विष्णू मंदिर

कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

दक्षिण महाराष्ट्रात पेशवाईमध्ये प्रसिद्धीस आलेल्या पटवर्धन घराण्याच्या मिरज, सांगली, तासगाव, जमखंडी, मिरजमळा, बुधगाव आदी विविध शाखा क्रमाक्रमाने उत्पन्न झाल्या. कुरुंदवाड ही त्यातलीच एक होती. सुपीक जमीन, दुभदुभत्याचा सुकाळ, त्यामुळे बासुंदी, खवा, पेढे या मिठाईचा गोडवा असलेले आणि विविध क्षेत्रांत देश व जागतिक स्तरावर स्वकर्तृत्वाने आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या मातब्बरांचे खानदानी गाव ही कुरुंदवाडची ओळख आहे. इतिहासाबरोबरच धार्मिकदृष्ट्याही हे गाव महत्त्वाचे आहे. अनेक हिंदू व जैन मंदिरांचे सान्निध्य लाभलेल्या अशा या गावातच अठराव्या शतकातील सुप्रसिद्ध विष्णू मंदिर आहे.

येथील विष्णू मंदिरास राघवजी मंदिर असेही संबोधले जाते. संस्थानच्या काळात हे मंदिर बांधण्यात आले होते. या संस्थानचा इतिहास असा की हरिभट हा येथील पटवर्धन घराण्याचा मूळ पुरुष. त्यांचा तिसरा मुलगा त्र्यंबक हरी ऊर्फ अप्पा याने कुरुंदवाडची स्थापना केली. त्र्यंबक हरी हे अक्कलकोटच्या भोसले यांच्या पदरी होते. त्यांचे नेहमी कापशीला जाणे येणे असे. कुरुंदवाड हे मुळात कापशीच्या घोरपडे यांचे गाव होते; परंतु पैशांची आवश्यकता पडल्याने कापशीच्या राणोजी घोरपडे यांनी ते गाव त्र्यंबक हरी यांच्याकडे गहाण ठेवले. ते १७३३ मध्ये त्र्यंबक हरी यांना मिळाले. त्यांनी कुरुंदवाडच्या

वस्तीचा विकास केला. त्यांनी मराठा साम्राज्याची दक्षिण सीमा तुंगभद्रा नदीपर्यंत वाढवण्यास पेशव्यांना साह्य केले होते. त्यामुळे पेशव्यांनी १७७१ मध्ये त्यांना कुरुंदवाड व आसपासच्या प्रदेशाची जहागिरी दिली.

या मंदिरातील शिलालेखानुसार, श्रीमंत त्र्यंबक हरी यांचे नातू रघुनाथराव निळकंठ तथा दादासाहेब पटवर्धन यांनी इ.स. १७९५ मध्ये येथील विष्णू मंदिर बांधले. त्यामुळे या मंदिरास त्यांच्या नावाने राघवजी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. पुढे त्यांचे पणतू श्रीमंत रघुनाथराव केशव यांची पत्नी सीताबाईसाहेब यांनी १८८० मध्ये मंदिरास सभामंडप बांधला. येथील अनेक शिळांवर सीताबाईसाहेब यांचे नाव कोरलेले दिसते. मंदिर मोठ्या आवारात वसलेले आहे. या भोवती पूर्वी चारही बाजूंनी उंच दगडी आवारभिंत होती. आता ही भिंत तीन बाजूंनी दिसते. या प्रांगणात मध्यभागी हे मराठा कालखंडातील विशिष्ट वास्तुशैलीतील मंदिर उभे आहे. चौरसाकार दगडी शिळांनी बांधलेला गाभारा, त्याच्या छतावर चारी कोनांवर देवळ्यांसारखी छोट्या मनोऱ्यांची रचना आणि वर निमुळते होत गेलेले उंच गोलाकार शिखर अशी ही स्थापत्यरचना असते. यात शिखर चार ते पाच स्तरांचे असते. या स्तरांना भूमी असे म्हणतात. ते दगडात वा विटांमध्ये बांधलेले असते. त्यात अनेक देवकोष्टके असतात. त्यांत देवी-देवता तसेच संतांच्या मूर्ती चुनेगच्चीत कोरलेल्या असतात. शिखरावर मोदकासारखा आमलक आणि त्यावर कळस, गाभाऱ्यासमोर मोठा सभामंडप अशी मंदिर रचना साधारणतः सतराव्या-अठराव्या शतकातील मराठी मंदिरवास्तूंत दिसते. कुरुंदवाडचे विष्णू मंदिरही अशाच प्रकारचे आहे.

हे मंदिर उंच जगतीवर उभे आहे. येथे चारी बाजूंनी मंदिरास प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा ठेवलेली आहे. मंदिराचे बांधकाम दगडी आहे व त्यावरील उंच शिखर मात्र विटांमध्ये बांधलेले आहे. शिखरांवरील देवळ्यांत विष्णूचे दशावतार, गणेश, रिद्धी-सिद्धी आदी देवी-देवतांप्रमाणेच जैन मूर्तीही दिसतात. येथे आमलकाच्या खालच्या बाजूला चारही बाजूंनी आमलकांच्या छोट्या प्रतिकृती बसविलेल्या आहेत. कळसाचे एकूणच बांधकाम अत्यंत आकर्षक आहे.

मंदिराच्या समोर एका उंच मोठ्या चौथऱ्यावर सुरेखसे घुमटाकार देऊळ (गरुडमंडप) बांधलेले आहे. या देवळात गरुडाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. मूर्तीचे दोन्ही हात नमस्कार मुद्रेत आहेत. या देवळाजवळच पाषाणाचे तुळशी वृंदावन आहे. गरुड आणि तुलसी या दोन्ही वैष्णव परिवारातील देवता आहेत. गरुड हे विष्णूचे वाहन मानले जाते, तर तुलसी ही विष्णूपत्नी मानली जाते. देवउत्थनी एकादशीच्या दिवशी तुळशीचा विष्णूशी विवाह लावला जातो.

येथून सभामंडपाकडे जाण्यासाठी दगडी चिऱ्यांनी बनवलेली वाट आहे. सभामंडप दुमजली आहे व त्याचा खालचा मजला चांगलाच उंच आहे. या सभामंडपास प्रवेशद्वार नाही. तो पुढच्या बाजूने पूर्णतः खुल्या स्वरूपाचा आहे. त्याच्या दोन्ही बाजूंनी उंच भिंती आहेत. त्यांपासून आत काही अंतर सोडून सागवानी लाकडात कोरलेल्या सुरूदार स्तंभांची रांग आहे. येथे दोन्ही बाजूंनी पाच पाच स्तंभ आहेत. त्यांवर वरच्या बाजूला महिरपी काष्ठकमानी आहेत. छतावर मध्यभागी लाकडावर फुलांसारखी नक्षी आहे. मंडपात सर्वत्र फरशा बसवलेल्या आहेत. येथे एक षटकोनी आकाराचे खोलगट भुयार दिसते. त्याबाबत लोककथा अशा आहेत की या भुयारातून कुरुंदवाड घाटापर्यंत मार्ग आहे. काही जण असे सांगतात की येथून बाहेरील तुळशी वृंदावनापर्यंत मार्ग आहे, तर काहींच्या म्हणण्यानुसार हे यज्ञकुंड आहे.

सभामंडपातून पाच पायऱ्या उंचावर मंदिराचा उपसभामंडप आहे. तेथील काष्ठस्तंभ अत्यंत देखणे आहेत. त्यावर विष्णूस प्रिय असलेल्या कमळाच्या पाकळ्यांची नक्षी कोरलेली आहे. पुढे गर्भगृहास एकूण तीन दरवाजे दिसतात. त्यातील बाजूचे दोन बंद आहेत. मध्यभागी दगडाचीच द्वारचौकट आहे. त्यावर ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. गाभाऱ्यात उंच अधिष्ठानावर कोरीव नक्षीकाम असलेल्या लाकडी देव्हाऱ्यामध्ये विष्णू आणि लक्ष्मी यांच्या संगमरवरात कोरलेल्या मूर्ती आहेत.

या मंदिरात रोज सकाळ-संध्याकाळी भाविकांची मोठी गर्दी असते. एकादशी, दीपावली, गुढीपाडवा, विजयादशमी आदी सण व उत्सव, तसेच कीर्तनादी कार्यक्रम येथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या मंदिराचे स्थापत्य पाहण्यासाठी अनेक अभ्यासक आवर्जून येत असतात.

उपयुक्त माहिती

  • शिरोळपासून ९ किमी, तर कोल्हापूरपासून ४७ किमी अंतरावर
  • शिरोळ व कोल्हापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home