महाराष्ट्रातील आध्यात्मिक संस्कृतीचे प्रतीक बनलेले विठ्ठल आणि मल्हारीमार्तंड हे मूळचे येथील गवळी-धनगर या गोपजनांचे देव. या दोन देवांप्रमाणेच बिरदेव हा दक्षिण भारतातील धनगरांचा देव आहे. विठ्ठल हा बिरदेवाचा अभिन्न सहकारी आहे. विठ्ठल-बीरप्पा या जोडनावाने त्यांचा उल्लेख केला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली हे या विठ्ठल-बिरदेवाचे प्रमुख ठाणे आहे. भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत, धनगरी ढोल-कैताळांच्या निनादात येथे भरणारी विठ्ठल-बिरदेवाची यात्रा हा एक मोठा उत्सव असतो. यात्रेच्या वेळी होणारी ‘भाकणूक’ अर्थात भविष्यकथन ऐकण्यासाठी येथे लाखो भाविकांची मांदियाळी जमते.
धनगर समाजाचे आराध्यदैवत आणि अठरा पगड जातीच्या लोकांचे श्रद्धास्थान असलेला बिरदेव हा विरुबा, विरोबा, बिरप्पा किंवा विरूपा, वीरण्णा या नावांनीही ओळखला जातो. ‘श्री विठ्ठल बिरदेव माहात्म्य कथासार’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत थोर संशोधक रा. चिं. ढेरे सांगतात की दक्षिणेतील अनेक प्रख्यात राजकुळे गवळी-धनगर समाजातून उदयाला आली आहेत. या राजकुलांच्या पुढाकाराने त्यांच्या मूळच्या दैवतांचे वैभव अनेक ठाण्यांत वाढले. ते देव उच्च समजल्या जाणाऱ्या समाजातील देवांचे रूप व चरित्र पावले. विठ्ठलाचा विष्णू-कृष्णरूप श्रीविठ्ठल झाला. मैलाराचा शिवरूप मल्लारि झाली आणि अनेक ठाण्यांत वीरभद्राचा बिरदेव झाला. वीरशैव धर्माच्या प्रभावकाळात धनगरांचे समूह जेव्हा वीरशैव बनले, तेव्हा त्यांचा बिरप्पा शिवपरिवारातील वीरभद्र या देवाचे स्वरूप पावला.
उत्तर कर्नाटकातील यडूर या ठिकाणी असलेले वीरभद्राचे जागते-गाजते क्षेत्र हे मूळचे बिरदेवाचे ठाणे आहे, तर विजयनगर साम्राज्याच्या उत्तरपर्वात निर्माण झालेले, स्थापत्य व मूर्तिशिल्प या दोन्ही दृष्टींनी जगभर गाजलेले लेपाक्षीचे वीरभद्र मंदिर हे मूळचे विठ्ठल-बिरप्पाचे ठाणे आहे. पट्टणकोडोली हेही विठ्ठल-बिरदेवाचे एक प्रमुख ठाणे मानले जाते. ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील हातकणंगले तालुक्यात आहे. ‘मराठी विश्वकोशा’त हातकणंगले या नावाविषयी अशी आख्यायिका नमूद करण्यात आली आहे की पूर्वी येथील एका व्यक्तीने तैलदिव्य म्हणजे उकळत्या तेलामध्ये आपले हात बुडवून आपण निष्पाप आहोत असे दाखवण्याचे दिव्य केले होते. त्यावरून या गावास हातकणंगले हे नाव पडले. पट्टणकोडोली या गावाचे जुने नाव इंगळकोडोली असे आहे. येथील विठ्ठल-बिरदेव मंदिर प्राचीन आहे. विजापूरच्या आदिलशाहाने येथील मंदिरास जमीन दान दिली होती. ती जमीन देवमळा म्हणून ओळखली जाते. या मळ्यातील विहिरीचे पाणीच पवित्र जल म्हणून मंदिरातील पूजेसाठी वापरले जाते.
या बिरदेवाची जन्मकथा तसेच माहात्म्य यांचे वर्णन ‘श्री विठ्ठल बिरदेव माहात्म्य’ या ग्रंथात वर्णिले आहे. ‘सुंबरान मांडिलं’ या धनगरी ओव्यांतून गायली जाणारी आख्याने यांच्या आधारे दत्तात्रय बोरगावे आणि विठ्ठल ओमापुजारी या बिरदेव भक्तांनी हा ग्रंथ रचला आहे. त्यात अशी आख्यायिका सांगण्यात आली आहे की दक्षयज्ञाच्या वेळी शंकराचा अपमान झाल्याने दाक्षायणीने म्हणजेच पार्वतीने आत्मदहन केले. त्यामुळे क्रोधित झालेल्या शंकराने जटा आपटल्या व त्यातून वीरभद्राचा जन्म झाला. वीरभद्राने दक्षाचे धड उडवले. त्यावेळी दक्षपत्नीने वीरभद्राची करुणा भाकली. आपल्या पतीस जिवंत करावे, अशी याचना तिने केली. त्यास जिवंत कसे करावे याचा विचार करीत असताना वीरभद्रास जवळच मेंढ्या चारीत असलेला धनगर दिसला. त्याने मेंढीचे शिर दक्षाच्या धडास लावण्याचे ठरवले. त्यावेळी धनगराने वीरभद्राची प्रार्थना केली, ‘श्रेष्ठकुलात आपण अवतार घेतला म्हणून दक्षासारखे शिवनिंदक स्वतःला थोर समजतात. आपण आमच्या हीन कुळात अवतार घ्यावा व शिवनिंदक व दुष्टांचा संहार करावा.’ तेव्हा वीरभद्राने त्यास सांगितले की कलीयुगात मी धनगरकुलात जन्म घेईन.
पुढे नारदपुरातील राजा ध्रुवाइत याची कन्या गंगासूरवंती (गंगा-सरस्वती) हिच्या पोटी वीरभद्र म्हणजेच बिरदेवाने जन्म घेतला. मात्र तो पुत्र मातेजवळ राहू शकला नाही. नदीच्या शापामुळे त्याला वनात एका पाळण्यात घालून ठेवावे लागले. त्या शापाची अशी आख्यायिका आहे की आपली कन्या विवाह न होता गर्भवती राहिली आहे, या कारणाने गंगासूरवंतीच्या पित्याने तिच्या जेवणात विष कालवले. गर्भात असलेल्या बिरदेवांनी मातेला विषापासून वाचवले, पण उरलेले अन्न सूरवंतीच्या दासीने नदीत टाकले, त्यामुळे जलचर मृत झाले. माझी मुले तू मारलीस म्हणून तुझा मुलगा जन्माला आला की तुझ्यापासून दूर राहील, असा नदीने शाप दिला. त्यामुळे बिरदेवाला अरण्यात पाळण्यात ठेवले गेले. तेथे एकव्वा आणि तिच्या धाकट्या बहिणीने त्या बाळाला आपला भाऊ मानले व चिंचली येथे नेऊन त्याचा सांभाळ केला. अक्का म्हणजे बहीण, ती आई झाली म्हणून एकव्वाला मायक्का असे नाव पडले. बेळगावजवळ चिंचली येथे तिचे मंदिर आहे. पुढे काही वर्षांनी बिरदेवाचे त्याच्या मामेबहिणीशी लग्न झाले, पण तो संसारात रमला नाही. त्याने तपश्चर्या केली व विठ्ठलाला भावाच्या रूपात बोलावले. धनगरांना त्रास देणार्या दैत्यांचा दोघांनी मिळून नाश केला.
विठ्ठल व बिरदेव हे एनापूर, हुक्केरी, वढंगोल, सदलगा, दोनेवाडी, रेंदाळ, हुपरी, तळंदगे, वसगडे असा प्रवास करीत पट्टणकोडोलीला आले. या गावांमध्ये त्यांनी मुक्काम केला होता. त्यामुळे ती तीर्थक्षेत्रे मानली जातात. पट्टणकोडोली येथील एका माळावर त्यांनी वस्ती केली. येथेच विशाल अशा पटांगणात विठ्ठल-बिरदेवाचे भव्य मंदिर स्थित आहे.
उंच आवारभिंतीआड मोठ्या प्रांगणात हे मंदिर वसलेले आहे. एखाद्या राजस्थानी किल्ल्याचा महादरवाजा असावा असे या मंदिराचे महाद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे. ताशीव दगडी चिऱ्यांनी बांधलेल्या या महाद्वारातून आत येताच वाड्यासारख्या असलेल्या या मंदिराचे भव्य रूप समोर येते. आवारभिंतीस खेटून ओवऱ्या व अन्य इमारती आहेत. या ओवऱ्या गावोगावच्या धनगर समाजाने दिलेल्या निधीतून बांधण्यात आलेल्या आहेत. त्यांपासून काही अंतरावर मध्यभागी सभामंडप, अंतराळ आणि गाभारा अशी या मंदिराची संरचना आहे. गाभाऱ्यावर भव्य असे संगमरवरात बांधलेले शिखर आहे. सभामंडप लाकडी बांधणीचा, दगडी फरशांचा, खुल्या स्वरूपाचा आणि दुमजली आहे. मुख्य महाद्वारातून सभामंडपात प्रवेश होताना आतील बाजूस दोन्ही बाजूंना उंच चौथऱ्यावर मेंढ्यांची शिल्पे दिसतात. त्यांच्या बाजूलाच पुरुषभर उंचीचे दगडी दीपस्तंभ आहेत. येथे जवळच हनुमानाची देवळी आहे व त्यासमोर नंदीची मोठी पितळी मूर्ती आहे.
सभामंडपातून पाच पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना गदा, चक्र व शंखधारी द्वारपालांची शिल्पे आहेत. वरच्या बाजूस विठ्ठल-बिरोबा माहात्म्यातील विविध पौराणिक कथांची चित्रे लावलेली आहेत. शैव आणि वैष्णव संप्रदायाच्या महासमन्वयाचे प्रतीक असलेल्या या मंदिरात दोन गाभारे आहेत. डावीकडील गाभाऱ्यासमोर उंच चौथऱ्यावर नंदीची पितळी मूर्ती आहे. या चौथऱ्यालगत जमिनीवर बसवलेल्या शिळेमध्ये साष्टांग दर्शन घेत असलेल्या स्त्रीची प्रतिमा कोरलेली आहे. गाभाऱ्याचे प्रवेशद्वार कोरीव नक्षीकाम केलेल्या पितळी पत्र्याने मढवलेले आहे. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी पितळी कीर्तिमुख आहे. आत उंच वज्रपीठावर भगिरथीचे स्थान आहे. त्यामागे पितळी महिरप आहे व तेथे नागमूर्ती विराजमान आहे. भगिरथी ही विठ्ठलाची मानसकन्या मानली जाते.
उजवीकडे मंदिराचा मुख्य गाभारा आहे. या गाभाऱ्याचा दरवाजाही पितळी पत्र्याने मढवलेला आहे. तेथेही कीर्तिमुख व द्वारचौकटीच्या वरील दोन्ही बाजूंस पितळेच्या छोट्या अश्वमूर्ती आहेत. आत लाकडी कोरीवकाम असलेल्या मोठ्या कमानदार देव्हाऱ्यामध्ये विठ्ठल आणि विरोबाची पाषाण लिंगे आहेत. याच्या मागच्या बाजूस अश्वारूढ बिरदेवाची पितळी मूर्तीसह अश्वमूर्ती, नागमूर्ती, मेंढा, नंदी यांच्याही मूर्ती आहेत. या मंदिराच्या डावीकडील महाद्वारालगतच पाषाणांचे मंदिर आहे. त्याच्या भिंती तसेच शिखरावर येथील मूळ पुजारी नारायण गावडे, हेगडी प्रधान, संत तुकाराम आदी संतांची उठावशिल्पे बसवण्यात आली आहेत. मंदिराच्या आवाराच्या भिंतीवरही अशाच प्रकारे उठावशिल्पांच्या माध्यमातून विठ्ठल-बिरदेव यांच्या चरित्रातील काही प्रसंग चित्रांकित करण्यात आले आहेत.
या मंदिरात रोज सकाळ-संध्याकाळी पूजा-आरती केली जाते. मूळ पुजारी नारायण गावडे यांचे वंशज येथे परंपरेनुसार पूजा करतात. वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. यातील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे येथे अश्विन महिन्यात भरत असलेली महायात्रा. ‘विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात, काही टन भंडाऱ्याच्या मुक्तहस्ते उधळणीत आणि धनगरी ढोल-कैताळांच्या निनादात या सोहळ्यास प्रारंभ होतो. या यात्रेचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथे होणारी भाकणूक अर्थात भविष्यकथन. अंजनगावचे फरांदे महाराज ही भाकणूक सांगतात. पाऊसपाणी, रोगराईपासून राज्य आणि देशाचे राजकारण, अर्थकारण अशा विविध विषयांची भाकिते ते वर्तवितात. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून किमान सात ते आठ लाख भाविक येथे येतात. या काळात पट्टणकोडोलीतील हा अवघा मंदिर परिसर धनगरी ढोल, ओव्या, चांगभलंचा जयघोष यांनी निनादलेला असतो. भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीमुळे परिसरात सोन्यासारखी झळाळी प्राप्त झालेली असते. यात्रा काळात येथे ओवी गायनाची चढाओढ लागलेली असते. ढोलपथके, गजी नृत्य पथकेही मंदिरात आपली कला सादर करतात. विशेष म्हणजे लोकदैवतांच्या यात्रांमध्ये सहसा मांसाहार असला, तरी विठ्ठल-बिरोबाच्या येथील यात्रेत मांसाहार निषिद्ध असतो. या यात्रेत देशातील सर्वांत मोठा घोंगड्यांचा बाजार भरतो.