विमलेश्वर मंदिर

वाडा, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग

निसर्गसमृद्ध कोकणभूमीत विविध कलाविष्कारांनी नटलेली अनेक मंदिरे आहेत. त्यांची स्थापत्यशैली त्यांत असलेल्या मूर्तींवरील कोरीव काम अनेक अभ्यासक पर्यटकांना भुरळ घालते. याच पठडीतील विमलेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर देवगड तालुक्यातील वाडा या गावात आहे. जागृत देवस्थान वेगळ्या धाटणीची स्थापत्यरचना यामुळे हे देवस्थान हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. साधारणतः ५० फूट उंच ३२५ फूट लांब अशा कातळ खडकात ते कोरलेले आहे. येथील स्वयंभू शिवलिंग काशीविश्वेश्वराचे प्रतिरूप असल्याची मान्यता आहे.

आकाशाकडे झेपावणारे उंचच उंच माड पोफळीची झाडे, बाजूने झुळुझुळु वाहणारा झरा अशा निसर्गसमृद्ध शांत वातावरणात विमलेश्वर महादेवाचे मंदिर स्थित आहे. एका आख्यायिकेनुसार, पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी एका रात्रीत या मंदिराची निर्मिती केली होती. प्राचीन शिल्पकलेचा सुंदर नमुना असलेले हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या अखंड कातळात कोरलेले आहे. रस्त्यापासून खालच्या बाजूस असलेल्या या मंदिरात ५० ते ६० पायऱ्या उतरून यावे लागते. मंदिराच्या समोरील बाजूस मोकळी जागा आहे त्यापुढे खाली वाहता झरा आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस कातळामध्ये माहुतांसह दोन विशाल हत्ती कोरलेले आहेत.

मंदिरासमोर ११ दीपस्तंभ आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात पाच शिल्पे आहेत, त्यांना पंचतत्त्वांची प्रतिके मानली जातात. यापैकी मध्यभागी असलेली तीन शिल्पे ही ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची तर उर्वरित दोन गरुड आणि हनुमंताची आहेत. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे येथील ब्रह्मा एकमुखी आहे, तर शंकर जटा सोडून खाली बसलेल्या अवस्थेत आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आणि शिखराचा भाग हा नंतर सिमेंट काँक्रीटने बांधलेला आहे. जमिनीपासून आठ पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश होतो. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या कातळात कोरलेल्या मंदिराची रचना आहे. येथील सभामंडपात बाजूने नक्षीकाम केलेले मोठे स्तंभ आहेत. मंदिरात काळोख असल्याने तेथे कायम वटवाघळांचा वावर असतो. येथून पुढे अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ एका चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. येथे नंदीकडून कौल घेतले जाते.

साधारणतः शंकराच्या मंदिरातील गर्भगृह हे जमिनीशी समतल वा काहीसे खोलवर असते; परंतु या मंदिरातील गर्भगृह हे उंचीवर असून १२ ते १३ पायऱ्या चढून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात मध्यभागी भूतलावर विमलेश्वर महादेवाची पिंडी आहे. असे सांगितले जाते की देशातील हे अत्यंत दुर्मिळ मंदिर आहे, जेथे नंदी खाली आणि शिवपिंडी उंचावर आहे. विशेष म्हणजे या शिवपिंडीवर कोरीव नक्षीकामही आहे. या शिवपिंडीवर दररोज अभिषेक केला जातो. पिंडीवर कितीही जलाभिषेक केला तरी ते पाणी तेथेच मुरून जाते, हेही येथील वैशिष्ट्य समजले जाते.

या मंदिर परिसरात अनेक वीरगळ, सतीशिळा तसेच वीरसतीगळ मांडून ठेवलेल्या आहेत. या शिळांमध्ये युद्धप्रसंगांचे संकेत दिसतात. यातील स्त्रीपुरुष प्रतिमांच्या तत्कालीन वस्त्रभूषा, अलंकार यांवरही प्रकाश पडतो. महिलांच्या अधोवस्त्रास पुढच्या बाजूने असलेला सोगा, पुरुषांच्या अंगावरील चोळणा, घट्ट धोतर या बाबी त्यातून प्रकर्षाने दिसतात.

या शिळांच्या शेजारी काळभैरवाचेही दगडात कोरलेले मंदिर आहे. चिंचोळ्या दरवाजातून आत गेल्यावर तिथे एक शिवपिंडी दिसते. विमलेश्वराच्या मंदिरात जाण्याआधी काळभैरवाच्या मंदिरात दर्शन घेण्याची येथ पद्धत आहे. काळभैरव गुहेच्या समोर मोठे तुळशी वृदांवन आणि या तुळशी वृंदावनाच्या समोर एक गणपती मंदिर आहे. मंदिराच्या खालच्या बाजूला एक झरा आहे बाराही महिने तो वाहत असतो. मंदिराशेजारी असलेल्या लेण्यांच्या दगडातून अनेकदा पांढरा गोंदासारखा द्रव पाझरतो, त्यास बोलीभाषेतपाषाणअसे म्हटले जाते. या पाषाणाच्या उपयोगाने दमा या आजारात आराम पडतो, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.

या मंदिरात दोन वार्षिक उत्सव पार पडतात. त्यापैकी एक त्रिपुरारी पौर्णिमा. या दिवशी मंदिरासमोरील दीपस्तंभांवर दिवे प्रज्वलित केले जातात. तर दुसरा मुख्य उत्सव महाशिवरात्रीचा असतो. तो माघ कृष्ण दशमी ते अमावास्येपर्यंत चालतो. माघ कृष्ण दशमीला विमलेश्वराची पालखी मंदिरात आणली जाते. दशमीपासून अमावस्येपर्यंत रोज रात्री पालखीसोबत भाविक मंदिराला प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा घातल्यावर कीर्तनाचा कार्यक्रम असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. त्या दिवशी ग्रामदैवत रवळनाथाचे तरंग मंदिरात आणले जातात. मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा घातली जाते. मंदिरात दिवसभर भजनाचे कार्यक्रम सुरू असतात. अमावास्येच्या दिवशी सकाळी पालखीसह लोक समुद्रस्नानासाठी जवळ असलेल्या फणसे येथील किनाऱ्यावर जातात. रात्री लळिताच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होते.

देवगड तालुक्यातील वाडा हे गाव पूर्वीपासून अडकित्त्यांसाठी (सुपारी कापण्याचे लहानसे यंत्र) प्रसिद्ध आहे. याशिवाय भारतीय संस्कृती कोशाचे जनक पंडित महादेवशास्त्री जोशी, कथाकादंबरीकार श्रीपाद काळे अभिनेत्री पल्लवी जोशी यांचेही हे मूळ गाव होय.

उपयुक्त माहिती

  • देवगडपासून १४ किमी, तर विजयदुर्गपासून १८ किमी अंतरावर
  • देवगड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home