वटेश्वर महादेव मंदिर

खानापूर, ता. पातूर, जि. अकोला

पातूर तालुक्यातील खानापूर येथील वटेश्वर महादेव मंदिर हे महाराष्ट्रातील निजामशाहीपूर्वीचे शिवालय आहे. ६२५ वर्षांपूर्वीचा ज्ञात इतिहास असलेल्या या मंदिरातील शिवलिंगावर महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्याची किरणे पडतात. अनेक आक्रमणे झेललेल्या या मंदिराच्या शिखरामधील गुप्त खोलीत ग्रामस्थ संकटप्रसंगी मौल्यवान दागिने तसेच महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवत असत. महाशिवरात्रीच्या दिवशी होणाऱ्या उत्सवाप्रसंगी या प्राचीन मंदिराचा परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून जातो.
पातूर शहरापासून चार किमी अंतरावर असलेले खानापूर या गावात वटेश्वर महादेवाचे मंदिर स्थित आहे. असे सांगितले जाते की मंदिरानजीक असलेल्या वटवृक्षावरून येथील महादेवाला ‘वटेश्वर महादेव’ असे नाव पडले आहे. निसर्गरम्य परिसर लाभलेल्या या मंदिराला चारही बाजूंनी तटबंदी आहे. आजही भक्कम स्थितीत असलेल्या या तटबंदींच्या विटा जोडण्यासाठी सिमेंट किंवा चुन्याचा वापर न करता उडीद व गुळाचे मिश्रण वापरण्यात आलेले आहे. आतील भागात बांधलेल्या पायऱ्या चढून या तटबंदीवर चारही बाजूंनी फिरता येत असे. या तटबंदीवर पूर्वी गोमुखाचा आकार असलेले अनेक दगड कोरण्यात आले होते. त्यापैकी आता काहीच शिल्लक आहेत. या तटबंदीला आतील भागात लागून असलेल्या ओवऱ्यांमध्ये पूर्वी भाविकांसाठी निवासाची सोय केली जात असे.
या मंदिराला पूर्वाभिमुख व उत्तराभिमुख अशी दोन प्रवेशद्वार आहेत. पूर्वेकडील प्रवेशद्वार मोठ्या आकाराचे आहे. पूर्वेकडील कमानीदार प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या भिंतींत दोन्ही बाजूला द्वारपाल कक्ष आहेत. प्रांगणात मंदिरासमोर एका मोठ्या चौथऱ्यावर, वर निमुळता होत जाणारा दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभाच्या वरच्या भागात मोठा दीप आहे. उत्सवांच्या प्रसंगी हा दीप प्रज्ज्वलित करण्यात येतो. वटेश्वर महादेवाचे मंदिर उंच अधिष्ठानावर बांधण्यात आलेले आहे. पाच पायऱ्या चढून या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोचता येते. या अधिष्ठानावर प्रदक्षिणा मार्ग सोडून मंदिराची रचना आहे. प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखांवर दोन्ही बाजूला दोन दोन दीपकोष्टके आहेत. कमानीकार प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो.
सभामंडपात मोठमोठे स्तंभ आहेत. हे सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीसदृश्य कलाकुसरींनी जोडलेले आहेत. सभामंडपातील चार स्तंभांच्या मध्यभागी जमिनीवर एका कमी उंचीच्या चौथऱ्यावर दोन प्राचीन नंदीमूर्ती आहेत. त्यापैकी एक नंदी मोठ्या आकाराचा आहे. या दोन नंदीमूर्तींच्या मध्यभागी एक लहानशी नंदीमूर्ती व त्यासमोर शिवपिंडी आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या स्तंभशाखांवर दीपकोष्टके व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात अखंड पाषाणातील प्राचीन शिवपिंडी आहे. गर्भगृहातील एका भिंतीवरील देवळीत शिवशंकरांची प्रसन्न मूर्ती आहे. येथे पार्वतीमातेचा मुखवटा तसेच इतर देव-देवतांच्या मूर्तीही आहेत.
मंदिरातील भिंतीत एका बाजूला एक खिडकी आहे. ती उघडल्यावर भिंतींमधून शिखराजवळ जाण्यासाठीचा अरुंद पायरीमार्ग आहे. अंदाजे दोन फूट रुंदीच्या या जिन्यातून एका वेळी केवळ एकच व्यक्ती वर जाऊ शकते. या पायऱ्यांची चढण कठीण आहे. या पायऱ्या चढताना दोन-तीन वेळा दिशा बदलावी लागते. छोट्या द्वारातून वर आल्यावर बाजूलाच या पायरी मार्गावर हवा खेळती राहण्यासाठी भिंतींमध्ये असलेली छिद्रे दिसतात. शिखरावर जाण्यासाठी आणखी काही पायऱ्या आहेत. शिखराजवळ एक गुप्त खोली आहे. या खोलीच्या प्रवेशद्वारातून जवळजवळ झोपूनच आत जावे लागते. ही खोली अंदाजे बारा फूट लांब व सात फूट उंच आहे. गावावर आक्रमण झाल्यास किंवा गावात दरोडा पडणार असल्याची माहिती मिळाल्यावर येथील श्रीमंत मंडळी या खोलीत घरातील मौल्यवान दागिने व महत्त्वाचे दस्तऐवज येथे लपवून ठेवत असत. संकटकाळी ग्रामस्थ या मंदिराचा आसरा घेत असत. या मंदिराच्या गर्भगृहावर मोठ्या आकाराचे घुमटाकार शिखर आहे. या शिखरावर द्विस्तरीय आमलक व कळस आहे. मंदिराच्या छतावर बाशिंगी कठडा आहे.
या मंदिराच्या मागील बाजूला दोन समाध्या आहेत. मखाराम पाटील आणि सखाराम पाटील या दोन भावांच्या या समाध्या असून त्यांच्याच पुढाकाराने हे मंदिर उभारण्यात आल्याचे सांगण्यात येते. उपलब्ध कागदपत्रांवरून हे मंदिर ६२५ वर्षांपूर्वीचे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर परिसरात मोठा उत्सव होतो. गावातील लहान-थोर मंडळी या उत्सवात सहभागी होतात. यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात येते.

उपयुक्त माहिती:

  • पातूर येथून ४ किमी अंतरावर
  • पातूर येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • पातूर येथे निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home