पौराणिक आख्यायिकेनुसार भृगू ऋषींच्या आशीर्वादामुळे पृथ्वीवर भगवान विष्णूंनी घेतलेला अवतार म्हणजे बालाजी होय. दक्षिणेकडे व्यंकटेश, वेंकट, पेरुमल, श्रीनिवास या नावांनीही ओळखला जाणारा बालाजी हा पंढरपूरच्या विठ्ठलाचा समधर्मी देव मानला जातो. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशाप्रमाणेच बालाजी राजस्थान तसेच महाराष्ट्रातीलही अनेकांचे कुलदैवत आहे. या व्यंकटेश बालाजीचे सुमारे सव्वादोनशे वर्षांपूर्वीचे मंदिर वाळकेश्वर टेकडीवरील बाणगंगा तीर्थाजवळ वसले आहे. ‘उघड्या डोळ्यांच्या बालाजीचे मंदिर’ म्हणून ते ओळखले जाते. याचे कारण दक्षिणेतील मंदिरांप्रमाणे येथे बालाजीच्या मूर्तीचे नेत्र झाकून ठेवलेले नाहीत.
व्यंकटेश बालाजीबाबतची पौराणिक आख्यायिका अशी की सत्ययुगात ऋषी-मुनींच्या तपाचे फळसंचित कोणत्या देवाला द्यावे, याबाबत परीक्षा घेण्याकरिता भृगू ऋषी भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी गेले. देवाची परीक्षा घेण्यासाठी भृगू ऋषींनी विष्णूंच्या छातीवर लाथ मारली. तेव्हा विष्णूंच्या हृदयात वास करणारी लक्ष्मी रागावून देवलोक सोडून पृथ्वीवर आली. भगवान विष्णूंनी भृगू ऋषींच्या पायाला श्रम पडले म्हणून त्यांचे पाय कुरवाळले आणि त्यांच्या पायाला असलेल्या गर्वाच्या डोळ्याचा नाश केला. तेव्हा भृगू ऋषींनी सर्व संचितफळ विष्णूंना अर्पण केले आणि “कलियुगात पृथ्वीवर प्रत्येक याचकाच्या इच्छा तू पूर्ण करशील,” असा आशीर्वाद दिला. त्यानंतर भगवान विष्णू पृथ्वीवर बालाजी रूपात स्थापित होऊन भक्तांच्या इच्छा पूर्ण करू लागले.
पंढरपूरचा विठ्ठल आणि तिरुपतीचा व्यंकटेश हे दोघेही विष्णूंच्या पुराणप्रसिद्ध अवतारांशी अथवा रूपांशी संबंध नसणारे तरीही विष्णुरूप पावलेले आहेत. विठ्ठल हा बाळकृष्ण मानला जातो, तर व्यंकटेश हा बालाजी या नावाने ओळखला जातो. विठ्ठलाची पत्नी राधेचे निमित्त सांगून दिंडीरवनात रुसून बसली होती, तर व्यंकटेशाची पत्नी भृगूने केलेला अपमान पतीने सोसल्यामुळे चिडून प्रथम करवीरात आणि नंतर तिरुचानूरमध्ये दूर वेगळी राहिली. व्यंकटेश बालाजी हा विठ्ठलाप्रमाणेच डावा हात कटीवर ठेवून उजव्या हाताने भक्तांना वरदान देत असतो. हा व्यंकटेश बालाजी वसई, विरार आणि नायगाव परिसरातील कोळीबांधवांचे कुलदैवत आहे. व्यंकटेश बालाजीचे मंदिर बाणगंगा तलावाच्या पूर्वेकडील कोपऱ्यामध्ये वसले आहे.
बाणगंगेचा हा तलाव प्राचीन काळापासून येथे आहे. ‘महिकावतीच्या बखरी’त त्याचा उल्लेख आढळतो. मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब यांनी इ.स. ११४२ मध्ये मुख्य प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी यांना मुंबई बेटे सर करण्यासाठी पाठवले होते.
त्यांनी वालुकेश्वरापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. बखरीतील मूळ उल्लेख पुढीलप्रमाणे आहे, “येसाव्या पासुन जुहु। यावत् वाहिनळे। राजण फार पाहोन वाळुकेश्वरी गेले। बाणगंगा देखिली। हनुमानप्रतिमा लक्षिली। तेथे स्थिर जाले दिवस ५।” याचा अर्थ असा की बाळकृष्णराव सोमवंशी वेसावे, जुहू येथून वाळुकेश्वर व बाणगंगेला आले. या भागात त्यांनी पाच दिवस वास्तव्य केले. या तलाव-तीर्थाबाबत काही पौराणिक आख्यायिका आहेत. ‘ज्ञानोदय’ या वृत्तपत्रात इ.स. १८६०-६१ च्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या आख्यायिकेनुसार प्रभू श्रीराम लक्ष्मणासह लंकेकडे जात असताना या ठिकाणी आले होते. येथे त्यांनी वालुकेश्वराचे लिंग स्थापन केले. त्यावेळी श्रीरामांना तहान लागली असल्यामुळे त्यांनी भूमीत बाण मारून जल निर्माण केले. अन्य एका कथेमध्ये बाणगंगा तलावाची निर्मिती भृगुकच्छ म्हणजेच भरुचपासून केरळपर्यंतच्या भूमीचे निर्माते मानल्या गेलेल्या आणि विष्णूंचे सहावे अवतार असलेल्या परशुरामांनी केली. महेंद्रगिरीवर राहत असताना परशुरामांनी स्वतःला थोडासा भूप्रदेश देण्याची विनंती समुद्राला केली. मात्र समुद्राने ती अव्हेरल्याने क्रोधित होऊन त्यांनी बाण मारून उत्तरेकडील कच्छपासून कन्याकुमारीपर्यंत समुद्र मागे हटवला. त्यातून सहा योजने रुंद आणि चारशे योजने लांब असा भूप्रदेश निर्माण झाला.
या भूप्रदेशाला ‘सप्तकोकण’ असे म्हणतात. या सप्तकोकणात केरळ, तुलंग, सौराष्ट्र, कोकण, करहाट, कर्नाट आणि बर्बर यांचा समावेश होतो. परशुरामांनी मारलेल्या चौदा बाणांपैकी एक बाण सध्या वाळुकेश्वर टेकडी असलेल्या ठिकाणी पडला. त्यामुळे येथे हे पवित्र तीर्थ निर्माण झाले. श्रीराम किंवा परशुराम यांनी बाण मारून हे तीर्थ निर्माण केल्यामुळे याला बाणगंगा असे म्हणतात. पूर्वी याला ‘बाणतीर्थ’ किंवा ‘पाताळगंगा’ असेही म्हटले जात असे.
या तीर्थाच्या परिसरात वेगवेगळ्या काळात सोळा मोठी मंदिरे तसेच काही मठ स्थापन झाले. व्यंकटेश बालाजीचे मंदिर हे त्यांतील एक महत्त्वाचे व जुने मंदिर मानले जाते. या मंदिराची स्थापना इ.स. १७८९ मध्ये रामशंकर भवानीशंकर दवे यांच्या इच्छेनुसार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्या काळात वाळकेश्वराचा हा डोंगर अगदी ओसाड होता. येथे काही ठिकाणी गायीगुरांसाठीचे गौचरण होते. काही लोक येथे वालपापडी, वांगी, गवार आणि काकडीचे पीक घेत असत. गोविंद नारायण माडगांवकर यांच्या ‘मुंबईचें वर्णन’ (इ.स. १८६३) मधील माहितीनुसार अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात येथे दिवसा-उजेडी जाण्यासही लोक घाबरत असत. अशा ठिकाणी रामा शेणवी लोटलीकर यांच्या मालकीची काही जागा होती. त्यांनी ती आपले परममित्र असलेल्या दवे यांना देणगीपत्राद्वारे दिली. दवे हे बालाजीचे परमभक्त होते. येथे बालाजीचे मंदिर बांधावे अशी त्यांची इच्छा होती. दवे यांनी नेमलेल्या दोन विश्वस्तांनी त्यांची ही इच्छा पूर्ण केली. पुढे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेब्रुवारी २००५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
बाणगंगा तलावालगत एका छोट्या टेकडावर हे मंदिर स्थित आहे. नऊ पायऱ्या चढून या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणाला साधेसे चौरसाकार प्रवेशद्वार आहे. त्याच्या बाजूला आवारभिंतीवर द्वाररक्षकाचे उठावशिल्प आहे. या प्रांगणात उजवीकडे उंच चौथऱ्यावर आठ स्तरांचा अष्टकोनी दीपस्तंभ तसेच गरुड आणि सिद्धिविनायकाची देवळी आहे. येथील गरुडाची मूर्ती वीरासनात नागावर बसलेली आहे. सिद्धिविनायकाच्या देवळीत गणेश आणि रिद्धी-सिद्धी यांची एकाच संगमरवरी पाषाणात घडवलेली मूर्ती आहे.
समोरच उंच जगतीवर बालाजीचे मराठाकालीन वाडा शैलीतील मंदिर आहे. सभामंडप, गर्भगृह आणि त्यावर द्विस्तरीय कलश असलेले घुमटाकार शिखर अशी या मंदिराची संरचना आहे. पाच पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. मंगळुरी कौलांचे छत, उंच आणि तळाशी बुटके कठडे असलेल्या उंच चौरसाकार खिडक्या, साधा लाकडी दरवाजा असलेल्या या प्रशस्त सभामंडपाच्या आत पेशवाई वाड्यासारखी लाकडाची रचना आहे. सभामंडपाच्या भिंतीपासून काही अंतरावर सागवानी ताशीव खांब,
त्यांच्यामध्ये महिरपी कमानी, खाली बुटके कठडे आणि वर लाकडी समतल छत अशी ही रचना आहे. त्यात मध्यभागी काचेचे झुंबर लावलेले आहे. समोरच बालाजीचे गर्भगृह आहे. त्याच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या डावीकडील देवकोष्ठकात हनुमानाची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. एरवीच्या मंदिरांमध्ये हनुमान हा गदाधारी असतो. येथे तो धनुर्धारी स्वरूपात आहे. उजवीकडील देवकोष्ठकात गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराच्या द्वारचौकटीच्या वर ललाटबिंबस्थानी गणेशाची छोटी कोरीव मूर्ती आहे. त्याच्या वरच्या भागात कीर्तिमुख आहे. गर्भगृहात भिंतीलगत असलेल्या उंच संगमरवरी अधिष्ठानावर घुमटाकार देवळीमध्ये व्यंकटेश बालाजीची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या घुमटीच्या उजवीकडे छोट्या घुमटीमध्ये अंबामातेची व्याघ्रारूढ, खड्गधारी मूर्ती विराजमान आहे. मुख्य घुमटीच्या डाव्या बाजूस बालाजीची छोटी पितळी मूर्ती आहे. येथील व्यंकटेश बालाजीची मूर्ती दक्षिण भारतातून आणण्यात आली होती. व्यंकटेश बालाजीच्या दाक्षिणात्य मंदिरांमध्ये बालाजीच्या मूर्तीच्या कपाळापासून डोळ्यांपर्यंत शुद्ध कापराच्या इंग्रजी ‘व्ही’ आकाराच्या पट्ट्या लावलेल्या असतात. याबाबत असे सांगितले जाते की बालाजीचे नेत्र नेहमी उघडे असतात. या तेजस्वी नेत्रांमध्ये प्रचंड ऊर्जा असते.
त्या ऊर्जेमुळे संपूर्ण विश्व भाजून निघण्याची शक्यता असते. तसे होऊ नये म्हणून विशिष्ट प्रकारचा कापूर लावून ते झाकले जातात. याविषयी आणखी एक स्पष्टीकरण असे देण्यात येते की बालाजीचे पद्मनयन अत्यंत सुंदर असतात. ते पाहून भाविक एवढे भारावून जातील की मूर्तीपुढून निघण्याचे नावच घेणार नाहीत. म्हणून ते झाकले जातात. केवळ नेत्रदर्शनाच्या वेळी तो कापूर बाजूला काढला जातो. त्यावेळी बालाजीचे नेत्र भाविकांना पाहता येतात. या मंदिरात मात्र या मूर्तीचे नेत्र सदैव उघडे आहेत. हे या मंदिराचे वैशिष्ट्य असल्याचे सांगण्यात येते.
या मंदिरात सकाळी ६ ते रात्री ८ या कालावधीत भाविक देवदर्शन घेऊ शकतात. शुक्रवार हा व्यंकटेश बालाजीचा वार मानला जातो. त्यामुळे अनेक भाविक खास करून या दिवशी मंदिरात दर्शनासाठी येतात. प्रतिवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच घटस्थापनेच्या प्रारंभदिनी मंदिराच्या वार्षिक उत्सवास प्रारंभ होतो. अश्विन शुद्ध एकादशी हा बालाजीचा वाढदिवस मानला जातो. या दिवशी उत्सवाची सांगता होते. या काळात मंदिरात विधिवत षोडशोपचार पूजा, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या उत्सवात अगदी वसईपासूनचे कोळीबांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. या मंदिराचा कारभार मुंबई उच्च न्यायालयाच्या ४ ऑक्टोबर १९२७ च्या आदेशानुसार राज्य सरकारने नेमलेल्या शासकीय विश्वस्तांद्वारे पाहिला जातो.