विठ्ठल-रखुमाई मंदिर

श्री क्षेत्र वैष्णवगड, ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैष्णवगडावर विठ्ठल-रखुमाईचे एक सुंदर मंदिर आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराप्रमाणेच येथे नित्यपूजा-अर्चा पार पडते. हे मंदिर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील अनुयायांसाठी मोठे श्रद्धेचे केंद्र आहे. राजस्थानातील धौलपूर येथील प्रसिद्ध बलुआ दगडाचा वापर करून, नागर स्थापत्यशैलीतील हे भव्य मंदिर तीन एकर परिसरात लोकवर्गणीतून साकारण्यात आले आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला जाऊ न शकणारे जिल्ह्यातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. संपूर्ण परिसर यावेळी हरिनामाने दुमदुमून जातो.

वारकरी धर्माचा प्रसार व प्रचारासाठी आयुष्य वेचलेल्या ह.भ.प. त्र्यंबक पर्वतराव सानप गुरुजी (नाना) यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारण्यात आले आहे. आध्यात्मिक क्षेत्राबरोबरच शिक्षणक्षेत्रातही भरीव योगदान देणाऱ्या सानप गुरुजींचा जन्म २६ ऑगस्ट १९३९ रोजी झाला. कुशाग्र बुद्धी लाभलेल्या सानप गुरुजींचा बालपणापासूनच आध्यात्मिकतेकडे ओढा होता. बालपणीच वारकरी संप्रदायाची माळ गळ्यात घालणारे सानप गुरुजी हे अंढेरा (ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा) येथे आजोळी वाढले. त्यांचा संत वाङ्मयाचा गाढा अभ्यास होता. ते उत्तम गुणांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले; मात्र घरच्या परिस्थितीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही.

एके दिवशी गाडगे महाराजांचे शिष्य शंकर महाराज नागरे हे वर्गणी जमवण्यासाठी अंढेरा येथे आले होते. त्यांनी पंढरपूर येथे वंजारी समाजाची धर्मशाळा व मागासवर्गीयांसाठी वसतिगृह असल्याची माहिती दिली. त्यांच्या सांगण्यावरून सानप गुरुजी पंढरपूरला गेले. चंद्रभागा नदीपात्रात स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर ते दिवसभर हरिनाम करत. कालांतराने त्यांना बारामती तालुक्यातील ढाकाळे येथे शिक्षकाची नोकरी लागली. या गावात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देतानाच त्यांनी ग्रामसुधारणेची अनेक कामे केली. तेथे त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्याचेही कार्य केले. पुढे त्यांची बदली बारामती तालुक्यातील खामगळवाडी येथे झाली. खामगळवाडी हे गाव आळंदी ते पंढरपूरदरम्यान वसलेले आहे. पंढरपूरला जाताना अनेक वारकरी त्यांच्याकडे येत. सानप गुरुजी पंढरपूरला जाणाऱ्या पालखी सोहळ्यांमध्येही सहभागी होत. कालांतराने त्यांनी परिसरात गाथा पारायणाचे सप्ताह सुरू केले. यासाठी त्यांनी एकदा गंगूकाका शिरवळकर फडाचे मालक तुकारामबुवा शिरवळकर यांना निमंत्रित केले. १९६७ ते १९७६ या कालावधीत त्यांनी परिसरात वार्षिक नामसप्ताह सुरू केले. वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करत त्यांनी अनेक वारकरी घडवण्यासोबतच दिंडीमार्गात पंगतीसाठी अनेक दातेही तयार केले. गंगूकाका शिरवळकर फडाच्या माध्यमातून त्यांनी परिसरात आध्यात्मिक कार्य सुरू ठेवले. दरम्यानच्या काळात त्यांची बदली बुलडाणा तालुक्यातील केळवद, बायगाव (बुद्रुक), धोत्रा नंदाई आदी ठिकाणी झाली. धोत्रा नंदाई येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कारही मिळाला. धोत्रा नंदाई येथे त्यांनी १४ वर्षे काम केले. या काळात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आणि शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शनही केले. हे कार्य करत असतानाच त्यांनी परिसरात एकादशी मंडळ स्थापन करून येथेही वार्षिक नामसप्ताह सुरू केले. १९९१ मध्ये पळसखेड चक्का येथे झालेल्या सप्ताहाचे स्वरूप मोठे होते. त्यानंतर भविष्यात एकाच ठिकाणी नामसप्ताह व्हावा, या हेतूने त्यांनी वैष्णवगड येथे विठ्ठल मंदिर उभारण्याचा संकल्प केला. त्यासाठी गावोगावी हिंडून लोकवर्गणी जमा केली. या वर्गणीतून मंदिर उभारण्यात आल्यानंतर २ मार्च २०१७ रोजी येथे विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अल्पावधीतच या मंदिराचा तालुक्याचे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून लौकिक झाला. राज्य सरकारने या मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.

सिंदखेड राजा-मेहकर या महामार्गावरील सावखेड तेजनपासून तीन किमी अंतरावर वैष्णवगड आहे. मंदिराला भव्य महाद्वार असून त्यावरील कोरीव कलाकुसर व शिल्पे लक्ष वेधून घेतात. या महाद्वारातून आत आल्यावर प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात डावीकडे गणेशाचे तर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. फरसबंदी केलेल्या प्रांगणात मध्यभागी उंच जोत्यावर विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर साकारले आहे. अकरा पायऱ्या चढून मंदिराच्या जोत्यावर प्रवेश होतो. या पायरीमार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या कठड्यांवर सोंड उंचावलेल्या गजराजांची आकर्षक शिल्पे आहेत.

तीन मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. संपूर्ण मंदिरावर सुंदर कलाकुसर केलेली आहे. सभामंडपातील स्तंभांच्या वरच्या भागात सूरसुंदरींच्या मूर्तींसह विविध शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपातील वितानावर सुंदर नक्षीकाम आहे. सभामंडपात एका चौथऱ्यावर गर्भगृहाकडे मुख असलेले गरुडदेवाचे शिल्प आहे, तर गर्भगृहासमोर कासव शिल्प आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची द्वारपट्टी तसेच आसपासच्या भागातही सुंदर कलाकुसर केलेली आहे. द्वारस्तंभांवर द्वारपाल कोरलेले आहेत. प्रवेशद्वाराच्या पायथ्याजवळ कीर्तिमुखे कोरलेली आहेत. गर्भगृहात मोठ्या संगमरवरी पीठासनावरील संगमरवरी मखरात विठ्ठल-रखुमाईच्या सुंदर मूर्ती विराजमान आहेत. या मंदिराचे तिन्ही मुखमंडप आणि सभामंडपावर वरच्या दिशेने निमुळती होत जाणारी चौकोनी स्तरांची शिखरे आहेत. या शिखरांवर आमलक व कळस आहेत. गर्भगृहाच्या शिखरावर अनेक लहान-लहान शिखरांच्या प्रतिकृती आहेत. त्याच्या शीर्षभागी द्विस्तरीय आमलक व कळस आहे.

पंढरपूर येथील मंदिराप्रमाणेच येथील दैनंदिन पूजा-अर्चा केली जाते. वर्षभर येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी या कालावधीत येथे मोठा उत्सव होतो. हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सप्ताहादरम्यान काकडा आरती, गाथाभजन, वाल्मीकि रामायण कथा, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होतात. काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता करण्यात येते. या सप्ताहादरम्यान दररोज महाप्रसादाचे वाटप केले जाते.

आषाढी तसेच कार्तिकी एकादशीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पहाटे मान्यवरांच्या हस्ते अभिषेक व महापूजा झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात होते. हजारो भाविक ‘विठू माऊली’चा जयघोष करत रांगेत उभे राहून दर्शन घेतात.

आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यातील विविध भागांतून येथे सुमारे ८० दिंड्या येतात. यावेळी आलेल्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येते. दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी परिसरात भक्तनिवास बांधण्यात आले आहे.

उपयुक्त माहिती:

  • सिंदखेड राजा येथून ९ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ८० किमी अंतरावर
  • सिंदखेड राजा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८२२३७१६७७

विट्ठल-रखुमाई मंदिर

श्रीक्षेत्र वैष्णवगढ़, ताल. सिंदखेड राजा, जिला. बुलढाणा

Back To Home