मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खोपोलीजवळील घाट सुरू होतो तेथेच प्रसिद्ध पेशवेकालीन विरेश्वर मंदिर आहे. या प्राचीन मंदिराची रचना हेमांडपंती धाटणीची आहे. अठराव्या शतकात मराठा साम्राज्याचे कर्तबगार मुत्सद्दी नाना फडणवीस यांनी या मंदिराची उभारणी केल्याची इतिहासात नोंद आहे. ब्रिटिश अधिकारी बिशप हेबर याने १८२५ साली या मंदिरावरून ‘तलाव व शंकराचे मंदिर असलेले सुंदर गाव’, असे खोपोलीचे वर्णन केले आहे, असा उल्लेख गॅझेटियरमध्ये आहे. पाताळगंगा नदीच्या तीरावर असलेल्या प्रसिद्ध गगनगिरी महाराज मठाच्या उजव्या बाजूला हे विरेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
नाना फडणवीस हे मराठा साम्राज्याचे धोरणकर्ते आणि न्यायप्रिय प्रशासक होते. त्यांच्या कार्यकाळात अठराव्या शतकात त्यांनी खोपोलीत हे विरेश्वर मंदिर उभारले. तशी नोंद मंदिराच्या भिंतीवर आहे. त्याचवेळी या मंदिराशेजारी भला मोठा तलाव बांधला. याचा परीघ साधारणतः एक किलो मीटर आहे. तलावाभोवती दगडी भिंती बांधलेल्या आहेत व आत उतरण्यासाठी शेवटपर्यंत पायऱ्या आहेत. या तलावास नाना फडणवीस तलाव या नावानेच ओळखले गेले. सध्या त्यास शंकर मंदिर तलाव असे संबोधले जाते. पुणे येथून पालीचा बल्लाळेश्वर व महड येथील वरदविनायकाच्या दर्शनासाठी पेशव्यांचे येणे-जाणे असायचे. घाट चढण्यापूर्वी काहीसा आराम मिळावा आणि भक्तीही साधली जावी, यासाठी त्यांनी या मंदिराची उभारणी केली होती.
खोपोली गावातील बस स्थानकापासून एक किमी अंतरावर हे मंदिर आहे. एका मोठ्या तलावाकाठी असलेल्या या मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणातील आहे. आवाराभोवती उंच तटभिंती आहेत. या तटभिंतीत असलेल्या कमानाकृती प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी सूर्यप्रतिमा कोरलेली आहे. याशिवाय प्रवेशद्वारावर जाळीदार कलाकुसरीचे नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराजवळ, बाहेरच्या बाजुला, एक भले मोठ दगडी जाते आहे. प्रांगणात मंदिराच्या उजवीकडे दगडी बांधणीतील तुळशी वृंदावन आहे. या प्रांगणात ठिकठिकाणी भाविकांना बसण्यासाठी दगडी बाकांची सुविधा आहे.
मंदिराचा आकार फार मोठा नसला तरी त्याची बांधणी अत्यंत सुबक आहे. चार फूट उंचीच्या अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराची नंदीमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी संरचना आहे. चार फूट उंचीच्या अधिष्ठानावर प्रदक्षिणा मार्ग सोडून आतील बाजूला चार दगडी स्तंभ असलेला नंदीमंडप आहे. या स्तंभांच्या मध्यभागी नंदीची अखंड काळ्या पाषाणातील वैशिष्ट्यपूर्ण कोरीव मूर्ती आहे. या नंदीचे पुढचे दोन्ही पाय दुमडलेले आहेत. मागचा डावा पाय त्याने पोटाखाली घेतला असून उजवा पाय गुडघ्यातून वाकवला आहे. त्याच्या अंगावर विविध अलंकार आहेत. गळ्यातून खांद्याच्या मागे बांधलेला तिनपदरी पट्टा आहे. त्यावर लहान घंटा ओवलेल्या दिसतात. या पट्ट्यावरील मुख्य तीन घंटा मोठ्या आकाराच्या आहेत. नंदीच्या कपाळावरही कोरीव नक्षीकाम आहे. नंदीमंडपातील चार स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीच्या आकारांनी जोडलेले आहेत. त्यावरील भागात छतावर बाशिंगी कलाकुसर आहे. छतावर मुख्य शिखराच्या चारही बाजूने लहान लहान शिखरे आहेत.
पाच पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. कमानीदार प्रवेशद्वाराच्या खालच्या बाजुला दोन किर्तीमुखे आहेत. येथील सभामंडप बंदिस्त स्वरुपाचा आहे. पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त या सभामंडपाला उत्तर व दक्षिण दिशेलाही आणखी दोन दरवाजे आहेत. सभामंडपात मध्यभागी काळ्या पाषाणातील कासवमूर्ती आहे. या मूर्तीच्या चारही बाजूने पाषाणातच पुष्प कोरलेले आहेत. सभामंडपाच्या गोलाकार वितानावर जटिल नक्षीकाम आहे. गर्भगृहातील दर्शनी भिंतीवरील देवकोष्टकांत उजवीकडे गणेशाची आणि डावीकडे हनुमानाची मूर्ती आहे. या दोन्ही मूर्ती काळ्या पाषाणातील व सुबक आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार नक्षीकामाने सुशोभित आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पर्णफुलांची नक्षी आहे. उत्तरांगावर जाळीदार नक्षीकाम आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराप्रमाणेच या प्रवेशद्वारावरही खालच्या बाजुला दोन किर्तीमुखे आहेत.
येथील गर्भगृह हे सभामंडपाच्या तुलनेत खोलगट आहे. काही पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात मध्यभागी जमिनीवर उंच अधिष्ठानावर विरेश्वर महादेवाची अखंड काळ्या पाषाणातील पिंडी आहे. या पिंडीशेजारी त्रिशूल व डमरू आहेत. उत्सवकाळात या पिंडीला चांदीचे अलंकार व मुखवट्याने सजविले जाते. गर्भगृहाच्या मागील भिंतीत असलेल्या देवकोष्टकात पार्वती मातेचे स्थान आहे. असे सांगितले जाते की येथील शिवपिंडीची स्थापना काशी येथील पुरोहितांकडून करण्यात आली होती. त्याचवेळी या मंदिराच्या पूजेच्या व देखभालीचा मान पेशव्यांनी येथील गुरव घराण्याला दिला होता.
मंदिराच्या शिखराची रचना अष्टकोनी व टप्प्याटप्प्याने अरुंद होणारी आहे. या शिखराच्या प्रत्येक स्तरात देवकोष्टके आहेत. शिरोभागी आमलक व त्यावर कळस आहे. मंदिराच्या प्रांगणातून शेजारी असलेल्या जलकुंडात उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. या कुंडात पवित्र स्नानासाठी अनेक भाविक येथे येतात. महाशिवरात्र हा येथील मुख्य उत्सव असतो. यावेळी मंदिर व परिसराची आकर्षक सजावट केली जाते. महाशिवरात्रीला मंदिरात अखंड शिवभजन, अभिषेक, रुद्रपाठ होतो. यावेळी मंदिर परिसराला जत्रेचे स्वरुप येते. महाशिवरात्रीला सायंकाळी निघणारी पालखी हे खोपोलीकरांसाठी विशेष आकर्षण असते. त्यात हजारो भाविक सहभागी होतात. याशिवाय हरतालिका, नागपंचमीसह श्रावण महिन्यातील सोमवारी येथे होणाऱ्या विशेष पुजेनिमित्त अनेक भाविक दर्शनासाठी येतात.