व्यंकटेश बालाजी मंदिर
पतवीपुरा, अमरावती शहर, जि. अमरावती
अमरावती शहरातील पतवीपुरा या मध्यवर्ती भागात विष्णूंचे स्वरूप असलेल्या श्री व्यंकटेश बालाजीचे मंदिर वसले आहे. विदर्भातील वैष्णव संप्रदायाचे आणि तिरुमला तिरुपती देवस्थानच्या भक्तांचे हे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. दाक्षिणात्य द्रविड मंदिर स्थापत्यशैलीत उभारलेले हे देवालय परिसरातील भाविकांसाठी नित्य उपासनेचे केंद्र आहे. दररोज चालणारे विविध शास्त्रोक्त पूजाविधी आणि बालाजीच्या दर्शनासाठी भाविकांची येथे नेहमीच गर्दी असते. वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या ब्रह्मोत्सव, वैकुंठ एकादशी आणि रथयात्रेच्या निमित्ताने विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे दर्शनासाठी येतात.
अमरावती शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अमरावती जिल्हा गॅझेटिअर तसेच जुन्या ऐतिहासिक नोंदींनुसार, प्राचीन काळी या परिसरात औदुंबराची म्हणजेच उंबराची विपुल झाडे असल्यामुळे या वस्तीला ‘उदुंबरावती’ असे नाव पडले. या नावाचे प्राकृत रूपांतर ‘उमरावती’ असे झाले आणि कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन अमरावती हे नाव रूढ झाले. स्थानिक परंपरेनुसार, शहरातील प्राचीन अंबादेवीच्या मंदिरावरूनही या परिसरास अमरावती हे संबोधन मिळाले. अमरावतीच्या प्राचीन अस्तित्वाचा ऐतिहासिक पुरावा इसवी सन १०९७ मधील भगवान आदिनाथांच्या संगमरवरी मूर्तीच्या पाषाणचौथऱ्यावर कोरलेल्या शिलालेखात मिळतो. चौदाव्या शतकातील भीषण दुष्काळानंतर हा परिसर काही काळ ओसाड झाला होता. परंतु इसवी सन १७२२ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी अमरावती आणि बडनेराची जहागीर राणोजी भोसले यांच्याकडे सोपवली. त्यानंतर या शहराचा पुनर्विकास होऊन या शहरास ‘भोसल्यांची अमरावती’ म्हणून ओळख मिळाली. ऐतिहासिक जुन्या वऱ्हाड म्हणजेच बेरार प्रांतात प्रशासकीय व व्यापारी केंद्र म्हणून नावारूपास आलेल्या याच शहराच्या मध्यवर्ती भागात हे बालाजी मंदिर उभारण्यात आले आहे.
पौराणिक मान्यतेनुसार, कलियुगात भक्तांच्या कल्याणासाठी आणि संकटनिवारणासाठी भगवान विष्णूंनी तिरुमला पर्वतावर व्यंकटेश्वराचा अवतार धारण केला. ‘स्कंद पुराणा’तील ‘वेंकटाचल माहात्म्य’ या खंडात या अवताराचे आणि तिरुमला क्षेत्राचे सविस्तर माहात्म्य विशद केलेले आढळते. पृथ्वीतलावरील भक्तांच्या उद्धारासाठी प्रगट झालेले हे स्थान कलियुगातील वैकुंठ मानले जाते. याच वैष्णव परंपरेनुसार अमरावतीतील या मंदिरात बालाजीची नित्य आराधना चालते. मंदिराच्या मुख्य सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर ‘वैकुंठम’ अशी नामपाटी लावली आहे, जी भक्तांना भूलोकीच्या वैकुंठाची प्रचिती देते.
अमरावतीच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या स्थानिक वैष्णव भाविकांनी आणि व्यापारी समाजाने एकत्र येऊन या मंदिराची स्थापना केली.
भाविकांना स्थानिक पातळीवरच तिरुपती बालाजीच्या दर्शनाची व शास्त्रोक्त पूजनाची सुविधा लाभावी, हा या स्थापनेमागील मुख्य हेतू होता. मंदिराचा कारभार सुव्यवस्थित चालावा म्हणून ‘श्री व्यंकटेश बालाजी ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली. या विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार करण्यात आला असून मूळ दाक्षिणात्य स्थापत्य परंपरेचे जतन करत मंदिर संकुलाचा विस्तार करण्यात आला. भाविकांच्या वाढत्या संख्येचा विचार करून सभामंडप, दर्शन रांगा आणि अनुष्ठान कक्षांची पुनर्रचना करून परिसरास सध्याचे सुसज्ज रूप देण्यात आले आहे.
मंदिराची वास्तुकला पूर्णपणे दाक्षिणात्य द्रविड शैलीवर आधारित आहे. मंदिराच्या बाह्य भिंतींवरील देवकोष्टकांमध्ये कालियामर्दन करणाऱ्या श्रीकृष्णासह विष्णूंच्या दशावतारांची शिल्पे साकारली आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे बहुमजली गोपुरम असून त्यावर विविध देवीदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या गोपुराच्या प्रवेशद्वाराजवळ मारुतीची मूर्ती स्थापित आहे. गोपुरातून आत प्रवेश केल्यावर मोकळ्या प्रांगणात एक उंच पितळी ध्वजस्तंभ दृष्टीस पडतो. ध्वजस्तंभाच्या बरोबर मागे दर्शनमंडप आहे. सभामंडपात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. या सभामंडपात गरुड आणि हनुमानाच्या मूर्ती हात जोडलेल्या मुद्रेत आहेत.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर कोरीव दगडी द्वारशाखा आहेत. मुख्य गर्भगृहात काळ्या पाषाणातील श्री व्यंकटेश्वराची चतुर्भुज मूर्ती आहे. या मूर्तीच्या मस्तकावर सोनेरी मुकुट आहे. पाठीमागील दोन हातांत शंख आणि सुदर्शन चक्र कोरलेले आहे. पुढील उजवा हात खालील बाजूस झुकलेल्या वरद (वैकुंठ) मुद्रेत आहे, तर डावा हात कमरेवर ठेवलेला आहे. मूर्तीला वस्त्रालंकारांनी शृंगारले जाते. मुख्य गर्भगृहाच्या उजवीकडील उपगर्भगृहात महालक्ष्मीची मूर्ती आहे, तर डावीकडील उपगर्भगृहात पद्मावती मातेची मूर्ती स्थापित आहे. पद्मावतीच्या मूर्तीमागे एक सोनेरी प्रभावळ आहे. गर्भगृहावर द्रविड पद्धतीचे विमान शिखर असून त्यावर कळस आहे.
मंदिराची दैनंदिन दिनचर्या तिरुमला देवस्थानच्या परंपरेनुसार अत्यंत काटेकोर आणि शास्त्रोक्त पद्धतीने चालते. श्री व्यंकटेश बालाजी ट्रस्टच्या वेळापत्रकानुसार, पहाटे ५:३० वाजता सुप्रभातम्,
विश्वरूप दर्शन आणि प्रभात मंगल आरतीने दिनक्रमाची सुरुवात होते. सकाळी ७:३० वाजता आराधना विधी पार पडतो, तर सकाळी ९:१५ ते ११:१५ या वेळेत भाविकांसाठी अर्चना आणि दर्शन खुले असते. सकाळी ११:३० वाजता राजभोग अर्पण केला जातो. त्यानंतर ११:३० ते ४ या वेळेत मंदिर शयनविश्रांतीसाठी बंद ठेवले जाते. सायंकाळी ४ वाजता उत्थापनाने मंदिराची कवाडे पुन्हा उघडली जातात. सायंकाळी ६:३० वाजता संध्या आरती आणि रात्री ९:३० वाजता शयन दर्शन आरती करून मंदिर दर्शनासाठी बंद होते. दर शुक्रवारी सकाळी ७ वाजता मुख्य व्यंकटेश पाषाणमूर्तीवर विशेष ‘तिरुमंजन’ म्हणजेच पंचामृत महाअभिषेक संपन्न होतो.
मंदिरात रामनवमी, गोकुळाष्टमी, दसरा, वैकुंठ एकादशी आणि ब्रह्मोत्सव यांसारखे सण उत्साहाने साजरे केले जातात. त्यामध्ये वार्षिक ब्रह्मोत्सव हा मंदिरातील सर्वांत प्रमुख उत्सव मानला जातो. ब्रह्मोत्सवादरम्यान शहरात भगवान व्यंकटेश बालाजींची मोठी रथयात्रा काढली जाते. ही रथयात्रा पतवीपुरा, जयस्तंभ चौक आणि अमरावतीच्या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करते. त्यामध्ये हजारो भाविक सहभागी होतात. वैकुंठ एकादशीच्या दिवशी मंदिरात वैकुंठद्वारातून दर्शन घेण्याची विशेष परंपरा पाळली जाते. या धार्मिक सोहळ्यांशिवाय मंदिर परिसरात ‘संत श्री गजानन महाराज गुरुकुल’ यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत दररोज सात्त्विक आणि मिष्टान्न भोजनाची अन्नदान योजना चालवली जाते.
उपयुक्त माहिती
- अमरावती रेल्वे व एसटी बस स्थानकापासून २.५ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक शहरांतून अमरावतीसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध
