विमलेश्वर महादेव मंदिर

मरळक, ता. नांदेड, जि. नांदेड

नांदेड जिल्ह्याला सुमारे २५०० वर्षांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इसवीसन पूर्व पाचव्या शतकातील नंद घराण्याच्या सत्तेपासून ते इसवीसनाच्या तेराव्या शतकातील यादव घराण्याचे राज्य येथे होते. या जिल्ह्यात धार्मिक स्थळांची विविधता आहे. नांदेड शहरातील गुरुद्वारा, देगलूर येथील होट्टल मंदिर, मालेगाव येथील खंडोबा मंदिर, माहुरगडची रेणुका माता अशी अनेक प्रसिद्ध मंदिरे जिल्ह्यात आहेत. यापैकीच एक असलेले मरळक येथील विमलेश्वराचे प्राचीन मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील विमलेश्वर महादेवाचे स्थान जागृत आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

असे सांगितले जाते की हेमाडपंती शैलीचे दगडी बांधकाम असलेले हे प्राचीन मंदिर तेराव्या शतकातील आहे. या मंदिराचा उल्लेख रामायण व महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथात आढळतो. मंदिराबाबत आख्यायिका अशी की प्रभू श्रीराम आपल्या गुरूंची आज्ञा घेऊन बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी निघाले, तेव्हा ते या शिवलिंगाचे दर्शन घेऊन पुढे गेले. प्रत्यक्ष प्रभू श्री रामाने दर्शन घेतले असल्याने या शिवमंदिराचे प्राचीनत्व सिद्ध होते व त्यास विशेष महत्त्व प्राप्त होते. मंदिराच्या प्रांगणात असलेल्या कुंडात कासव सोडल्याने नवस पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.

रस्त्यालगत असलेल्या मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. मंदिराला भक्कम तटबंदी आहे. तटबंदीत समोरील बाजूला एक आणि डाव्या व उजव्या बाजूला दोन अशी एकूण तीन मोठी प्रवेशद्वारे आहेत. ही प्रवेशद्वारे किल्ल्यांच्या महाद्वारासारखी भासतात. रस्त्यापेक्षा व प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या या प्रवेशद्वारांच्या मागे-पुढे प्रत्येकी दहा पायऱ्या आहेत. या प्रवेशद्वारांना रस्त्याकडील व मंदिराकडील बाजूस प्रत्येकी दोन गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. या स्तंभांवर तुळई व त्यावर छत आहे. मंदिरासमोरील असलेल्या प्रवेशद्वाराच्या छतावर मंदिराकडे मुख असलेले महाकाय नंदीशिल्प आहे. या प्रवेशद्वाराच्या आत पहारेकरी कक्ष व वितानावर चक्राकार नक्षी आहे. छतावर गोपुर पद्धतीचे तीन थरांचे शिखर आहे. शिखराच्या पहिल्या थरात उभ्या शिखरांची मंदिर शिल्पे म्हणजे ‘कुट’ व आडव्या शिखरांची मंदिर शिल्पे म्हणजेच ‘शाल’ आणि दुसऱ्या थरात उरूश्रूंगी शिखरे आहेत. तिसऱ्या थरात घुमट, त्यावर आमलक व कळस आहे. या प्रवेशद्वारांतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात काही प्राचीन मेघडंबरी व इतस्ततः प्राचीन शिवपिंडी दिसतात.

प्रशस्त प्रांगणात स्टेनलेस स्टीलचे बॅरिकेड्स लावून रांगांचे व्यवस्थापन केले आहे. प्रांगणात असलेल्या प्राचीन महावृक्षांभोवती पार बांधलेले आहेत. मंदिराजवळ सुमारे ३२ फूट उंचीचा गोलाकार दगडी दीपस्तंभ आहे. दर सोमवारी या स्तंभावर दिवे प्रज्वलित केले जातात. मंदिराच्या प्रांगणात कलशाकृती कुंड आहे. याबाबत असे सांगितले जाते की येथील दीपस्तंभाचा वरचा शेंडा हलवला असता कुंडातील पाणी हलते व त्यातून बुडबुडे निघतात. या कुंडाची खोली सुमारे ४५ फूट आहे व ते तळाकडे निमुळते होत गेलेले आहे. कुंडातील पाण्यात विविध प्रकारची कासवे आहेत. कुंडास चहूबाजूंनी सुरक्षा कठडे व त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. कुंडातील दगडी बांधकाम असलेल्या भिंतींत देवकोष्ठके आहेत.

मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या मंदिराच्या मुखमंडपास समोरील बाजूला दोन नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभपाद चौकोनी व स्तंभदंड चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी, वर्तुळ अशा विविध भौमितिक आकारात आहेत. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी तीन नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. सभामंडपात बाह्य बाजूस कठडा आहे. सभामंडपात मध्यभागी वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. पुढे मंदिराचे अरुंद व बंदिस्त अंतराळ आहे. अंतराळात डाव्या व उजव्या बाजूच्या भिंतीत दीपकोष्ठके आहेत. वितानावर चक्राकार पाषाण नक्षी व झुंबर आहे.

पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. येथील द्वारशाखांवरील नक्षी अस्पष्ट झाली असली तरी स्तंभशाखा नक्षीदार आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व उत्तरांगावर शिखर नक्षी कोरलेली आहे. उंबरठ्यासमोर चंद्रशीला आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पंचफणी पितळी नाग व त्यावर जलधार धरलेले अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहाच्या वितानावर चक्राकार नक्षी आहे.

मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी सुमारे सहा फूट उंच कठडा आहे. त्यातील देवकोष्ठकांत शिव-पार्वती, गणपती, लक्ष्मी, नटराज, हनुमान, वीरभद्र, रेणुकाचार्य आदी देवदेवतांची शिल्पे आहेत. कठड्यावर कुट, शाल, स्तंभ, शिखर, पताका, ध्वज आदी नक्षी आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखरातील प्रत्येक थरात चारही बाजूंना देवकोष्ठके व त्यात देवप्रतिमा आहेत. देवकोष्ठकांवर शिखर, आमलक व कळस आहेत. मुख्य शिखराच्या प्रत्येक थरात कोनांवर स्तंभ नक्षी आहे. मुख्य शिखरात शीर्षभागी कमळदल नक्षी असलेले आमलक व त्यावर कळस आहे.

मंदिराच्या मागील बाजूस तटबंदीस लागून सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह व धर्मशाळेची दुमजली इमारत आहे. मंदिरात महाशिवरात्री व श्रावण मास हे मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यावेळी देवाची पालखी सजवून त्यात विमलेश्वर महादेवाचा मुखवटा ठेवला जातो. ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत हजारो भाविकांच्या उपस्थितीत ग्रामप्रदक्षिणा घालण्यात येते. वार्षिक उत्सवांच्या वेळी मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंदिरात दर सोमवारी तसेच पौर्णिमा व अमावस्या यांसारख्या दिवशी भाविकांची गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • नांदेड येथून १४ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून नांदेडसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात न्याहरीची सुविधा आहे, निवासाची नाही

विमलेश्वर महादेव मंदिर

मरालक, ता. नांदेड़, जिला. नांदेड़

Back To Home