नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा या गावाची ‘विदर्भाचे पंढरपूर’ अशी ख्याती आहे. येथील चंद्रभागा नदी तीरावर असलेले विठ्ठल– रुक्मिणीचे मंदिर प्रसिद्ध असून दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त ३०० ते ३५० पायी दिंड्या व लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे येतात. त्यामध्ये आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू येथील भाविकांचाही समावेश असतो. १७४० मध्ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद आहे. ज्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन विठ्ठल–रुक्मिणी धापेवाडा येथे आले त्या कोलबा स्वामींचे मंदिरही येथे आहे.
धापेवाडा येथील मंदिराची आख्यायिका अशी की उमरेड तालुक्यातील बेला गावचे रहिवासी असलेले कोलबा स्वामी हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ३०० वर्षांपूर्वी ते बेला गावातून धापेवाडा येथे येऊन राहू लागले. गावातील मालगुजार (खोत / जमीनदार) उमाजी आप्पा खोलकुटे यांनी त्यांना आश्रय दिला. प्रत्येक वर्षी कोलबा स्वामी धापेवाडा येथून पंढरपूरची वारी करीत असत. वयोवृद्ध झाल्यामुळे त्यांना वारी करणे जमेनासे झाले म्हणून ते व्यथित झाले होते. पांडुरंगाने एकदा रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन सांगतले की मला भेटण्यासाठी आता तुला पंढरपूरला येण्याची गरज नाही. तुझ्याच गावात चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या बाहुलीत (विहिरीत) आम्ही आहोत. स्वप्नदृष्टांताप्रमाणे कोलबा स्वामी आणि उमाजी आप्पा यांनी विहिरीत शोध घेतला असता तेथे त्यांना विठ्ठल व रुक्मिणीच्या मूर्ती सापडल्या. त्यानंतर त्यांनी मंदिर बांधण्याचे काम हाती घेतले. १७४० मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर १७४१ मध्ये ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला या मूर्तींची मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला विठ्ठलाची रथ यात्रा निघते.
पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भक्तांसाठी दर वर्षी गुरुपौर्णिमेला पांडुरंग धापेवाडा या ठिकाणी येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. चंद्रभागा नदीच्या तीरावर असलेल्या या मंदिराला तटभिंती आहेत. तटभिंतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर नामदेव पायरी असून तेथून पुढे गेल्यावर मंदिराच्या आवारात प्रवेश होतो. मुख्य मंदिर संपूर्ण दगडी बांधकामाचे असून सभामंडप व गाभारा अशी त्याची रचना आहे. मुख्य मंदिर जमिनीपासून काहीसे उंचावर आहे. येथील सभामंडप हा खुल्या प्रकारातील आहे. गाभाऱ्यात चांदीच्या मखरात विठ्ठल व रुक्मिणीच्या स्वयंभू मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात महादेव, श्रीदत्त, हनुमान व भक्त पुंडलिक यांची मंदिरे आहेत, तर मंदिराच्या आवाराच्या शेजारी दुर्गा मातेचे मंदिर आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीला आतील बाजूस ओवऱ्या असून त्यामध्ये उत्सवाच्यावेळी भाविकांना थांबता येते.
मंदिरासमोरून वाहणाऱ्या नदीचे नावही पंढरपूरप्रमाणे चंद्रभागाच आहे. पूर्ववाहिनी असलेली ही नदी मंदिराजवळ मात्र उत्तरवाहिनी होते. पुढे ती सावनेर तालुक्यातील पाटण सावंगीजवळ कोलार नदीला मिळते. विठ्ठलाचे दर्शन घेण्याआधी भाविक या नदीत स्नान करतात. येथे स्नान केल्याने पंढरपूरच्या चंद्रभागेत स्नान केल्याचे व या मंदिरात ३ वाऱ्या केल्यास पंढरपूरला केलेल्या एका वारीइतके पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
विठ्ठल मंदिराच्या शेजारी संत कोलबा स्वामी यांचे समाधी मंदिर आहे. कोलबा स्वामी मठाच्या मठाधिपतींकडून वसंत पंचमीला स्वामींच्या समाधीचे पूजन करण्यात येते. स्वामींचे गुरू धर्मशेट्टीबाबा रंगारी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वसंत पंचमीला येथे हजारो भाविकांची उपस्थिती असते. या दिवशी गावातील प्रमुख मार्गाने दिंडी काढण्यात येते. तसेच आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. आषाढी पौर्णिमा, वसंत पंचमी आणि रथ यात्रा (ज्येष्ठ शुद्ध द्वादशी) या तीन दिवशी येथे यात्रा असते. एसटी महामंडळातर्फे त्यासाठी कळमेश्वर, मोहपा, काटोल, सावनेर व नागपूर येथून विशेष बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात येते.
विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडा मंदिरात स्वयंभू विठ्ठल–रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य शासनाकडून या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब‘ दर्जा देण्यात आला आहे. (ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी वर्षाला ४ लाखांहून अधिक भाविक येतात, अशा देवस्थानाला राज्य शासनाकडून तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्राप्त होतो. त्या दर्जानुसार येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयी–सुविधांसाठी वेळोवेळी शासनाकडून निधी उपलब्ध होतो.)