वीर मारुती मंदिर (समर्थस्थापित)

बत्तीस शिराळा, ता. शिराळा, जि. सांगली

तरुणांमध्ये बळ आणि ध्यैर्य वाढून ते राष्ट्र उभारणीत सक्रीय सहभाग घेऊ शकतील, या उद्देशाने समर्थ रामदासांनी सातारा, सांगली कोल्हापूर जिल्ह्यांत शक्तीचे प्रतिक असलेल्या मारुतीची अकरा ठिकाणी स्थापना केली होती. हिच मंदिरे पुढे समर्थस्थापित अकरा मारुती म्हणून प्रसिद्ध झाली. त्यापैकी एक महत्त्वाचे स्थान सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे आहे. शके १५७६ म्हणजेच .. १६५५ मध्ये रामदास स्वामींनी येथे मारुती मंदिराची स्थापना केली होती. या मारुतीस वीर मारुती म्हणून ओळखले जाते. हा मारुती नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

सतराव्या शतकात आस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे समाजास आत्मग्लानी आली होती. ‘जे युगीं देव धर्म बुडाले। अवघे येकंकार जालें। सत्य जातीनसीं हारपलें। स्वधर्मासकट।।म्हणजे देवधर्म बुडाले, सत्य हरपले, सबगोलंकार अशी समाजाची धर्मस्थिती झाली. अशा या समाजाचा उद्धार करावा, लोकांमध्ये ज्ञान भक्तीप्रमाणेच बलोपासनेची आवड निर्माण करावी या हेतूने समर्थ रामदास स्वामींनी दासबोध, मनाचे श्लोक आदी ग्रंथांची रचना केली. त्याच बरोबर, या हेतूने त्यांनी येथे अनेक राममंदिरे हनुमान मंदिरे स्थापन केली. समर्थ रामदास स्वामी हे श्रीरामास आपले गुरू मानत असत, तर हनुमान हे त्यांचे कुलदैवत होते. समर्थांनी एका षट्‌पदीतहनुमंत आमुची कुळवल्लीअसे म्हटले आहे

आपल्या या कुलदैवताची आणि भक्ती शक्तीची देवता असलेल्या मारूतीची ११ मंदिरे त्यांनी स्वहस्ते स्थापन केली. समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म .. १६०८चा. १६१९ मध्ये, वयाच्या अकराव्या वर्षी चिंता करतो विश्वाची असे म्हणणाऱ्या नारायण ठोसर अर्थात रामदास स्वामी यांनी लग्नातून पलायन केले. यानंतर त्यांनी संपूर्ण उत्तर भारतात तीर्थाटन केले. १६४० मध्ये वयाच्या ३२व्या वर्षी ते त्यांच्या जन्मगावी जांब येथे परत आले. त्यानंतर पुन्हा चार वर्षे दक्षिणेकडे तीर्थाटन करून ते १६४४ मध्ये सातारा परिसरात आले. कराड तालुक्यातील मसूर, शहापूर, उंब्रज चरेगाव असे ते कृष्णातीरी भ्रमण करीत असत. या परिसरात म्हणजे १६४४ ते १६५४ या १० वर्षांत त्यांनी ही ११ मारूती स्थाने स्थापिली. समर्थांच्या शिष्या वेणाबाई या मूळच्या मीरजच्या. त्यांनी त्यांच्या एका अभंगात या मारुतींची माहिती दिली आहे, ती अशी

चाफळामाजीं दोन उंब्रजेसी येक पारगांवीं देख चौथा तो हा

पांचवा मसूरी शहापुरीं साहवा। जाण तो सातवा शिराळ्यांत॥

सिंगणवाडीं आठवा मनपाडलें नववा। दहावा जाणावा माजगांवीं॥

बाह्यांत अकरावा येणें रीति गावा। सर्व मनोरथा पुरवील॥

वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास। कीर्ति गगनांत नसमाये॥

यावरून बत्तीस शिराळा येथे समर्थांनी ११ पैकी सातवा मारूती स्थापन केल्याचे स्पष्ट होते. याबाबत सदाशिव खंडो आळतेकर या समर्थभक्तांनी १९३३ साली लिहिलेल्याश्रीसमर्थचरित्रया संशोधनपर ग्रंथात असे म्हटले आहे कीशिराळे येथील देशपांडे प्रभृती बऱ्याच मंडळींनी समर्थांचा अनुग्रह घेतला. त्यांनी विनंती केल्यावरून तेथे मारूतीची स्थापना करून पूजाअर्चेचे काम देशपांडे यांना सांगितले.’ रस्त्यापासून काहीशा उंचावर असलेल्या टेकडीवरील या मंदिराच्या प्रांगणात जाण्यासाठी सुमारे २५ पायऱ्या आहेत. या मंदिरास चारी बाजूंनी भक्कम आवारभिंत आहे. या आवारभिंतीत असलेल्या अरुंद प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराला लागून एक प्राचीन वीरगळ आहे. येथील सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा (गूढमंडप) आहे. सभामंडपाची छताकडील बाजू गजपृष्ठ आकारातील आहे छताच्या मध्यभागी चक्राकार नक्षी आहे. पुढे चार स्तंभ त्यावर तीन कमानी असलेले मंदिराचे अंतराळ आहे. अंतराळातील प्रदक्षिणा मार्गात डाव्या उजव्या बाजूला प्रवेशद्वारे आहेत. अंतराळात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीजवळ स्थानिक देवतांच्या प्राचीन मूर्ती आहेत.

पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर खाली कमळ फुलांची नक्षी वरील बाजूस उभ्या धारेची नक्षी आहे. ललाटबिंबावर गणपती मंडारकावर कीर्तीमुख शिल्प आहे. गर्भगृहात वज्रपीठावर मारुतीची सुमारे सात फूट उंचीची पाषाणातील शेंदुरचर्चित उभी मूर्ती आहे. मूर्तीच्या कटीचे वस्त्र, कंबरपट्टा त्यातील घंटा बारीक कलाकुसरीसहीत कोरलेल्या आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूस स्तंभ त्यावरील कमानीवर पानफुलांची नक्षी आहे. गर्भगृहात मूर्तीच्या दोन्ही बाजूस गवाक्ष आहेत. त्यातून सकाळी सायंकाळी मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात.

मंदिराच्या छतावर चहूबाजूने कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखरातील प्रत्येक थरात देवकोष्टके, शीर्षभागी कमळदल नक्षी असलेले आमलक त्यावर कळस आहे. प्रांगणात आवारभिंतीला लागून पूजा साहित्याची काही दुकाने आहेत. या मंदिरात हनुमान जयंती हा मुख्य उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी देवाची पालखी मिरवणूक काढण्यात येते. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात. याशिवाय मंदिरात चैत्र पाडवा, रामनवमी श्रावणी सोमवारी उत्सवांचे आयोजन केले जाते. दर शनिवारी मारुतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.

उपयुक्त माहिती

  • शिराळा बस स्थानकापासून पायी पाच मिनिटांवर
  • सांगलीपासून ५४ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून शिराळासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : राहुल देशपांडे, पुजारी, मो. ९४२३२७२३४३
Back To Home