शिल्पे, तर द्वारपट्टीच्या वरील भागात संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा लावलेली आहे. गर्भगृहात मध्यभागी वज्रपीठावर काळ्या पाषाणातील कटीवर कर असलेल्या विठ्ठल व रुख्मिणीच्या पाषाण मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्तींचे डोळे सोन्याचे आहेत. मूर्तींच्या मागच्या भागात सुंदर कलाकुसर करण्यात आलेले चांदीचे मखर आहे. १८५९ मध्ये या मूर्तीची स्थापना करण्यात आली असल्याचे मंदिरातील शिलालेखात म्हटले आहे. गर्भगृहास प्रदक्षिणा घालण्यासाठी अंतराळातून मार्ग आहे. प्रदक्षिणामार्गातील देवळ्यांमध्ये विविध देवतांच्या मूर्ती दिसतात. त्यामध्ये विष्णूच्या दशावतारांचे दर्शन घडते. या प्रदक्षिणा मार्गावर जागोजागी खिडक्या आहेत, त्यामुळे भरपूर प्रकाश व हवा खेळती राहते.
या मंदिराचा इतिहास असा सांगितला जातो की १७२५ मध्ये पाडगावकर नावाच्या वारकरी गृहस्थांनी हे मंदिर बांधले. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. दरवर्षी ते पंढरपूरची वारी करायचे. त्यांच्या नावानेच हे मंदिर ‘पाडगावकरांचे विठ्ठल मंदिर’ म्हणून ओळखले जात असे. पेशवाईच्या काळातील स्थापत्याची आठवण करून देणारे हे मंदिर जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. पूर्वी सावंतवाडी नावाचे संस्थान होते. अठराव्या शतकात खेम सावंत तिसरे हे सावंतवाडीचा राज्यकारभार चालवत असत. पाडगावकरांनी स्थापन केलेल्या या मंदिराचे खेम सावंत यांनी मोठा निधी देऊन नूतनीकरण केले. कोकणचे पंढरपूर या नावानेही हे मंदिर प्रसिद्ध आहे.
या मंदिरात सकाळी ६.१५ ते ८.१५ या वेळेत मनाचे श्लोक, रामरक्षा, दासबोध, सूर्यगायत्री यांचे वाचन, होमहवन व सौर्यसूक्त करून आरती केली जाते. त्यानंतर दुपारी १२.१५ वाजता हरिपाठ, एकनाथी भागवताचे वाचन करून हवन केले जाते. सायंकाळी ६.१५ वाजता पूजेत हरिपाठ, भगवद्गीता व ज्ञानेश्वरी वाचन झाल्यावर सर्व देवतांची पूजा केली जाते. प्रत्येक एकादशीला सकाळी, दुपारी, सायंकाळी व रात्री हरिपाठ, त्यानंतर कीर्तन व देवांची पालखी काढण्यात येते. दर महिन्याच्या कृष्ण अष्टमीला व अश्विन शुद्ध दशमीला सकाळी सप्तशती हवन होते. रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत दररोज सायंकाळी मंदिरात कीर्तन होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आषाढ शुक्ल द्वितियेपासून अखंड हरिनाम आणि वीणा सप्ताह आयोजित केला जातो. यावेळी येथे होणाऱ्या भजन स्पर्धेचे कोकणात आकर्षण आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्ह्यातीलही भजनी मंडळे भाग घेतात.